चंद्रकांत काळे
एक ‘बायकी’ पुरुष दुसऱ्या पुरुषाबरोबर सोशिक पतिव्रतेसारखा राहतो, तिसऱ्या पुरुषाबरोबर संसाराची स्वप्नं रंगवतो आणि एका वळणावर तर बाई म्हणून चक्क गर्भवती राहतो… ‘बर्वे’चं ‘बेगम’ म्हणून वावरणं, नंतर ‘नलावडेबाई’ होणं, ही ४५ वर्षांपूर्वी काहीशी अनाकलनीयच वाटावी अशी गोष्ट होती. सामान्य स्त्रीपुरुषांच्या सांसारिक, आर्थिक, लैंगिक भावभावनांचा आपल्याला अस्वस्थ करणारा उद्रेक हीच ‘बेगम बर्वे’ या नाटकाची विलक्षण ताकद आहे. आता सामाजिक संदर्भ बदलले आहेत. खुरडत जगताना भासआभासांच्या दुनियेत सुटका शोधणाऱ्या ‘बेगम बर्वे’ची शोकांतिका आजच्या तरुणाईलाही भिडू शकते, यातच त्याची कालातीतता आहे.

बेगम बर्वे’ या नाटकाचा पहिला प्रयोग १९ मार्च १९७९ रोजी झाला. या घटनेला आता ४५ वर्षं पूर्ण झाली. या नाटकात एकूण पात्रं चार- शामराव, जावडेकर, बावडेकर आणि बर्वे. जावडेकर आणि बावडेकर हे दोन सामान्य कारकून आहेत. एका चाळीच्या दोन खोल्यांत ते राहात आहेत. एक चाकोरीतलं मध्यमवर्गीय जीवन जगत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये नलावडे या एक विधवा बाई आहेत. त्यांच्यावर जावडेकरांचा एकतर्फी जीव आहे आणि ऑफिसच्या साहेबाची मुलगी बावडेकरांना अतिशय आवडणारी आहे. त्यांचं तिच्यावर असंच एकतर्फी प्रेम आहे. या घडीला दोघंही ‘घोडनवरे’ आहेत, अर्थातच अविवाहित.

Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!
chaturang article, ganesh matkari, my female friend, common thoughts, subjects, two way communication, sharing,
माझी मैत्रीण : टूवे स्ट्रीट
Loksatta Chaturang The world of birds wandering in the wilderness Interesting
मनातलं कागदावर: लोभस हा इहलोक…!
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

शामराव जुन्या काळच्या बंद पडलेल्या नाटक कंपनीतला बारीकसारीक कामांसाठी टांगा हाकणारा टांगेवाला आहे. त्याची त्या काळी ‘बेगम’ नावाची टांग्याची घोडी होती, ती आता मेलेली आहे. शामराव लंगडा आहे. जुगारी आणि व्यसनी आहे. तोंडात सतत शिवराळ भाषा आहे. आणि एका बाजूनं हा शामराव या नाटकाचा सूत्रधारही आहे. शामरावच्या बरोबर बर्वे नावाचा एक बायकी पुरुष राहतो. तो उदबत्त्या विकतो आणि त्यातून येणाऱ्या पैशांतून कशीबशी दोघांची गुजराण होते. हा बर्वे त्याच नाटक कंपनीतला एक हरकाम्या नट. नाटकाआधी बत्त्या साफ करणं, सामानाची मांडामांड करणं आणि ती कामं झाली की वेण्या घालून, साडी नेसून ‘मॉबसीन’मध्ये जाऊन बसणं इतक्याच वकुबाचा हा सामान्य नट. एक फुटकी बत्ती आणि बालगंधर्वांचा एक जुना विटका शेला या गोष्टी त्यानं अजून जिवापाड जपून ठेवल्या आहेत. अशी ही जोडी त्याच चाळीच्या जिन्याखाली राहते आहे. शामरावशी बर्वे एकनिष्ठ आहे. व्यसनी शामराव त्याला मारहाण करतो, घाणेरड्या शिव्या देतो, उदबत्त्या खपल्या नाहीत तर दमबाजी करतो आणि टांग्याच्या घोडीवर जसं त्याचं स्वामित्व होतं, तोच अधिकार तो बर्वेशी वागतानाही वापरतो. नव्हे नव्हे, बर्वेला तो ‘बेगम’ म्हणूनच वागवतो. बर्वेनं हे ‘बेगम’पण अंतर्बाह्य स्वीकारलेलं आहे.

हेही वाचा : ‘एका’ मनात होती : पुरुषी एकटेपण

ही बेगम अष्टौप्रहर शामरावाच्या सेवेत आहे. ती काबाडकष्ट करून पैसे मिळवते, त्याचा लाथाबुक्क्यांचा मार सहन करते, त्याला क्वचित गजरा बांधते. एका सामान्य, सोशिक पतिव्रतेसारखी ती त्याची सेवा करते. त्याच्या ढासळत्या प्रकृतीची काळजी करते. त्याच्या व्यसनांवरून त्याला बोलही लावते. दिवसा उदबत्त्या विकायला निघताना शामरावानं दिलेला दमसुद्धा मुकाट्यानं ऐकते. ‘‘जा, उदबत्त्या खपवून ये. खप झाला नाही तर गाठ माझ्याशी आहे! दिवस तुझा असतो भ x x, पण रात्र माझी असते. रिकाम्या हातानं परत आलास तर रात्री जिन्याखाली घेणार नाही,’’ अशी शामरावाची दहशतपण ती सहन करते. जुन्या नाटकातल्या पतिव्रता नायिका तिच्या अंगात ठासून भरलेल्या आहेत. तरीही पाताळयंत्री शामरावाची बारीक नजर स्वत:च्या प्रियेवर- बेगमवर सतत रोखलेली आहे.

पण अशा खुरडत खुरडत जगणाऱ्या बेगमला एक असामान्य वरदान मिळालेलं आहे, इंद्रधनुषी रंगांच्या मायावी स्वप्नांचं! कदाचित त्याच बळावर शामरावानं दम भरल्यावरसुद्धा ती स्वत:शीच उद्गारते, ‘‘दिवस माझा आणि रात्र तुमची? हंऽऽऽ दिवस माझा, अन् रात्र तर माझीच माझी! रात्र माझ्या बत्तीची, रात्र ऑर्गनची, रात्र मखमली पडद्याची, नारायणरावांच्या शेल्याची, अवघी रात्र कंपनीच्या मालकांची.’’ ही आभासी स्वप्नांची दुनिया हा तिनं स्वत:साठी मिळवलेला दिलासा आहे. विरंगुळासुद्धा, जीवघेणा छंदसुद्धा. आणि इथेच तिची एक वेगळी कहाणी सुरू होते- आभासाची.

एका गुरुवारी उदबत्तीच्या सुगंधात ती जावडेकर-बावडेकरांच्या थकलेल्या आयुष्यात स्वयंवरातल्या रुक्मिणीचे विभ्रम दाखवीत प्रवेश करते, ती त्यांच्याच ऑफिसमधल्या विधवा नलावडेबाईंच्या रूपात! बावचळलेले जावडेकर चकित होऊन तिचं स्वागत करतात आणि बावडेकरसुद्धा अतिशय उत्साहात हे ‘भावजीपण’ स्वीकारतात. ‘‘मी जरा पाय मोकळे करून येतो. तोपर्यंत निवांत बोला काय ते. एकदा काय ते सगळं उरकूनच टाकू आपण!’’ असं बजावून ते निघून जातात. आणि आता ‘बेगम नलावडेबाई’ आणि जावडेकरांमधला प्रणय फुलू लागतो. शिशुपाल सोडून कृष्ण आपल्याला वर म्हणून लाभला, याचा आनंद बेगमच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहायला लागतो. त्या काळातल्या कुठल्याही अतिसामान्य स्त्रीला कर्तबगार नवरा मिळाला, की आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं, तीच भावना बेगमची होते. ती आता त्या घरासाठी स्वत:ला वाहून घेते. सामान्य कारकुनांच्या दोन विस्कटलेल्या खोल्यांत तिला आता स्वर्ग उपभोगायचा असतो.

हेही वाचा : ॲलर्जीचं ‘वावडं’!

मग तिला त्या मळकट खोल्यांतला या दोन ब्रह्मचाऱ्यांचा पसारा दिसतो, सगळीकडे पसरलेला केरकचरा दिसतो, पाण्याच्या पिंपाला चढलेली शेवाळ्याची पुटं दिसतात, डब्यातला वास येणारा चिवडा दिसतो… तिला या सगळ्या गोष्टी एकदा का लग्न पार पडलं, की निगुतीनं नीट करायच्या असतात.

बावडेकर त्या दोघांचं लग्न लावून देतात. बेगम आणि जावडेकर पहिल्या रात्रीची स्वप्नं रंगवत असतानाच शामराव आता ‘सायबाचा माणूस’ म्हणून प्रवेशतो आणि त्या तिघांच्या स्वप्नबंधांना एक जोरदार सुरुंग लावून निघून जातो. बेगमच्या न कळत ती चिठ्ठी वाचली जाते आणि त्यानुसार ऑफिसमध्ये एकाच जागेवर चुकून दोन कारकुनांची म्हणजे जावडेकर-बावडेकरांची नेमणूक झाल्याचं उघडकीस येतं. ऑडिटच्या हरकतीनुसार आता या दोघांपैकी एकाची नोकरी जाणार असते. कोणाची ते कळत नाही. त्यावर वरती खल चालू असतो.

आपल्या समाजातील लग्न झालेल्या बाईची सार्थकता म्हणजे लग्नानंतर लगेच तिचं आई होणं! हलाखीत जगणारी बेगम ‘‘आपल्या रेशनकार्डावर आता जास्त साखर मिळणार…’’ या शब्दांत ही गोड बातमी आपल्या पतीराजांना देते. ‘घास घे रे तान्ह्या बाळा, गोविंदा गोपाळा…’ अशा लेकुरवाळ्या स्वप्नांत ते दोघं रंगून जातात आणि तिथेही बेगमला एक ओंगळ चाहूल लागते, शामरावाच्या अभद्र सावलीची. आपला गर्भ जिन्याखालच्या अंधारात हळूहळू नाहीसा होतोय, हे दु:स्वप्न तिला भयभीत करतं. पण सौख्याच्या भोवऱ्यात गरगरणारी बेगम हार मानत नाही. प्रयत्नपूर्वक ती ही घसरलेली गाडी हिकमतीनं डोहाळजेवणाच्या रुळापर्यंत खेचून आणते. दरम्यान ‘सायबाचा माणूस’ एकांतात बावडेकरला भेटतो आणि बेगमच्या पोटातलं मूल सायबाचं असल्याचं सांगतो. नोकरीच्या चिंतेनं सैरभैर झालेला बावडेकर डोहाळजेवण पार विस्कटून टाकतो. सायबाचं पोर पोटात असल्याचं सांगून बावडेकर नलावडेबाईवर- बेगमवर व्यभिचाराचे आरोप करतात आणि बेगम एकाकीपणे, या सगळ्या मोडकळीस आलेल्या, ढासळत चाललेल्या परिस्थितीवर मात करण्याचे अयशस्वी प्रयत्न करत राहते. सर्व बाजूंनी झालेल्या ‘पुरुषकोंडीत’ तिचा जीव गुदमरतच रहातो. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, स्वत:च्या स्वार्थासाठी तिची फरपट करणं, प्रसंगी तिच्या पोटातला गर्भसुद्धा अनैतिकतेच्या नावाखाली नष्ट करण्याचा प्रयत्न करणं, तसंही पुरुषी रक्ताला सोपंच असतं. अगदी भास-आभासांच्या दुनियेतसुद्धा आपल्या भावभावनांचा सतत चोळामोळा होत राहणं हीच बर्वेच्या ‘बेगमपणा’ची शोकांतिका आहे.
शेवटी तर लंगडा शामराव डोहाळ- जेवणासाठी सजलेल्या बेगमचं साक्षात वस्त्रहरण करून तिला जिन्याखाली परत चलण्यासाठी बजावतो. ‘‘तुमचं डोहाळजेवण? अगं आय आय आय आय! बघितलं का नलावडेबाईला दिवस गेलेत. बघा बघा या नलावडेबाईचं धोतर बघा. धोतर नेसलेली बाई बघा! बिनपोट वाढलेली गर्भारशी बाई बघा! दिवस जातात होय रे तुला भ x x!’’ असं म्हणून तो बर्वेचं धोतर खेचतो. बर्वे हेलपाटत राहतो आणि अखेर ‘जिन्याखालचा अंधारच आमचा’ हे विद्रूप सत्य स्वीकारून ‘बेगम’ जिन्याखाली जायला निघते.

हेही वाचा : ‘भय’ भूती : भीती आहे, म्हणून तर…

आपली ‘प्रॉपर्टी’ आपल्याकडे खेचून आणल्यावर शामराव जाता जाता जावडेकर-बावडेकरांना दिलासा देतो. ‘‘वरच्या ऑफिसचा जी.आर. आलाय, पहिला हुकूम चुकून निघाला म्हणून. तवा आता कुणाच्याबी नोकऱ्या जाणार नाहीत.’’ असं सांगून सुधारित पत्र तो दोघांच्या हाती देतो आणि हे कुटिल नाटक संपवतो. त्याबरोबरच बेगमचं आभासनाट्यही समाप्त होतं. कुठल्याही नाटककारानं आजतागायत नाटक लिहिताना ‘मराठी संगीत नाटक’ हा फॉर्म म्हणून वापरल्याचं उदाहरण मराठी रंगभूमीवर नाही. मला तरी ठाऊक नाही. पंचेचाळीस वर्षांपूर्वी नाटककार सतीश आळेकरांनी ‘बेगम बर्वे’ नाटकाच्या निमित्तानं अगदी सहजपणे ही किमया साधली. सामान्य स्त्री-पुरुषांच्या सांसारिक, आर्थिक, लैंगिक भावभावनांचा आपल्याला अस्वस्थ करणारा उद्रेक या नाटकात सतत आपल्याला अनुभवायला मिळतो. हीच या नाटकाची विलक्षण ताकद आहे.

१९७९ नंतर आम्ही या नाटकाचं तीन ते चार वेळा पुनर्निर्माण केलं. पिढी बदलत गेली. दर वेळी बघणारा प्रेक्षक वेगळा वेगळा येत होता. शेवटचा प्रयोग होऊन आता १२-१३ वर्षं झाली. २०११-१२ मध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना बेगमच्या शामरावशी किंवा जावडेकरांशी असलेल्या संबंधांचा फार धक्का बसतोय असं जाणवलं नाही. कदाचित ‘एलजीबीटीक्यू’ संबंधांबद्दल त्यांना व्यवस्थित माहिती होती. या संबंधांविषयीची चर्चा आता खूप उघड उघड सुरू झाली होती. जागतिक पातळीवर या संबंधांना असलेली मान्यता किंवा त्यासाठीच्या चळवळी तरुणाई पाहात होती. त्यामुळे शेवटी शेवटी तरुणांनी या प्रयोगांना भरपूर गर्दी केली होती. त्यांना ते छान भिडत होते. आता आमची वयं नाहीत, नाही तर ते कुणी सादर केल्यास त्यालाही उदंड प्रतिसाद मिळेल, असं वाटत राहतं. एका अर्थानं ते मग कालातीत नाटत ठरतं.

हेही वाचा : स्त्री‘वि’श्व: लढवय्या स्त्रियांपुढचे पेच

अजूनही मला कधीतरी वाटतं, उद्या कदाचित ही बेगम उदबत्तीचा सुगंध, अंगाला चिकटलेला सुभद्रेचा शेला, वाऱ्याच्या झुळकेबरोबर येणारे ऑर्गनचे सूर, एवढ्या भांडवलावर पुन्हा उभारी धरेल. बत्तीला कवटाळत आणखी एखादं भारून टाकणारं, सुंदर आभासनाट्य उभं करेल. जिवाच्या आकांतानं गाईल- ‘प्रभू अजी गमला- मनी तोषला’. आणि मी तिला मनभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद देईन.
chandrakantkale51@gmail.com