ही गोष्ट आहे चंदाची. चंदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या एका खेड्यात राहणारी. आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. दारिद्र्य त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं. चंदा पाच भावंडांपैकी सर्वात थोरली. खाणारं एक तोंड कमी होईल म्हणून चंदाचं पंधराव्या वर्षीच लग्न लावून दिलं. सासर बीडचं आणि तिथंही तशीच गरिबी. लग्नानंतर दोन वर्षांतच चंदाला पहिलं मूल झालं आणि २३ वर्षांची होईपर्यंत चंदा तीन मुलांची आई झाली.

चंदा व तिचा नवरा ऊसतोडणी कामगार म्हणून शेतात कामाला जायचे. दिवसाला १२-१४ तास काम करायला लागायचं. अशातच चंदाला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अंगावरून पांढरं जायला लागलं. अशक्तपणा आला. पाळीच्या वेळी तर पोटदुखीचा खूपच त्रास व्हायचा. शेतात कामाला गेलं की ना स्वच्छतागृहाची सोय, ना पाण्याची. मग अशा वेळी स्वच्छता कशी पाळणार? त्यामुळे कामावरून सुट्टी घ्यायला लागायची. पैसे कापले जायचे. औषधपाण्यालासुद्धा पैसे नसायचे. मुलाबाळांच्या खाण्यापिण्याचे हाल व्हायचे. अशातच तिच्या मैत्रिणीने तिला गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला. गर्भाशय पिशवी काढली की मासिक पाळी आणि पाळीचे त्रास, दोन्ही बंद होईल. मग कामावरही खाडा नाही आणि औषधांवर खर्चही नाही. चंदाला हा उपाय पटला. ती डॉक्टरांना भेटली. अंगावरून पांढरे जात असल्याने डॉक्टरांनी गर्भाशय पिशवी काढून टाकली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी चंदाची गर्भाशय पिशवी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झाली.

आता चंदा कशी आहे? चंदाचा मासिक पाळीचा त्रास थांबलाय, पण लहान वयात गर्भाशय काढल्याने इतर त्रास सुरू झाले आहेत. कंबर-पाठदुखी, अशक्तपणा यामुळे ती बेजार झाली आहे. कामावरच्या सुट्ट्या वाढल्या आहेत, औषधपाण्याचा खर्चही वाढलाय. शिवाय शस्त्रक्रियेच्या वेळी घेतलेलं पैशांचं कर्ज डोक्यावर झालंय. ही गोष्ट एकट्या चंदाची नाही. ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा’नुसार, स्त्रियांमध्ये लहान वयात Hysterectomy अर्थात ‘गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया’ करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, तर बीड जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे.

बीड जिल्ह्यातील १३ हजारांपेक्षा जास्त ऊसतोडणी कामगार स्त्रियांनी स्वत:चं गर्भाशय काढून टाकलं आहे. याची अनेक कारणं आहेत. दारिद्र्य, लहान वयात मुलं होणं, स्वच्छतेचा अभाव व पाण्याचं दुर्भिक्ष्य यामुळे या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा जंतुसंसर्ग व गर्भाशयाचे इतर आजार होण्याचं प्रमाण जास्त आहे. ‘मुलं झाली आहेत, आता गर्भाशय काय कामाचं? तो तर एक निरुपयोगी अवयव आहे.’ यासारख्या चुकीच्या समजुतींमुळे गर्भाशयाचे त्रास झाल्यास औषधं घेण्याऐवजी गर्भाशयच थेट काढून टाकण्याचा निर्णय घेतला जातो. शस्त्रक्रिया केली नाही तर कर्करोग होईल अशी अवास्तव व चुकीची भीतीसुद्धा यासाठी कारणीभूत असते. शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या त्रासांविषयी या स्त्रियांना काहीच माहिती नसते.

लहान वयात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचे अनेक तोटे असतात. मोठ्या शस्त्रक्रियेनंतर अशक्तपणा येतो. कंबरदुखी वाढते, सांधे दुखतात. एकूणच शारीरिक क्षमता कमी होते. संप्रेरकांच्या कमतरतेमुळे लवकर वार्धक्य येतं. हाडं ठिसूळ होतात. लघवीच्या आजारांची शक्यता वाढते. त्यामुळे लहान वयात ‘हिस्टरेक्टॉमी’ची शस्त्रक्रिया टाळणंच योग्य. गर्भाशयाच्या अनेक प्रकारच्या आजारांसाठी ‘हिस्टरेक्टॉमी’ची शस्त्रक्रिया केली जाते. मध्यम वयातील स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या स्त्री-आरोग्य समस्या व गर्भाशयाच्या आजारांविषयी थोडं समजून घेऊ या व त्यासाठी उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतींची माहिती करून घेऊ या.

गर्भाशयातून होणारा अनैसर्गिक रक्तस्राव (Abnormal Uterine Bleeding) ही चाळिशीच्या सुमारास अनेक स्त्रियांना भेडसावणारी समस्या. काही जणींमध्ये मासिक पाळीतील रक्तस्रावाचं प्रमाण वाढतं, तर काही वेळेस खूप जास्त दिवस रक्तस्राव होतो. काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित होते, तर काही जणींना अधूनमधून रक्तस्राव होत राहतो. संप्रेरकांमधील असंतुलन हे याचं सर्वात महत्त्वाचं कारण. चाळिशीच्या सुमारास बीजनिर्मिती अनियमित झाल्याने संप्रेरकांमध्ये असंतुलन निर्माण होतं. यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होतात. मासिक पाळीच्या समस्या होत असल्यास वैद्याकीय सल्ला घ्यायलाच हवा. निदान करण्यासाठी सोनोग्राफीने गर्भाशय व बीजांडकोशाची तपासणी केली जाते. संप्रेरकांची रक्तामधली पातळी बघितली जाते. काही स्त्रियांमध्ये गरज भासल्यास गर्भाशयाच्या आतील आवरणाची ‘बायोप्सी’ ( Endometrial Biopsy) करून कर्करोगपूर्व पेशी तपासल्या जातात व गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता पडताळली जाते.

मासिक पाळीचा त्रास बहुतेकदा औषधोपचाराने नियंत्रणाखाली आणता येतो. संप्रेरकांमधील असंतुलन किंवा कर्करोगपूर्व पेशी आढळल्यास संप्रेरकयुक्त औषधं दिली जातात. यासाठी ‘एलएनजी-आययूएस’ (LNG- IUS) ही आधुनिक उपचारप्रणाली खूप उपयोगी पडते. ‘एलएनजी-आययूएस’या साधनात प्रोजेस्टेरॉन संप्रेरक असतं. हे साधन गर्भाशयात बसवलं जातं. यातून दररोज अत्यल्प प्रमाणात प्रोजेस्टेरॉन गर्भाशयात वितरित केलं जातं. या साधनाद्वारे रक्तस्राव नियंत्रणात आणता येतो व गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी करता येतो. जास्त रक्तस्राव होत असल्यास ‘एंडोमेट्रियल अॅब्लेशन’ (गर्भाशयाच्या आतील थराला (एंडोमेट्रियम) काढून टाकण्याची प्रक्रिया) करता येते. ज्यामध्ये गर्भाशयाचं आतलं आवरण नष्ट केलं जातं. गर्भाशयातून होणाऱ्या अनैसर्गिक रक्तस्रावासाठी अगदी क्वचितच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रिया हा या समस्येसाठी असलेला शेवटचा उपाय असायला हवा.

या काळात स्त्रियांमध्ये आढळणारी सर्वसामान्य समस्या म्हणजे ‘फायब्रॉईड’. फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयाच्या स्नायूंची गाठ. साधारणत: ३० टक्के स्त्रियांमध्ये गर्भाशयात गाठी आढळतात. अनेकदा या गाठींची कोणतीही लक्षणं स्त्रियांना जाणवत नाहीत. या गाठींचं निदान सोनोग्राफीने करता येतं. काही स्त्रियांमध्ये फायब्रॉईडच्या गाठींमुळे पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होतो किंवा पोटात जास्त दुखतं. गाठी खूप मोठ्या असल्यास आजूबाजूच्या अवयवांवर ताण पडतो. गर्भाशयाच्या गाठी छोट्या असल्यास व त्याचा काहीच त्रास होत नसल्यास औषधोपचाराची गरज नसते. जास्त रक्तस्राव होत असल्यास अथवा पोटात दुखत असल्यास औषधांनी त्रास कमी करता येतो. ‘फायब्रॉईड’चा आकार कमी करण्यासाठी संप्रेरकयुक्त औषधं उपलब्ध आहेत; परंतु त्यांचा उपयोग तात्पुरता होतो.

औषधोपचाराचा उपयोग न झाल्यास अथवा गाठी मोठ्या असल्यास शस्त्रक्रिया करण्यात येते. शस्त्रक्रियेमार्फत ‘फायब्रॉईड’च्या गाठी काढता येतात अथवा गर्भाशय पूर्णपणे काढून टाकलं जातं. या गाठींमध्ये कर्करोग होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने गाठ आहे म्हणून शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. आधुनिक वैद्याकशास्त्रात फायब्रॉईडच्या गाठीसाठी इतर काही उपाय उपलब्ध आहेत. ‘Uterine Artery Embolisation’ (UAE) मध्ये गर्भाशयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ‘एम्बोलस’ घातला जातो. यामुळे गर्भाशयाचा रक्तपुरवठा कमी होऊन फायब्रॉईडच्या गाठी लहान होतात. ‘एचआयएफयू’ अर्थात तीव्र अल्ट्रा ध्वनीलहरींचा गाठीवर मारा करून गाठीचा आकार कमी केला जातो, हे अत्याधुनिक उपचार खर्चिक असून भारतातील काही शहरांतच उपलब्ध आहेत.

गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये कधी कधी गर्भाशयाच्या आतील आवरणातील पेशी असतात (Adenomyosis). पाळीदरम्यान त्यात रक्तस्राव होतो. यामुळे गर्भाशयाचा आकार मोठा होतो. पाळीच्या वेळी पोटात खूप दुखतं व जास्त रक्तस्राव होतो. संप्रेरकयुक्त औषधं व ‘एलएनजी – आययूएस’ने हे त्रास कमी करता येतात. बीजांडकोशाच्या (Ovary) गाठीचं निदान सोनोग्राफीने करण्यात येतं. बीजांडकोशात गाठ आढळल्यास तपासण्या करून कर्करोगाची शक्यता नाही हे निश्चित करायला हवं. बीजांडकोशाच्या गाठी बहुतेकदा संप्रेरकांमधील बदलांमुळे होतात व त्या आपोआप जातात. काही वेळेस संप्रेरकयुक्त औषधं द्यावी लागतात. ‘एन्डोमेट्रिओसिस’च्या आजारात बीजांडकोशात रक्ताच्या गाठी निर्माण होतात. यामुळे पाळीदरम्यान व पाळीनंतर पोटात खूप दुखतं. ‘एन्डोमेट्रिओसिस’ नियंत्रणात आणण्यासाठी संप्रेरकं घ्यावी लागतात. काही वेळेला शस्त्रक्रियादेखील करावी लागते.

विक्रम गोखले दिग्दर्शित ‘आघात’ चित्रपटाची कथा आठवतेय. यात संगीता ही २२ वर्षांची तरुणी बीजांडकोशाच्या शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात दाखल होते. तिच्या बीजांडकोशावर मोठी गाठ आली आहे व तो कर्करोग असण्याची शक्यता आहे. डॉ. खुराणा शस्त्रक्रिया करून बीजांडकोश व गाठ काढून तपासतात. त्यात कर्करोग असल्याचं निष्पन्न झाल्यावर दुसरं बीजांडकोशही काढून टाकतात. तेथील डॉक्टर स्मिता दुसरं बीजांडकोश तपासणीशिवाय काढायला विरोध करतात. दुसऱ्या बीजांडकोशात कर्करोग नसल्याचं नंतर सिद्ध होतं. डॉक्टर खुराणांचं म्हणणं आहे की, दुसऱ्या बीजांडकोशात कर्करोगाची शक्यता असल्याने एकाच शस्त्रक्रियेत दोन्ही बीजांडकोश काढून टाकले म्हणजे रुग्णाला परत शस्त्रक्रियेला सामोरं जायला नको. परंतु डॉक्टर स्मिताच्या मतानुसार, संगीताचं वय लक्षात घेता बीजांडकोशासारखा महत्त्वाचा अवयव तपासणीशिवाय काढायला नको. दोन्ही बीजांडकोश काढून टाकल्यास संप्रेरक निर्मिती बंद होईल व अकाली वार्धक्य टाळण्यासाठी कायमस्वरूपी संप्रेरकयुक्त औषधं घ्यावी लागतील. तसेच बीजांडकोश काढल्याने स्वत:चं मूल होण्याची शक्यताही मावळते. मग डॉ. खुराणांचा निर्णय योग्य की डॉ. स्मितांचं म्हणणं योग्य?

लहान वयाच्या मुली व तरुणींच्या बीजांडकोशात गाठी झाल्यास स्त्री आरोग्यतज्ज्ञ बीजांडकोश वाचवण्याचा प्रयत्न करतात. कर्करोगाचं निदान झाल्यास शस्त्रक्रियेपूर्वी किंवा ‘किमोथेरपी’ व ‘रेडिएशन’च्या आधी स्त्रीबीजे संकलित करून ठेवण्याचा विचार करता येतो. बुरशीजन्य संसर्ग किंवा जिवाणू संसर्गामुळे योनीमार्गातून स्राव जाणं ही स्त्रियांमधील सर्वसामान्य समस्या. हा स्राव हिरवट पिवळा किंवा घट्ट पांढरा असतो. त्याबरोबर खाज सुटणं, घाण वास येणं यासारखे त्रास होतात, अशी लक्षणं दिसल्यास लगेचच औषधोपचार करायला हवेत. यासाठी शस्त्रक्रियेची गरज नसते. जंतुसंसर्ग बळावल्यास तो गर्भाशय व इतर अवयवांना पोहोचू शकतो. अशा वेळी पोटात दुखणं, ताप येणं यासारखी लक्षणं जाणवतात. प्रतिजैविक औषधं हा त्यावरील उपाय आहे.

मध्यमवयीन गटातील स्त्रिया दैनंदिन आयुष्य, मुलं, कुटुंबीय, नोकरी यामध्ये पूर्णपणे व्यग्र असतात. कुटुंबातील सदस्यांच्या सुखासाठी झटणाऱ्या या स्त्रिया स्वत:कडे मात्र दुर्लक्ष करतात. प्रकृतीचा त्रास झाला तरी तो अंगावर काढतात. सहसा डॉक्टरांकडे जात नाहीत. स्वत:च्या आरोग्य समस्यांसाठी वेळ व पैसा खर्च करणं त्यांना अयोग्य वाटतं. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. स्त्रीचं स्वत:चं आरोग्य उत्तम राहिलं तरच ती कुटुंबाचा भरभक्कम आधार बनू शकते. नियमित वैद्याकीय तपासणी करणं व आरोग्यसंपन्न राहणं हे यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

vaishalibiniwale@yahoo.com