हेमा होणवाड
मूल वाढवणं पालकांची जबाबदारी आहेच, मात्र समाजातही ते मूल घडत जातं. विश्वाच्या अंगणात हे मूल वाढतं ते एकमेकांच्या संगतीने, सहजीवनाचा वेगळाच अनुभव घेत. सामाजिक बांधिलकी पूर्णपणे स्वीकारणाऱ्या प्राची आणि संगीतासारख्या गुणी माणसांना प्रेरणा आणि पाठिंबा देणारी माणसंच समाज घडवत असतात.
आज पालकत्वावर जेवढी चर्चा होत आहे, लिखाण होत आहे, तेवढं साधारण वीस वर्षांपूर्वी कधी झाल्याचं कोणाला आठवत आहे का? अनेक तज्ज्ञ मंडळींचे लेख आपण वाचतो. मानसशास्त्रज्ञ ‘पॉडकास्ट’मध्ये अनेक गोष्टी सुचवतात. त्या ऐकतो आणि पालक म्हणून स्वत:ला तराजूत घालून तोलत असतो. आपण करतो, वागतो ते बरोबर आहे ना? मुलाच्या भविष्याच्या विचारानं अनेकदा आपली रात्रीची झोप उडालेली असते. अधूनमधून सतावणारी अपराधीपणाची भावना, आपलं काम, घर, नातेसंबंध सांभाळत मुलांचं संगोपन करणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. ताणाचं होत आहे. अनेक विवाहित जोडपी आज ‘मूल नको’ किंवा ‘एकच मूल पुरे’ हा निर्णय घेताना दिसत आहेत.
१०/१२ वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका विचारशील शाळेत, घरी एकुलत्या एक असलेल्या मुलांना एक प्रश्नावली दिली होती. त्यामध्ये एक प्रश्न असा होता की, ‘तुम्हाला एखादं भावंडं असतं तर आवडलं असतं का?’ तेव्हा प्रत्येकानं ‘नाही’ हेच उत्तर दिलं. ‘‘आमचं आयुष्य मज्जेत चाललं आहे. आई-बाबांच्या प्रेमात आम्हाला कोणी वाटेकरी नाही हे छानच आहे. काहीही वाटून घ्यावं लागत नाही.’’ पण एकच मूल किंवा मूलच नको हा पर्याय योग्य कसा ठरू शकेल?
मुलांच्या वाढीत परस्पर विश्वास असलेला शेजार असेल तर आईवडिलांचा ताण कमी होतोच, पण आपलं व्यक्तिमत्त्व किती समृद्ध होऊ शकतं हे माझ्या पिढीनं अनुभवलं आहे. मानसतज्ज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ मूल वाढवताना परिसरातील इतरांच्या सहकार्याचं महत्त्व अधोरेखित करताहेत आणि ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्नही काही ठिकाणी चालू आहेत. आत्ता या जून महिन्यातील गोष्ट.
मराठवाड्यात ज्या ‘शैक्षणिक केंद्रा’त मला २०११ पासून लहानसं योगदान करण्याची संधी मिळाली तिथली ही गोष्ट. एका बैठ्या इमारतीत ‘अष्टकोन’ ही चारी बाजूंनी मोकळी, सगळ्यांच्या आवडीची बैठकीची प्रशस्त जागा. युवा कार्यकर्त्यांचं छोटं-मोठं यश, त्यांचे वाढदिवस साजरे करण्याची ही जागा. नावाप्रमाणे आठ कोन. बसायला दोन झोपाळे आणि खूप साऱ्या खुर्च्या. एका बाजूला कार्तिक महिन्यात बहरणारा आकाशनिंब, तर दुसऱ्या बाजूला वातावरण गंधित करणारा प्राजक्त. आज पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा छोटेखानी समारंभ होता. तिथली मुक्ता मला सांगत आली, ‘‘हेमाताई, चला, आपल्याला अष्टकोनात जमायचं आहे.’’
‘‘का गं? आज कोणाचा वाढदिवस?’’
‘‘वाढदिवस नाही ताई, प्राचीला पुण्याच्या चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. ७०० मुलींच्या मुलाखतीतून तिची निवड झाली आहे.’’
‘‘काय सांगतेस काय? कमाल आहे या प्राचीची!’’ मग काय, आइस्क्रीमचा आस्वाद घेत, गाणी गात, हसून हसून दमल्यावर शेवटी प्राचीला औक्षण करून तिच्या पुढच्या शिक्षणासाठी शुभचिंतन करून सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेलो.
मराठवाड्यातील एका लहान गावात प्राचीचा जन्म झाला. घरच्या अत्यंत कठीण परिस्थितीत, सातत्यानं येणाऱ्या अडचणींना धैर्यानं तोंड देणारी आणि आईवडिलांना हातभार लावणारी प्राची भावंडांत सगळ्यात मोठी. एक लहान बहीण, एक शाळकरी छोटा भाऊ आणि दुसरा दिव्यांग लहान भाऊ. दहावीपर्यंत शिक्षण आणि मग एखादा दोन-तीन महिन्यांचा अभ्यासक्रम करून लग्न हा ‘धोपट’ मार्ग सोडून ‘बिकट’ वाट निवडण्याचं धाडस आणि शहाणपण दोन्ही प्राचीमध्ये होतं.
‘जोदी तोर डाक शुने केऊ ना आशे तोमे अॅकला चालो रे…’ या ठेक्यावर ती ठामपणे एकटी चालू लागली. या तिच्या प्रवासात तिला मदतीची गरज आहे, असं जाणवलं की तिचा हात धरायला केंद्रातली सहृदय आणि सुजाण माणसं तत्पर असायची. त्यांनी तिच्यातले निसर्गदत्त सुप्त गुण ती लहान असतानाच हेरले होते. प्रेरित करणारा परिसर साथीला असला की गुणांना बहरायला वेळ लागत नाही. वडिलांना दारूची सवय होती खरी, पण त्यांनी तिला कोणतंही काम करताना केवळ मुलगी म्हणून कधी थांबवलं नाही. नातेवाईक मात्र हिच्या लग्नासाठी आईच्या मागे लकडा लावायचे. आई चांगलीच खंबीर होती. भावंडांना सांभाळून सर्व प्रकारे आईला मदत करणारी प्राची, आई आणि वडील एकापाठोपाठ एक हे जग सोडून गेले तेव्हा आतून पूर्णपणे हलली होती. पण सावरलं स्वत:ला. प्राचार्यादेखील कामाच्या व्यग्रतेतून तिच्यासाठी खास वेळ काढत असत. एखादी सुजाण संस्था मुला-मुलींचे अव्यक्त गुण हेरून त्यांना शैक्षणिक, भावनिक, आर्थिक पाठिंबा देऊन त्यांचं व्यक्तिमत्त्व फुलायला कशी मदत करू शकते, याचं प्राची हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
एकाच परिसरात राहणारे समवयस्क मित्र-मैत्रिणी, छोटी मुलं-मुली, वयानं मोठे दादा-ताई, स्थायिक शिक्षक आणि मार्गदर्शक, बाहेरून येऊन मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती, अनुभवी ज्येष्ठ व्यक्ती ही सगळ्या वयोगटांतील माणसं सातत्यानं परस्परांशी औपचारिक आणि अनौपचारिक संवाद साधत असतात. खऱ्या अर्थानं सहजीवनाचा अनुभव घेत असतात. मागच्या लेखात ज्या संयुक्त राष्ट्रांच्या चार स्तंभांचा उल्लेख केला होता- १. एकमेकांबरोबर राहणं, २. स्वत:चा शोध घेणं, ३. स्वत:च्या हातानं काम करणं आणि ४. शिकायला शिकणं हे इथं सहज घडतं. कारण अशा केंद्रांमध्ये तीच संस्कृती प्रयत्नपूर्वक जोपासलेली असते. माणसाच्या मूलभूत दोन गरजा इथं सहज भागतात. ‘‘पहिली गरज असते जिव्हाळा, प्रेम अनुभवायला मिळणं (sense of belonging) आणि दुसरी, आपण महत्त्वाची व्यक्ती आहोत हा विश्वास निर्माण होणं (feeling significant).’’ इथं प्रत्येक मुलाच्या अस्तित्वाची दखल घेऊन ते ‘मूल’ नावाचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. कोणत्याही मुला-मुलीला केंद्रप्रमुखांशीसुद्धा मोकळा संवाद साधता येतो. अशा संपन्न परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात राहून वाढत असताना असंख्य संधी सतत समोर येत असतात आणि त्यांचा लाभ घेणाऱ्या मुलांच्या जाणिवा परिपक्व होत जातात.
‘It takes a village to raise a child.’ ही दक्षिण आफ्रिकेतील एक लोकप्रिय म्हण आपल्याला सांगते, ‘मुलाचं संगोपन करताना आई-वडिलांबरोबर अख्ख्या गावाची त्यामध्ये गुंतवणूक असायला हवी.’ त्या म्हणीला, ‘It takes a village to support the child’s parent!’ अशी पुष्टी द्यावी असं वाटतं. प्राचीचं अख्खं कुटुंबच संस्थेचं झालं. मूल वाढवणं ही जितकी पालकांची जबाबदारी आहे, तितकीच ती समाजाचीही आहे. आपण ‘जंगल’ हा शब्द उच्चारला तर डोळ्यासमोर दाट जंगल उभं राहतं. पण ते एक एक स्वतंत्र झाड मिळूनच तयार झालेलं असतं. तशीच समाजातली प्रत्येक व्यक्ती त्या समाजाला आकार देत असते. गेल्या आठवड्यात एके दिवशी सकाळी पुण्यात पौड रस्त्यावर आजूबाजूचे सगळे वाहनचालक नियम तोडत असताना, लाल सिग्नलला शांतपणे थांबलेली, शाळेच्या गणवेशातील दोन आठवीतली मुलं मी पाहिली तेव्हा आपली स्वप्नं नक्की पूर्ण होणार याची मला खात्री वाटली.
निसर्गाकडून बुद्धिमत्ता, रूप, रंग आणि काही वैशिष्ट्यं घेऊन मूल जन्माला येतं. वंशपरंपरेनं लाभलेल्या या उपजत गुणांचं संगोपन आणि निगराणी करण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त आपल्यावरच आहे ही भावना पालकांसाठी खूप ताणाची असते. शहरी पालक म्हणून मी स्वत:ही हा ताण अनुभवला आहे. परस्पर विश्वासाच्या अभावामुळे ‘आपण आणि इतर’ असं विभाजन मनात होतं आणि मग मुलांच्या सुरक्षिततेबद्दल भीती वाटत राहते. आपले शेजारीपाजारी, आपल्या इमारतीत राहणारी इतर मुलं, यांच्याशी मुक्त संवाद साधणं आजच्या शहरी वातावरणात भीती आणि ताणामुळे कमी होत चाललं आहे. याचा शेवट मूल स्वकेंद्रित आणि संकुचित विचारांचं होण्यामध्ये होऊ शकतो. यासाठी पुन्हा ‘वाडा संस्कृती’ किंवा ‘एकत्र कुटुंबपद्धती’ परत आणणं आपल्याला शक्य नाही, पण आपण परस्परांना सहकार्य करण्याच्या, एकत्र येण्याच्या संधी जाणीवपूर्वक निर्माण करू शकतो.
पालकत्वाचे किती वेगवेगळे पैलू असतात. मी नुकताच ‘नील बटे सन्नाटा’ हा हिंदी चित्रपट पाहिला. कथा काल्पनिक आहे. त्यातील आई कामवाली बाई असते. ती जिच्याकडे कामाला असते तिच्या सहकार्यानं आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी तिची अथक धडपड चालू असते. जेव्हा तिची मुलगी म्हणते, ‘‘डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनीयरचा मुलगा इंजिनीयर आणि कामवाल्या बाईची मुलगी कामवाली बाईच होणार. मग अभ्यास कशाला करायचा?’’ तेव्हा संतापलेली ही आई मुलीनं अभ्यास करून समाजात स्वत:चं स्थान निर्माण करावं म्हणून जंग जंग पछाडते. स्वत: मुलीच्या शाळेत प्रवेश घेऊन वर्गात बसते. मुलीचे डोळे उघडावेत म्हणून स्वत: अभ्यास करते. तिच्या प्रयत्नांना लखलखीत यश येतं. सहसा काल्पनिक कथानकात मी फारशी रमत नाही. पण ही कथा मात्र मला आवडली.
वर उल्लेख केलेल्या संस्थेमध्ये मला आणखी एक छोटी मैत्रीण भेटली, संगीता पतंगे. हिनं मुलांच्या शिक्षणासाठी एक अवघड वाट निवडली. तिला परिचारिकेच्या कामाचा काहीही अनुभव नसताना तिनं ते काम शिकण्याची तयारी दाखवली आणि उत्तम प्रकारे ते काम ती शिकली. स्मृतिभ्रंश झालेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीची सेवा करण्याचं व्रत तिनं स्वीकारलं, आणि जेव्हा त्यांच्यावर दुसऱ्या गावी स्थलांतराची वेळ आली तेव्हा तिनंही त्यांच्याबरोबर आनंदानं स्थलांतर केलं. याचं कारण त्या वयोवृद्ध स्त्रीचे प्रेमळ कुटुंबीय तिच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची सर्वतोपरी जबाबदारी घेत होते. संगीताचा मोठा मुलगा आता त्या केंद्रात दहावीच्या आणि धाकटा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. मुलांचं कल्याण व्हावं यासाठी मनावर दगड ठेवून ती तिकडे दूर दिल्लीमध्ये राहून त्या आजींची मनापासून सेवा करत आहे. पतीची आवक अनिश्चित असते, पण मुलांची आई त्यांच्या शिक्षणासाठी एवढ्या लांब राहून काम करते, हे स्वीकारल्यावर मुलांची सर्वतोपरी काळजी घेण्याचं काम ते करतात.
आपली सामाजिक बांधिलकी पूर्णपणे स्वीकारून प्राची आणि संगीतासारख्या गुणी माणसांना प्रेरणा आणि पाठिंबा देणारी माणसं आत्ता ज्या संख्येनं अस्तित्वात आहेत त्यापेक्षा त्यांची संख्या खूप वाढण्याची गरज आहे. असा समाज हे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे.