स्त्रीजगतात देशपातळीवर जशा असंख्य घटना घडल्या, घडत आहेत, तशाच किंबहुना जगव्यापी परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी घडत आहेत. स्त्रीचं जगणं त्यामुळे काही अंशी पण र्सवकष स्वातंत्र्याच्या दृष्टीने पुढे जाते आहे, उच्च पदांवर नियुक्त्या असो की आंदोलनांच्या मार्गाने न्याय मिळवणे असो, स्त्रीचा आवाज सशक्त होऊ लागला आहे. सरत्या वर्षांतील महत्त्वाच्या जागतिक घटनांचा धांडोळा घेताना, नवीन वर्षांतील तिचा आवाज अधिक बुलंद होणार यात काहीच शंका नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या लाखो घटना स्त्रीजगतासाठी महत्त्वाच्या असतात. भिन्न संस्कृतीत, भिन्न पाश्र्वभूमीवर घडलेल्या असूनही त्यांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पडसाद देशपातळीवर, अगदी गावपातळीवरही जाणवतात. कारण एखाद्या महत्त्वाच्या पदावर झालेली एका स्त्रीची निवड हा निव्वळ त्या संस्थेचा वा त्या स्त्रीचा गौरव नसून समस्त स्त्रीवर्गासाठी ती अभिमानाची बाब असते. तसेच सोशल नेटवर्किंग साइट्सवर छेडलेल्या एखाद्या #WhyIStayed  सारख्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद कुठल्या एका देशाच्या भौगोलिक सीमारेषांपुरता मर्यादित राहत नसून तो सर्वदूर पसरतो. म्हणूनच स्त्रियांशी निगडित २०१४ साली घडलेल्या अशाच काही घटनांचा हा धांडोळा –
यंदा अनेक महत्त्वाच्या पदांवरील नेमणुकांमध्ये स्त्रियांचे कर्तृत्व अधोरेखित झाले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्याचे आव्हान पेलण्यासाठी फेडरल रिझव्‍‌र्ह बँक या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा गेल्या १०० वर्षांत पहिल्यांदाच एका स्त्रीकडे सोपवण्यात आली. ६७ वर्षीय जेनेट येलेन यांची या पदावर फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच नेमणूक झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षपदी ख्रिस्तिन लेगार्ड यांच्या नियुक्तीपाठोपाठ येलेन यांची ही नेमणूक म्हणजे स्त्रियांच्या कार्यक्षमतेला दिलेली पावतीच होती. राजकारणातही अनेक महत्त्वाची पदे स्त्रियांच्या खाती जमा झाली असून ब्रिटिश मंत्रिमंडळात सईदा वारसी या मुस्लीम स्त्रीचा समावेश जगातील अनेक वृत्तपत्रांसाठी मुख्य मथळ्याची बातमी ठरली.
अरब देशांमध्ये पुराणमतवादी वातावरणाचा पगडा असताना, संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई दलात प्रवेश घेत पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला मरियम अल मन्सुरी हिने. सप्टेंबरमध्ये ‘इसिस’ या संघटनेविरुद्ध केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये एफ-१६ या लढाऊ विमानाची पायलट म्हणून तिने जबाबदारी पार पाडली; तर दुसरीकडे इराणी वंशाच्या लंडनस्थित गणितज्ञ मरियम मिर्झाखानी यांनी ‘फिल्ड मेडल’ या गणितातील नोबेल समजल्या जाणाऱ्या पुरस्कारावर नाव कोरत हा पुरस्कार पटकावणारी पहिली महिला होण्याचा बहुमानही मिळवला. मुस्लीम स्त्रियांची जागतिक स्तरावर तयार झालेली प्रतिमा विस्तारण्याचे काम निश्चितच या स्त्रियांनी केले आहे; तर रेव्हरंड लिबी जेन यांची चर्च ऑफ इंग्लंडच्या पहिल्या महिला बिशप म्हणून डिसेंबरच्या अखेरीस जाहीर झालेली नियुक्ती म्हणजे क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय आहे.
यासह वर्ष संपता संपता जाहीर झालेल्या मानाच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या नामांकनांमध्ये पहिल्यांदाच सवरेत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून एवा द्युवर्ने या कृष्णवर्णीय स्त्रीने स्थान पटकावले आहे. ‘सेल्मा’ या मार्टिन ल्युथर किंग यांनी १९६५ साली छेडलेल्या आंदोलनावर आधारित चित्रपटासाठी तिला नामांकन मिळाले आहे. गर्भपातासारख्या नाजूक विषयावर आलेला ‘ऑव्हिअस चाइल्ड’ हा हलकाफुलका चित्रपट पाश्चात्त्य देशांमधील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजला गेला. आयुष्याकडे हरहुन्नरी दृष्टीने बघणारी नायिका आयुष्यातला हा टप्पाही तितक्याच सहजतेने घेत प्रगल्भतेने, कुठेही उथळ न वागता निभावून नेते. आजच्या स्त्रीची खरीखुरी निर्णयक्षमता मांडणारा चित्रपट म्हणून त्याचं कौतुक करण्यात आलं.
तब्बल १६ वर्षांच्या प्रकाशनानंतर २००८ साली बंद पाडण्यात आलेले इराणमधील ‘झनन-ए-इमरुज’ हे स्त्रियांचे मासिक जून २०१४ पासून पुन्हा प्रसिद्ध करण्याचा संकल्प शाहला शेरकत या पत्रकार स्त्रीने सोडला. इराणी वंशाची लंडनस्थित पत्रकार मसीह अलिनेजाद हिने सुरू केलेल्या मोहिमेला इराणमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याच्या पाश्र्वभूमीवर हे मासिक पुनरुज्जीवित होत आहे. मसीहने इराणमधील महिलांचे हिजाबशिवायचे फोटो पोस्ट करत, ड्रेसकोडबाबतच्या ठोस भूमिका घेण्याची मोहीम हाती घेतली होती. त्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तिच्या फेसबुक पेजला साडेतीन लाख फॉलोअर्स मिळाले आहेत.
सोशल नेटवर्किंग साइट्समुळे महिलांच्या आंदोलनाला एक नवे व्यासपीठ मिळाले असले तरी त्याचा गैरवापर होण्याच्या घटनाही चालू वर्षी वाढल्याचे दिसले. अमेरिकेच्या फुटबॉल लीगचा खेळाडू रे राइस हा पत्नी जाने पाल्मर हिला मारहाण करणारा व्हिडीओ सोशल साइटवर अपलोड झाला आणि त्याच्या निषेध नोंदवणारी मोहीम उभी ठाकली. या प्रसंगानंतरही पाल्मर त्याच्यासह का राहते आहे, यावर आश्चर्य व्यक्त होत असताना ट्विटरवर WhyIStayed या हॅशटॅगखाली अनेक स्त्रियांनी आपल्याविरोधातील हिंसाचाराची घटना नोंदवत तरीही त्याच जोडीदारासह त्या का नांदत आहेत, याची कारणे नोंदवली. शोषणाची घटना किती गुंतागुंतीची असू शकते हे यातून दिसून आले. मुख्य म्हणजे एका घटनेने अनेक स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातील अन्याय वा वेदना मांडण्यासाठी सर्वव्यापी व्यासपीठ मिळाले. अनेक समस्या, आंदोलने व चळवळ उभारण्यासाठी सोशल नेटवर्किंगचे व्यासपीठ व्यापक स्वरूप धारण करू लागले आहेच.
  ‘अॅपल्स आय क्लाऊड’ येथून काही खासगी फोटोंची चोरी होऊन ते इंटरनेटवर परवानगीशिवाय झळकल्याचा अमेरिकी अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स व ग्रॅब्रिअल युनियन या दोघींनी कडक शब्दांत निषेध नोंदवला. हा ‘लैंगिक गुन्हा’ असल्याचे म्हणत सेलिब्रिटी आहोत म्हणून आमचे नग्न फोटो सर्वत्र दाखवण्याचा अधिकार इतरांना कसा असू शकतो, असे गॅब्रिअलने ठणकावले.
स्त्रियांसंदर्भात एक महत्त्वाचा असा निर्णय झाला तो म्हणजे ऑगस्टमध्ये कॅलिफोर्नियामध्ये मंजूर करण्यात आलेले एक क्रांतिकारी विधेयक. महाविद्यालयांमधील लैंगिक हिंसाचाराच्या वा बलात्कारासारख्या घटनांचा तपास करण्याबाबत येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी ‘येस मिन्स येस’ या धर्तीवर तपास केला जावा हा तो आदेश. अनेकदा पीडित व्यक्तीने विरोध केला नाही, घटनेवेळी ती अल्कोहोल वा अमली पदार्थाच्या नशेत होती म्हणून तिची संमती गृहीत धरली गेली होती, अशा अनेक बाबी पीडित मुलींच्या विरोधात जात होत्या. त्यावर लगाम घालण्यासाठी पीडित व्यक्ती जोपर्यंत स्पष्ट शब्दांत, ‘हो माझी याला संमती आहे’ म्हणून या घटनेत सहभागी नव्हती, तोपर्यंत कँपसमधील सर्व घटनांकडे संशयानेच पाहिले पाहिजे, असे कडक निर्देश या कायद्याने कॅलिफोर्नियातील महाविद्यालयांना दिले आहेत. महिलांचे ‘नाही’ म्हणजे ‘हो’ असते, हा जो अलिखित संदेश समाजात पसरला आहे, त्याला स्पष्ट विरोध नोंदवणारा हा निर्देश जागतिक स्तरावरही महत्त्वाचा ठरेल.
तर दुसरीकडे जर्मन सरकारने देशातल्या प्रमुख कंपन्यांच्या संचालक मंडळांवर स्त्रियांचा सहभाग निश्चित करण्यासाठी स्त्रियांना आरक्षण ठेवत ते बंधनकारक करण्याचा विचार सुरू असल्याची बातमी आहे. लवकरच याविषयीचे विधेयक मांडले जाणार आहे. या निर्णयाविषयी स्वत: चान्सलर अँजेला मर्केल यांनी पुढाकार घेतला आहे. हा निर्णय झाला तर फ्रान्स, इटली, स्पेन, नेदरलँड्स या देशांच्या पंक्तीत जर्मनी जाऊन बसेल.
इंटरनेटवर स्त्रियांचे फोटो शोधायला सुरुवात केली की मॉडेलिंग करतानाचे फोटो, वा नटूनथटून विविध पोजेस देणारी अत्याधुनिक स्त्री किंवा कुटुंबदक्ष स्त्री, चांगली आई, चांगली सून याच भूमिकांमधले स्त्रियांचे फोटो मिळतात. स्त्रियांचे तेच ते फोटो कालबाह्य़ झाले असून आजची स्त्री तिचा वावर, तिचे अवकाश बदलले असल्याची दखल घेत ‘गेट्टी इमेजेस’ या फोटोंसाठी सर्वाधिक लोकप्रिय वेबसाइटने ‘लीन इन’ नावाचे २५०० फोटोंचे नवे कलेक्शन लाँच केले आहे. गेट्टी इमेजेस व फेसबुकची सीओओ शेरील सँडबर्ग हिच्या संस्थेचा हा संयुक्त उपक्रम आहे. फेब्रुवारीमध्ये याची घोषणा झाल्यावर माध्यमांनी या घटनेचे स्वागत केले आहे. पॅम गॅसमेन यांच्या दूरदृष्टीतून व पुढाकाराने हा प्रकल्प आकारला आहे.
स्त्रियांचं बदलतं अवकाश या फोटोंमधून अधोरेखित होणार आहे, तसंच वर्षभरात आलेल्या स्त्रीलेखिकांच्या पुस्तकातूनही ते स्पष्ट होते आहे. वर्षभरात अनेक स्त्रीलेखिकांची पुस्तके चर्चेत राहिली, त्यात अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन यांचे ‘हार्ड चॉइसेस’ आघाडीवर होते; त्यासह अमी पोह्लरचे ‘येस प्लीज’, रोक्सॅन गे चे ‘फेमिनिस्ट’ आणि चिमामदा नोग्झी आदिची ‘व्हाय शूड ऑल बी फेमिनिस्ट’, रिबेका रोलनिट ‘मेन एक्सप्लेन थिंग्ज टू मी’ आणि सोफिया अॅमोरुसो ‘गर्लबॉस’ या पुस्तकांनी हे वर्ष गाजवलं.
स्त्री-आरोग्याचे चित्र सुधारण्यासाठी तिच्या आरोग्याबाबतच्या अधिकारांचाही विचार व्हायला हवा. तसे बदल कायद्यातही होणे गरजेचे आहे. म्हणून फ्रान्सने गर्भपाताविषयीच्या अधिकारांविषयी, कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
फ्रान्समध्ये गर्भपातासंबंधीचे नवीन कायदे लागू झाले असले तरी माल्टा, पोलंड, आर्यलड, अंडोरा व स्पेन या देशांमध्ये अजूनही जुनेच कायदे आहेत. त्यामुळे ४२० कलमांचा जाहीरनामा व युरोपव्यापी मोहीम यासाठी उघडणार असल्याचं फ्रान्सनं जाहीर केलं आहे. स्पेनमध्ये सप्टेंबरमध्ये गर्भपातासंबंधीचं विधेयक संमत होणार होते, ज्यायोगे फक्त माता वा बालक यांच्या जीविताला धोका असेल तरच १४ आठवडय़ांपर्यंत गर्भपात करू शकतात वा आणीबाणीच्या परिस्थितीत २२ आठवडय़ांपर्यंत गर्भपाताला परवानगी देण्यात येणार होती. हा कायदा महिला संघटनांच्या रेटय़ामुळे संमत होण्यापासून राहिला.
 स्त्रियांबाबत काही नकारात्मक घटना ही नोंदवल्या गेल्या. भारतातील दिल्लीतील बलात्काराच्या घटनेप्रमाणे अरबक्रांतीचं उगमस्थान असलेल्या टय़ुनिशियामध्ये एका बलात्काराच्या प्रकरणातला खटला व त्याचा निकाल फार गाजला. एका २९ वर्षीय मुलीवर, पोलिसांकडूनच सामूहिक बलात्कार करण्यात आला. तब्बल १८ महिन्यांनी खटल्यावर सुनावणी होत, आरोपींपैकी दोघांना बलात्कार केल्याच्या गुन्ह्य़ावरून तर एकाला पिळवणूक केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवत अनुक्रमे पंधरा वर्षांचा सश्रम तुरुंगवास व तिसऱ्याला दोन वर्षांचा तुरुंगवास अधिक दंड ठोठावण्यात आला. टय़ुनिशियासारख्या देशात एका महिलेने हा खटला लढवणे व न्याय मिळवणे या घटनेचे जगभरातून स्वागत करण्यात आले.     
हा निकाल तिथे एक मैलाचा दगड ठरला आहे. मध्यपूर्वेतील अरबक्रांतीची ठिणगी पडलेल्या टय़ुनिशियामध्ये ही मुहूर्तमेढ रोवली गेली हे विशेष. लोकशाहीच्या दिशेने पावले टाकत टय़ुनिशियातच नोव्हेंबरमध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या, आणि अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या २५ हून अधिक स्पर्धकांमध्ये ५५ वर्षीय कालथोम कान्नू या एकमेव महिलेचाही समावेश होता.
  गेले वर्षभर नायजेरिया चर्चेत राहिला तो बोको हरम या अतिरेक्यांच्या संघटनेने २०० हून अधिक शाळकरी मुलींच्या केलेल्या अपहरणाच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर. एप्रिलमध्ये २०० हून अधिक मुलींचे बोर्नोजवळील चिबोक येथील वसतिगृहातून अपहरण करण्यात आले. या मुलींचे काय झाले याबाबत अनेक उलटसुलट चर्चा झाल्या तरी त्यांच्या सुरक्षेबाबत, त्यांच्या जीविताबाबत ठोस माहिती अजूनही प्रकाशात आलेली नाही. कट्टर इस्लामिक संघटना, बोको हरमने या अपहरणाचे केलेले समर्थन मुलींचे शिक्षण ही दुरापास्त बाब असल्याचे वास्तव अधोरेखित करणारे होते. मुलींनी शिक्षण घेणे शरिया कायद्याविरोधात असून, त्यातही पाश्चिमात्य शिक्षण घेणे हे तर महापातक असल्याचा कांगावा बोको हरमने केला. अमेरिकेसह, ब्रिटिश माध्यमांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. सोशल मीडियावरही या घटनेचे पडसाद उमटले. याबाबत ‘ब्रिंग बोको अवर गर्ल्स’ या हॅशटॅगने पाठिंबा मिळवणारी मोहीम सुरू झाली. यासाठी मिशेल ओबामा आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजई यांनीही पाठिंबा दर्शवला. मात्र मुली,  स्त्रियांना ‘सॉफ्ट टार्गेट’ करत, समाजात दहशत पसरवण्याचा कित्ता बोको बरमने कायम ठेवल्याचे यातून दिसून आले.
  मार्च महिन्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असताना, इराकी कुर्दिस्तानातील स्त्रियांसाठी मात्र ती काळरात्र ठरली. घरगुती हिंसाचाराच्या जाचातून दोन मुलींनी स्वतला पेटवून घेत सुटका करून घेतली. त्यातली एक होती १४ वर्षांची कोवळी मुलगी तर दुसरी सीरियातून आलेली निर्वासित. पहिली घटना अपघात असल्याचे नोंदवले गेले तर दुसऱ्या केसमध्ये कौंटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. या घटनांमागचे सत्य प्रसिद्ध झालेच नाही. चालू वर्षांत सप्टेंबर महिन्यापर्यंत स्त्रियांविरोधातील हिंसाचाराच्या तब्बल ५,४७५ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. लग्नाची जबरदस्ती करणे, देहविक्रयासाठी भाग पाडणे, गर्भ पाडण्यासाठी दबाव आणणे अशा अनेक कारणांनी स्त्रियांची कुचंबणा होते आहे. त्यांचे भाऊ, वडील त्यांच्याकडून ‘शिघार’ (साटंलोटय़ाचं लग्न) पद्धतीच्या नावाखाली त्यांचे सौदे होताहेत. तर अनेकींना शुद्धतेच्या नावाखाली जेनिटल म्युटिलिएशनसारख्या अघोरी प्रथेला सामोरे जाण्याच्या दिव्यातून जावे लागते. ऑनर किलिंगच्या घटना वरचेवर घडतच असतात. यापूर्वी या अन्यायाविरोधात ‘ब्र’ काढण्याचीही सोय नव्हती आता मात्र अनेक सेवाभावी संस्थांच्या कामांमुळे परिस्थिती थोडी निवळते आहे.
कुर्दिस्तानातील वास्तव भीषण आहे तर बांगलादेशात येऊ घातलेल्या एका निर्णयामुळे हा देश धोक्याच्या सीमारेषेवर उभा ठाकला आहे. बालविवाह आणि कुमारी मातांच्या समस्येचा देशाला लागलेला काळिमा पुसून टाकण्यासाठी बांगलादेशी सरकारने मोठीच शक्कल लढवली आहे. सरकारने विवाहासाठीचे मुलींचे वय १६ वर्षांपर्यंत खाली आणण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्याचा विचार केला आहे.  
 रशियातील सामाजिक वातावरण ढवळून टाकले होते- २०१२ च्या पुसी राएटने. याच ‘पुसी राएट’वर आधारित माशा जस्सेन यांनी लिहिलेले पुस्तक ‘वर्ड विल ब्रेक सिमेंट’ हे पुस्तक २०१४ च्या सुरुवातीला प्रकाशित झाले व रशियासह पाश्चिमात्य देशांमध्ये आंदोलनावर चर्चा रंगल्या. अमेरिकेतही या पुस्तकाचे स्वागत करण्यात आले. रशियामध्ये अर्थातच याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
या सामाजिक दखल घ्यावा लागणाऱ्या घटनांसह अन्जा नाईड्रिग्युस या जर्मन युद्ध छायाचित्रकार महिलेचा अफगाणिस्तानात छायांकन करताना ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. प्रतिष्ठेच्या पुलित्झर पुरस्काराची ती मानकरी होती. युद्धातील छायांकनासारखे जोखिमेचे व शौर्याचे काम करत असताना तिचा मृत्यू झाल्याने जगभरातून हळहळ व्यक्त झाली.
‘गुडबाय वर्ल्ड, स्प्रेड गुड एनर्जी’ असा संदेश फेसबुकवर टाकत मेंदूचा कर्करोग असणाऱ्या ब्रिटानी मेनार्ड या २९ वर्षीय तरुणीने इच्छामरणाचा अधिकार वापरत ओरेगॉनमधील पोर्टलँड येथे ३ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. एप्रिलमध्ये तिला दुर्धर अशा कर्करोगाच्या प्रकाराचे निदान झाल्याने सुस्थितीत असतानाच मरण स्वीकारण्याचा निर्णय तिने घेतल्याने जगभरातील माध्यमांनी या घटनेची नोंद घेतली.
 सरते वर्ष, अशा अनेक नाटय़मय घडामोडींचे पडसाद नोंदवणारे होते. महिलांचे अर्धे अवकाश अजूनही ढगाळलेले आहे तरी त्याला बदलाची सोनेरी किनार आहे हे निश्चित. मात्र अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, शिक्षण, हक्क, समानता, समान संधी अशा अनेक मुद्दय़ांवर विकास साधायचा आहे. शिखरावर पोहोचायचे आहेच.. त्याच्या दिशेने प्रवासही सुरू झालाच आहे.. आता फक्त प्रतीक्षा आहे ते शिखर किती काळात गाठता येतंय याचीच.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens create history in
First published on: 27-12-2014 at 01:15 IST