कॉम्रेड बाबा अरगडे यांचा मला फोन आला. ‘‘पिंपळे गावची शोभा दोन दिवसांपासून बेपत्ता आहे, अशी चर्चा आहे. तिच्या अंगात देवी संचारली आणि शोभा अंतर्धान पावली.’’ मी तातडीने तिकडे जाण्यासाठी निघाले. दोन-अडीच तासांच्या प्रवासात डोक्यात अनेक विचार फेर धरत होते. मागच्या वर्षी वर्तमानपत्रात बातमी आली होती, ‘गावात देवी अवतरली. देवीने संकेत दिलेल्या ठिकाणी बोअरवेलमधून पाणी लागले.’ या बातमीचा मागोवा घेत मी आणि डॉ. मच्छिंद्र वाघ पिंपळ्याला पोहोचलो होतो. तिथं घटना जाणून घेऊन लोकांमध्ये प्रबोधनाचा प्रयत्न केला; परंतु कुणीही आमचं ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतं. ‘‘आमच्या गावात देवी अवतरली. तिच्या कृपेनं बोअरवेलला पाणी लागलं. गावावर देवीची कृपा झाली,’’ एवढंच पालुपद ते ऐकवत होते. आमच्या प्रबोधनाचा प्रयत्न विफल झाला. माघारी आलो. आणि आज ही बातमी. तेव्हा लक्षात आलं की या सर्व घटनाक्रमामागचं वास्तव खूपच गंभीर आहे.

शोभा आणि सुभाष एकाच गावात राहणारे. शोभा ही सुभाषच्या मामाची मुलगी. सुभाष गरीब कुटुंबातला २६ वर्षांचा तरुण. सुभाषचे वडील तो सहा वर्षांचा असतानाच वारले. मोलमजुरी करून आईने सुभाषचं शिक्षण केलं. सुभाषनेही मोलमजुरी करून शिक्षण पूर्ण केलं. लेखापरीक्षक म्हणून खासगी व्यवसाय सुरू केला. शोभा ही दोन भावांची एकुलती एक बहीण. मध्यम उंची, सडपातळ बांधा, चुणचुणीत आणि बोलका स्वभाव असलेली. वयाच्या बाराव्या वर्षीच शोभाला आत्याने सुभाषसाठी मागणी घातली. जुनं नातं नवं होईल, लग्न केलं म्हणजे जबाबदारी संपेल या विचाराने शोभाच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला. शोभाची शारीरिक, मानसिक वाढ अपूर्ण होती. लग्न, संसाराच्या जबाबदाऱ्या याबद्दल शोभाला काहीही जाण नव्हती. अल्लड शोभाचं वयाच्या तेराव्या वर्षी २६ वर्षांच्या सुभाषशी लग्न झालं. लग्नाला वर्ष उलटत नाही, तोच शोभा गरोदर राहिली. अठरा वर्षं वय पूर्ण होण्याच्या आतच शोभा दोन मुलांची आई झाली. शरीर व मनाने पक्व होण्यापूर्वीच ती संसारात पूर्ण गुरफटली. सुभाष त्याच्या दैनंदिन कामकाजात व्यग्र होता. मुलं शाळेत जाण्याएवढी मोठी झाली. दिवसभर शोभाला रिकामा वेळ मिळत होता.

एक दिवस अचानक शोभा घरातच चक्कर येऊन पडली. सुभाषने वैद्याकीय उपचार केले. त्यानंतर शोभाला रोजच चक्कर येऊ लागली. वैद्याकीय उपचार झाले. पण गुण येत नव्हता. दिवसेंदिवस शोभाच्या त्रासात वाढच होत गेली. पौर्णिमेच्या दिवशी गावातच राहत असलेली शोभाची भावजय अनिता सकाळी आठ वाजताच शोभाच्या घरी आली. ती सुभाषला म्हणाली, ‘‘एवढा दवा, डॉक्टर करूनही शोभाताईला गुण येत नाही. आपण आपल्या गावातला भगत रामदासकडं शोभाताईला घिऊन जाऊ. लई लोकानला त्याचा गुण आलाय. आज पौर्णिमा हाय. आज त्यो हवा घेइन.’’ सुभाषने तात्काळ होकार दिला. शोभा व अनिता रामदास भगताकडे गेल्या. रामदासच्या वस्तीवर एक छोटंसं खंडोबाचं मंदिर होतं. दर रविवारी अमावास्या-पौर्णिमेला रामदासच्या अंगात देव संचार करत होता. संचार झाल्यावर रामदास लोकांना प्रश्नावर, आजारावर उपाय सांगत होता. त्याच्याकडे लोकांच्या रांगा लागत. शोभाला रामदासने लिंबू, नारळ, उदी देऊन अकरा फेऱ्या मारण्यास सांगितलं. शोभा दर रविवारी रामदासच्या दरबारात जाऊ लागली. शोभाचं चक्कर येणं थांबलं असं ती सांगत होती. एक दिवस शोभा, रामदासच्या दरबारात बसली असताना तिच्या अंगात देवी संचारली. ती घुमू लागली. आता प्रत्येक रविवारी, पौर्णिमेला शोभा व रामदास या दोघांच्याही अंगात देवता संचारत. ते घुमत असतात. एक दिवस दरबारात शोभाच्या अंगात देवीचा संचार झाला असताना ती म्हणाली, ‘‘मी सात दिवस अन्नपाण्यावाचून निपचित पडून राहीन. आठव्या दिवशी मी जागी होईन तेव्हा गावात सडा-रांगोळी घाला. पुरणपोळीचा नैवेद्या करा. गावातून देवीची मिरवणूक काढा. मिरवणूक जिथं थांबल तिथं विहीर खोदा. पाणी लागल. विहिरीजवळच माझं मंदिर बांधा.’’ त्याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात एक दिवस शोभा अनिताच्या घरी गेली असताना अचानक चक्कर येऊन पडली. रामदासला निरोप गेला. तो शोभाची भावजय अनिताच्या घरी आला. त्याने अंगात हवा घेतली. आणि ‘‘शोभा, सात दिवस आशीच पडून राहील’’, असं सांगितलं. घडलंही तसंच. शोभा सात दिवस निपचित पडून होती. आठव्या दिवशी ती उठली. संपूर्ण गाव सजला होता. घरांसमोर सडा, रांगोळ्या घातल्या, पताका लावल्या. शोभा-रामदासची गावातून मिरवणूक निघाली. त्यांच्या अंगात देवतेचा संचार झाला होता. मिरवणूक शोभाच्या नवीन घर बांधण्यासाठी खरेदी केलेल्या प्लॉटजवळ आली. शोभा-रामदास घुमत त्या प्लॉटमध्ये गेले. त्यांनी एका कोपऱ्यातली माती बाजूला केली. तिथं देवीचा मुखवटा व एक रिकामी घागर निघाली. त्याच जागेवर बोअरवेल खोदली. तिथं पाणीही लागलं. गावकरी चकित झाले. सात वर्षांच्या मुलापासून ७० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सर्व शोभाच्या पायावर डोकं ठेवत होते. शोभाने त्या वेळेस सांगितलं की, ‘‘याच जागेवर माझं (देवीचं) मंदिर बांधा. मंदिरात हा मुखवटा व घागर ठेवा. ज्या दिवशी ही घागर फुटेल, त्या दिवशी मंदिरात हळद-कुंकवाचा सडा पडेल, लक्ष्मीची पावलं उमटतील त्याच दिवशी मी अंतर्धान पावेन.’’ सुभाषने पुढच्या सात-आठ महिन्यांतच त्या प्लॉटवर छोटंसं देवीचं मंदिर व लगतच राहण्यासाठी घर बांधलं. सुभाष आणि शोभा नवीन घरात राहायला गेले. देवीच्या मंदिरात शोभाचा पूजापाठ चालत होता. रामदासचंही येणं-जाणं सुरू होतं. मध्ये काही काळ गेला.

एके दिवशी पहाटे सुभाषला शोभा घरात दिसली नाही. शोभा कुठंही सापडली नाही म्हणून सुभाष घराच्या परिसरातील देवीच्या मंदिरात गेला. पाहतो तर मंदिरात फुलांचा सडा, घागर फुटलेली, लक्ष्मीची पावलं उमटलेली होती. सुभाष व गावकरी तेथील कुंडावर गेले. तिथं हिरवी साडी व जोडवे सापडले. गावात चर्चा झाली शोभा(देवी) अंतर्धान पावली. सुभाष चिंताक्रांत झाला. दोन दिवसांनंतर गावातील तरुण पोरांची चर्चा त्याच्या कानावर आली की, ‘‘शोभा दोन दिवसांपूर्वी पहाटे गुलाबी रंगाचे कपडे घालून गावाबाहेर जाताना दिसली.’’ सुभाषचा संशय बळावला. त्याने ‘महाराष्ट्र अंनिस’चे कॉम्रेड बाबा आरगडे यांच्याशी संपर्क साधला. मी आणि बाबा सुभाषच्या घरी पोहोचलो. त्या वेळी गावातील काही लोक तिथं उपस्थित होते. आम्ही सर्व बाबी समजून घेत पोलीस ठाण्यात फोन केला. लेखी तक्रारही पाठवली. पोलिसांमार्फत रामदासला सुभाषच्या घरी बोलावून घेतलं. रामदासला आम्ही काही प्रश्न विचारले. सोबत पोलीस हवालदारही होते. आमचा प्रश्नांचा भडिमार व पोलिसांच्या खाक्यामुळे रामदासच्या तोंडून सत्य उकळण्यात यश आलं. ‘‘शोभा दापोलीला आहे’’, असं त्यानं सांगितलं. शोभाचा मोबाइल फोनही रामदासकडे सापडला. पोलीस दापोलीच्या दिशेनं रवाना झाले.पोलिसांना शोभा दापोलीच्या बस स्थानकावर सापडली. पोलिसांनी रामदास व शोभाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आम्ही पोलीस ठाण्याला अर्ज दिला. शोभा तीन-चार दिवस कुठं होती? तिच्या जाण्यामागे किंवा तिला नेण्यामागे आणखी कोणाचा हात होता, त्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा असा आग्रह धरला. पाठपुरावा करूनही पोलीस मात्र हालचाल करत नव्हते. शोभा व रामदासच्या विरोधात न्यायालयात ‘चार्जशीट’ दाखल झाली. इकडे सुभाषच्या घरात मात्र आईविना दोन्ही मुलांची केविलवाणी अवस्था झाली होती. सुभाष शोभाला घरी नेऊ इच्छित होता. शोभाही घरी जायला तयार होती. शेवटी शोभाचं समुपदेशन करून तिला तिच्या घरी परत पाठवलं. न्यायालयाला विनंती करून प्रकरण मागे घेतलं. पिंपळे गावात प्रबोधनपर कार्यक्रम घेतले. अंगात येणं एक तर ढोंग असतं किंवा मानसिक आजार असतो, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

शोभाच्या अंगात देवीचा संचार झाल्यानंतर लहान मुलं ते वयस्कर व्यक्ती तिच्या पायावर डोकं ठेवत, शोभाला मानसन्मान मिळू लागला. त्यानंतर गावातल्या सुमारे दीडशे स्त्रियांच्या अंगात देवतांचा संचार झाला. गल्लोगल्ली स्त्रिया घुमत होत्या. परंतु शोभाचं निघून जाणं, पोलीस प्रकरण, आमचे प्रबोधनपर कार्यक्रम याचा परिणाम म्हणून लवकरच गावातील स्त्रियांचं अंगात येऊन घुमणं बंद झालं. शोभाचा बालविवाह, पती-पत्नीतील वयात१३ वर्षांचं अंतर. वेगवेगळ्या मानसिक, भावनिक गरजा. दोन लहान मुलांची पडलेली जबाबदारी, स्वत:ला महत्त्व प्राप्त करून घेण्याची मानसिकता, अन्य गरजा यामुळे मानसिक आजार व त्यातून बुवाबाजीला शोभा बळी पडली. नको तिकडे आकृष्ट झाली. हे सर्व करताना नवऱ्यासोबतच गावकऱ्यांनाही फसवलं. सुभाषने मात्र शेवटी अगतिकतेपोटी असेल, गरजेपोटी असेल किंवा मोठ्या मनाने माफ करून शोभाला पुन्हा स्वीकारलं. त्यांचा संसार सुरळीत सुरू आहे. शोभाने नवऱ्याच्या व्यवसायात लक्ष घातलं आहे. मुलींचं शिक्षण, योग्य वयात लग्न, सन्मान, कुटुंबाला महत्त्व दिल्यास अनेक शोभांचं मानसिक आरोग्य उत्तम राहील. त्या अशा गोष्टींना बळी पडणार नाहीत.

भोंदूगिरी, बुवाबाजी, असहायतेचा गैरफायदा याबरोबरच नियोजनबद्ध कटकारस्थान रचून शोभाचं शोषण, शोभाला हाताशी धरून समाजाची दिशाभूलही समोर येते. लोकांची धार्मिक भावना, विश्वास, श्रद्धा या बाबींना हात घालत अंगात देवाचा संचार, अंतर्धान पावणं अशी धूळफेक केली. देवीचा मुखवटा, घागर स्वत:च लपवून ठेवून माती उकरल्याचं नाटक करणं, हिरवी साडी, जोडवे, कुंडावर नेऊन ठेवण्याची व्यवस्था करणं हे सर्व नियोजित होतं. या समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आपण विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरत समाज बदलासाठी सारे मिळून एकत्र प्रयत्न करू या.

(लेखातील व्यक्तींची, स्थळांची नावे बदललेली आहेत.)

ranjanagawande123@gmail.com