News Flash

पोलिसी खाक्या

आव्हानात्मक व खडतर मानल्या जाणाऱ्या पोलिसी क्षेत्रातही आता स्त्री पोलीस मोठय़ा संख्येने कार्यरत आहेत. त्यांचं असणं हेच अनेक स्त्री तक्रारदारांसाठी आश्वासक ठरत असल्याने तक्रार नोंदवण्याच्या

| August 29, 2014 01:03 am

आव्हानात्मक व खडतर मानल्या जाणाऱ्या पोलिसी क्षेत्रातही आता स्त्री पोलीस मोठय़ा संख्येने कार्यरत आहेत. त्यांचं असणं हेच अनेक स्त्री तक्रारदारांसाठी आश्वासक ठरत असल्याने तक्रार नोंदवण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आपल्या तडफेने भल्याभल्यांची झोप उडवणाऱ्या या स्त्री पोलीस अधिकारी स्त्रीसुलभ स्वभावाने गुन्हेगारांमध्येही आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत. पोलिसांचं स्त्री असणं अनेक अत्याचार, अन्यायग्रस्त स्त्रियांसाठी, समाजासाठीही आश्वासक ठरत आहे.

पो लिसी क्षेत्र हे आव्हानात्मक आणि खडतर समजले जाते. बळाचा वापर या क्षेत्रात अपेक्षित मानला गेल्यामुळे सुरुवातीच्या काळात पुरुषांचीच या क्षेत्रात मक्तेदारी होती. काळाच्या ओघात स्त्रियांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले आणि आज त्याही त्याच तडफेने पोलिसी पहाऱ्यातून समाजाच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. आज पोलीस दलातील सर्वच स्तरांवर स्त्रिया कार्यरत आहेतच, पण स्त्री पोलिसांची वाढती संख्या अनेक स्त्री तक्रारदारांनाही मोठय़ा प्रमाणात पोलीस ठाण्यांकडे वळवत आहे, आपल्यावरच्या अन्यायाची दाद मागण्यास भाग पाडत आहे. हा एक मोठा महत्त्वाचा बदल झालेला आहे. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अधोरेखित होते ती ही की स्त्री पोलीस अधिकाऱ्यांनी स्त्रीसुलभ गुणांचा वापर अनेक प्रकरणे हाताळताना केला त्याचाही सकारात्मक परिणाम गुन्हेगारांवर होताना दिसला.
त्याचं ठसठशीत उदाहरण म्हणजे माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची तिहार तुरुंगातील कारकीर्द. तत्कालीन पोलीस दल पूर्णपणे पुरुषी खाक्याचे असूनही या करडय़ा वर्दीच्या पोलीस दलाला अधिक समाजाभिमुख करण्याचे काम बेदी यांनी त्यावेळी केले. तुरुंग महानिरीक्षकाचे पद पोलीस विभागात ‘डम्प पोस्टिंग’ समजले जात असे. पण, मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे काम किरण बेदींनी केले. तिहार तुरुंगाचा कायापालट घडवला. कैदींना सुधारण्याची संधी देणे म्हणजे पालथ्या घडय़ावर पाणी, हे पूर्वापार चालत आलेले गृहीतक त्यांनी मोडीत काढले. विपश्यनेचे वर्ग सुरू करून कैद्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला. कैद्यांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी झाली. तिहार म्हणजे अक्षरश: नरक अशी भावना असायची. या तुरुंगात येणाऱ्या बहुतेक स्त्रिया अशिक्षित आणि आयुष्यात हरल्याची भावना असलेल्या अशा होत्या. तुरुंगात कैद्यांना मिळणाऱ्या सुविधा, तुरुंगातील हक्क, पॅरोलवर सुटका, मुदतीआधी सुटका यासंबंधी त्यांना अंधूकशीदेखील कल्पना नसायची. खटल्याचा पाठपुरावा करणेही त्यांना शक्य नसायचे. अशा त्रासिक वातावरणात कैद्यांमध्ये सुडाची भावना धगधगत राही. ही रोगट परिस्थिती सुधारण्यासाठी बेदी यांनी कैदी व तुरुंग कर्मचाऱ्यांना मानवी मूल्यांची शिकवण देत विपश्यना करण्यास प्रवृत्त केले. कैद्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, कारागृहाची स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष पुरवले. कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा आत्मसन्मानाने परतता यावे, यासाठी समुपदेशन, व्यसनमुक्ती आणि प्रौढ शिक्षणासारखे कार्यक्रम राबवले. तुरुंगातील हताश आणि रोगट वातावरण दूर करण्याचा प्रयत्न केला. सूड आणि वैफल्यभावनेने मने झाकोळून गेलेल्या तिहारच्या कैद्यांना प्रकाशाची तिरीप दाखवली. ही खूप मोलाची कामगिरी मानली जाते.
भारतीय पोलीस सेवेत स्त्रियांचे प्रमाण कमीच असल्यामुळे स्त्रियांच्या प्रवेशाने पोलीस प्रशासनात झालेल्या सकारात्मक बदलांची संख्या कमी असेल. परंतु, हे बदल ठोस आणि आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे आहेत, यात शंका घेण्याचे कारण नाही. किरण बेदी यांच्याप्रमाणेच आपल्या धडाकेबाज कर्तृत्वाने तरुणाईच्या आयडॉल बनलेल्या मीरा बोरवणकर यांच्या नावासमोर अनेक गौरवशाली कामगिऱ्यांची नोंद आहे. मुंबईच्या कायदा-सुव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेचे प्रमुखपद त्यांनी सांभाळले आहे तसेच पुणे शहराचे आयुक्तपदही समर्थपणे पेलले आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना ‘पोलीस विद्यार्थी’ अभियान नामक एक अभिनव उपक्रम त्यांनी राबवला होता. यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज दोन तास याप्रमाणे आठवडाभर पोलीस ठाण्यात इंटर्नशिप करावी लागे. पोलिसी कामाचा खराखुरा अनुभव त्यांना मिळावा, विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांविषयीची नकारात्मक प्रतिमा नष्ट व्हावी व नागरिक म्हणून त्यांना आपल्या जबाबदारीचे भान तरुणवयातच यावे, हा या अभियानामागील हेतू होता. काही वर्षांपूर्वी राज्यात जळगांव येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ उडवली होती. जळगांवमधील अनेक कॉलेजवयीन आणि विवाहित स्त्रियांना ब्लॅकमेल करून राजकारणी, उद्योजकांनी आपल्या वासनेची शिकार बनवले होते. अत्याचारग्रस्त स्त्रिया लोकलज्जा आणि आरोपींच्या धमक्या यामुळे आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यास धजावत नव्हत्या. त्यावेळी त्यांना एक स्त्री म्हणून मानसिक आधार देऊन बोलते करण्यात बोरवणकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आणि आरोपींना गजाआड करण्यास मदत केली. या घटनेच्या पाश्र्वभूमीवरच पोलीस ठाण्यांमध्ये विशेष महिला कक्ष स्थापन झाले. त्यानंतरच्या काळात अनेक महिला आपल्यावरील अत्याचाराची फिर्याद नोंदवण्यासाठी धैर्याने पोलीस ठाण्याची पायरी चढू लागल्या, ही बोरवणकर यांच्या कामाला मिळालेली पोचपावतीच आहे.
मीरा बोरवणकर यांच्यासोबतच श्रीदेवी गोयल, अर्चना त्यागी, विद्या कुलकर्णी, प्रज्ञा सरोदे, शोभा ओहटकर, अस्वती दोरजे, रश्मी करंदीकर आदी नावे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे कायमच चर्चेत राहिली आहेत. रिक्षावाल्यांच्या मनमानीचा फटका प्रत्येक प्रवाशाला कधी ना कधी तरी बसला आहेच. भाडे वाढवून मागणे, प्रवाशांशी अरेरावीने वागणे असे प्रकार होणे ही बाब कल्याण-भिवंडीतल्या नागरिकांसाठी नवी नव्हती. पण, मनस्ताप मुक्याने सोसण्यावाचून त्यांच्याकडे काही पर्यायही नव्हता. रिक्षावाल्यांना वठणीवर आणण्यासाठी करंदीकर यांनी साध्या वेशातील पोलिसांना ग्राहक बनवून रिक्षांमध्ये प्रवास करायला लावला. दुप्पट भाडे वाढवले की तिथल्या तिथं कारवाई. करंदीकरांच्या या पोलिसी खाक्याने अखेरीस रिक्षावाले नरमले. नागरिकांची पिळवणूक थांबली. पनवेल येथील गतिमंद मुलींवरील बलात्कार प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने तपासकामासाठी खास त्यांची नेमणूक केली होती. त्यांनी मोठय़ा नेटाने साक्षीपुरावे गोळा करून आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली. ज्याप्रमाणे पालक सामंजस्य, ममत्व आणि जबाबदारीच्या भावनेतून आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्याच भावनेतून महिला पोलीस अधिकारी स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहतात. ज्याप्रमाणे मुली आपल्या अडचणी आईलाच सहजपणे सांगू शकतात, तीच भावना पीडित स्त्रियांच्या मनात महिला अधिकाऱ्यांबद्दल असते. समस्या समजावून घेणारी समोरील व्यक्ती स्त्री असेल तर संवादाचा पूल चटकन जोडला जातो. महिला अधिकारी त्यांना मानसिक आधार देऊन समस्येतून बाहेर पडण्यासाठी मदत करतात, असा करंदीकर यांचा अनुभव सांगतो. शहरातल्या पोलीस ठाण्यातल्या महिला सेलचाही याच मानसिकतेमुळे स्त्री तक्रारदारांच्या संख्येत वाढ होण्यास मदत झाली आहे.
 देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या ‘सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स’च्या डीआयजी म्हणून अर्चना त्यागी यांनी ठसा उमटवला आहे. अस्वती दोरजे यांनी तर नक्षलग्रस्त भागात पोलीस दलाचे नेतृत्व केले आहे. या अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाची जंत्री मोठी होऊ  शकते. परंतु, अनेक जणींनी अतिशय भरीव काम करत असताना स्वत:ला ‘लो प्रोफाईल’ ठेवणेच पसंत केले आहे. त्यांनी राबवलेल्या प्रयोगांमुळे पोलीस दल अधिक समाजाभिमुख झाल्याचीच उदाहरणे जास्त आहेत.
पोलीस दलातील पुरुष अधिकाऱ्यांच्या कार्यकुशलतेबद्दल शंका नाहीच. त्यांनीही वेगवेगळ्या स्तरावरची महत्त्वाची प्रकरणे निकाली काढली; परंतु त्यानंतर या क्षेत्रातला स्त्रीचा सहभागही महत्त्वाचा ठरतो आहे. महिला अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्यपरायणतेचे नाणे अगदी खणखणीतपणे वाजवलेले आहे.
ठाणे जिल्हा हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक समजला जातो. एके काळी या जिल्ह्यात दरोडय़ांचे प्रमाण प्रचंड होते. नागरिक दहशतीखाली वावरत होते. त्यांना पुन्हा सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात जगता यावे, यासाठी त्यावेळी अर्चना त्यागींसारख्या अधिकाऱ्याने पोलीस दलातील मोजके अधिकारी निवडून विशेष स्क्वॉड्स तयार केले. किंबहुना, अशा प्रकारचे स्क्वॉड्स तयार करण्याची कल्पना पहिल्यांदा सुचली ती त्यांनाच.
गुजरातमधील आयपीएस अधिकारी शोभा भुतडा सांगतात की, देशभरातच महिला आयपीएस वाढत आहेत. अनेक जिल्ह्य़ांच्या पोलीस अधीक्षकपदावर त्यांनी काम केले आहे. एका राज्याचे पोलीस महासंचालकपद महिलेने भूषवल्याचेदेखील उदाहरण आपल्यासमोर आहे. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पोलीस अकादमीचे प्रमुखपद महिलेकडे आले आहे. आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. परंतु, अद्यापही भारतासारख्या विकसनशील देशामध्ये पोलिसी काम हे पुरुषांची मक्तेदारी समजले जाते. त्यामुळेच कामाच्या ठिकाणी स्त्रीला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे वायफळ खर्च समजण्याची मानसिकता अनेक ठिकाणी बदललेली नाही, ही बाबही त्यांनी खेदाने नमूद केली. रश्मी करंदीकर यांनीदेखील महिलांसाठी सुविधा वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले.
आयुष्यात व्हायचे ते पोलीस अधिकारीच, याच ध्येयाने पोलीस सेवेत दाखल झालेल्या तामीळनाडू केडरच्या आयपीएस अधिकारी विद्या कुलकर्णी यांनी अधिकार व जबाबदाऱ्यांसंदर्भात महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत अजिबातच डावं-उजवं केलं जात नसल्याचं स्पष्टपणे सांगून टाकलं. ‘पोलिसांबद्दल आपल्या समाजात जेवढे पूर्वग्रह आहेत, त्यापेक्षाही जास्त पूर्वग्रह आणि उत्सुकता महिला पोलीस अधिकाऱ्यांबद्दल आहे. परंतु, मी माझ्या वाटय़ाला आलेल्या जबाबदाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. करिअर करणाऱ्या स्त्रियांनी या गोष्टींचा अजिबात बाऊ  करू नये. स्त्रिया या स्वभावत:च पुरुषांपेक्षा जास्त संयमी, हिकमती आणि सर्व जबाबदाऱ्या पेलण्यास समर्थ असतात’, अशा शब्दांत मीरा बोरवणकर यांनी स्त्रियांच्या कार्यक्षमतेबाबतचा मुद्दा स्पष्ट केला.
 ‘स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांच्या वाटचालीत आता स्त्रियांसाठी करिअरकरिता पोलिसी क्षेत्र म्हणजे ‘लेव्हल प्लेइंग फील्ड’ बनत चालले आहे. खुद्द महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत अधिक महिला पोलीस दलात कार्यरत आहेत. आजमितीस ज्या महिला पोलीस दलात कार्यरत आहेत, त्या त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्याच बरोबरीनेच नोकरीतील आव्हाने पेलत आहेत. गणेशोत्सवात तासन्तास उभं राहण्याची डय़ुटी असो, अथवा कुठल्याही मोर्चाचा बंदोबस्त.. यात महिला पोलिसांनाही पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत कसलीच सूट मिळत नाही. परंतु, त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांची मात्र वानवा असते. चेंजिंग रूम, स्वच्छतागृहे, विश्रांती कक्ष अशा गोष्टी अजूनही त्यांच्यासाठी दुर्लभच आहेत. खुद्द पोलीस ठाण्यांमध्येच या गोष्टींकडे अक्षम्य हेळसांड केली जाते, तर फील्डवर कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या परिस्थितीबाबत बोलायलाच नको. ‘आम्ही पुरुष सहकाऱ्यांच्याच बरोबरीने काम करतो आहोत. कुठल्याच सवलती मागत नाहीत. परंतु, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, त्या गोष्टींची तरतूद तरी शासनाने करायला हवी’, असाच एकमुखी सूर या महिला अधिकाऱ्यांच्या संभाषणातून निघाला.  
 मात्र शिक्षणाचा प्रसार आणि काहीतरी वेगळं करण्याची ऊर्मी स्त्रियांना पोलीस दलात येण्यासाठी प्रवृत्त करत असावी. तसेच, आपल्या कर्तृत्वाने पोलीस दलावर छाप पाडणाऱ्या आणि नागरिकांच्या मनात घर करणाऱ्या महिला अधिकारीही त्यांच्या रोल मॉडेल आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात अधिकाधिक संख्येने स्त्रिया पोलीस दलात दाखल होत आहेत.
या स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने पोलीस दलाचा पुरुषी चेहरामोहरा तर बदलतीलच; शिवाय, पुरुषी मानसिकतेतही बदल घडवून आणतील. त्याचबरोबर, प्रचलित शिक्षणपद्धतीत स्त्री-पुरुष समतेचे धडे जास्त प्रभावीपणे दिल्यास समाजमन आणखी समतावादी होईल, असा विश्वासाचा आश्वासक सूर या महिला अधिकारी आळवतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:03 am

Web Title: womens in police department
टॅग : Chaturang
Next Stories
1 महाराष्ट्रकन्या
2 कायद्याचे हाती
3 इवलीशी रोपे लावियली दारी..
Just Now!
X