-डॉ. प्रतिभा फाटक

‘एका ‘कविते’च्या मृत्यूचे कवित्व’ हा ‘लोकसत्ता’मधील अग्रलेख (२ मार्च) वाचून अनेक संवेदनशील व्यक्ती सुन्न झाल्या. योग्य वेळी वैद्याकीय सेवा न मिळाल्याने होणारे मृत्यू आपण थांबवू शकत नाही, ही हतबलता त्यातून जाणवली. मलाही या भावनेनं ग्रासून टाकलं होतं. पण माझ्यासाठी वैद्याकीय सेवेअभावी मृत्यू झालेली कविता राऊत, तिचा पाडा, तिचं आरोग्य केंद्र अनोळखी नव्हतं. त्यामुळे तिच्या पाड्यावर जाऊन कुटुंबीयांची भेट घेणं साहजिकच होतं. पण त्याहीपेक्षा तिच्या शेजारच्या ‘आशा’ताईची भेट घेणं जास्त गरजेचं वाटत होतं. फोनवर तिची हतबलता जाणवत होती.

cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा
Two men commit unnatural torture on a minor child in Buldhana district
आता…बालकेही सुरक्षित नाहीत!…खामगावच्या शाळेत अंध मुलावर…
waterborne diseases, health, death, diarrhea,
सावधान! राज्यात जलजन्य आजाराचे १४ बळी; सर्वाधिक मृत्यू अतिसारामुळे…
Minor girl raped by giving drug in soft drink One arrested in Dapoli
गुंगीचे शितपेय पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दापोलीत एकाला अटक

आम्ही पिंपळखुंटा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचलो, तिथं ‘जीएनएम’ (‘जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी’) झालेल्या प्रियंका सिस्टर भेटल्या. उपकेंद्राची जबाबदारी असलेल्या दोन सिस्टरही भेटल्या. प्रियंकानं ओळखलं. सात वर्षांपूर्वी आम्ही एका दुर्गम पाड्यावर कुपोषित मुलांचं आरोग्य शिबीर आटोपून परतत होतो. तेव्हा रस्त्यात बाळंतपणाच्या कळांनी विव्हळत पडलेल्या एका स्त्रीला पाहिलं. तिच्या शरीरात रक्त खूप कमी असल्यानं ग्रामीण रुग्णालयानं जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. तो न जुमानता ती स्वत:च्या पाड्याकडे निघाली आणि बाळंतपणाच्या कळा असह्य झाल्यामुळे रस्त्यावर पडून राहिली होती. आम्ही चादरीचं स्ट्रेचर करून अर्ध्या किलोमीटर अंतरावरच्या आरोग्य केंद्रात तिला उचलून घेऊन गेलो. तिथं पोहोचल्यावर अवघ्या दहा मिनिटांत तिचं बाळंतपण केलं. त्या वेळीदेखील तिथं प्रियंका एकट्याच होत्या.

आणखी वाचा-सांदीत सापडलेले.. ! शिक्षण!

कविताची बातमी ऐकून भेटायला आलोय हे सांगितल्यावर त्या जरा धास्तावल्याच. ती घटना घडल्यापासून सगळ्यांनी त्यांना धारेवरच धरलं होतं. पण आम्ही प्रियंकांना आश्वस्त केल्यानंतर त्यांनी त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला. रात्री १० वाजता कविताचे नातेवाईक खासगी वाहन करून तिला आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. कविता खूप सुजलेली होती, पांढरी पडली होती. प्रियंकांनी तिचा रक्तदाब तपासला, तो १७०/१२०- म्हणजे वाढलेला होता. गर्भाशयाचं तोंड जवळजवळ पूर्ण उघडलेलं होतं. सगळी स्थिती पाहता प्रियंकांना वाटलं, की ही खूप जोखमीची माता आहे. त्यांच्या आरोग्य केंद्रात ३ फेब्रुवारीपासून वैद्याकीय अधिकारी रुजू झालेले नव्हते. जोखमीच्या मातेचं बाळंतपण आपण एकट्याने हाताळू शकत नाही आणि पहिलटकरीण असल्यामुळे आणखी किमान तासभर तरी कविताचं बाळंतपण होणार नाही, हा अंदाज आल्यामुळे प्रियंकांनी कविताला गाडीतून मोलगीला पाठवलं, पण सहा किलोमीटरवर गाडी बंद पडली. पुढचा दीड तास बंद पडलेल्या गाडीत कविता वेदनांनी विव्हळत होती. अखेर गाडीतच तिची प्रसूती झाली. बाळ सुखरूप जन्माला आलं, पण रक्तस्राव होतच राहिला. रात्रीअकरा नंतर कविता ग्रामीण रुग्णालयात पोहोचली, मात्र तिची गंभीर स्थिती ओळखून तिला जिल्हा रुग्णालयात पाठवलं गेलं. पण तिथं पोहोचेपर्यंत कविताचा मृत्यू झालेला होता.

प्रियंका सिस्टर आरोग्य केंद्रात सात वर्षांपासून राहतात. दुरुस्तीला आलेल्या कर्मचारी निवासात पावसाळ्यात आपला जीव मुठीत धरून राहतात. त्या स्वत: आदिवासी आहेत. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान या आरोग्य केंद्रात २१६ बाळंतपणं सुखरूप केल्याचंही त्यांनी सांगितलं. आदल्या दिवशीचा एक किस्साही सांगितला. एक पहिलटकरीण आरोग्य केंद्रात बाळंत झाली. थोड्या फाटलेल्या मायांगाला टाके घालण्यासाठी प्रियंकांनी सुई हातात घेतली. ती पाहताच, नुकतीच बाळंत झालेली ती आई, सर्व ताकदीनिशी उठून, आरोग्य केंद्रांची भिंत ओलांडून, बाळालाही न घेता स्वत:च्या पाड्याकडे पळत सुटली. आरोग्य सेवेविषयी आजही तिथल्या लोकांमध्ये असलेलं हे अज्ञान काय सांगतं?

कविताच्या कहाणीचा तपशील तिच्या नातेवाईकांडून समजलाच होता. कविताचं ‘माता नोंदणी कार्ड’, दोन्ही सोनोग्राफी अहवाल आणि त्यावरील नोंदी नीट पाहिल्या. तिच्या बाळालाही पाहिलं. त्या बाळाची योग्य काळजी घेण्याची गरज बोलून झाली. कविताची आई आणि बहिणीची भेट झाली. कविताच्या माहेरचं घर म्हणजे भगत परिवार. कविता बाळंतपणासाठी माहेरी आली होती. पहिलटकरीण असूनही जवळजवळ १०-१५ तास त्यांनी घरीच घालवले होते. हा उशीर पुढे तिच्या प्रत्येक उपचारात आडवा आला.

आणखी वाचा-माझी मैत्रीण : टूवे स्ट्रीट

‘केअर मदर किट’ घेऊन कविताला तपासलेल्या ‘आशा’ताईकडच्या नोंदी पाहिल्या. पाचव्या महिन्यापासून कविता गावात होणाऱ्या दर महिन्याच्या तपासणीला हजर असायची. तिचं हिमोग्लोबिन वर-खाली होत होतं. प्रत्येक वेळेस रक्तवाढीच्या गोळ्यांबरोबर पुढे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लोहाचं इंजेक्शन घेण्याचा ‘एएनएम’ (ऑग्झिलिअरी नर्स अँड मिडवाईफ) आणि ‘आशा’ताईचा सल्ला कधीच पाळला गेला नव्हता. अनेकदा पाठपुरावा करूनही, ‘जोखमीची माता’ अशी नोंद असूनही कविता दवाखान्यात यायला तयार नव्हती. शेवटी जानेवारी महिन्यात- म्हणजे तिच्या आठव्या महिन्यात अनेक विनवण्यांनंतर कविता मोलगी ग्रामीण रुग्णालयात पोहोचली. जेमतेम दोन डोस लोहाच्या इंजेक्शनचे घेऊन परत फिरली. घरी दिलेल्या गोळ्यांचाही वापर अधूनमधूनच केला गेला. आमच्या परतीच्या प्रवासात गावच्या सरपंचताईंची भेट झाली. कविताच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सर्व कारणांची सर्वांनाच जाणीव झाली होती. पंचक्रोशीत अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ग्रामसभा घेण्याचं सरपंचताईंनी आश्वासन दिलं.

मागील सहा वर्षांपासून अनेक ‘कवितां’च्या मृत्यूचं नाही, तर जीवनाचं कवित्व फुलतानाची साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं आहे. मराठवाड्यातील ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ ही संस्था सातपुड्याच्या दुर्गम भागात शासनाबरोबर माता-बाल आरोग्याचे निर्देशांक सुधारण्यासाठी काम करते. ‘याहा मोगी’ माता-बाल आरोग्य प्रकल्पाद्वारे नर्मदेच्या खोऱ्यातल्या ११० पाड्यांवर दरवर्षी ८०० ते १००० गर्भवतींची संपूर्ण तपासणी- अगदी घरापर्यंत जाऊन केली जाते. १५ ‘आशा’ ताईंना निवडून त्यांना प्रशिक्षण देऊन ‘केअर मदर किट’ देण्यात आलं आहे. प्रशिक्षित ‘आशा’ताई कधी पायी, कधी दुचाकीवर आजूबाजूच्या पाड्यांवर जाऊन गर्भवतींची तपासणी करतात. तपासणीनंतर सगळ्या नोंदी मोबाइल अॅप ‘केअर मदर आनंदी माँ’मध्ये सेव्ह केल्या जातात. जिथे कुठे नेटवर्क असेल, तिथून ती माहिती अपलोड होते आणि दूर संभाजीनगरमध्ये बसलेल्या डॉक्टरांना दिसू शकते. माहिती भरताक्षणीच ती माता जोखमीची असेल, तर लाल रंगाची नोंद दिसते. कुठल्या कारणांमुळे ही जोखीम आहे, हे लगेच ‘आशा’ताईला कळतं आणि टाळता येण्याजोगे धोके असलेल्या मातांना वारंवार समजावून सांगून पुढील उपचारांसाठी पाठवलं जातं. ‘आशा’ताई निर्मला वळवी, रेखा वळवी यांच्या सारख्यांच्या अशा तपासणीतूनच अनेक जणी सुखरूप वाचल्या आहेत.

आणखी वाचा-जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

वीणा – मुक्काम मोदरापाडा. नवव्या महिन्यात माहेरी आलेली. हिमोग्लोबिन ६ ग्रॅम. ‘आशा’ताईनं स्वत: तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणलं. रक्ताच्या दोन पिशव्या दिल्यानंतर तीन दिवस भरती करून वीणा सुखरूप बाळंत झाली. चौथ्या खेपेची शांती. ही नियमित तपासणीला यायची, हिमोग्लोबिन मात्र १०.४ ग्रॅम. दोन आठवडे आधीच तिला कळा सुरू झाल्या. ‘आशा’ताईला बोलावणं आलं, ती लगेच पोहोचली. शांतीनं बाळाला जन्म दिला होता. खूप रक्तस्राव होत होता. घरच्यांचा विरोध पत्करून ‘आशा’ताईनं लगेच गाडीची व्यवस्था केली आणि ग्रामीण रुग्णालय गाठलं. पण तिथंही उपचार होऊ शकत नव्हते. शेवटी जिल्हा रुग्णालयात पोहोचली. चिकटलेली वार बाहेर काढून, दोन रक्ताच्या पिशव्या लावून, शांती सुखरूप घरी पोहोचली. असे अनेक जीव या ‘आशा’ताईंनी वाचवले आहेत. यांचं कौतुक व्हायला हवं. खरंच, आरोग्याच्या प्रश्नाकडे आपण एकांगी पाहू शकतो का?…

‘युनिसेफ’च्या मते स्त्रियांचं सामाजिक स्थान, अन्नसुरक्षा, पोषण, ज्ञानाचा अभाव, न परवडणाऱ्या आरोग्य सेवा, अशा अनेक बाबी माता-बाल आरोग्याच्या घसरत्या स्थितीला कारणीभूत आहेत. रस्त्यांची दुर्गमता, वाहतुकीची साधनं उपलब्ध नसणं, अज्ञान, गरिबी याबरोबरच भारतीय आरोग्य व्यवस्थेतली महत्त्वाची समस्या म्हणजे आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेतली असमानता यावर उपाय करणे गरजेचे आहे. याशिवाय मानसिकता बदलण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. वैद्याकीय शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांमध्ये सेवेचा अंकुर रुजवावा लागेल.

आणखी वाचा-‘ती’च्या भोवती..! बर्वे ते बेगम एक देहांतर

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेस कमी खर्चीक, पण अधिक परिणामकारक अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपली सेवा प्रभावीपणे देण्यासाठी करावा लागेल. आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि खासगी व सरकारी यंत्रणेतला भ्रष्टाचार, हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. देशाचा आरोग्यावरील खर्च एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपेक्षा अधिक करावा लागेल.

आशाताईंच्या रूपानं अगदी शेवटपर्यंत आरोग्य सेवेचं जाळं शासनानं उभं केलं आहे. मात्र खरी गरज आहे त्यांच्या सक्षमीकरणाची आणि त्यांच्या योग्य त्या सन्मानाचीही! प्रतिबंधात्मक उपक्रमांचं अंतिम उद्दिष्ट केवळ जनजागृती नसून वर्तनात सकारात्मक बदल, हेच असायला पाहिजे. याकामी पुन्हा एकदा अशासकीय संस्थांचा सहभाग परिणामकारक ठरू शकतो आणि सातपुड्यातील आरोग्याचं चित्र बदलू शकतं.

drpratibhaphatak@gmail.com

Story img Loader