अहिल्या रांगणेकर स्त्री आंदोलनाच्या एक अग्रगण्य नेत्या होत्या. स्त्रियांचे, लोकांचे प्रश्न फक्त ‘वाटाघाटी’ने सुटत नाहीत, त्यासाठी रस्त्यावर उतरून नेतृत्व करावं लागतं, आणि समूहाला रस्त्यावर उतरवून शासन संस्थेला नमवावं लागतं, हे त्यांच्या कामातून शिकायला मिळतं. अहिल्याताईंच्या झंझावाती भाषणांनी अवघ्या जनतेला कृतिशील बनवलं होतं. त्यावरून आचार्य अत्रे यांनी कविता रचून ‘रणरागिणी’ म्हणून त्यांचा गौरव केला होता.

आजच्या अगदी नवीन पिढीसाठी अहिल्या रांगणेकर हे नाव कदाचित परिचित नसावं; परंतु १९७५च्या आसपास अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, तारा रेड्डी ही व्यक्तिमत्त्वे केवळ स्त्री आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनाच माहिती होती असं नव्हे तर राजकीय पुढारी, मंत्रालयातील नोकरशहा, प्रमुख वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकारांपासून सामान्य माणसांनादेखील माहिती होती. एवढंच नव्हे तर त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदरही होता, अर्थात या स्त्रिया होत्याच तशा!

१९८१ मध्ये घडलेल्या ‘मथुरा बलात्कार’ प्रकरणाच्या वेळी मुंबईत होत असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान एका ट्रकवर चढून समोरच्यांना संबोधित करीत असलेल्या अहिल्याताईंचं वर्णन प्रसिद्ध इंग्रजी लेखिका गीता हरिहरन यांनी ‘एक छोटी मजबूत स्त्री’ (अ स्ट्राँग स्मॉल वूमन) असं केलं होतं. अशा अहिल्याताई आमच्यापैकी ज्यांनी पाहिल्या, त्यांना ते वर्णन किती समर्पक आहे हे निश्चितच पटेल. परंतु अहिल्या नावाचा झंझावात स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या केवळ या टप्प्यावरच होता असं नाही. तर भारतीय स्त्री आंदोलनाची जी पाळंमुळं स्वातंत्र्यपूर्व काळात आहेत, त्यात अहिल्या रांगणेकरांचं बहुविध योगदान आपल्याला दिसून येतं. त्यांच्या आणि त्यांच्यासमवेत असलेल्या इतर त्यांच्यासारख्या क्रांतिकारी स्त्रियांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात स्त्री आंदोलनाचं रंगरूप घडवलं, याबद्दल शंका नाही.

अहिल्याताईंचा जन्म ८ एप्रिल १९२२ रोजी एका आर्थिकदृष्ट्या संपन्न परंतु अतिशय पुरोगामी विचारांच्या कुटुंबात झाला. वडील त्र्यंबक रणदिवे यांच्यावर महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे अहिल्याताईंना आपल्याबरोबर रोजच्या व्यवहारात स्त्री म्हणून भेदभाव केल्याचं आठवत नाही. शिक्षणाची दारं त्यांच्यासाठी खुली होती. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना गांधीजींच्या हाकेला प्रतिसाद देऊन स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना येरवडा तुरुंगामध्ये बंद केलं गेलं, पण ब्रिटिश शासनाला त्यांचा निडर, बंडखोर स्वभाव कधीच चिरडता आला नाही. जेलमध्ये त्यांनी साड्या कापून तिरंगा बनवून फडकवण्याचा प्रयत्न केला. पुढे स्त्री आंदोलनाचं नेतृत्व करताना अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही बेधडक वृत्ती अनुभवली.

तुरुंगाचा त्यांचा हा अनुभव त्यांच्या कायम स्मरणात राहिला. तिथे असताना सामान्य कैदी स्त्रियांच्या कहाण्या ऐकून स्त्रियांच्या विविधांगी शोषणाची त्यांना जाणीव झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ‘रुईया महाविद्यालया’मधून पदवीचं शिक्षण घेतलं; परंतु सभोवतालच्या राजकीय वातावरणामुळे प्रभावित होऊन इतर शिक्षित स्त्रियांपेक्षा त्यांनी वेगळी वाट धरली. त्यांचे थोरले बंधू बी.टी. रणदिवे यांच्या पावलावर पाऊल टाकून त्या ‘कम्युनिस्ट पक्षा’त सामील झाल्या. स्त्रियांचं शोषण केवळ ‘स्त्री’ म्हणून नव्हे तर कामगार, कष्टकरी, नागरिक म्हणूनही होत असतं, हा मार्क्सवादी दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला, आणि त्याचा प्रभाव त्यांचा सहभाग आणि नेतृत्व असलेल्या सर्व आंदोलनांमध्ये दिसून येतो.

१९४०चं दशक जसं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं होतं, तसंच भारतीय समाजाच्या विविध घटकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणाऱ्या आंदोलनांचंही होतं. कामगार, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, स्त्रिया सर्व आपापल्या शोषणाच्या जाणिवेतून संघटित होऊ लागले होते. त्यामुळे वातावरण ढवळून निघालं होतं. मुंबईमध्ये विशेषत: गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात संघटित होऊन आंदोलनं, घेराव आणि संप करीत होते. गिरण्या आणि कामगारांच्या चाळी असलेलं परळ हे त्याचं एक केंद्र होतं. अहिल्याताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (पार्वतीबाई भोर, उषा डांगे, इत्यादी) स्वत: गिरणी कामगार असलेल्या आणि गिरणी कामगार कुटुंबातील स्त्रियांची ‘परळ महिला संघ’ नामक संघटना बांधायला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात ब्रिटिश शासनाने रेशन व्यवस्था सुरू केली होती. अन्नटंचाई, महागाई, पाणी, इत्यादी नागरी प्रश्नांबद्दल या संघटनेनं स्त्रियांना रस्त्यावर उतरवलं. पुढे ‘श्रमिक महिला संघ’ आणि १९८१ मध्ये ‘अखिल भारतीय जनवादी महिला संघटने’त (इंग्रजी संक्षिप्त रूप ‘एडवा’) त्याचं रूपांतर झालं. ‘एडवा’चा दृष्टिकोन आणि भूमिका तयार करण्यामध्ये एक संस्थापक पदाधिकारी या नात्याने अहिल्याताई यांचा मोलाचा वाटा होता. याच पायावर आज ही संघटना देशाच्या स्त्री आंदोलनाचा एक मोठा अन् महत्त्वाचा भाग बनली आहे.

या वेगवेगळ्या चळवळी आपापले स्वतंत्र मुद्दे पुढे रेटत असताना स्वत:ला व्यापक स्वातंत्र्य आंदोलनाशीदेखील जोडून घेत होत्या. १९४६ मध्ये मुंबईच्या समुद्रतटावर ब्रिटिश नौदलात काम करणाऱ्या नौसैनिकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केलं, त्याला इतिहासात ‘नाविकांचं बंड’ म्हणून ओळखलं जातं. खलाशांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा मागणारे हे आंदोलन ठिकठिकाणी (कोलकातापासून कराचीपर्यंत) पसरलं आणि त्याने लवकरच एक साम्राज्यवादविरोधी स्वरूप धारण केलं. मुंबईच्या गिरणी कामगारांना संघटित करणाऱ्या ‘ट्रेड युनियन’ने त्यांना पाठिंबा दिला. संप करणाऱ्या नाविकांचा अन्नपुरवठा बंद केल्यानंतर ‘परळ महिला संघा’च्या सदस्यांनी त्यांना डबे पुरवण्याचं काम सुरू केलं. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी सार्वत्रिक बंद पुकारला गेला. कष्टकरी, विद्यार्थी, सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. इतरांसोबत ‘परळ महिला संघा’च्या सदस्यसुद्धा हातात लाल बावटा घेऊन बोटींच्या दिशेने चालू लागल्या, त्यात अर्थातच अहिल्याताई अग्रभागी होत्या. शेवटी ब्रिटिशांनी बंदुका चालवल्या. अहिल्याताईंच्या जवळच्या सहकारी कुसुम दोंदे त्यात हुतात्मा झाल्या, त्याची आठवण अहिल्याताई कधीच विसरल्या नाहीत. साम्राज्यवादविरोध हा त्यांच्या नसानसांत भरलेला होता. हा धागा कायम राहिला; १९८१च्या इराक-इराण संघर्षाच्या विरोधात मुंबईमधील स्त्री संघटनांच्या संयुक्त धरणे आंदोलनात त्यांनी हिरिरीने घेतलेला सहभाग अनेकांना आजही प्रेरणा देतो.

पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अहिल्याताई यांचं कामगार आणि स्त्री संघटनेमधील काम सुरूच राहिलं, पण ते कधीच एकसुरी नव्हतं. स्वतंत्र भारताच्या भाषिक प्रांतरचनेच्या भोवताली जो देशात विविध ठिकाणी संघर्ष उभा राहिला, त्यात साठच्या दशकात झालेल्या ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळी’चा मोठा वाटा होता. अहिल्याताई संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या एक प्रमुख नेत्या होत्या. अमर शेख, अण्णा भाऊ साठे-गव्हाणकर यांच्या कला पथकाने जसा महाराष्ट्र ढवळून काढला तसेच अहिल्याताईंच्या झंझावती भाषणांनी अवघ्या जनतेला पेटवलं. त्यावरून आचार्य अत्रे यांनी त्यांच्याबद्दल कविता रचून ‘रणरागिणी’ म्हणून गौरव केला. आज शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी समाविष्ट करण्याचा शासकीय आग्रह केला जात असताना त्यांची विशेष आठवण होते.

याच दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू पारिवारिक कायद्यां’मध्ये सुधारणा करण्यासाठी संसदेत बी.एन. राव समितीच्या शिफारशींवर आधारित ‘हिंदू कोड बिला’चा प्रस्ताव मांडला, तेव्हा कट्टर विरोधकांनी केवळ संसदेत नव्हे, तर संसदेच्या बाहेरही त्यावरून प्रचंड विरोध केला. तेव्हा बिलाच्या बाजूने स्त्रियांमध्ये जाऊन प्रचार करण्यासाठी, ते स्त्रियांच्या हिताचं कसं आहे हे समजून सांगण्यासाठी अहिल्याताईंचा मोठा पुढाकार होता. ‘कम्युनिस्ट’ म्हणजे ‘स्त्रियांचीसुद्धा समान वाटणी करतात,’ असं म्हणत त्यांना कसं हिणवलं गेलं हे त्यांना प्रकर्षाने आठवत असे! परंतु त्यामुळे त्या कधी नाउमेद झाल्या नाहीत. उलट धर्मवादी सनातनी हे स्त्रियांच्या समानतेच्या विरोधात असतात ही मनाशी पक्की खूणगाठ बांधून आपलं काम त्यांनी पुढे सुरू ठेवलं. परंतु अशा टीकेला त्यांनी कधीच भीक घातली नाही. रस्त्यावरची लढाई हा त्यांचा मार्ग होता आणि तो त्यांनी कधीच सोडला नाही.

१९७०च्या दशकात भारतीय राज्यकर्त्या वर्गाच्या धोरणांमुळे जेव्हा महागाई वाढू लागली तेव्हा मृणाल गोरे, तारा रेड्डी इत्यादी नेत्यांबरोबर सामान्य स्त्रियांचे प्रचंड मोर्चे काढून त्यांनी सरकारला नमवलं. लाटणी मोर्चा, मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेची (रेशन धान्यातून वेचलेल्या) कचरातुला, ‘कांदा म्हणे बटाट्याला, लाज नाही सरकारला’ अशा नावीन्यपूर्ण कार्यक्रमांतून या महागाईविरोधी आंदोलनांनी लोकांमध्ये चैतन्य निर्माण केलं. जनतेला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरवण्याची कृती केल्याशिवाय शासन संस्था लक्ष देत नाही हा महत्त्वाचा धडा त्यांनी सर्वांसमोर ठेवला.

मुंबई महानगरपालिकेत १९ वर्षं नगरसेविका म्हणून काम करत असताना मतदारसंघाच्या नागरिकांचे मोर्चे ‘मनपा’ कार्यालयांवर नेणं हा त्यांचा नित्यनियमाचा कार्यक्रम होता. एखाद्या भ्रष्ट, आडमुठ्या अधिकाऱ्याला सरळ करण्याचा हाच मार्ग आहे हे त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळे प्रशासनात त्यांचा कायम दरारा होता.

सामूहिक चळवळींमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच व्यक्तींच्या भागीदारीतून परिवर्तन घडत असतं, हे तत्त्व आपण मान्य केलं तरी काही व्यक्तींचं योगदान आपण नमूद करीत असतो. अहिल्या रांगणेकर स्त्री आंदोलनाच्या अशाच एक अग्रगण्य नेत्या होत्या. स्त्रियांचे, लोकांचे प्रश्न फक्त ‘वाटाघाटी’ (अॅडव्होकसी)ने सुटत नाहीत, त्यासाठी रस्त्यावर उतरून नेतृत्व करावं लागतं, आणि समूहाला रस्त्यावर उतरवून शासन संस्थेला नमवावं लागतं, हे त्यांच्या कामातून आपल्याला शिकायला मिळतं. शिवाय आपण सत्याच्या बाजूने लढत असलो तर प्राण पणाला लावूनच लढलं पाहिजे हा त्यांचा जणू मंत्र होता!

आज स्त्री अभ्यास या ज्ञानक्षेत्रात ‘इंटरसेक्शनॅलिटी’ (आंतरछेदितता) हा पर्वणीचा शब्द झालेला आहे. परंतु भारताच्या स्त्रीमुक्ती चळवळीत नेहमीच वेगवेगळे पदर गोवले गेले होते, आणि अहिल्या रांगणेकर यांच्या जीवनकार्यात ते स्पष्टपणे दिसून येतं. कष्टकरी, स्त्रिया, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, सामान्य नागरिक या भूमिका वेगवेगळ्या नसतात. त्या एकमेकांशी अविभाज्यपणे जोडल्या गेल्या आहेत. तर कामगार चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, साम्राज्यवादविरोधी चळवळ, सामाजिक न्यायाची चळवळ, सांस्कृतिक चळवळ यादेखील वरकरणी वेगवेगळ्या वाटत असल्या, तरी त्यांचे धागे एकमेकांत परस्परपणे विणले गेले आहेत. त्या एकमेकांची दिशा ठरवतात, एकमेकांना मार्ग दाखवतात. अहिल्याताई रांगणेकरांसारखे व्यक्तिमत्त्व समजून घेतलं तर आपली पुढची वाटचाल कधीच एकांगी, एकसुरी, दुराभिमानी होणार नाही.

विशेष म्हणजे सामाजिक समतेची चळवळ ही राजकारणापासून अलिप्त असूच शकत नाही. आधी राजकीय की आधी सामाजिक हा वाद फसवा आणि व्यर्थ असून, समाजकारण आणि राजकारण जेव्हा अहिल्या रांगणेकरांच्या व्यक्तिमत्त्वासारख्या माध्यमातून हातात हात घालून चालतात तेव्हा परिवर्तनाच्या सर्व शक्यता खऱ्या ठरायला लागतात!

गेल्या ५० वर्षांत स्त्रियांच्या वेगवेगळ्या आंदोलनात हे नक्कीच दिसून येतं.

Kiranmoghe@gmail.com