लोक आपल्या जीवनाची व्यवस्था नीट लावण्यातच पूर्ण आयुष्य घालवतात. त्यांना खऱ्या अर्थानं जगण्याची संधीच कधी मिळत नाही. आधी जमवाजमव तर करू, जगणं वगैरे बघू नंतर, असं करत करत पूर्ण आयुष्य खर्ची पडतं. विश्वास ठेवा, जमवाजमव कधीच पुरी होत नाही. ज्याला खरंखुरं जीवन जगायचं आहे, त्याच्याजवळ काही गोष्टींची उणीव असलेलं जीवन जगण्याचं कौशल्य हवंच, कारण सर्व गोष्टी एकदम मिळतच नसतात.
शेतातल्या पिकाच्या संरक्षणासाठी जसे शेताच्या चारही बाजूंना काटेरी झुडुपं लावतात, तसंच तुमच्या रक्षणासाठी तुमचं मन हे कुंपणस्वरूप असायला हवं. पण तुम्ही असं कुंपण घालता, अशी झुडपं लावता की सगळं शेतच कुंपण खाऊन टाकतं आणि पुढे पुढे तर कुंपणाचंच जंगल एवढं माजतं की पीक काढायला जागाच उरली नाही, असे म्हणण्याची वेळ येते.     
जीवनामध्ये नेहमी कुंपणच शेताला खात असतं आणि लोकांना पत्ताही लागत नाही. जगण्यासाठी अन्न, निवारा, सुरक्षितता या साऱ्या गोष्टी पाहिजेतच, त्या आवश्यकच आहेत. परंतु होतं काय, मनुष्य गरजेपुरता विचार न करता शेवटपर्यंत वेडय़ासारखा त्याच्याच मागे लागतो. घर पाहिजे, घर पाहिजे, असं म्हणून एखादा माणूस सारखी घरंच बांधत राहतो. त्यात राहायला जाणं नसतंच. पैसा कमवायला लागायचं ते फक्त पैसाच कमवत राहायचं. त्या पैशाचा उपभोग घेणं शून्य! त्यामध्ये तो इतका बुडून जातो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरतो, ती म्हणते पैसा हे एक फक्त उपयुक्त कुंपण होते. परंतु तेच आता शेत बनून गेलंय. धनाची गरज निश्चितच आहे, परंतु त्यालाही एक सीमा आहे. कोणतीही गरज ही अमर्याद नसते. त्यावरची वासना मात्र अमर्याद असते.
मन हे अतिशय उपयोगी आहे. मन म्हणजे रडार यंत्र आहे. विमानांसाठी रडारचा अतिशय उपयोग असतो. दोनशे मैलांपर्यंतची सूचना रडार यंत्रावर आधी येते. फोटो येतात. विमानाची गती इतकी तीव्र असते की दोनशे मैलांवर सूचना आधी नाही मिळाली तर टक्कर होणारच. मध्ये ढग आहेत का, कुठलं यान आहे का, कुठला पक्षी आहे का.. हे सारं पडद्यावर दिसत असतं. शंभर मैल आधीच तुम्हाला स्वत:चं संरक्षण करावं लागतं, कारण वेग इतका प्रचंड असतो की दोनशे मैल आधी सूचना नाही मिळाली तर टक्करच.
 मन हेसुद्धा एक रडार यंत्र आहे. अत्यंत वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्हाला ते सूचना देत असतं, झलक दाखवत असतं. शहाण्या माणसांसाठी मन अत्यंत उपयोगी आहे. परंतु बेअक्कल माणसांसाठी मात्र मन हे भयंकर धोकादायक ठरू शकतं. कारण बेअक्कल माणसं मनाचा योग्य तो उपयोग कधीच करीत नसतात. मनच त्यांचा उपयोग करून घेत असतं. गुलाम मालक बनतो आणि मालक गुलाम बनतो, ही त्यांची अवस्था. गृहस्थावस्थेला मी नेहमीच असं म्हणतो की कुंपणानं शेत खाल्लं! आणि माझ्या दृष्टीनं संन्यासी अवस्था म्हणजे शेत हे शेतच राहातं आणि कुंपण हे कुंपणच राहातं. कुणीच कुणाचा कब्जा घेत नाही. कुंपण शेताला खात नाही आणि शेत कुंपणाला खात नाही. कारण गरज तर दोन्ही गोष्टींची असते. कुंपणाचीही गरज असतेच शेताच्या संरक्षणासाठी.
म्हणून कुंपणाप्रमाणेच मन हेही उपयोगी आहे. जीवनात त्याची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु कुठे थांबायचं याचं भान पाहिजे. अगदी सामान्य मनुष्यसुद्धा जर पूर्ण विचारपूर्वक आपल्या जगण्याचं नियोजन करेल तर मनासारखं उत्तम यंत्र दुसरं नाही. मन ही अशी विलक्षण गोष्ट आहे की ते दूरवपर्यंत पाहू शकतं, अगदी समीप पाहू शकतं, परिस्थितीचं गणित मांडू शकतं. संरक्षणाचे उपाय शोधून काढतं, जीवनाला अनेक संकटांतून वाचवण्याचे हजारो विविध मार्ग निर्माण करत असतं. म्हणून म्हणतो, आवश्यकता तर सर्व गोष्टींचीच आहे, परंतु तेच म्हणजे जीवन नाही. दारावर एखादा द्वारपाल कामाला ठेवणं ठीक आहे, परंतु स्वत:च द्वारपाल म्हणून उभं राहाणं हा शुद्ध वेडेपणा आहे. कारण मग रक्षण तरी कुणाचं करणार?
 लोक सतत आपल्या जीवनाची व्यवस्था नीट लावण्यातच पूर्ण आयुष्य घालवतात. त्यांना खऱ्या अर्थानं जगण्याची संधीच कधी मग मिळत नाही. तुम्ही रोज टाळाटाळ करता. खऱ्या अर्थानं जगणं वगैरे बघू नंतर, आधी जमवाजमव तर करू. असं करत करत पूर्ण आयुष्य खर्ची पडतं आणि विश्वास ठेवा जमवाजमव कधीच पुरी होत नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे. ज्याला खरंखुरं जीवन जगायचं आहे, त्याच्याजवळ काही गोष्टींची उणीव असलेलं जीवन जगण्याचं कौशल्य हवं, कारण सर्व गोष्टी या एकदम मिळतच नसतात. मन तुम्हाला सतत चिथावण्या देत असतं. हे कमी आहे, ते कमी आहे. हे आणखी जमव, ते जास्त जमव. मन सतत म्हणणार- अजून राहायला जाऊ नकोस, कारण ताजमहाल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घरं घेत राहा आणि मनाचंच सतत ऐकत जाल तर जगण्यासाठी वेळच मिळणार नाही. जीवन फार छोटं आहे आणि मनोकामनांना अंतच नाही. म्हणून वेळीच थांबलं पाहिजे, अन्यथा आवश्यक गोष्टींचासुद्धा त्याग करायला लागतो, तशीही वेळ येते.
 जगामध्ये दोन तऱ्हेची माणसं असतात. एक तऱ्हा आहे ती म्हणजे आवश्यक गोष्टींमध्येच जीवन व्यर्थ घालवणारा मनुष्य! अशा तऱ्हेनं जीवन जगण्यानंही नंतर तो माणूस कंटाळून  जातो, वैतागतो आणि दुसरा वेडेपणा सुरू करतो. तो म्हणजे सगळ्या आवश्यकतांचा त्याग करणं. भोजनाचा त्याग करणं, सतत उपास करणं. म्हणजे होतं कसं? तर एकतर भोजनच सारखं करत राहायचं नाहीतर एकदम सतत उपासच करत राहायचं.. मधली अवस्था नाहीच.. संतुलन कुठे नाहीच.
 म्हणजे थोडक्यात काय?.. तर एका वेडेपणातून सुटका झाली की दुसरा वेडेपणा सुरू होतो, तर दुसरी तऱ्हा म्हणजे- वेडय़ा माणसांचाही त्यांचा म्हणून एक तर्क असतो. तो त्या तर्काशी अगदी सुसंगत असतो आणि मनानं निर्माण केलेले तर्क जर का अमलात आणत असाल तर मग वेडेपणाची मालिकाच चालू राहते. म्हणजे बघा- मनाचा तर्क असा असतो. समजा, एक वेळा जेवण केल्यानं जे समाधान मिळतं, ते समाधान वीस वेळा जेवल्यामुळे किती तरी वाढत असणार.. मग चला.. वीस वेळा जेवू.. हे इतकं साधं मनाचं गणित असतं. परंतु आपलं जीवन या अशा तर्कावर -गणितावर- चालत नसतं, कारण एक वेळ जेवल्यानं फायदा होतो म्हटल्यानंतर वीस वेळा जेवणं यामध्ये वीसपट फायदा होत नसतो. वीस वेळा जेवल्यानंतर आज नाही तर उद्या तरी तुम्हाला त्रास होणारच, तुम्ही रोगी बनाल. नंतर नंतर जेवण समोर आलं तरी ते फेकून देण्याची इच्छा होईल. आतासुद्धा तुमच्या तर्काचं गणित साधं-सोपं आहे. जेवणानं इतकं नुकसान होत आहे म्हणजेच सगळ्या दु:खाचं मूळच भोजन आहे. चला मग आता उपास करू या, सगळ्या जगामध्ये उपासाचे निरनिराळे पंथ आहेत. आता तुम्ही दुसरं टोक गाठणार, पण तिथेही दु:ख आहेच. म्हणूनच मध्यबिंदूवर थांबणे हा मनापासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग आहे. पण मन हे नेहमी अतिरेकामध्ये जगत असतं. घडय़ाळाच्या लंबकाप्रमाणे एकदा या टोकाकडून त्या टोकाकडे. मध्यावर थांबणं नाहीच, कारण मध्यावर थांबणं म्हणजे घडय़ाळ बंद पडणं आहे. ज्या क्षणी तुम्ही मध्यावर थांबाल त्या क्षणी तुमचं मनाचं घडय़ाळ थांबेल. त्या क्षणी ‘माया’ थांबेल. माया तुमच्यामध्ये विरघळून जाईल. त्यातूनच तर विराट सौंदर्याचा जन्म होत असतो. बुद्धत्वाचा जन्म होतो. कबीर जन्मतात, श्रीकृष्ण जन्मतात, जीझस ख्राईस्ट जन्मतात.    ल्ल
(‘ऐका संतांनो’ या प्रज्ञा ओक अनुवादित, मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article from osho world
First published on: 29-11-2014 at 01:01 IST