मृत्यू अटळ आहे. परंतु एका देहाचं जगणं संपतं, तेव्हा एक नवीन जीवन सुरू होऊ शकतं… कोणाच्या तरी श्वासातून… हृदयातून… दृष्टीतून…! ‘रहे ना रहे हम…’ पण अवयवदानातून त्या व्यक्तीच्या मनात माणुसकीचा सुगंध अखंड दरवळत ठेवणं आपल्याला सहज शक्य आहे. भारतामध्ये एक लाख मृत व्यक्तींमध्ये, फक्त एकाचे नातेवाईक अवयवदानास मान्यता देतात. हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत ३० पट कमी आहे. म्हणून प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करायला हवा. नुकत्याच झालेल्या जागतिक अवयवदान दिनाच्या (१३ ऑगस्ट) निमित्ताने… १७५ हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे डॉ. अन्वय मुळे यांचा खास लेख.
ही घटना ३ जानेवारी २०१६ची. इंदूरपासून १८० किलोमीटर अंतरावरील गावात राहणारा एक शेतकरी, आपल्या १७ वर्षांच्या मुलीला उपचारासाठी एस.टी.ने इंदूरच्या सरकारी रुग्णालयात घेऊन येत असे. तिला आकडी (फिट्स) येत असे. एकदा रुग्णालयातून औषधे घेऊन, परत जाण्यासाठी एस.टी.च्या थांब्यावर उभं असताना, त्या मुलीला तीव्र आकडी येऊन ती मागच्या भिंतीवर जोरात आदळली. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मेंदूमृत (ब्रेनडेड) घोषित केलं आणि तिच्या वडिलांना अवयवदानासाठी प्रेरित केलं. त्यानंतर आम्हाला बोलावून घेण्यात आलं. (मेंदू मृत झाल्यावर म्हणजे मेंदूतील श्वसनाच्या केंद्राचे काम थांबल्यावर, त्या व्यक्तीचे हृदय व्हेंटिलेटरच्या मदतीने तीन ते चार दिवस चालू ठेवता येतं. या काळात हृदय व इतर अवयवांचे दान करणे शक्य आहे.)

मी माझ्या टीमसह तातडीने तिथे पोहोचलो आणि हृदय प्रत्यारोपणाची ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली. एक जीव गेला होता, परंतु तिच्यामुळे दुसरा जीव वाचला होता. मुलीच्या मृत्यूच्या अनपेक्षित धक्क्यातून स्वत:ला सावरून, एका अल्पशिक्षित, गरीब पित्याने घेतलेला तिच्या अवयवदानाचा निर्णय हा मला माणुसकीचा सर्वोच्च आविष्कार वाटला. माझ्या मुलीचं आयुष्य संपलंय, पण तिचे अवयव इतर कोणाचे जीवन वाचवू शकत असतील, तर ते दान करणं ही माझी जबाबदारी आहे, हे ज्याला कळलं त्याला अल्पशिक्षित कसं म्हणायचं?

हृदय शल्यविशारद म्हणून गेली २५ वर्षं काम करताना मला अशा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. त्यातील काही हुरूप वाढवणारे तर काही हतबल करणारे. ऑगस्ट २०१५ मध्ये मी एका २६ वर्षांच्या युवकावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. अवयवदानसंबंधातील ही मुंबईतील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया, ज्याने या तरुणाचं जीवन पूर्ण बदललं. त्यानंतर ५-६ वर्षांनी त्याचा लहान भाऊ माझ्याकडे आला. त्यालाही हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. मात्र सांगितलेले उपचार व्यवस्थित न घेतल्याने, हृदयात रक्ताच्या गाठी होऊन, त्यातील एक मेंदूत जाऊन तो ‘ब्रेनडेड’ झाला.

अशा परिस्थितीत याच प्रक्रियेतून जीवनदान मिळालेला त्याचा मोठा भाऊ, याच्या अवयवदानासाठी (मूत्रपिंड, यकृत इत्यादीच्या) आनंदाने संमती देईल असं वाटलं होतं. पण त्याने धर्माच्या नावाखाली नकार दिला तेव्हा मी मनोमन हादरलो. खरं तर जगातील सर्व धर्म सेवा, करुणा आणि मानवतेचा संदेश देतात. मग असं का व्हावं? तत्क्षणी मला अवयवदानविषयक जनजागृतीची गरज तीव्रतेने जाणवली.

अवयवदान ही केवळ सामाजिक बांधिलकी नाही, ती देशभक्ती आहे, धर्म आहे, मानवतेची हाक आहे. अवयवदान म्हणजे दुसऱ्या जीवांना जीवन देऊन आपलं आयुष्य संजीवन करणं. आयुष्यभर आपल्या अवयवांचा आपण उपयोग केला, पण मृत्यूनंतर ते जळून जातात किंवा मातीत मिसळून जातात. ते जर कोणाच्या श्वासांचं कारण बनू शकत असतील, तर त्यासारखं मोठं पुण्यकर्म नाही.

भारतामध्ये अवयवदानासाठी कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी आणि प्रचार फारच मर्यादित आहे. खरं तर सरकार, स्वयंसेवी संस्था आणि समाज माध्यमे (सोशल मीडिया) यांनी एकत्र येऊन ‘मृत्यूनंतर अवयवदान म्हणजे जीवनदान’ हा संदेश जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचवायला हवा. डोळे, हृदय, मूत्रपिंडं, यकृत, फुप्फुसं, स्वादुपिंड आदी अवयव एका मृत शरीरातून, दिलेल्या अवधीत काढले गेले तर ७ ते ८ जीव वाचू शकतात. देहाने मृत झालेला तो जीव, विविध शरीरांमधून आपलं अस्तित्व टिकवून राहू शकतो.

भारतामध्ये एक लाख मृत व्यक्तींमध्ये, फक्त एकाचे नातेवाईक अवयवदानास मान्यता देतात. हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत ३० पट कमी आहे. त्यातही तमिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक ही राज्ये अवयवदानात अग्रेसर आहेत. या ठिकाणी तिथल्या एकूण अवयवदानातील ३० टक्के शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात होतात, तर बाकीच्या ७० टक्के सरकारी रुग्णालयात.

महाराष्ट्रात हे प्रमाण उलट आहे. वास्तविक रेल्वे किंवा रस्त्यावरील अपघातातील जखमींना सरकारी रुग्णालयातच दाखल केलं जातं. गोरगरिबानांही इथल्याच सेवेचा आधार असतो. त्यामुळे या रुग्णालयात अवयवदानाची गरज जास्त असते. वर उल्लेखलेल्या तीन राज्यांत तर अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या मृतांच्या नातलगांना शासकीय मानवंदना (स्टेट सॅल्यूट) दिली जाते. ओडिशा सरकार तर त्यांना आर्थिक सहाय्यदेखील देते. मात्र महाराष्ट्रात याबाबत रुग्णालये तसेच डॉक्टरांकडून उदासीनता दिसून येते.

त्यातही मुंबईबाहेरील भागातून होणाऱ्या अवयवदानाचे प्रमाण ७० टक्के आहे तर मुंबईतून होणाऱ्या दानाचे प्रमाण ३० टक्के इतकेच आहे. समाजाची मानसिकता बदलायला वर्षे नव्हे तर पिढ्या लागतात. म्हणून मी अवयवदानाची चळवळ सुरू केली. कारण दानाशिवाय प्रत्यारोपण नाही. अवयवदाना- विषयी शिबिरे, व्याख्याने घेताना मला जाणवलं की, मुंबईबाहेरच्या लोकांमध्ये मृत्यूनंतर शरीरदान व अवयवदानाची संस्कृती अधिक खोलवर रुजलेली आहे. मोठ्या खासगी इस्पितळात, मृतांच्या नातेवाईकांना अवयवदानाचं महत्त्व पटवून देणारी, त्यासाठी मार्गदर्शन करणारी स्वतंत्र गट, व्यवस्था असते. ही सुविधा सरकारी रुग्णालयातही सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे.

मात्र दात्याचं हृदय घेऊन येत असताना, चार तासांच्या आत ते पुन्हा सक्रिय व्हावे यासाठी विमान कर्मचारी आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून जे सहकार्य मिळतं (ग्रीन कॉरिडॉर) त्याला तोड नाही. या सेवेचा अभिमानाने सांगावा असा हा अनुभव… सकाळचे नऊ वाजले होते. नाशिकच्या रुग्णालयात हृदय काढून घेण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली होती.

आता पुढचा प्रत्येक क्षण अमूल्य. प्रत्येक सेकंद जीव वाचवणारा! यानंतर ते हृदय मुंबईला घेऊन जायचं तर समोर एक मोठा अडथळा उभा होता. नाशिक विमानतळ त्यावेळी कार्यरत नसल्याने चार्टर विमानाची शक्यता मावळलेली. सामान्यपणे रस्तामार्गे नाशिकहून मुंबईला जाण्यास तीन-साडेतीन तास लागतात. त्यातही सकाळची ९ची वेळ म्हणजे महामार्गावर गाड्यांची प्रचंड गर्दी. ही परिस्थिती समजल्यावर आमचंच हृदय धडधडू लागलं.

आम्ही पोलिसांना फोन लावला आणि काय आश्चर्य… कमालीच्या वेगाने चक्रं फिरू लागली. नाशिक पोलिसांनी सायरनचा आवाज दिला तसं वाहतूक पोलिसांनी सर्व महामार्ग रिकामे केले. कल्याण, भिवंडी, ठाणे आणि मुंबई हा संपूर्ण मार्ग आमच्यासाठी मोकळा झाला. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याशी स्पर्धा करणाऱ्या वेगाने आमची अॅम्बुलन्स धावू लागली.

मोजून ७० मिनिटांत आम्ही या दरवाजापासून त्या दरवाजापर्यंत पोहोचलो. केवळ पोलिसांच्या धाडसाने, समन्वयाने आणि सेवाभावाने एका जीवाला नवं आयुष्य मिळालं. असाच अनुभव आला तो अमरावतीला. तेथील अतिशय दुर्गम ठिकाणी, रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १७ वर्षांच्या मुलीचं हृदय आणणंही आम्हाला केवळ ग्रीन कॉरिडॉरमुळेच शक्य झालं.

परदेशामध्ये शालेय वयातच मुलांच्या मनावर अवयवदानाचे महत्त्व बिंबवल्याने, होणाऱ्या सकारात्मक बदलाचं मी अनुभवलेलं एक उदाहरणही सांगावंसं वाटतं. माझ्याकडे उपचार घेत असलेल्या एका सात-आठ वर्षांच्या छोट्या मुलीला हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. ती इतकी अशक्त झाली होती की, व्हीलचेअरवर बसून दात घासतानाही तिला ऑक्सिजन द्यावा लागत असे. पण तिच्या वयाचं, त्या आकाराचं, त्या रक्तगटाचं हृदय काही केल्या मिळत नव्हतं. पण परमेश्वराने तिच्यासाठी काहीतरी योजना आखली होती. त्यानुसार तिला ऑस्ट्रेलियातील एका तिच्याच वयाच्या मुलाचं हृदय मिळालं.

झालं असं… आई, वडील आणि तो मुलगा असं ते गुजराती कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झालं होतं. एक दिवस तो मुलगा घरी येताच आईला, तू अवयवदानासाठी नोंदणी केली आहेस का… म्हणून विचारू लागला. त्या दिवशी शाळेत कोणी तज्ज्ञाने या विषयाचे महत्त्व सांगितल्याने तो उत्साहात होता. आईने त्याला आपला वाहनचालक परवाना दाखवला. त्यावर I am a organ donar असं लिहून पुढे नोंदणी क्रमांक टाकला होता.

वडिलांच्या परवान्यावर तशी नोंद नसल्याने, त्याने त्यांचा पिच्छा पुरवून, त्यांना तशी नोंदणी करण्यास भाग पाडलं आणि म्हणाला, ‘‘मलाही हे करायचे आहे. पण १८ वर्षांपर्यंत अशी नोंदणी करता येत नसल्याने, जर तशी वेळ आलीच तर तुम्ही माझं अवयवदान करा.’’

‘उगीच अभद्र बोलू नकोस,’ म्हणत आईने तो विषय तिथेच थांबवला. परंतु ती गोष्ट घडलीच. हे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत मुंबईत येत असताना विमानात अचानकपणे या मुलाची शुद्ध हरपली, तो अत्यवस्थ झाल्याने आई-वडिलांनी आधीच म्हणजे बेंगळूरुला उतरून त्याला इस्पितळात नेलं. तेव्हा मेंदूतील रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गाठी जमा झाल्याने त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित करण्यात आलं. ते माता- पिता त्याला व्हेंटिलेटरसह उचलून मुंबईत माझ्याकडे घेऊन आले आणि त्या मुलीला ज्याची प्रतीक्षा होती ते हृदय मिळालं. ‘मुलाची इच्छा पूर्ण केली’ म्हणून त्या माऊलीने मला नमस्कार केला तेव्हा मीही सद्गदित होऊन त्या दात्यांसमोर वाकलो.

आपल्या पुराणामध्येही याचे उल्लेख आढळतात. महर्षी दधीचि यांनी देवांच्या कल्याणासाठी आपल्या हाडांचं दान केलं. त्यांपासून बनलेल्या वज्राने इंद्राने वृत्रासुराचा पराभव केला, अशा कथा सांगितल्या जातात. हा देहदानाचा आदर्श विसरून कसं चालेल? शिक्षिका असलेली माझी आई वयाच्या ८४व्या वर्षी निधन पावली. तिच्या इच्छापत्रामध्ये तिने म्हटलं होतं, ‘माझं शरीर वैद्याकीय महाविद्यालयाला दान करावं. भावी डॉक्टर्सना अभ्यासासाठी माझ्या शरीराचा उपयोग झाला तर मला धन्यता वाटेल.’ आयुष्यभर विद्यादान करणाऱ्या आणि मृत्यूनंतरही तीच इच्छा धरणाऱ्या, तिच्यातील शिक्षकाचं हे मनोगत मला नि:शब्द करून गेलं.

आपल्याकडे जिवंतपणी कुटुंबातील व्यक्तीसाठी किंवा जिवलगांसाठी मूत्रपिंड किंवा यकृताचा काही भाग देण्याची लोकांची तयारी असते. (कारण एका मूत्रपिंडावर काम भागतं आणि यकृत हळूहळू पुन्हा आपला मूळ आकार धारण करतं). पण मृत्यूनंतर अवयवदानाचं प्रमाण मात्र अत्यल्प आहे. याची कारणे म्हणजे एक तर जागरूकतेचा अभाव आणि दुसरं म्हणजे जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने बसलेल्या धक्क्यातून सावरून, त्या देहाची चिरफाड करून अवयवदान करण्याचा निर्णय घेणं नातलगांना अवघड जातं.

यावर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण जिवंत असतानाच अवयवदानाचा संकल्प करावा, आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना याबद्दल स्पष्ट सांगावं, हाच उपाय आहे. त्यामुळे अशा प्रसंगी त्यांची मानसिक तयारी राहते. (जशी ऑस्ट्रेलियातील त्या मुलाच्या आई-वडिलांची होती.)

एका आई-वडिलांनी दाखवलेल्या पराकोटीच्या मानसिक बळाचं प्रत्यंतर पाहताना तर मी अवाकच झालो. दीड वर्षांच्या बाळाचं हृदय घेऊन जाण्यासाठी मला सुरतला बोलावण्यात आलं होतं. ती लहानगी आईच्या कडेवरून चुकून निसटून पायऱ्यांवरून थेट खाली पडली. त्या क्षणाने तिचं आयुष्य थांबवलं. हा धक्का सहन करण्यापलीकडचा. पण त्या तरुण माता-पित्यांनी, मानसिक बळ एकवटून, एक मोठा निर्णय घेतला- आपल्या लाडक्या मुलीचे अवयवदान करण्याचा.

त्या छोट्या मुलीचं हृदय मुंबईतील एका ३ वर्षांच्या मुलीच्या छातीत धडधडू लागलं. या गोष्टीला आज आठ वर्षं झाली. नवजीवन मिळालेली ती ११ वर्षांची कन्या आता आनंदात जगते आहे. मात्र त्या दिवशी दोन्ही कुटुंबांच्या डोळ्यात पाहिलेले टोकाचे भाव- एकीकडे आपल्या काळजाच्या तुकड्याला गमावल्याचं असह्य दु:ख आणि दुसरीकडे आपल्या लाडक्या लेकराला धडधडणारं हृदय मिळाल्याचा आनंद- विसरणं कसं शक्य आहे?

दुसऱ्याला सहजपणे देता येणाऱ्या या आनंदासाठी सगळ्यांनीच ‘मी अवयवदान करणार’चा निर्णय घ्यायला हवा. मात्र आपले अवयव इतरांच्या उपयोगी पडावे यासाठी आपलं शरीर निरोगी ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. लोकांचं कल्याण करण्याचं शरीर हेच एकमेव साधन आहे. ते आरोग्यपूर्ण असेल तरच त्या शरीरातूनच योग्य अवयव पुढे दिले जाऊ शकतात.

मृत्यू अटळ आहे. पण जेव्हा एक देह संपतो तेव्हा एक नवीन जीवन सुरू होऊ शकतं- कोणाच्या तरी श्वासातून… हृदयातून… दृष्टीतून! आपण असू अथवा न नसू… रहे ना रहे हम… अवयवदानातून त्या व्यक्तीच्या मनात मानवतेचा सुगंध अखंड दरवळत ठेवणं आपल्याला सहज शक्य आहे. आज अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. योग्य वेळी ते मिळाल्यास त्यांचं आयुष्य वाचू शकतं. यासाठी गरज आहे ती शासन आणि समाज यांनी एकत्रित पावलं उचलण्याची!

आज मी प्रत्येक अवयवदात्याला आणि त्यांच्या कुटुंबाला सलाम करतो. त्यांच्या नि:स्वार्थ कृतीने, अनेकांच्या डोळ्यांत पुन्हा पहाट उगवली आहे. मी स्वत:ला फक्त एक ‘कुरिअर बॉय’ समजतो, ज्याने १७५ हून अधिक हृदये नव्याने धडधडत ठेवली. पण खरे नायक तर ते आहेत, ज्यांनी ती दिली.

anvay03 @gmail.com

शब्दांकन संपदा वागळे

waglesampada@gmail.com