वर्धन चौधरी
११६ वर्षांनंतर आता ब्रिटनच्या गुप्तहेर संस्थेच्या ‘एमआय६’च्या प्रमुखपदी ब्लेझ मेट्रीवेली यांची झालेली निवड ऐतिहासिक मानली गेली असली तरी फार पूर्वीपासून स्त्रियांनी अत्यंत जोखमीची कामे खूप यशस्वीरीत्या केलेली आहेत. १६६० मध्ये इंग्लंडसाठी हेरगिरी करणाऱ्या अफ्रा बेह, सुझान हायड, नेदरलँडच्या माटा हॅरी, रशियाच्या हेर ॲना चॅपमन, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनसाठी हेरगिरी करणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नूर इनायत खान, भारताच्यासरस्वती राजमणी, सेहमत खान अशा अनेकींनी गुप्तहेर होण्यासाठी लागणाऱ्या अंगभूत निर्णयक्षमता, अचूक निरीक्षणशक्ती आणि सहज संशय न येऊ देण्याची ताकद आदी गुणांमुळे देशासाठी अतुलनीय कामगिरी केली आहे.

गुप्तहेर संस्थांचे जगत हे नेहमीच गूढ, जोखमीचे आणि गुंतागुंतीचे समजले जाते. शत्रूच्या हालचाली ओळखून आपल्या सरकारकडे त्यांची माहिती पोहोचवणे, परदेशात गुप्त मोहिमा पार पाडणे, देशाच्या सुरक्षिततेसाठी स्वत:ची मूळ ओळख अंधारात ठेवूनच काम करणे, ही अत्यंत जोखमीची जबाबदारी गुप्तचर संस्थांसाठी काम करणाऱ्या निर्भीड गुप्तहेर अर्थात ‘स्पाय’ मंडळींना पार पाडावी लागते. परकीय दहशतवाद, घुसखोरी, सायबर हल्ले यांसारख्या विघातक गोष्टींविरुद्ध लढणाऱ्या यंत्रणांसाठी हे लोक आपल्या जिवाची बाजी लावतात.

‘MI6’ म्हणजेच ‘ Military Intelligence, Section 6’, ज्याला आज ‘Secret Intelligence Service ( SIS)’ म्हणून ओळखले जाते, ही ब्रिटनची १९०९ मध्ये स्थापना झालेली परदेशी गुप्तचर संस्था आहे. १९७० पर्यंत संस्थेमध्ये स्त्री कर्मचारी नियुक्त करण्यास मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. ज्या देशाच्या इतिहासात राणीने म्हणजे एका स्त्रीने अनेक दशके कारभार सांभाळला, त्या इंग्लंडला ‘एमआय६’ च्या प्रमुख पदावर एका स्त्रीची नियुक्ती करण्यास मात्र तब्बल ११६ वर्षांचा काळ जावा लागला. म्हणूनच ब्लेझ मेट्रीवेली यांची ‘एमआय६’ च्या प्रमुख पदावर झालेली निवड ही ऐतिहासिकच म्हणावी लागेल. पंतप्रधान स्टार्मर यांच्या वक्तव्यानुसार ‘हा एक ऐतिहासिक क्षण आहे’ आणि आज जेव्हा गुप्तहेर खात्याचे सर्वाधिक महत्त्व आहे, तेव्हा ही नियुक्ती होणे अतिशय स्तुत्य आहे यात वादच नाही.

‘एमआय६’ म्हटले की आपल्याला ‘जेम्स बॉण्ड’चे चित्रपट आठवतील. या चित्रपटात ‘एमआय६’च्या मुख्य स्थानी ‘M’ ही एक अतिशय धाडसी आणि कर्तृत्ववान स्त्री दाखवलेली आहे, आता ते प्रत्यक्षात आले आहे. ब्लेझ मेट्रीवेली याआधी ‘एमआय६’ मध्ये ‘Q’ म्हणजे ‘एमआय६’च्या तंत्रज्ञान सांभाळणाऱ्या खात्याचे नेतृत्व करत होत्या. ‘जेम्स बॉण्ड’ चित्रपटात बॉण्डला ज्या खात्याकडून स्फोट घडवून आणणारा पेन, लेझर असणारे गॉगल, बंदुकीच्या गोळ्या चालवणारा कॅमेरा असे सगळे अत्याधुनिक ‘गॅजेट्स’ मिळतात ते हे खाते.

१९९९ मध्ये ‘एमआय६’मध्ये काम सुरू करणाऱ्या ब्लेझ आता ‘एमआय६’च्या अठराव्या प्रमुख असणार आहेत. या प्रमुख पदाला ‘ C’ असे संबोधले जाते. ‘ C’ म्हणजे ‘ Chief’ किंवा प्रमुख हा त्याचा अर्थ आहे, हा गैरसमज आहे. ब्रिटनची पहिली गुप्तहेर संस्था ‘सीक्रेट सर्व्हिस ब्युरो’ आणि तिचे पहिले प्रमुख ‘रॉयल नेव्ही’ म्हणजे नौदलाचे एक ऑफिसर कॅप्टन मॅन्सफिल्ड कमिन्ग हे होते. ते स्वत:चे नाव ‘C’ असे लिहायचे. परंतु मूळ प्रश्न पुन्हा हाच, की ११६ वर्षं ‘एमआय६’मध्ये एकही स्त्री या मुख्य पदावर येऊ नये?

हा प्रश्न पडण्याचे कारण असे की, इतिहासाची पाने चाळल्यास लक्षात येते ते म्हणजे पुरुषी मक्तेदारी असलेल्या ‘गुप्तचर संघटनां’मध्ये फार पूर्वीपासून स्त्रियांनीही अत्यंत जोखमीची कामे खूप यशस्वीरीत्या केलेली आहेत. प्रथम उल्लेख आढळतात ते इंग्लंडसाठी १६६०च्या काळात हेरगिरी करणाऱ्या अफ्रा बेह, त्यानंतरच सुझान हायड यांचे.

पहिल्या महायुद्धात फ्रान्स आणि जर्मनीसाठी असीम धाडस दाखवत हेरगिरी करणाऱ्या नेदरलँडच्या माटा हॅरी, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनसाठी हेरगिरी करणाऱ्या,मूळ भारतीय वंशाच्या नूर इनायत खान, ‘स्पाय रिंग’साठी काम करणाऱ्या रशियाच्या हेर ॲना चॅपमन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘मिलिटरी इंटेलिजन्स विंग’साठी जिवाची शर्थ करणाऱ्या सरस्वती राजमणी, त्याचबरोबर आपल्या काश्मीरमधील एक कन्या, जिचे नाव सेहमत खान म्हणून घेतले जाते. तिनं पाकिस्तानातील मोठ्या लष्करी अधिकाऱ्याची सून म्हणून तिथे प्रवेश मिळवला.

स्वत:चा जीव धोक्यात घालून भारतीय युद्धनौका नष्ट करण्याच्या त्यांच्या संपूर्ण योजनेबद्दलची माहिती भारतीय गुप्तचर संघटनेस कळवून आपली अपरिमित हानी वाचवली. ती युद्धनौका म्हणजे १९७१च्या युद्धातील भारताची फार मोठी ताकद होती. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. अनेक गुप्तचर स्त्रियांना पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात कामगिरी पार पडताना अटक झाली आणि काहींना शत्रू पक्षाकडून मृत्युदंड दिला गेला होता.

‘CIA’ (अमेरिका), ‘MI6’(इंग्लंड), ‘Mossad’ (इस्रायल), ‘RAW’ (भारत) आणि अन्य अनेक गुप्तचर संस्थांमध्ये आज काही स्त्रिया अत्युच्च पदांवर कार्यरत आहेत आणि त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने, धैर्याने व नेतृत्वगुणांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर ‘अमेरिका सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) च्या पहिल्या स्त्री प्रमुख जिना हॅस्पेल, ज्यांनी अफगाणिस्तानातील ‘अल कायदा’विरोधातील कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. तामिर पर्डो यांच्या नेतृत्वात ‘मोसाद’ ज्या गुप्तहेर स्त्रियांवर विसंबून होती, त्यांनी इराणच्या अणुबॉम्ब कार्यक्रमाला चक्क खीळ बसवली. या स्त्रिया केवळ ‘स्त्री’ म्हणून नाही तर निर्णयक्षम, धोरणनिष्ठ आणि अत्यंत कुशल गुप्तचर अधिकारी म्हणून इतिहास घडवत आहेत. त्यांच्या कथा, जरी फारशा उघड होत नसल्या तरी त्या निश्चितच प्रेरणादायी आहेत. अशाच काही स्त्रिया प्रवाहाविरुद्ध जाऊन जगभरातील विविध ‘इंटेलिजन्स एजन्सी’मध्ये उच्च पदावर पोहोचल्या आहेत.

इंग्रजी कादंबरी ‘सीक्रेट अॅसेट’मधली लिझ कार्लाईल ही धाडसी ऑफिसर ‘एमआय५’ म्हणजे ‘ब्रिटिश सीक्रेट सर्व्हिस’मध्ये काम करणारी. एक दिवस तिला माहिती मिळते एका पुस्तकांच्या दुकानाबद्दल… तिथे काही आतंकवादी हालचाल करत असल्याची टीप… ‘एमआय५’ मध्ये कोणी तरी आहे जो बाहेर माहिती पुरवतोय… अशा पद्धतीचे हे कथानक आहे. पण या कादंबरीची लेखिका या लिझप्रमाणे स्वत:देखील गुप्तहेरांच्या विश्वाचा एक भाग होती असे सांगितले तर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या आणि यासारख्या अनेक कादंबऱ्या स्टेला रिमिंग्टन यांनी लिहिल्या आहेत. त्यांनी नक्कीच त्यांच्या अनुभवातून काही प्रसंग लिहिले असणार असे वाटते कारण स्टेला रिमिंग्टन या ‘एमआय५’ या संस्थेच्या पहिल्या स्त्री महासंचालिका (डायरेक्टर जनरल)ठरल्या.

सप्टेंबर १९६५ मध्ये स्टेला आपल्या पतीसोबत भारतात आल्या. त्यांचे पती दिल्लीला असणाऱ्या ‘ब्रिटिश हाय कमिशन’मध्ये ‘फर्स्ट सेक्रेटरी’ या पदावर होते. स्टेला यांनाही दुसऱ्या ‘फर्स्ट सेक्रेटरी’साठी काम करण्याची संधी मिळाली. १९६७ मध्ये दोन वर्षे हे काम केल्यानंतर त्या पतीबरोबर लंडनमध्ये परतल्या आणि ‘एमआय५’मध्ये नोकरीसाठी अर्ज केला. पुढच्या २१ वर्षांत त्यांनी ‘काउंटर इस्पिओनाज’ म्हणजे शत्रुराष्ट्राच्या जासूसी कारवायांना आळा घालणे, ‘काउंटर टेरेरिझम’ म्हणजे आतंकवादी हल्ले थांबवण्याची कामे आणि ‘काउंटर सबव्हर्जन’ म्हणजे सरकारी यंत्रणा कमकुवत करू पाहणाऱ्या अपराध्यांना आळा घालणे अशा ‘एमआय५’मधील अनेक क्षेत्रांत काम केले. १९८९ मध्ये ‘व्ह्याक्लाव जेलीनेक’ या चेक रिपब्लिकन राष्ट्राच्या गुप्तहेराला पकडण्यात त्यांचा हात होता.

न्यायालयात ‘मिस जे’ हे खोटे नाव घेऊन त्यांनी साक्ष दिली व इंग्लंड विरुद्ध अनेक वर्षांपासून सुरू असणारी गुप्तहेर कारवाई थांबवली. या कामामुळे व अनेक वर्षं उत्तम कामगिरी केल्यामुळे ‘एमआय५’ मध्ये असणाऱ्या केवळ दोन साहाय्यक महासंचालकांपैकी एक पद स्टेला यांना देण्यात आले. ब्रिटिश माध्यमाने १९९०च्या दशकात ‘सीक्रेट सर्व्हिस’ने आपली माणसे व आपल्या कारवायांबद्दल जनसामान्यांना माहिती द्यावी अशी मागणी केली. समाजमाध्यमांकडून येणाऱ्या या मागण्यांना स्वीकारून सरकारच्या परवानगीनंतर काही माहिती ‘एमआय५’ने समाजमाध्यमांना दिली. त्या वेळी ‘एमआय५’च्या महासंचालकाचे नाव असे पहिल्यांदाच प्रसिद्ध झाले होते. तद्नंतर स्टेला यांना आपल्या पंचतारांकित करिअरनंतर ‘डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द बाथ’ हा मोठा सन्मान देण्यात आला.

अमेरिका जगातील सर्वात मोठी आर्थिक सत्ता असूनदेखील त्यांच्या ‘इंटेलिजन्स ब्युरो’च्या संचालकपदी एक स्त्री यायला २०२० हे वर्ष उजाडावे लागले. २३ नोव्हेंबर २०२० मध्ये ‘डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ पदावर एवरील हेनेस यांची अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नियुक्ती केली. हेनेस यांचे नाव ओबामा सरकारच्या काळात आपल्या ऐकण्यात आले होते. ओबामा यांच्यावर टीका करणाऱ्या ‘मीडिया हाऊस’ आणि ‘ह्यूमन राइट्स’च्या लोकांनी ओबामा यांच्या ‘ड्रोन टार्गेटिंग’बद्दल गोंधळ केला होता. ड्रोनचा वापर करून अतिरेकी आहेत तिथेच त्यांच्यावर बॉम्ब टाकून स्फोट घडवून आणायची योजना होती. परंतु असे करताना तेथील निरपराध नागरिकदेखील जखमी होतात व मारलेही जातात हा एकंदर विषय होता. या वेळेस हेनेस यांनी त्या योजनेची धुरा सांभाळली होती.

हेनेस आणि जॉन ब्रेनन (सीआयएचे तत्कालीन संचालक) यांनी ड्रोन टार्गेटिंगसाठी साचेबद्ध धोरण आखले. यासाठी त्या रात्रंदिवस कार्यरत होत्या. ‘अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन’कडून ओबामा यांच्यावर टीकाही झाली होती. या सगळ्या गोष्टी संयमितरित्या हाताळण्याचे श्रेय हेनेस यांना देण्यात येते. हेनेस यांनी ‘DNSA’ म्हणजे ‘डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर’ हे पददेखील भूषवले आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्यादेखील त्या पहिल्या स्त्री होत्या. २०२० मध्ये हेनेस यांना ‘डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ हे पद मिळाले. नोव्हेंबर २०२४ मध्ये हेनेस यांना ‘वुमन फॉर पीस अँड सिक्युरिटी’ हा सन्मान दिला गेला.

काही वर्षांपूर्वी ‘मोसाद’ने ‘एजंट ए’ व ‘एजंट के’ अशा दोन स्त्रिया ‘मोसाद’मध्ये अतिउच्च पदावर असल्याचे घोषित केले. ‘मोसाद’चे इराणकडील काम सांभाळणारी स्त्री ‘एजन्ट के’ व ‘मोसाद फील्ड ऑपरेशन्स’चे नेतृत्व करणारी ‘एजन्ट ए’ यांच्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही, पण त्यांच्या काही मोहिमांबद्दल माहिती उपलब्ध आहे.

‘इंटेलिजन्स सर्व्हिस’च्या प्रांतात आवश्यक असणारे शारीरिक चापल्य, स्नायूंची ताकद या निकषांवर स्त्रियांना त्यापासून थोडे दूरच ठेवण्यात आले. स्त्रिया भावनिकदृष्ट्या थोड्या कमजोर पडू शकतात अशीही भावना त्यामागे होती, पण तिच्या अंगभूत निर्णयक्षमता, अचूक निरीक्षणशक्ती आणि सहज संशय न येऊ देण्याची ताकद… या गुणांमुळे ती एक उत्तम हेर आणि निर्णायक भूमिका पार पाडणारी उत्तम अधिकारी होऊ शकते हे तिने वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. असंख्य स्त्रिया तर कायमच जगाच्या पडद्यावर अदृश्यच राहिल्या आहेत. त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे हा कृतघ्नपणा ठरेल.

भारतीय गुप्तहेर सरस्वती राजमणि

भारतातील सर्वात तरुण महिला गुप्तहेर होण्याचा मान जातो तोे सरस्वती राजमणी यांच्याकडे. अगदी लहान वयापासून प्रखर राष्ट्रवादी सरस्वती म्हणजेच राजमणी या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘इंडियन नॅशनल आर्मी’साठी हेरगिरी करत होत्या. १९४२मध्ये त्यांना ‘आर्मी इंटेलिजन्स विंग’मध्ये सामील केलं गेलं. इंग्रजांच्या छावणीत एका मुलाचा वेश धारण करून सफाई कर्मचारी म्हणून त्या रुजू झाल्या होत्या. बूट पॉलिश करताना, चादरी बदलताना ऐकलेल्या चर्चेतून मिळालेली सगळी माहिती त्या ‘आयएनए’ला पुरवत असत. असे करताना एकदा त्यांची साथीदार मैत्रीण दुर्गा मात्र इंग्रजांच्या ताब्यात सापडली. त्यानंतर सरस्वती यांना कामावरून काढण्यात आले. तद्नंतर त्यांनी एका नर्तकीच्या वेशात पुन्हा छावणीत प्रवेश घेऊन दुर्गाला इंग्रजांच्या कैदेतून सोडवून आणण्याचे धाडस दाखवले होते. तेव्हा त्यांचे वय होते अवघे सोळा वर्षे! आजच्या म्यानमारमध्ये (तत्कालीन बर्माब्रह्मदेश) त्यांचा जन्म झाला होता. एका धनाढ्य परिवारातल्या त्या असल्या तरीही देशासाठी काही तरी करावे हे संस्कार त्यांच्या घरात त्यांना मिळाले होतेच. नेताजींच्या भाषणांनी प्रेरित होऊन राजमणी यांनी आपले दागिने ‘आयएनए’ला दान करून टाकले. चुकून हे झाले असेल असे समजून दागिने परत द्यायचा प्रयत्नदेखील झाला, परंतु त्यांनी ते परत घेण्यास साफ नकार दिला. तेव्हा नेताजींनी त्यांना सरस्वती हे नाव दिल्याचे सांगितले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vsc312@gmail.com