|| वृषाली मगदूम

गेल्या सव्वा वर्षांत करोनामुळे उद्भवलेल्या टाळेबंदीमुळे घरात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी ‘हेल्पेज इंडिया’ या संस्थेने महत्त्वाच्या राज्यांतील वृद्धांचे सर्वेक्षण केले. त्यात अनेकांनी भीती, काळजी, नैराश्य आणि एकटेपणाने ग्रासल्याचे, तसेच ६१.४ टक्के  ज्येष्ठांनी त्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सांगितले आहे. या सर्वेक्षणात अनेक ज्येष्ठांनी त्यांचा अनादर होत असल्याचे, मुलांनी त्यांच्या अंगावर धावून येणे, मारणे असे प्रकार घडल्याचे सांगितले. तर वृद्धाश्रमात राहाणाऱ्या अनेक ज्येष्ठांनी कोणीतरी भेटावे, आपल्याशी बोलावे, असं वाटत असल्याचे सांगितले. वृद्धांच्या संरक्षणासाठी धोरणे आहेत, योजना आहेत, कायदाही आहे, परंतु तो किती लोकांपर्यंत किती पोहोचतो हा प्रश्न अशा प्रकरणांमुळे अधोरेखित होतो.

 

ऐंशी वर्षांच्या वसुधाताईंचा मला फोन आला. त्यांच्या मुलीने, सीमाने त्यांना तीस जूनपर्यंत घर खाली करायला सांगितल्याचे त्या सांगत होत्या. वसुधाताई तिच्याविरोधात न्यायालयात गेल्यामुळे ती त्यांच्यावर प्रचंड संतापली आहे. वसुधाताईंनी २०१२ मध्ये स्वकमाईचे हे घर ‘गिफ्ट डीड’ करून सीमाला दिले. सीमाने २०१५ मध्ये ते स्वत:च्या नावावर करून घेतले. वसुधाताई याच घरात राहतात. या घराचे भाडे ती त्यांच्याकडून घेतेच, पण तरीही तिचे वसुधाताईंना मानसिक त्रास देणे सुरू झाले आहे. घर खाली करण्यासाठी ती सतत धमकावते आहे. त्यामुळे त्यांना आता हे ‘गिफ्ट डीड’ रद्द करायचे आहे.

त्यांनी दीड वर्षांपूर्वी त्यासाठी न्यायालयात के स दाखल के ली. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या टाळेबंदीमुळे न्यायालयातील कामकाज मंदावले आहे. तारीख पडत नाही, तारीख पडली तर वकील पुढची तारीख घेत आहेत, त्यामुळे वैतागून त्या अलीकडे बेलापूर न्यायालयात गेल्या. दोन्ही वकिलांशी बोलल्या. आता त्यांना येत्या आठ जुलैची तारीख मिळाली आहे. सीमा त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढायला निघाली असल्याने ‘घर सोडू नका, पोलीस ठाण्यात तक्रार देऊन ठेवा,’ असे वकिलांनी आणि मीही त्यांना सांगितले. त्यांच्या पश्चात सीमाला हे घर मिळेल आणि तोपर्यंत सीमाने त्यांचा सांभाळ केला तरच ते मिळेल, असे त्या ‘गिफ्ट डीड’मध्ये लिहायला हवे होते, असे मी म्हणताच वसुधाताईंनी एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि ‘पोटची पोर असे काही करेल, असं कोणाला वाटेल का,’ असे मलाच विचारले. खरे तर ‘आईवडिलांना सांभाळायची जबाबदारी विवाहित मुलीचीही आहे,’ असा निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या.अरुण चौधरी यांनी एका प्रकरणात दिला होता. पण कायदा किती लोकांपर्यंत किती पोहोचतो हा प्रश्न अशा प्रकरणांमुळे अधोरेखित होतो.

गेल्या सव्वा वर्षांत करोनामुळे ओढवलेल्या टाळेबंदीमुळे घरात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने ‘हेल्पेज इंडिया’ या संस्थेने दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळूरू, हैदराबाद या शहरातील ३,५२६ वृद्धांचे सर्वेक्षण केले. त्यात या ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य पूर्वीपेक्षा जास्त बिघडल्याचे निदर्शनास आले आहे. भीती, काळजी, नैराश्य आणि एकटेपणाने अनेकांना ग्रासले आहे. ६१.४ टक्के  ज्येष्ठांनी त्यांचे  दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळित झाल्याचे सांगितले आहे. घरातली नोकरदार मंडळी घरून काम करतात. त्याच्या जोडीला मुलांची शाळाही घरूनच चालू आहे. त्यामुळे घरात नेहमीच्या आवाजात बोलणे, जरा मोठा आवाज करणे, टी.व्ही.लावणे, यावर बंधने आहेत. घरातला

एखादा कोपरा शोधून तिथेच बसून राहावे लागतेय, कारण घरे लहान आहेत. शिवाय घराबाहेर जाण्यावरही बंदी आहे. अलीकडे एका ज्येष्ठ प्राध्यापक स्नेह््यांना सहज विचारपूस करण्यासाठी फोन केला, तर त्यांनी फोन उचलला, पण बराच वेळ बोलेनात,काही वेळाने म्हणाले,‘सॉरी तुम्हाला थांबावे लागले, पण पर्याय नव्हता. बाथरूममध्ये येऊन बोलतो आहे.’

या सर्वेक्षणातील ६२ टक्के  ज्येष्ठांनी करोना काळात अपमानास्पद वागणुकीत वाढ झाल्याचे सांगितले. सारेजण  घरातून काम करत आहेत, त्यामुळे ज्येष्ठ रिकामटेकडे आहेत, असे त्यांना वाटतेच, शिवाय त्यांचा घरातला वावरही मुला-नातवंडांना अडचणीचा वाटतो आहे. या सर्वेक्षणात ४५.६ टक्के  ज्येष्ठांनी त्यांचा अनादर होत असल्याचे सांगितले आहे. ३३.१ टक्के  ज्येष्ठांनी  मुलांनी त्यांच्या अंगावर धावून येणे, मारणे असेही प्रकार घडल्याचे सांगितले. यांमध्ये ४५.८ टक्के  मुलगे, २७.८ टक्के  सुना, तर १४.२ टक्के  मुलींकडून असे गैरवर्तन होत असल्याचे पुढे आले आहे. या सर्वेक्षणात वृद्धाश्रमात राहाणाऱ्या ४०२ ज्येष्ठांचेही सर्वेक्षण करण्यात आले.

५६.७ टक्के  ज्येष्ठांनी कोणीतरी भेटावे, आपल्याशी बोलावे, असे वाटत असल्याचे सांगितले, भेटीसाठीची एवढी तीव्रता पूर्वी कधी वाटली नसल्याचेही ५४.७ टक्के  ज्येष्ठांनी सांगितले. गेल्या सव्वा वर्षांत वृद्धाश्रमात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाही. त्यामुळे लोकांचा संपर्क नाही. इतरांशी संवाद थांबला आहे. त्यातून ज्येष्ठांना नैराश्य येत आहे. कोणीतरी संपर्क साधेल, या आशेवर ज्येष्ठ लोक दिवस व्यतीत करत आहेत. दिवसभर त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे. त्यामुळे रोजचा दिवस कंटाळवाणा व लांबलचक वाटतो, असेही अनेकांनी सांगितले.

करोनाकाळात ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. मन बिघडले की शरीर बिघडते. इथे या वृद्धांच्या बाबतीत असे झाले आहे, की शारीरिक आजार उद्भवू नये म्हणून काळजी व भय त्यांच्या मनात आहे आणि भय आहे म्हणून शारीरिक आजारपणही वाढते आहे. आरोग्ययंत्रणा कोलमडली आहे. करोना व इतर आजार झाला, तर योग्य उपचार, रुग्णालयांतील खाटांची उपलब्धता यात अडचणी आहेत हे सतत त्यांच्या कानावर पडत आहे, त्यातून ते तारतम्य नसणाऱ्या प्रतिबंधात्मक उपचारांचा स्वत:वर मारा करत आहेत, यातून हतबलताही आली आहे. आज ज्येष्ठांचे आयुर्मान वाढले आहे. काही घरात तीन पिढ्या एकत्र राहात आहेत. चाळिशीतील मुले, साठीतील आई-वडील आणि ऐंशीतील आजी किंवा आजोबा घरी आहेत. काहींची मुले परदेशात आहेत. काही मुले गावातच वेगळी राहात आहेत. काहीजणांना वृद्धाश्रमात जावे लागले आहे. पण हे सारेच समदु:खी आहेत. घरात असणारेही एकमेकांशी फारसा संवाद करत नाहीत. वृद्धाश्रम ही संकल्पना अजून अनेकांच्या पचनी पडत नसल्याने घरातच वाढता एकटेपणा, नैराश्य आले तरी ते सहन के ले जाते आहे. यामुळे भावनिक आरोग्य समस्या घरोघरी पाहायला मिळतात. प्रचंड भावनिक घुसळण होते आहे. यामागचे मुख्य कारण नातेसंबंधातील दरी हेच आहे.

परळ येथील ‘स्त्री मुक्ती संघटने’च्या कौटुंबिक सल्ला केंद्रात ७० वर्षांचे एक आजोबा आले. १५ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांचा कोल्हापूरला असलेला मुलगा बायकोसह त्यांना भेटायला आला व त्यांच्या घरातच राहिला. नंतर सुनेने खानावळ सुरू केली आणि आजोबांना जवळपास घराबाहेर काढले, जेवायला न देणे, घरात न घेणे, अपमानास्पद बोलणे अनेक वर्षे चालूच होते. आजोबा बाहेर कोठेतरी खायचे, घराच्या ओसरीवर  झोपायचे, शरीरधर्मासाठीही त्यांना     सार्वजनिक ठिकाणी जावे लागायचे. कपडे बदलणे, आंघोळ, यासाठी घरी गेले की सून बडबड करायची. स्त्री मुक्ती संघटनेच्या परळच्या कौटुंबिक सल्ला केंद्रात समुपदेशक गीता जाधव यांनी आजोबांची समस्या ऐकून घेतली आणि केस नोंदवून घेतली. मुलगा व सुनेला बोलावून त्यांची बाजूही ऐकली. एकत्र बैठकीत दोघेही ‘तीन महिन्यात ते घर खाली करतो,’ असे म्हणाले. सासूचे बळकावलेले दागिनेही परत द्यायला सून तयार झाली. हे सर्व लेखी झाले होते, तरी तीन महिने होऊनही मुलगा घर सोडेना. ‘खासगी संस्था काय करणार,’ म्हणून आजोबांनाच  टोमणे मारूलागले. त्यातच करोनामुळे पहिली टाळेबंदी सुरू झाली आणि सर्व कार्यालये बंद झाली. ऑगस्टमध्ये कार्यालय उघडले तेव्हा तेथील सुरक्षारक्षकाने गीता यांना सांगितले, की एक आजोबा रोज येतात. तुमची चौकशी करतात व खूप रडतात. गीतांनी आजोबांना बोलवून घेतलं. टाळेबंदीच्या काळात आजोबांनी खूप हलाखीचे दिवस काढले होते. स्वत:च्याच घरात त्यांना प्रवेश नव्हता. एक वडापाववाला त्यांना रोज वडापाव द्यायचा. पण त्याला करोना झाला आणि त्यातच तो मरण पावला. आजोबा प्रचंड हादरले. हे सर्व सांगताना आजोबा खूप रडत होते. मग गीता यांनी ओल्ड कस्टम हाऊसला ‘सीनिअर सिटिझन्स अ‍ॅक्ट’खाली उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केस नोंदवली. मुलगा व सून यांच्याबरोबर एकच सेशन झाले आणि पुन्हा दुसरी  टाळेबंदी लागू झाली. ऑक्टोबर २०२० मध्ये गीता अधिकाऱ्यांना भेटली होती.

२६ जानेवारी २०२१ ला ऑर्डर निघाली. या ऑर्डरनुसार सर्वांनी एकत्र राहावे, मुलाने आजोबांना दर महिन्याला पाच हजार निर्वाह भत्ता द्यावा, दागिने परत द्यावेत, असा आदेश दिलेला होता. मुलगा यातले काहीच करणार नाही, याची आजोबांना खात्री होती. त्यामुळे आजोबा खूप निराश झाले. गीता यांनी अपील करण्यासाठी अनेक वकिलांना संपर्क केला. पण वकिलांची फी आजोबांना परवडणारी नव्हती. मग गीता यांनी स्वत:च या केसचा सखोल अभ्यास केला. अनेक संदर्भ तपासले आणि स्वत:च अपील तयार के ले. ज्यामध्ये आजोबांच्या वतीनं ‘मला शांतपणे वृद्धापकाळ व्यतीत करायचा आहे व माझ्या पश्चात हे घर मुलालाच मिळेल,’ यावर भर दिला.             १० मार्च २०२१ ला  हे अपील सादर केले व नुकताच निकाल हाती आला आहे. त्यात १५ दिवसांत मुलगा आणि सुनेने घर खाली करायचा आदेश दिला आहे. दागिनेही परत द्यायचे आहेत. आजोबांचा आनंद शब्दांपलीकडचा आहे. गीता जाधव यांनी कायद्याचा रीतसर अभ्यास नसताना तो करून एक काम म्हणून नाही, तर माणुसकी म्हणून न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले. आजोबांना त्यांचे घर, सुरक्षितता, प्रतिष्ठा, निरोगी जीवन परत मिळण्यासाठी त्याची मदत झाली.

असे अनेक ज्येष्ठ नागरिक न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार देशात ६० वर्षांपुढील १० कोटी ४०लाख ज्येष्ठ नागरिक आहेत, यात ५ कोटी ३० लाख स्त्रिया, तर ५ कोटी १० लाख पुरुष आहेत, २०२६ पर्यंत हा आकडा १७ कोटी ३० लाखांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना असून कायदेशीर तरतुदीही आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ व नियम २०१० नुसार ‘मातोश्री वृद्धाश्रम योजना’ आहे. याशिवाय ६० वर्षांवरील ज्येष्ठ  नागरिकांना ओळखपत्र, बसप्रवास भाड्यात सवलत, संजय निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अशा विविध योजना आहेत. ज्येष्ठ  नागरिक कायद्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पाल्याकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद आहे. ‘ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण’ यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक अर्ज आणि तक्रार दाखल करू शकतात. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायाधिकरण असून उपविभागीय अधिकारी हे कामकाज पाहातात. पाल्याकडून मिळणारी चरितार्थासाठीची रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत असते. ज्येष्ठ नागरिकांचे समाधान न झाल्यास त्यांना पुन्हा अपील करता  येते. कायद्यांतर्गत पालकांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना तीन महिने  तुरुंगवास आणि ५,००० रुपये दंड अशी शिक्षा आहे.  मुले आईवडिलांना घराबाहेर काढू शकत नाहीत.

२०१३ मध्ये महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण आले. या धोरणात आर्थिक नियोजन,आरोग्याची काळजी, तणावमुक्त जगण्यासाठी समुपदेशन यांचा समावेश आहे. वृद्धाश्रमासाठी सिडको, म्हाडा यांनी जागा ठेवायच्या आहेत. पालकांकडे दुर्लक्ष, हलगर्जीपणा करणाऱ्या मुलांची यादी करावी, वार्डन योजना ज्येष्ठांच्या संरक्षणासाठी राबवण्यात यावी. राज्यनिहाय हेल्पलाईन सेवेची माहिती द्यावी, मोफत वैद्यकीय उपचार, विरंगुळा केंद्र, स्मृतिभ्रंश निवारण केंद्र जागोजागी असावीत, असेही धोरणात म्हटले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये त्या भागातील एकट्या राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची यादी हवी, या ज्येष्ठांना गरज असल्यास समुपदेशन व गृहभेटही करावी असेही या धोरणात म्हटले आहे.

ज्येष्ठांसाठी कायदे आहेत, धोरणे आहेत, पण कायद्याचा बडगा वापरताना दमछाक होते. खरे तर नात्यांमध्ये सामंजस्य व समजूतदारपणा उपयोगी पडतो. तरुण पिढीशी संवाद करताना अपेक्षांचे ओझे उतरवून ठेवले व एक तटस्थता अंगीकारली तर ज्येष्ठांचे जगणे सुसह्य होईल. तटस्थता म्हणजे तुसडेपणा नाही. तुझा माझा काही संबंध नाही, ही टोकाची भूमिका नको; पण अनावश्यक ओढही ठेवायची नाही. तुझ्या त्रासाने मी व्यथित होतो, तसे तुही माझ्या त्रासाने त्रस्त झाले पाहिजे; ही अपेक्षा अनाठायी आहे.

करोना काळात ज्येष्ठ नागरिक फार भरडले गेले आहेत. कुटुंब, समाज, शासन यांच्याकडून त्यांच्या भल्यासाठी, पण खूप बंधने घातली गेली आहेत. प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता आहे. हे सारे कधी संपेल आणि माझे जगणे कधी सुसह््य होईल याची वाट बघणे सुरू आहे. पण या टप्प्यावर इतक्या वर्षांच्या सुखदु:खाचे, संकटांचे, अडचणींचे, अनेक आव्हानांचे, नातेसंबंधांचे आणि या सगळ्याचे नेटके व्यवस्थापन केल्याचे अनुभवसंचित उपयोगी पडणार आहे. ज्येष्ठांनी ‘माझे आरोग्य माझ्या हाती. माझे जगणे मी ठरवेन,’ म्हणत शारीरिक, मानसिक, भावनिक सक्षम भावनेने जगले पाहिजे. सामाजिक, सांस्कृतिक परीघ वाढवला पाहिजे. आपल्या मस्तीत अतिशय समृद्ध, निरोगी व निकोप जगणे त्यांचा शेवटचा दिस गोड करेल.

vamagdum@gmail.com