‘ज्यांना सर्व काही विनासायास मिळतं त्यांना भाग्यशाली म्हटलं जात नाही. तर आपल्याला जे मिळतं, त्याला जे सुंदर बनवतात तेच खरे भाग्यशाली असतात.’ म्हणूनच तर म्हटलं जातं,
‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’.
म नोवैज्ञानिकांनुसार आपल्या मनात एका मिनिटांत २५ ते ३० विचार येतात. म्हणजे एका तासाला सुमारे दीड ते दोन हजार विचार मनात येऊन जातात व एका दिवसात साधारणत: तीस हजार विचारांची निर्मिती आपल्या मनात होत असते. प्रत्येक विचाराबरोबर त्याला अनुसरून निर्माण होणाऱ्या भावना (इमोशन्स) व दृष्टिकोन (अ‍ॅटिटय़ूड)देखील निर्माण होत असतो. त्यानंतर आपण कर्मेद्रियांद्वारे कर्म करतो. पुन्हा पुन्हा कर्म केल्याने त्याची सवय होत जाते, ज्यातून आपले व्यक्तिमत्त्व (पर्सनॅलिटी)घडत जाते. हे व्यक्तिमत्त्व घेऊनच आपण सर्वत्र वावरत असतो. तुम्ही लोकांशी जसे वागता, जी ऊर्जा किंवा जे व्हायब्रेशन तुम्ही त्यांना देता, तेच पुन्हा तुमच्यापर्यंत येत असतं. संतांनीदेखील म्हटलंय,
समस्त वेद पुराणमें बात कही है,
दुख देवत, दुख होते है,
सुख देवत, सुख होय।
जसं आपण कर्म करतो तसंच फळ आपल्याला मिळतं. जसं आपलं व्यक्तित्व असतं, तशीच आपली नियती बनत जाते. थोडक्यात आपलं भाग्य उजळण्यासाठी सकारात्मक विचार, सद्विचार करणं अत्यंत जरुरीचं आहे.
कबिरांच्या झोपडीजवळ एक कसाई त्याचा धंदा करीत असे. जवळच राहत असल्यामुळे इच्छा नसतानाही कबिरांची नजर सारखी तिथे जात असे आणि साहजिकच ते दु:खी, निराश होत. त्यांच्या मनात विचार यायचा, कसा निर्दयी माणूस आहे हा? किती पाप करतो आहे? पण एक दिवस त्यांनी स्वत:च आपल्या मनाला समजावलं. आपण का दु:खी होतो आहोत? त्या कसायाने केलेल्या कर्माचं चिंतन आपण का करावं? जेव्हा एखादं कर्म घडतं तेव्हा त्याची प्रतिक्रिया स्वाभाविकपणे उमटतच असते. लगेचच कबिरांनी दोहा लिहिला,
कबीर तेरी झोंपडी
गल कटियन के पास,
करणगे सो भरणगे
तू क्यों भया उदास!
भाग्य म्हणतं, जे कर्म आम्ही करतो त्याचं फळ आम्हास मिळतं. आपण आजपर्यंत तसंच मानून चालत होतो, की माझं भाग्य लिहिणारा कोणी दुसराच आहे. खरं पाहता, पावलोपावली आपलं भाग्य आपणच बनवत असतो. एकदा एका व्यक्तीने परमेश्वराजवळ खंत व्यक्त केली. म्हणाला, ‘भगवंता. तू सर्वाना यथायोग्य सर्व काही देतोस, पण मला का बरं या सुखापासून वंचित ठेवलंस?’ तेव्हा उत्तरादाखल भगवंत म्हणाले, ‘ज्यांना सर्वकाही विनासायास मिळतं त्यांना भाग्यशाली म्हटलं जात नाही. तर आपल्याला जे मिळतं, त्याला जे सुंदर बनवतात तेच खरे भाग्यशाली असतात.’ म्हणूनच तर म्हटलं जातं, ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’ त्यामुळे आपलं भाग्य जर बदलायचं असेल तर सर्वप्रथम आपले विचार बदलणं आवश्यक आहे.
संत तुकाराम मोठय़ा श्रद्धेने विठ्ठलाची भक्ती करायचे. आजूबाजूच्या लोकांनाही विठ्ठलाची महती सांगायचे, परंतु धर्ममरतडांना मात्र ते रुचलं नाही. त्यांनी गावकऱ्यांची मनं कलुषित केली व त्यांच्या मदतीने महाराजांची गाढवावरून धिंड काढली. त्यांच्या डोक्यावरील केसांचं मुंडण करून, हळदीचा लेप लावला. तोंडाला काळं फासलं व त्यांच्या गळय़ात वांगी, बटाटे, टमाटे, लिंबू इ. भाज्यांची माळ घातली. गावातील गल्ली बोळांतून फिरवून आणल्यावर शेवटी त्यांच्या घरासमोर आणून उभं केलं. त्यांच्या पत्नीने जेव्हा हे बघितलं तेव्हा ती सर्वाना शिवीगाळ करायला लागली. अशा परिस्थितीत महाराज अतिशय शांत व गंभीर स्वरात पत्नीला म्हणाले, ‘तू यांना का बोल लावतेस? या सर्वानी आपल्यासाठी हा आठ दिवसांचा भाजीपाला दिला आहे. त्याचबरोबर माझ्या डोक्यावरील केसांचं मुंडण करून तेथे हळदीचा लेप लावल्याने माझ्या डोक्यावर जे फोड यायचे ते आता बरे होतील. आपल्या लग्नाच्या वेळेस आपली कुणी वरात काढली नव्हती. आता या सर्वानी गल्ली-बोळातून माझी वरात काढली. हे सर्व जण पायी चालत होते, मी मात्र आरामात गाढवावर बसलो होतो. त्यामुळे हे सर्व जण चालून थकले असतील. त्यांना तू चहा पाणी दे. शिव्या न देता त्यांना धन्यवाद दे!’ हे तुकाराम महाराजांचे उद्गार ऐकताक्षणीच गावकऱ्यांचं मन भरून आलं. भारतीय समाजाने राजाची पालखी कधीच उचलली नाही, पण संतांची पालखी मात्र उचलली आहे, याचं कारण ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.’ सकारात्मक विचार हाच भाग्य बनवण्याचा आधार आहे.
 कवी प्रदीपजींनी एका गीतात म्हटलय,
कोई लाख करे चतुराई
कर्म का लेख मिटे ना रे भाई।
एक घटना आठवते. एकदा एका श्रीमंत घरच्या मुलाची गाडी खड्डय़ात अडकली. खूप प्रयत्न करूनही तो मुलगा खड्डय़ातून गाडी बाहेर काढू शकेना. तेव्हा जवळच्याच एका घरातून एक गरीब शेतकरी त्याच्या मदतीला आला, त्याने गाडी खडय़ातून बाहेर काढून दिली. मुलाने शेतकऱ्याचे आभार मानले आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्या मुलाचे वडील त्या शेतकऱ्याकडे आले व म्हणाले, ‘हे भल्या माणसा, मी तुला इनाम देऊ इच्छितो. तू केलेल्या मदतीबद्दल.’ परंतु शेतकऱ्याने नम्रपणे सांगितलं, ‘मला इनाम नको. केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून मी हे कर्म केलं. मी केवळ माझं कर्तव्य पार पाडलं आहे.’ भरपूर आग्रह करूनही जेव्हा तो शेतकरी इनाम घेण्यास तयार होईना तेव्हा श्रीमंत माणसाने विचारलं, ‘तुला मूल-बाळ आहे का?’ त्यावर शेतकऱ्याने एक मुलगा असून तो शाळेत शिकत असल्याची माहिती दिली. तेव्हा त्या श्रीमंत माणसाने तो मुलगा सांभाळण्याची व त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली. खूप विचाराअंती शेतकऱ्याने त्याला संमती दर्शवली. तो श्रीमंत माणूस त्या शेतकऱ्याच्या मुलाला घेऊन गेला. त्या गरीब मुलाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं, चांगलं उच्चशिक्षण दिलं. पुढे तो मुलगा एक मोठा नामांकित डॉक्टर झाला.
पुढे एकदा त्या श्रीमंत माणसाचा स्वत:चा मुलगा खूप आजारी पडला. आजार एवढा बळावला की त्याच्या जगण्याची आशा मावळून गेली. याच दरम्यान डॉक्टर बनलेल्या त्या शेतकऱ्याच्या मुलाने पेनीसिलीन या जैवरक्षक औषधाचा शोध लावला होता. त्या औषधामुळेच श्रीमंत माणसाचा मुलगा पुर्ववत, स्वस्थ झाला. ते दोघे कोण होते माहितेय? शेतकऱ्याचा मुलगा होता
डॉ. अलेक्झांडर फ्लेमिंग व श्रीमंत माणसाचा मुलगा, जो आजारी पडला ते होते, सर विन्स्टन चर्चिल. जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
त्यामुळे विसरू नका, या जगात जे पेराल तेच उगवतं, तसंच जितकं पेराल तितकं उगवतं हेच खरं.    ल्ल
( प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ‘ओम शांती मीडिया’ या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा हा मराठी अनुवाद)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bodhi vruksha as you sow as you reap
First published on: 15-03-2014 at 01:38 IST