दर शनिवारी हे सदर प्रसिद्ध झाल्यानंतर वाचकांची प्रश्न विचारणारी पत्रे नियमीत येत. काहींना मी उत्तरे दिली. पण सगळ्यांनाच उत्तरे देणे शक्य झाले नाही. मात्र आजी-आजोबांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांमधले काही प्रमुख प्रश्न व त्यांची उत्तरे अशी.
१. धान्ये कोणती वापरावीत आणि कशी?
– गहू आणि तांदूळ ही जरी नेहमीच्या वापरातील धान्ये असली तरी ज्वारी, बाजरी, मका, कुळीथ, राजगिरा, नाचणी, जव इत्यादी धान्ये आलटूनपालटून वापरावीत. जेणेकरून योग्य प्रमाणात कोंडा आणि ब जीवनसत्त्व मिळते. वयाप्रमाणे गहू पचायला जड जातो म्हणूनसुद्धा या इतर धान्यांचा वापर हितकारक. मिश्र पिठांची ‘पोळी’ही छान होते.  
२. घावनांचे विविध प्रकार – (लाल) तांदळाचे पीठ बेस ठेवून त्यात आलटूनपालटून विविध पिठे घालावीत किंवा मिश्र डाळींचे (भिजत घालून आणि वाटून केलेले) डोसे, भाजणीच्या पिठाचे थालीपीठ किंवा धिरडे, रव्याचे घावन गहू-बेसन डाळींचे घावन वगैरे काही प्रकार अतिशय चविष्ट लागतात आणि पचायला सोप्पे. चवीसाठी ओवा / तीळ / जिरे / धणेपूड / बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा मेथीची पाने, किसलेलं गाजर / बीट / भोपळा जरूर वापरावा.  
३. दूध  चांगलं की वाईट?
दूध प्यायल्यामुळे गॅस किंवा जुलाब असे त्रास काहींना होतात.  दुधातील साखर या अपचनाला कारणीभूत ठरते. तशी काही लक्षणे नसली तर दूधाला नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण वरील त्रास होत असेल तर दुधात सुंठ पावडर टाकून खायला हरकत नाही.
४. नाश्त्याचे काही प्रकार – तांदूळ / नाचणीची / ज्वारीची उकड, सातूची पेज (गुळ / मीठ घालून),
जिरेसाळ- मेतकूट भात, लापशीची / अळिवाची खीर, राजगिरा लाडू – दूध किंवा राजगिरा लाही – ताक,
  उपमा / पोहे, कडधान्याच्या पिठाची धिरडी
५. घसा कोरडा का पडतो?
तोंडातील लाळ-ग्रंथी शिथिल झाल्यामुळे बऱ्याच वेळी घास गिळताना ठसका लागतो, कारण घसा कोरडा असतो. म्हणून कोणतेही अन्नसेवन करताना प्रवाही पदार्थ जसे दूध, सूप, ताक, आमटी, जरूर घ्यावेत.
६. झोप कमी झाली आहे?
तुम्हाला झोप मिळविण्यासाठी रात्री अंथरुणावर वेळेवर जावे लागेल (रात्री ९ च्या सुमारास) आणि दिवसा एक डुलकी घेऊन कमतरता भरून काढता येईल. बहुतांश व्यक्तींसाठी अशा प्रकारे ‘झोप बदल’ सामान्य आहेत आणि असे बदल समस्या सूचित करीत नाहीत. जशी आपली दिनचर्या ठरलेली असते, तशी झोपेची ‘पूर्व’तयारी सुद्धा सवयीमध्ये बसवून घेतली पाहिजे. म्हणजे उदा. ९ वाजले, हळदीचे दूध पिऊन झालं, तोंड धुतलं, आणि ९.१५ पर्यंत बिछान्यावर आडवं झालं, देवाचं नाव घेत डोळे मिटले- हा क्रम झाला की मनाला सवयीने कळतं की आता झोपायचं आहे!  शांत झोपेसाठी आवश्यक असलेले संप्रेरक म्हणजे मेलाटोनिन शरीराला मिळतं ते पुढील पदार्थामधून – केळं, हळद घातलेलं कोमट दूध, पालक, सोयाबीन, अक्रोड, भिजवलेले बदाम, अननस, संत्रे, ओट्स, मका, टोमॅटो, चेरी, मध वगैरे
पेशींच्या चयापचयाशी ‘टय़ून अप’ करणाऱ्या काही टिपा :
‘शरीरातील प्रदूषण’ टाळा. म्हणजेच अवयवांना (आणि मनालासुद्धा) गंज लागू देऊ  नका. त्यासाठी आपलं दैनिक जीवन थोडंसं बदला. अतिकॅलरीजयुक्त पदार्थ (तेलकट-तुपकट-गोड) खाताना नियंत्रण असू द्या. वजन आटोक्यात असेल तर उत्साह कमी नाही होणार. जरुरीप्रमाणे किंवा थोडंसं कमी खा. शरीर जसं साथ देईल त्याप्रमाणे चालत-फिरत राहा. थोडं का होईना पण चाला.
सप्तशक्ती
 अळशी, काळे तीळ, पांढरे तीळ, ओवा, किसलेलं सुकं खोबरं, शहाजिरे, धणेडाळ आणि काळे मीठ, शेंदेलोण, पादेलोण. सर्व जिन्नस भाजून डब्यात भरून ठेवा. दिवसातून दोन चमचे चावून खायचे.     
प्रेमाची टीप-
पुढच्या महिन्यात घरच्या घरी ‘हुरडा पार्टी’ जरूर करा! म्हणजे कोवळा हुरडा त्यावर कुटून केलेली सोलापूर स्पेशल शेंगाचटणी आणि चवीला बारीक शेव. पचत असेल तर ‘शेरडीचा रस’ (उसाचा) जरूर प्या.
ल्ल वैदेही अमोघ नवाथे,
  आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com