scorecardresearch

गरज औषधसंवादकांची!

एका शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला दवाखाना.

भारतात गेल्या काही वर्षांत औषधांच्या झालेल्या अर्निबध वापरामुळे आपण एका धोकादायक उंबरठय़ावर उभे आहोत. या संपूर्ण दुष्टचक्राच्या मागे दिसते ते एक महत्त्वाचे कारण म्हणजे रुग्ण-डॉक्टर-फार्मासिस्ट यांच्यातला हरवलेला औषधविषयक संवाद! आपल्याकडे औषधनिर्माणशास्त्र विषय शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी आरोग्यसंवादक म्हणून काम करण्यास इच्छुक असतील?

एका शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला दवाखाना. प्रचंड गर्दी असल्यामुळे रुग्णाला पाच मिनिटांत डॉक्टर कसेबसे तपासून औषध लिहून बाहेर काढतात. तो रुग्ण सांगितलेली गोळी फार्मासिस्ट कडून घेऊन जातो. रात्री गोळी घेतल्यावर त्याला अंगावर प्रचंड पुरळ येतात, डोळे आणि चेहरा सुजतो. घरचे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करतात. तिथे रुग्णालयात कळते की, डॉक्टरने दिलेल्या औषधाची रुग्णाला अ‍ॅलर्जी आहे.. हा प्रसंग म्हणावा तितका दुर्मीळ नाही! आपण घेतोय ती गोळी नक्की किती वेळा घ्यायची? ‘अ’ आणि ‘ब’ या दोन गोळ्या एकाच वेळी घेतल्या तर चालतात का? माझ्या आईला ज्या गोळीची अ‍ॅलर्जी आहे त्या गोळीने मला त्रास होऊ शकतो का? नाकात घालायचे औषध बसून घालायचे की झोपून? हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात. गोळीच्या पाकिटाबरोबर कित्येकदा एक अत्यंत बारीक अक्षरांत लिहिलेले माहितीपत्रक दिलेले असते, ते एक तर वाचायला त्रास होतो किंवा त्यातल्या कित्येक गोष्टी समजत नाहीत. मनात आलेले प्रश्न बाजूला सारायचे किंवा ‘गुगल’ला विचारायचे किंवा मनात आलेला मोठा अपराधभाव लपवत वेळोवेळी डॉक्टरला फोन लावायचा, अशी परिस्थिती आज आपल्यापैकी कित्येकांची आहे; परंतु डॉक्टरवर आंधळा भरवसा ठेवून सांगितलेले औषध मुकाटय़ाने पोटात ढकलणाऱ्यांची संख्याही त्यापेक्षाही मोठी आहे.

औषधे ही मानव जातीसाठी वरदान ठरली आहेत, परंतु ती वाटेल तशी, निष्काळजीपणाने वापरायची गोष्ट नाही. काही दशकांपूर्वी जीवघेणे असलेले आजार आज बोटाच्या पेरावर मावणाऱ्या छोटय़ाशा गोळ्यांनी पूर्णपणे बरे होतात. अनेक शतके लाखो लोकांचे जीव घेतल्यावर हिवताप, टायफॉईड, कॉलरासारखे आजार आज सहज बरे होतात; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हे सर्व रोग पुन्हा उचल खाताना दिसत आहेत. अनेक र्वष बरा होणारा टीबी अर्थात क्षयरोग आज पुन्हा नवीन, भयानक रूप धारण करून जगात थैमान घालतो आहे. कुठल्याही औषधाला न जुमानणारा हा रोग आज हजारो लोकांचे जीव घेतो आहे आणि विशेषत: भारतामध्ये मोठय़ा प्रमाणात पसरतो आहे. या सगळ्यामागे एक मोठे कारण आहे, भारतामध्ये होणारा औषधांचा अर्निबध वापर आणि भारतामध्ये औषधनिर्माणशास्त्राच्या पदवीधरांचा सामाजिक आरोग्य क्षेत्राशी केवळ नाममात्र उरलेला संबंध.

भारतात गेल्या काही वर्षांत औषधांच्या झालेल्या अर्निबध वापरामुळे आज आपण एका धोकादायक उंबरठय़ावर उभे आहोत. आपल्या औषधांच्या बेहिशेबी वापरासाठी एक मोठी यंत्रणा जबाबदार आहे. कुठल्या एका व्यक्ती अथवा व्यवसायावर याचे खापर फोडून चालणार नाही, परंतु आपल्याकडे औषधनिर्माणशास्त्र विषय शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी आज नेमके किती विद्यार्थी आरोग्यसंवादक म्हणून काम करण्यास इच्छुक असतील? मुळात औषधनिर्माणशास्त्र हे केवळ औषधे निर्माण करण्याचे शास्त्र नाही. बहुतांश विकसित देशांमध्ये आज औषधनिर्माणशास्त्राचे पदवीधर हे आरोग्ययंत्रणेचा भाग आहेत. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियासारख्या देशात रुग्णाला औषध देताना प्रत्येक क्लिनिकल फार्मासिस्टला रुग्णाच्या रोगाची माहिती, वैद्यकीय इतिहास, त्याला असणाऱ्या अ‍ॅलर्जी आणि इतर गोष्टींची पाश्र्वभूूमी लक्षात घेऊनच त्याला औषध द्यावे लागते. आदिती पाठक या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील फ्रिमेसन्स रुग्णालयात क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्या म्हणतात, ‘‘भारतामध्ये शिकवलेले औषधनिर्माणशास्त्र हे केवळ औषधनिर्मितीच्या प्रक्रियेवर भर देते. औषधे ही योग्य रीतीने न वापरल्यास ती सामाजिक आरोग्यासाठी किती जोखमीची ठरू शकतात याची जाणीव आज बहुतांश विद्यार्थ्यांना आणि अनेक तज्ज्ञांनाही नाही. ऑस्ट्रेलियामध्ये आमच्याकडे रुग्ण आल्यावर आम्हाला त्याची वैद्यकीय पाश्र्वभूमी, त्याला असलेले इतर आजार, तो घेत असलेली इतर औषधे यांसारखे अनेक प्रश्न विचारून रुग्णाबद्दल सखोल माहिती घ्यावी लागते. मग आम्ही डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराचा आराखडा तयार करतो. आपण देत असलेल्या औषधांचा रुग्णाला त्रास होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेणे येथील यंत्रणा महत्त्वाचे मानते. भारतामधले विद्यार्थी आज हे करण्यास उत्सुक नाहीत, कारण मुळात या विषयाचा अभ्यासच अत्यंत त्रोटक प्रमाणात केला जातो. बाहेरच्या देशात अँटिबायोटिक्स आणि स्टेरॉइड्ससारखी धोकादायक औषधे सर्रास दिली जाऊ  शकत नाहीत जी आपल्याकडे सर्दी-खोकल्यासाठीही वापरली जातात. आम्ही येथे घेत असलेल्या खबरदारीमुळे आणि रुग्णांशी साधत असलेल्या संवादामुळे अजून ऑस्ट्रेलियामध्ये अँटिबायोटिक रेसिस्टन्स तितक्या प्रमाणात दिसत नाही. भारतात मात्र हा प्रश्न भयंकर रूप धारण करीत आहे.’’ औषधांच्या निर्मितीपासून त्यांचे फायदे, तोटे, धोके, शरीरावरील परिणाम, औषधांचा एकमेकांवर होणारा परिणाम, आहार आणि औषधे यांचे नियम, रुग्णालयीन औषधशास्त्र असे वेगवेगळे विषय अभ्यासक्रमात असूनही आपल्याकडील औषधशास्त्र हे समाजापासून तुटलेलेच राहिले आहे. औषधांना न जुमानणाऱ्या नव्या रोगांमुळे लोक दगावण्याचे प्रमाण जगभर हळूहळू वाढते आहे. युवतींमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्भधारणा थांबवण्यासाठी संप्रेरके असलेली औषधे घेतली जात आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पटकन ‘बॉडी’ कमवायला स्टेरॉइडस घेतली जात आहेत. थोडे दुखले की वेदनाशामक गोळ्यांचा मारा केला जात आहे. या सगळ्याचा परिणाम केवळ व्यक्ती म्हणून आपल्याच शरीरावर नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यावर होत असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. गोळ्यांच्या अकारण भडिमारामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या आरोग्य-समस्या, त्याचा कुटुंबावर पडणारा ताण, त्यामुळे निर्माण होणारा आर्थिक बोजा, रुग्णालयांवर पडणारा अतिरिक्त ताण आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून रुग्णांच्या मनात निर्माण होणारा आरोग्ययंत्रणेविषयीचा अविश्वास. या संपूर्ण दुष्टचक्राच्या मागे दिसते ते एक महत्त्वाचे कारण म्हणजे रुग्ण-डॉक्टर-फार्मासिस्ट यांच्यातला हरवलेला औषधविषयक संवाद!

मुळात एक मोठी आरोग्ययंत्रणा कार्यरत असताना भारतामध्ये औषधनिर्माणशास्त्राचा आवाका इतका तोकडा राहण्याचे कारण शोधणे गरजेचे आहे.

डॉ. संपदा पटवर्धन या महाराष्ट्र राज्य औषधनिर्माण शास्त्र समितीच्या औषध माहिती केंद्राच्या माजी संचालिका होत्या. त्या म्हणतात, ‘‘भारतामध्ये आज औषधनिर्माणशास्त्राचे पदवीधर हे कारखाने, दुकाने, विक्री आणि विपणनासारख्या कामांमध्ये गर्क आहेत. रुग्णालयात आणि रुग्णांच्या एकूण सेवेमध्ये या विषयाच्या तज्ज्ञांना सामावून घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पहिले या क्षेत्रातील अभ्यासक्रमाला रुग्णाभिमुख करून घेणे गरजेचे आहे.’’ सध्या भारतामध्ये बहुतांश रुग्ण हे खासगी वैद्यकीय सेवेकडे वळलेले दिसतात. सरकारी सेवेवर विश्वासाचा अभाव आणि त्यात काहीही न दिसणारा बदल यामुळे अगदी गरीब कुटुंबसुद्धा खासगी वैद्याकडे जाणेच पसंत करतात. त्यातून अनेकदा डॉक्टरकडे होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णांना वेळ न देऊ शकणे, त्यांच्या शंकांचे निरसन न करू शकल्यामुळे रुग्णांकडून औषधे अर्धवट घेतली जातात किंवा थोडा त्रास झाल्यावर औषधे घेणे बंद केले जाते आणि क्षयरोगासारख्या औषधोपचारामध्ये हेच सगळ्यात घातक ठरते. ग्रामीण भागात तर काहीही शैक्षणिक पात्रता नसलेल्या ‘वैदूंची’ संख्यापण मोठी आहे, अशा लोकांकडून चुकीची औषधे दिली गेल्यामुळेसुद्धा या समस्येत भर पडते.’’

औषधनिर्माणशास्त्रात खरं तर रुग्णाने औषध घेईपर्यंत त्याची देखरेख करणे अभिप्रेत आहे. औषधे चांगली बनवण्याचे कार्यही महत्त्वाचे आहेच, परंतु त्यापलीकडे जाऊन आरोग्य क्षेत्रात हातभार लावणे हे या व्यवसायामध्ये अपेक्षित आहे; परंतु आपल्याकडे मात्र फार्मसी या विषयाशी आपला औषधाच्या दुकानात सोडून कुठे संबंधच येत नसल्यामुळे भारतात या व्यवसायाच्या इतर पैलूंविषयी सर्वसामान्यांना माहिती नाही. अनामलाई विद्यापीठाच्या एका अनुमानानुसार इस्पितळात दाखल केलेल्या ६.७ टक्के रुग्णांना औषधांच्या अयोग्य वापरामुळे त्रास होतात; परंतु शासकीय यंत्रणेपर्यंत ही माहिती त्यासाठी यंत्रणा असतानाही पोहोचत नाही.

आरोग्ययंत्रणेवर पडणारा प्रचंड ताण हलका करण्यासाठी फार्मसीमधील पदवीधरांना आरोग्ययंत्रणेत सामावून कसे घेता येईल, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. त्यासाठी या विषयातील शिक्षणापासून, संशोधनापासून ते आरोग्ययंत्रणेच्या रचनेपर्यंत सर्व गोष्टींचा पुनर्विचार करण्याची मोठी प्रक्रिया होणे गरजेचे आहे. आपली आरोग्ययंत्रणा आज प्रचंड तणावाखाली आहे. डॉक्टर तसेच नर्सेसची संख्या अत्यंत अपुरी आहे. त्यासाठी आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे काम करणाऱ्या औषधनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांची फळी तयार केल्यास निश्चितच आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी व्हायला मदत होईल.

औषधनिर्माते हे औषधसंवादक झाले तर आपण सामाजिक आरोग्य क्षेत्रात एका अत्यंत सकारात्मक दिशेने पाऊल टाकू शकू!

मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com

मुंबईत मुलुंड येथे महाराष्ट्र राज्य औषधनिर्माण परिषदेचे औषध-माहिती केंद्र आहे. कुठल्याही औषधाबद्दल प्रश्न असल्यास किंवा माहिती हवी असल्यास त्यांना dicmspc@gmail.com या पत्त्यावर अथवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ – सायंकाळी ५.३० पर्यंत ०२२-२५९३०६०७ या क्रमांकावर संपर्क करता येऊ शकतो.

 

मराठीतील सर्व आरोग्यम् जनसंपदा ( Arogya-jansanpada ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health dialogist drug development science marathi articles