daanरतिलाल माणिकचंद शहा, वय वर्षे ८३, आयुष्यभर कारकुनी केलेल्या या सामान्य माणसातलं असामान्यत्व म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत स्वत:चे १ कोटी ३० लाख रुपये दान केले आहेत. स्वत:साठी काहीच हातचं न राखता.. त्यांच्या या सत्पात्री दानाविषयी..
रतिलाल माणिकचंद शहा.. बघायला गेलं तर बी-कॉमपर्यंत शिक्षण घेतलेला.. पंढरपूरजवळील आष्टी नावाच्या छोटय़ाशा खेडय़ातून आलेला आणि कुर्ला येथील प्रीमियर ऑटोमोबाइल्स या एकाच ठिकाणी ३६/३७ वर्षे कारकुनी करून १९९२ साली निवृत्त झालेला एक सर्वसामान्य माणूस!
 निवृत्तीच्या वेळी या गृहस्थाचा पगार होता गोळाबेरीज १५ हजार रुपये. पण या सामान्य व्यक्तीचं असामान्यत्व हे की त्याने राजमार्गाने आपली कमाई कित्येक पट वाढवली.. तिचा ट्रस्ट केला आणि गेल्या १५ वर्षांत या ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांचं सत्पात्री दान दिलं. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळू नये म्हणतात, तद्वत रतिलालभाईंनी आपल्या कार्याची कुठेही वाच्यता केलेली नाही. खरं तर मुलाखतीसाठी त्यांना तयार करणं हेच एक आव्हान होतं. पण या कामासाठी माझी छोटी मैत्रीण गीता शहा हिने आपली सगळी ऊर्जा पणाला लावली आणि मुख्य म्हणजे तुमची कहाणी वाचून अनेक ‘रतिलाल शहा’ निर्माण होऊ शकतात या एकमेव मुद्दय़ाच्या आधारे आम्ही ‘टॉस’ जिंकला!
सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं म्हणतात.. याचा प्रत्यय रतिलालभाईंचं जीवन पहाताना येतो. घडलं ते असं.. कॉमर्सची पदवी जवळ असल्याने ते प्रीमियर ऑटोमोबाइल्समध्ये अकाऊंटस् विभागात कामाला लागले. त्याकाळी शेअर्समध्ये गुंतवणूक हा धनवृद्धीचा नवा फंडा नुकताच उदयास येत होता. जैनधर्मीय असल्याने व्यापाराचं रक्त धमन्यांत खेळत होतंच. परिणामी ऑफिसमधील या क्षेत्रातील जाणत्यांची चर्चा त्यांच्या कानांनी टिपायला सुरुवात केली. अनेक मोठय़ा कंपन्या आपलं समभागांचं दुकान थाटून गुंतवणूकदारांना ‘या, या’ अशी आर्जवं करत होत्या तेव्हाचा तो काळ. रतिलालभाईंनी हिय्या करून काही शेअर्स विकत घेतले. नंतर १९७७ मध्ये ‘दुनिया मेरी मुठ्ठीमे’ म्हणणाऱ्यांचा पब्लिक इश्यू आला. पाठोपाठ प्रीमियर पद्मिनीनेही कात टाकली आणि पहाता पहाता त्यांच्या कंपनीच्या शेअर्सचा भाव १००-१२५ रुपयांवरून ६५० रुपयांवर गेला. हळूहळू शेअर्सच्या खरेदी-विक्रीतून पैसा कमावण्याचं तंत्र त्यांना जमत गेलं. पुढे हर्षद मेहता नावाच्या झंझावातात ए.सी.सी. कंपनीच्या समभागांनी त्यांना चांगलंच श्रीमंत केलं.
पण सगळेच दिवस सारखे नसतात. दु:खानंतर सुख आणि सुखानंतर दु:ख या विधात्याच्या चक्राने त्यांच्या पदरात अचानकपणे दु:खाचं डोंगराएवढं दान टाकलं. ८ ऑगस्ट १९७७ हा तो काळा दिवस! या दिवशी त्यांची एकुलती एक मुलगी ज्योती वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी पहिल्या बाळंतपणात हे जग सोडून गेली. त्याआधी म्हणजे ज्योती ५ वर्षांची असताना तिच्या पाठीवर जन्माला आलेल्या मुलाची प्राणज्योती तर अवघ्या १४ दिवसांतच मावळली होती. ज्योतीच्या नवजात कन्यकेला तिचे वडील घेऊन गेले आणि शहा पती-पत्नीपाशी उरली ती फक्त प्रचंड पोकळी, भरून न येणारी!
 या जीवघेण्या हादऱ्यानंतर त्या दोघांचे देह जणू अचेतन झाले. प्राण जात नाही म्हणून जगायचं एवढंच हाती उरलं होतं. अशातच ज्योतीचा प्रथम स्मृतिदिन आला. त्या दिवशी रतिलालभाईंनी लेकीचं इंग्रजीवरचं प्रेम स्मरून तिच्या फग्र्युसन कॉलेजमधून बी.ए.ला इंग्रजीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली. बस तेवढंच. काहीही न घडता दिवस पुढे जात होते. पुढची १३/१४ वर्षे अशीच गेली.
होता होता रतिलालभाईंची निवृत्तीही आली. त्यानंतर वेळ घालवण्यासाठी त्यांनी रोज सकाळी चालायला सुरुवात केली. बी.के.सी.च्या अरुणोदय वॉकर्स क्लबचे ते सदस्य झाले. इथेच त्यांचं आयुष्य बदलणारा तो क्षण आला. त्यांची कहाणी ऐकून चॅरिटी कमिशनचं काम करणाऱ्या डी. जी. गावंड यांनी त्यांना एक दिशा दिली. ते रतिलालभाईंना ‘दि महाराष्ट्र एक्झिक्युटर अ‍ॅण्ड ट्रस्टी कंपनी प्रा. लि.’ या बँक ऑफ महाराष्ट्रच्या दादर येथील उपकंपनीत घेऊन गेले. त्यानंतर काही महिन्यांत सर्व सोपस्कार पूर्ण होऊन १८ मे १९९९ या दिवशी ‘नलिनी रतिलाल शहा अष्टीकर निर्मित ‘ज्योती मेमोरियल फाऊंडेशन’ या ट्रस्ट’चं काम सुरू झालं.
त्यानंतर रतिलालभाईंना एकच ध्यास लागला.. ट्रस्टची गंगाजळी भरण्याचा. मुदत संपलेल्या बँकेच्या ठेवी, शेअर्सच्या व्यवहारातून मिळणारे पैसे.. सगळा ओघ एकाच ठिकाणी वळला. काही वर्षांनी उभयतांच्या पी.पी.एफ. खात्यांची २५ वर्षांची मुदत संपली आणि त्यांच्या हाती ८० लाख रुपये आले. त्यात मुदत ठेवींपासून मिळालेल्या २० लाखांची त्यांनी भर घातली आणि ट्रस्टच्या भांडवलाने २ कोटींचं उद्दिष्टय़ गाठलं. आता या रकमेचं दरवर्षी २२ लाख रुपये व्याज येतं. ट्रस्टचे व्यवहार पहाणाऱ्या कंपनीचे २ लाख रुपयांचे चार्जेस वजा जाता उरलेले २० लाख शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक कारणांसाठी वाटले जातात. घरखर्चाची सोय वेगळी. विश्वास ठेवायला कठीण वाटेल पण या ‘फाटक्या’ माणसाने गेल्या १५ वर्षांत आपल्या ज्योती मेमोरियल फाऊंडेशनतर्फे तब्बल   १ कोटी ३० लाख रुपयांचं दान दिलंय.
तीन वर्षांपूर्वी ‘चतुरंग’ पुरवणीतील ठाण्याच्या विद्यादान प्रसारक मंडळाविषयी वाचून त्यांनी या संस्थेला १० हजार रुपयांची मदत दिली. त्यानंतर गेली २ वर्षे त्यांनी केलेल्या एक लाख रुपयांच्या दानामुळे शुभम गेडाम हा अत्यंत गरीब कुटुंबातील आदिवासी मुलगा यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतोय, तर सत्यजित पाटील  समाजाला भरभरून देऊनही कृतज्ञतेच्या पत्रांची त्यांच्यापाशी वानवाच आहे. उलट काही कटू अनुभव मात्र त्यांच्या पोतडीत जमा आहेत. जवळच्या नात्यातल्याच एका मुलीला त्यांच्या ट्रस्टचे उच्चशिक्षणासाठी सलग ३ वर्षे साहाय्य केलं. पण चौथ्या वर्षी तिच्या गुणपत्रिकेतील २ विषयांची एटीकेटी बँक अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी शिष्यवृत्ती नाकारली. या गोष्टीसाठी आपल्या मुलीला समज देण्याऐवजी त्या कुटुंबाने यांनाच दूषणं दिली. रतिलालभाई म्हणतात, ‘या कमाईचा मी विश्वस्त आहे. हे समाजाचं देणं योग्य हाती सोपवणं हेच माझं कर्तव्य आहे.’
 त्यांच्या ट्रस्टचं कार्यालय वाशीला आहे. तिथे जाण्यासाठी ते आजही वांद्रे पूर्वमधील म्हाडा कॉलनीतील आपल्या घराजवळील ३१० नंबरची बस पकडून कुल्र्याला येतात. तिथून हार्बर लोकलने वाशी स्टेशन. पुढे ५-७ मिनिटांची चाल. परत येतानाही हाच मार्ग. स्वत:साठी गाडी ठेवणं, ट्रॅव्हल कंपनीबरोबर फिरणं त्यांनी केव्हाच नाकारलंय. गरज आणि चैन यातील स्वत:ची सीमारेषा त्यांच्या मनात पक्की आहे. त्यांची पत्नी नलिनी शहा याही साध्या सरळ गृहिणी. पतीच्या पावलांवर पाऊल टाकत जायचं एवढंच त्यांना ठाऊक. रतिलालभाई म्हणाले की, आजपर्यंत तिने माझ्याकडे स्वत:साठी काहीच मागितलं नाही. जैनांचा ‘समयसार’ हा धार्मिक ग्रंथ शहा पती-पत्नींचा परमेश्वर आहे आणि ‘सत्पात्री दान’ हा त्या परमेश्वराने त्यांना दिलेला कानमंत्र!
दु:खाचे कढ सोसूनही, समाजाचा आधारस्तंभ बनलेल्या या शहा पती-पत्नींना सलाम करताना दत्ता हलसगीकर यांच्या ओळी आठवल्या..
ज्याचे जगी कोणी नाही
त्याने माझ्या घरी यावे
माझ्या छपराखाली
दु:ख सारे विसरावे
माझ्या ज्योतीच्या तेजाने
त्याने पेटवावा दिवा
त्याच्या प्रवासाचा मार्ग
स्वच्छ सुंदर दिसावा    
संपदा वागळे –waglesampada@gmail.com
——————————————
संपर्क – रतिलाल शहा, जी ९ , जी १०,लोकमान्य टिळक मार्केट, सेक्टर
एक, वाशी, नवी मुंबई- ४००७०३, दूरध्वनी- २७८२२०६७
———————————-
तुम्हाला माहितीतल्या, परिसरातील अशाच ‘सत्पात्री दान’ करणाऱ्यांची माहिती आम्हाला खालील ई-मेलवर जरूर कळवा.
chaturang@expressindia.com

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…