डॉ. प्रज्ञा दया पवार
तुम्ही कोण आहात? कोणत्या जातीधर्मात, कोणत्या आर्थिक परिस्थितीत, एवढंच नव्हे तर कुठल्या परिसरात जन्माला येता, वाढता या गोष्टी ठरवत असतात तुमच्या आयुष्यावर कोसळणारा भित्यंतराचा कल्लोळ. दर पावसाळ्यात घरात कंबरभर तुंबणारं पाणी असो की विकृतीचं टोक गाठणाऱ्या भयातून रचली गेलेली माणसाचं शिरकाण करणारी वृत्ती किंवा मग केवळ तुमचं बाई असणं. मनमस्तिष्क झिंझोडून टाकणाऱ्या भयाच्या जाणिवा वेगवेगळ्या टप्प्यांवर सामोऱ्या येतच राहतात…

माझं सगळं बालपण गोरेगावच्या ‘सिद्धार्थ नगर’ नावाच्या पत्र्याच्या चाळीत गेलं. आज माझ्यासाठी तो सर्वात रम्य काळ असला, तरी एक अ-रम्य भय तेव्हापासूनच मनात घर करून आहे, पावसाचं भय!

family, old women, attention to old women,
मनातलं कागदावर: दुधातील साखर…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
Loksatta chaturang Friends friendship Express implicit relationship
माझी मैत्रीण: व्यक्त-अव्यक्त नातं
Special modak making classes for visually impaired women
हात जेव्हा डोळे होतात…
Descriptions of Lord Ganesha by various sants
बुद्धिदेवता ओंकारब्रह्म
parents children self reliant chaturang article
सांदीत सापडलेले : काळजी

आम्ही राहत होतो तो भाग ओशिवरा खाडीला लगटून असलेला काहीसा सखल भाग होता. प्रत्येक पावसाळ्यात किमान दहा-पंधरा वेळा तरी चाळीत कंबरेपेक्षाही जास्त पाणी भरायचं. आमच्या घरात एक उंच लाकडी पलंग होता. त्यावर आई सगळं गरजेचं, अत्यावश्यक सामान ठेवत असे, पण समोरच्या रस्त्यावरून बेस्टच्या डबलडेकर बस जेव्हा वेगात पाणी कापत धावायच्या तेव्हा उंच उंच लाटा उसळायच्या. घरातलं सगळं सामान गदागदा हलून पाण्यात डुबक्या घेत अखेर वाहून जायचं. ते धरून ठेवता ठेवता आम्हा भावंडांची मोठी तारांबळ उडायची. पलंगावर बसलेला माझा लहान भाऊ त्याच्या चिमुकल्या हातात लांब काठी घेऊन पाण्यात हमखास निघणाऱ्या सापांना न घाबरता लांबवर ढकलत बसायचा. सार्वजनिक नळ, सार्वजनिक टोपल्यांचे संडास, खाडीची, तुंबलेल्या गटारांची गदळघाण हे सगळंच एकमेकांत मिसळून जायचं आणि पाणी ओसरल्यावर अख्खं घर साफसुथरं करत बसण्यात दिवसाचे १२ तासही पुरायचे नाहीत.

हेही वाचा : हात जेव्हा डोळे होतात…

आईदादांनी कष्टानं उभा केलेला त्यांचा संसार पावसाळ्यात पाणी भरलं की तितरबितर व्हायचा. त्यातही कसले कसले खेळ खेळणारी माझी मासूम लहानगी भावंडं मला आजही आठवतात आणि कंबरेवर हात ठेवून, पदर खोचून भर रस्त्यात एकाही बसला जाऊ न देण्यासाठी राडा करणारी माझी आई आठवते. घरातलं पाणी ओसरल्यावर सगळं आवरून सावरून, चार घास खाऊन गाढ झोपेतल्या आम्हा सगळ्यांच्या अंथरुणांना पुन्हा तो पाऊस रात्रभर कोसळून वैरी झाल्यासारखा विळखे घालायचा. शेजारची पटेल भाभी जोरजोरात पत्र्याच्या भिंती वाजवून जागं करायची आणि आईला सांगायची, ‘‘पानी आया, पानी आया… हिराभाभी बच्चों को संभालो पहले… उठो जल्दी, आवाज क्यों नही देती? मरना है क्या…?’’

पाऊस मला कधीच रोमँटिक वगैरे वाटला नाही. पण भीतीशी चार हात करणाऱ्या आईनं म्हणा अथवा तिनं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिलेल्या बाळकडूमुळे म्हणा, मला असं वाटू लागलं, की आपल्याला कसली भीती? कशाची भीती? हॅ.. मला नाही वाटत बुवा भीतीबिती. पण तो भ्रम होता हेही लवकरच कळून चुकलं. भयाचं श्वापद असं दबा धरून बसलेलं असतंच आपल्या आत. मनमस्तिष्क झिंझोडून टाकणारी एखादी घटना घडायचा अवकाश, ते चाल करून येतं आपल्यावर. जनरली ज्या गोष्टींची भीती अनेकांना, विशेषत: बाईमाणसांना वाटते किंवा तसं चित्रण केलं जातं तशी भीती मला सहसा वाटली नाही. उदाहरणार्थ झुरळं, पालींची भीती, अंधाराची भीती, एकटं राहण्याची भीती. ही यादी कितीही मोठी होऊ शकते. मग मला नेमकी भीती वाटते तरी कसली? असा प्रश्न मी ‘भयभूती’च्या निमित्ताने स्वत:ला विचारला. तेव्हा मनात सरसरून वर आली ती नात्यागोत्यांच्या आणि त्यापल्याड घट्ट जोडल्या गेलेल्या माणसांच्या दुरावण्याची भीती. जिवलगांच्या मृत्यूची भीती. त्यांच्याआधीच मी हे जग सोडून गेले तर बरं, असं मला फार आतून वाटतं. त्यांच्याशिवायच्या जगाची, जगायची मी कल्पना करू शकत नाही.

हे असं का झालं असावं? खरं तर जन्माला येणारा प्रत्येक जण जाणारच कधी ना कधी. हे सार्वत्रिक, चिरंतन सत्य पचवायला मला इतके सायास का पडताहेत? माझ्या वडिलांचा- दया पवारांचा आकस्मिक झालेला मृत्यूच या सगळ्याचं आदिकारण असावं, असं मला राहून राहून वाटतं. त्यांचं जाणं दीर्घ काळ मला स्वीकारता नाही आलं. एका अनाहूत भीतीनं जन्म घेतला होता माझ्यात. ‘फादर फिक्सेशन’ त्यातूनच आकारलं असावं बहुधा. वयानं ज्येष्ठ असलेल्या, वडीलधारेपणाचं संयुग जाणवणाऱ्या पुरुषाकडे आपसूक ओढली जाण्याची ती एक फेजच होती. त्यातून बाहेर पडायला काही काळ जावा लागला.

हेही वाचा : बुद्धिदेवता ओंकारब्रह्म

माणूस आपल्यापासून तुटतंय, दूर जातंय म्हणून वाटणाऱ्या भीतीपायी (खरं तर ती वेदनाच… पराकोटीची वेदना) आणि त्यांना आपल्यामुळे, आपल्या कोणत्याही कृतीमुळे त्रास होऊ नये म्हणून सतत जपण्यासाठी धडपडण्याच्या प्रयत्नात मी मात्र अनेकदा माती खाल्ली आहे, हे अलाहिदा. ज्या आप्तस्वकीयांसाठी मी हे उन्मेखून करते त्यांना तर जाणीवही नसते याची. पण त्यांचा तरी काय दोष? ही तर माझीच गरज! भीतीपासून सुटका करून घेण्याचा उपाय आणि त्यातून पुन्हा नवा छळवाद स्वत:शीच आरंभल्याची बेचैनी. भ्रमनिरास. मग पुन्हा त्यातून उद्भवणारं दु:ख. तर हे असं आहे. अंतहीन! बुद्धानं एकदा पोटच्या लेकराच्या मृत्यूनं वेड्यापिशा झालेल्या, ‘माझ्या लेकराला पुन्हा जिवंत कर’, असा धोशा लावलेल्या एका बाईला सांगितलं, ‘‘जा… मला अशा घरातून चिमूटभर मोहरी आणून दे जिथे कधी एकही मृत्यू झालेला नाही.’’ वणवणली ती माय सगळीकडे. पण नाहीच सापडलं तिला तसं एकही घर.

शहाणीव दिली तिला बुद्धानं. बुद्ध जर मला भेटला, तर मी त्याला एकच प्रश्न विचारला असता… तर्कानं सगळंच समजून घेता येतं तथागता पण मनाचं काय? त्याची समजूत कशी काढायची? अष्टांग मार्ग, सम्यक जाणिवा हे उपाय तू सांगितलेस खरे. ‘डरो मत’ हे तर तू हजारो वर्षांपूर्वीच सांगून गेलायस. निर्भयतेचा, ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केलास आमच्या मनात. तरीही भय काही संपत नाहीत.

कसलं कसलं भय असतं माणसांच्या मनात? समूहांच्या नेणिवांमध्ये? त्यातूनच एखादा हिटलर तयार होतो. गॅस चेंबर्स तयार होतात. ज्यूंच्या शिरकाणाची ‘आउश्वित्झ’ तयार केली जातात. विकृतीचं टोक गाठणाऱ्या या भयातून रचली जाणारी ही नॅरॅटिव्हज् जगभरात पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतात. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, स्त्रिया, तमाम वंचित, लहानगी मुलं या विध्वंसक भयाची बळी ठरतात. हा एक प्रकारचा मॅनियाच असतो. त्याला उच्चनीचतेच्या, वंशवादाच्या, धर्मांधतेच्या, जातिव्यवस्थेच्या, मूलतत्त्ववादाच्या, विक्राळ नवभांडवली व्यवस्थेच्या अशा किती तरी जालीम छटा असतात. यात सर्वाधिक नागवल्या जातात त्या स्त्रियाच. त्यांचं शरीर हे निव्वळ एका व्यक्तीचं शरीर नसतं. ते निव्वळ एखाद्या स्त्रीचं शरीर नसतं. ते जातिपातीच्या, धर्माच्या दोरखंडानं गच्च बांधलेलं असतं. तीच तिची ओळख असते.

पण या ओळखीला झुगारून पुढे जाता येतं. मुळात कुठल्याही जिवंत शरीरात सर्व भेदांना ओलांडून जाण्याची ताकद असते. म्हणूनच की काय, त्या प्रमाथी ऊर्जेला कोंडून घातलं जातं जातधर्मादी ओळखग्रस्तीच्या कुंपणात. स्त्रीचं शरीर ही भलतीच स्फोटदायक बाब बनते आणि त्यावर मालकी हक्काच्या पताका प्रागैतिहासिक काळापासून ते आजतागायत फडफडताना दिसतात. मला याचं फार भय वाटतं. स्वप्नातही या पताका मला दिसतात. उन्मत्त वाऱ्यावर फडफडणारा तो आवाज असह्य झाल्यानं घाबरून मी कैकदा रात्री-अपरात्री जागी झाले आहे. घोषणा देणारा तो हिंस्त्र जमाव माझ्या नजरेसमोरून जागेपणीही हटत नाही. त्यांच्या पुढ्यात नग्न स्त्रिया. छळाचे जितके म्हणून प्रकार असतात त्या सर्व प्रकारांनी त्यांना यातना देऊन बीभत्स हसणारा. अलीकडे तर मला फिरून फिरून पडणारी अशी भयंकर स्वप्नं आणि वास्तव यातलं अंतर झपाट्याने कमी झाल्याचं जाणवतं. थरकाप उडतो माझा. भीतीचा भलामोठा खड्डा पडतो पोटात. हा खड्डा कसा बुजवायचा? कविता लिहून? लेख लिहून? जनआंदोलने करून? वर्गात समतेचे धडे विद्यार्थ्यांना देऊन? सहवेदनेच्या परमोच्च बिंदूजवळ स्वत:ला नेता येईल तिथवर नेऊन? याचं ठाम उत्तर माझ्याकडे नाही.

हेही वाचा : मनातलं कागदावर: दुधातील साखर…

एकदा मी दक्षिण मुंबईत कोणत्या तरी कामासाठी गेले होते. सोबत माझा मुलगा, प्रतीक होता. कार काहीशी लांब पार्क केली होती म्हणून तो ती आणायला गेला. परतायला माझ्या अपेक्षेहूनही बराच वेळ लागला त्याला. तेवढ्या वेळेत एक-दोघांनी मला न्याहाळत ‘आती क्या?’, ‘कितना रेट?’ वगैरे चाचपणी करायला सुरुवात केली. माझ्या लेकाएवढ्या वयाचा एक जण माझ्याभोवती दोनदा गिरकी मारून गेला. तेवढ्यात प्रतीक दिसला. पलीकडून जोरजोरात हॉर्न वाजवून ‘‘मम्मी… मम्मी…’’ अशा हाका मारत ‘‘क्रॉस करून ये’’, असं सांगत होता. तत्क्षणी मी धावत सुटले. ‘‘तुला इतका वेळ का लागला?’’ हा प्रश्न मी त्याला सारखा विचारत राहिले. खूप रागावले त्याच्यावर. त्याला कळेना, अचानक मम्मीला झालं तरी काय? मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. मी खूप विचित्र कपडे घातलेत का? असं काय दिसलं त्या पुरुषांना की त्यांना मी ‘तसली’ वाटले? घरी आल्यावर आरशासमोर उभं राहून मी स्वत:ला कधी नव्हे इतक्या वेळा न्याहाळलं. तशा तर अजिबातच दिसत नाही आपण, असं स्वत:ला समजावलं मी आणि समजावता समजावताच मला माझीच भयंकर लाज वाटू लागली. हा मध्यमवर्गीय किडा कधी चावला आपल्याला? स्वत:च्याच थोबाडात मारून घेतलं त्या रात्री. होय, मला मध्यमवर्गीय होण्याची अतोनात भीती वाटते. त्या जाणिवांच्या सापळ्यात स्वत:ला अडकू न देण्याची शिकस्त करत राहते मी. कधी जमतं तर कधी कधी त्या रात्रीसारख्या फटी राहतात. वर्गांतराची स्वाभाविक आस बूर्ज्वा वर्गीय नॉर्म्समध्ये बदलू नये यासाठी ‘पापणी ठेवीन जागी’ ही प्रतिज्ञा स्वत:शीच वारंवार घ्यावी लागते आताशा. विश्वातल्या प्रत्येक बाईचे असेच असावेत डोळे वेश्येसारखे-विश्वाचं रहस्य समजून चुकलेले!

माझ्याच एका कवितेत लिहिलेल्या या ओळी मला खाडकन् भानावर आणतात. खरं सांगायचं, तर भित्यंतराच्या कल्लोळाला कचकचीत टाचणी लावतात.

pradnyadpawar@gmail.com