गेलं वर्षभर या सदराच्या माध्यमातून वाचकांशी संवाद साधत होते. बघता बघता वर्ष उलटलं आणि निरोपाची घटिका आली. नेहमीच्या गुळगुळीत शब्दांत बोलायचं झालं तर वर्ष कसं गेलं कळलंच नाही. पण खरंच, वर्ष फार मजेत, आनंदात आणि हो, धावपळीतही गेलं. वाचक ठिकठिकाणाहून मोठय़ा प्रमाणावर व उत्स्फूर्त प्रतिसाद देत राहिल्याने माझा उत्साह टिकून राहिला. जबाबदारीही वाढल्यासारखी वाटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद, पुणे, नांदेड इत्यादी ठिकाणी शिकत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही मला ईमेल पाठवून काही कळवावंसं वाटलं. विद्यार्थ्यांचं वाचन फार नसतं या समजुतीला किंचित का होईना छेद गेला. त्यांनी आपलं म्हणणं माझ्यापर्यंत पोचवलं याचा मला विशेष आनंद वाटला. देशा-परदेशातील इतर अनेक मान्यवर, ज्ञानवंत, अभ्यासक आणि अर्थातच मित्र-मैत्रिणी (ते तर हक्काचे वाचक आणि सल्लागारही) यांनी मला प्रतिक्रिया कळवल्या. त्या सर्वाविषयी वाटणारी कृतज्ञता इथे व्यक्त करतेय.

आपल्या सदरातील प्रत्येक लेख म्हणजे परीक्षेचा पेपरच असतो, असं वाटतं मला. मात्र त्या परीक्षेचा निकाल लगेचच कळतो. तयारी करतच राहावी लागते. आलेले प्रतिसाद हुरूप वाढवतात. वाचकांमधल्या रुचिभिन्नतेमुळे प्रत्येक लेखाला प्रतिसाद निराळा असे. संस्कृत पंडिता क्षमा राव हिच्यावरील लेखाबद्दल तेल-अवीवमध्ये कामानिमित्त गेलेल्या एका व्यासंगी संशोधकाने आपल्याला या लेखातून नवीन माहिती मिळाल्याचे कळवले तेव्हा साहजिकच समाधान झाले. क्वचित कुणी प्रश्न वा शंकाही विचारल्या.

गेल्या वर्षी याच सुमारास, साहित्यविषयक सदर- तेही लेखिकांसंबंधी- मी लिहायचं असं नक्की झालं. कोणकोणत्या लेखिकांवर लिहिता येईल, कोण कोण आपल्या मनात ठसलेल्या आहेत, कोणा-कोणावर लिहिणं आवश्यक वाटतंय याचा विचार सुरू झाला.  यादी करायला लागल्यावर, खरं म्हणजे आरंभी गोंधळच उडाला. एखादी लेखिका खूप आवडते म्हणून यादीत तिचं नाव घालावं आणि दुसऱ्या दिवशी आणखी एखादी आठवली की तिचंही नाव घालावं. कुणाच्या नावावर फुली मारावी असाच प्रश्न पडू लागला. सदर पाक्षिक असणार. म्हणजे जास्तीत जास्त २४-२५ लेखिकांचा विचार करता येईल. निर्णय करता येईना. मग एक ठरवलं की शक्यतो फारशा परिचित नसणाऱ्या लेखिका निवडाव्यात. वाङ्मयाचे विविध प्रकार, भिन्न आकृतिबंध हाताळणाऱ्या, भिन्न अनुभव क्षेत्रांबद्दल लिहिणाऱ्या लेखिकांबद्दल मला कुतूहल वाटतं. त्यासाठी त्यांनी केलेली धडपड, त्यांना करावा लागलेला संघर्ष मोलाचा असतो. मराठीतील अनेक लेखिका मला प्रिय आहेत. पण त्यांच्याबद्दल रसिक वाचक वाचत असतात, अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्या लेखनाची दखल घेतली जाते. इतर भारतीय वा अभारतीय, परदेशातील लेखिका आपल्यापर्यंत मराठीतून कमी प्रमाणात पोचतात.  एखादा मोठा पुरस्कार मिळालेल्या लेखिकांबद्दल मराठीत काही प्रमाणात लिहिलं जातं हे खरं आहे, पण तेही तेवढय़ापुरतं राहतं. त्यामुळे कधी कधी तोलामोलाच्या, चांगल्या लेखिकाही आपल्यापर्यंत पोचतातच असं नाही. अशा अल्पपरिचित लेखिकांची ओळख करून द्यावी असं वाटलं. वयोवृद्ध तरीही आपल्या लेखनातला ताजेपणा टिकवलेल्या, हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांच्या वेगळ्या अक्षरवाटेचा मी धांडोळा घेतला. चांगला योगायोग असा की लगेचच्या महिन्यात त्यांना यावर्षीचं ज्ञानपीठ जाहीर झाल्याने आपण योग्य लेखिका निवडली याचा आनंद झाला. ‘न्यूयॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’ या प्रतिष्ठित नियतकालिकाच्या विनंतीवरून, युद्धनिरीक्षक म्हणून व्हिएतनामला प्रत्यक्ष जाऊन तेथील परिस्थितीचा ‘आँखों देखा हाल’ लिहिणारी, विचारवंत मेरी मॅकार्थी असो किंवा १९८९मध्ये झालेल्या, चीनमधील तिआनान्मेन चौकातील नृशंस हत्याकांडावेळी धाडसी प्रसंगांचा सामना करत, वार्ताकन करणारी केट एडी असो, त्यांची कामगिरी ही अद्वितीयच म्हणावी लागेल. यांची ओळख करून घेणं हे साऱ्यांना प्रेरणादायी तर आहेच, पण अबला मानली गेलेली स्त्री वास्तवात किती सबला आहे याचाही आनंददायी प्रत्यय देणारी ही ओळख आहे असं वाटलं. बदलत्या परिस्थितीप्रमाणे पाश्चात्त्य देशांतील लेखकांची अनुभवक्षेत्रं बदलली, विस्तारली. स्त्रियांच्या बाबतीत हा बदल अधिक लक्षणीय होता, कारण मुळात स्त्रियांचं अनुभवविश्व तोवर मर्यादित होतं. पाश्चात्त्य स्त्रीला महायुद्धांचे घाव अधिक काळ सोसावे लागले आणि त्या जखमा खूप खोलवर पोहोचत गेल्या. पूर्वी भारतातील सामाजिक परिस्थिती व कायदे स्त्रियांना अनुकूल नव्हते. अजूनही काही प्रमाणात नाहीत. पाश्चात्य देशांतही फार वेगळी स्थिती नव्हती हे या लेखिकांच्या चरित्रांवरून दिसते. तेथेही स्त्रीवर अनेक सामाजिक बंधनं होती. स्त्रियांना शिक्षण घेणं, लेखन करणं याला सामाजिकच नव्हे तर कायद्याने बंदी होती. एकोणिसाव्या शतकारंभी कायदे बदलले. मग युरोपमध्येही स्त्रिया लिहू लागल्या. तरीही अनेक घरांमधून स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध होता. अगदी तेथील उच्चभ्रू समाजातील व्हर्जिनिया वूल्फच्या घरात वडील स्वत: लेखक, इतिहासतज्ज्ञ असूनही त्यांनी तिच्या शिक्षणाला विरोध केला आणि तिला घरी स्वत:च शिकावं लागलं. म्हणूनच बेर्था स्यूट्नेरला टोपण नावाने व अनाम राहून लिहावं लागलं. मेरी अ‍ॅन इव्हान्सला ‘जॉर्ज एलियट’ असं पुरुषी टोपणनाव घ्यावं लागलं. त्याच वेळी हेही लक्षात ठेवायला हवं की, अनेकदा पुरुषांनी किंवा घरातील वडीलधाऱ्या माणसांनी मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरून तिला स्वतंत्र, स्वावलंबी केलं आहे, स्वत:चा वेगळा विचार करायला शिकवलं आहे. कॉर्नेलिया सोराबजीच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाचे दरवाजे ठोठावले नसते तर विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी मुलींना कदाचित आणखी बराच काळ वाट पाहावी लागली असती, आणि गोपाळराव जोशींनी पत्नीला शिक्षणाची जबरदस्ती केली नसती, तर आनंदीबाई पहिली महिला डॉक्टर होऊ शकली नसती.

आज परिस्थिती बदललीय याचा अर्थ सगळं काही छान छान आहे असं मुळीच नाही. उलट स्त्रियांवरील अत्याचार, त्यांना दिला जाणारा त्रास यात कदाचित वाढ झालीय की काय असा प्रश्न पडावा असे प्रसंग आजूबाजूला घडलेले दिसतात हे खरंच. पण परिवर्तन होतंय, संथ गतीनं का होईना स्थिती बदलतेय असं वाटणारंही घडताना दिसतंय. स्त्रिया किंचित्काल हतबल झाल्यासारख्या वाटल्या तरी स्वत:ला अपराधी न मानता अत्याचाराविरुद्ध आवाज उठवू शकतात, त्या आवाजाची दखल घेतली जाते, उपाय शोधले जातात. हे आशादायी चित्र दाखवणारी जेसिका स्टर्न, त्या दहशतवादी अत्याचाराचाच मुळापासून शोध घेत त्यातील अधिकारी व्यक्ती बनते हे किती प्रेरक आहे, आदर वाटायला लावणारं आहे. अ‍ॅना दस्तयेवस्कीबद्दल लिहिल्यावर कुणीतरी मला लिहिलं, ‘पुन्हा पुन्हा तुम्ही स्त्रीच्या समर्पणाला उदात्तता देता, अशा लेखिका का निवडता?’ मला वाटलं, स्त्रीचं हे रूपही आजही अस्तित्वात आहे, समाजात अनुभवास येतं.

लहानपणापासून वाचनाची आवड असल्याने आजवर मी सतत वाचत आले. पुस्तकं जमवली तरी त्या अर्थाने संग्राहक झाले नाही. पण पुस्तकांबरोबर माझं मैत्र जुळलं. त्यामुळे अ‍ॅन फॅडिमन किंवा तिच्यासारख्या अनेक व्यक्तींचे ग्रंथप्रेम हे ग्रंथवेडापर्यंत पोचतं याचं मला आश्चर्य वाटत नाही. हे सारं वाचताना आकळलेलं काही नवीन इतरांना सांगायची, त्याबद्दल स्वत:ही अधिक काही समजून घ्यायची एक संधी म्हणजे हे सदर असा विचार मी सुरुवातीला केला होता.

या लेखिकांची व इतरांचीही पुस्तकं मी पूर्वीपासून वाचत आले होते. काहीजणींची सारीच वाचली होती, असं नाही. काही हयात लेखिकांची अलीकडची वाचली नव्हती. ती यानिमित्ताने वाचली गेली. मुख्य म्हणजे पूर्वी वाचलेली काही मी परत वाचली. मनातले संदर्भ जागे झाले आणि मुद्दामहून जागे केलेही. गतिमान सोय म्हणून, (आणि लेख लिहिण्याची वेळ सांभाळायची म्हणूनही) किंडलसारखी माध्यमं वापरत पुस्तकं मिळवली, वाचली. जर्मेन ग्रिअर म्हणते तसं कधी कधी पुस्तकं बकाबक खाल्ली. या साऱ्या व्यापात या लेखिकांना मी अधिक समजून घेऊ शकले. त्यांच्या निमित्ताने मानवी स्वभावातील विविध छटा जाणवत गेल्या.

अलीकडे साहित्याचे मूल्यमापन करताना चरित्रात्मक समीक्षापद्धती वापरू नये असा एक मतप्रवाह आहे. येथे साहित्य हा लेखांचा मुख्य पाया होता. परंतु कुणीही एकांडा सर्जनशील लेखक देखील समाजातच राहतो. त्याच्या लेखनाशी त्याच्या व्यक्तित्त्वाचा निकटचा संबंध असतो अशी माझी धारणा आहे. त्यामुळे या लेखिकांच्या व्यक्तित्वाबद्दलही थोडंसं लिहिणं आवश्यक आहे असं मला वाटलं. त्यामुळे त्यांची जडणघडण, कुटुंब याबद्दल मी लिहीत गेले. मात्र त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीबद्दल स्वतंत्रपणाने लिहिणं शक्य झालं नाही. वृत्तपत्रीय लेखनाला असणारी शब्दमर्यादा मला कायमच जाचक वाटत आली. आणखी बरंच लिहिणं शक्य असूनही लिहिता न आल्याची रुखरुख राहिली. (आयन रॅन्ड, सुभद्राकुमारी चौहान, जर्मेन ग्रिअर आणि जवळ जवळ सगळ्यांबद्दलच.) ती मर्यादा कधी कधी ओलांडली तरी संपादकांनी नेहमीच विषयाचे महत्त्व समजून घेऊन मागे-पुढे केले, याविषयी कृतज्ञता वाटते.

नॉर्वेजियन अभिनेत्री व आत्मचरित्रकार लिव उलमन, जॉर्ज एलियट, मल्याळीमधील सशक्त लेखिका ललिताम्बिका अंतर्जानम्, अनिता व किरण देसाई, फ्रेंच लेखिका मार्गारेट द्युरास, कवयित्री सिल्विया प्लाथ, अमेरिकन कादंबरीकार जॉयसे कॅरल ओट्स अशा मराठीबाहेरच्या कितीतरी आवडत्या लेखिकांबद्दल लिहायचे होते. आवडते लेखक तर लांबच राहिले. पण असे काहीतरी अपुरेपण असल्याशिवाय जीवनात गंमत ती काय? वाटेवरच्या सावल्या होत, पुस्तकांनी कायम सोबत केली हेही नसे थोडकं!

कळावे, लोभ असावा.

 

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com

(सदर समाप्त)

मराठीतील सर्व अनवट अक्षरवाटा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meena vaishampayan 2017 last marathi articles in chaturang
First published on: 23-12-2017 at 04:42 IST