वृषाली मगदूम  – vamagdum@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘करोना’मुळे अचानक उद्भवलेल्या टाळेबंदीत गावी गेलेले अनेक लोक होते तिथेच अडकून पडले. ही अशाच एका अडकून पडलेल्या गरोदर स्त्रीची गोष्ट. नवरा सारखी मारझोड करतो, त्यातच सासरचे लोक टोचून बोलतात, अशी आणखीनच वेगळी ‘टाळेबंदी’ तिच्या नशिबी आली. आता जावं तरी कुठं, या विवंचनेत असलेल्या तिच्या मदतीसाठी इतर काही जणी मात्र खंबीरपणे उभ्या राहिल्या. तिला सुखरूप बाहेर काढून घरी पोहोचवण्यासाठी त्यांची एक छोटीशी ‘टीम’च बनली. आणि…

पाच मुली असलेली लक्ष्मी नवी मुंबईच्या रबाळे येथील  झोपडपट्टीत राहून कंपनीच्या आजूबाजूचा कचरा वेचून घर चालवते. दारुडय़ा नवऱ्याचा मार खात आणि त्याच्या दारूला पैसे पुरवत लक्ष्मीनं अनेक वर्षं काढली. सात महिन्यांपूर्वी दारूच्या नशेत त्यानं घरातच गळफास लावून घेतला. चार वर्षांंपूर्वी लक्ष्मीच्या मनोरुग्ण नणंदेनं एका मुलाला जन्म दिला आणि त्यातच ती गेली. दारू आणि गांजाचं व्यसन असलेल्या नणंदेच्या नवऱ्याच्या झोपडीला आग लागली. त्यानंतर तोही वारला. तेव्हापासून नणंदेच्या मुलाला, बाबूलाही लक्ष्मीच सांभाळते. ही लक्ष्मी इंगळे गेल्या दहा वर्षांंपासून ‘स्त्री मुक्ती संघटने’च्या बचत गटात आहे.

दहा महिन्यांपूर्वी लक्ष्मीच्या धाकटय़ा मुलीनं- मीनानं पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता. मुलगा प्लंबिंग आणि दुरुस्तीची कामं करतो. अर्धवट शिक्षण सोडलेली मीना शिवण शिकली आहे. लक्ष्मीनं या लग्नाचा स्वीकार केला तरी मीनाच्या सासरच्या लोकांचा त्याला विरोधच आहे.  मीनाच्या सासरचे लोक कोकणात चिपळूणजवळच्या एका छोटय़ा गावात राहतात. होळीला त्यांनी मीनाचा नवरा शंकर आणि तिला बोलावलं. दोन दिवस जाऊन यायचं ठरलं. बाबूलाही घेऊन जाते, असं मीना म्हणाली. होळीसाठी सगळे गावी गेले. दोनाचे आठ दिवस झाले. परतीचं तिकीट मिळत नव्हतं. आणि अचानक टाळेबंदी जाहीर झाली आणि सर्वच ठप्प झालं. मीनाच्या सासरी सासू, सासरे, नणंद, दीर एवढी माणसं. त्यात या तीन माणसांची भर पडली. ‘करोना’मुळे सगळे घरातच. सासू मीनाला सारखं टोचून बोलू लागली. बाबूलाही सारे हिडीसफिडीस करू लागले. शंकर सकाळी गावात फिरायला गेला की रात्रीच उगवायचा. धुसफुस वाढू लागली. मीना गरोदर होती. तिसरा महिना संपत आला होता. पण त्याची नवऱ्याला पर्वा नव्हतीच. त्याची तिच्यावर हात उचलण्यापर्यंत मजल गेली. लक्ष्मीनं मला फोन करून सर्व सविस्तर सांगितलं. त्यानंतर मग मी मीनाशी दूरध्वनीवरून संपर्कात राहू लागले. तिला तब्येतीची काळजी कशी घ्यावी ते सांगत होते. तीही समजुतीनं घेत होती. रोज माझ्याशी बोलत होती. ‘‘तुमच्याशी बोललं की बरं वाटतं. तुम्ही माझी सुटका कराल या आशेवरच मी निमूटपणे सहन करतेय,’’असं म्हणायची. मी नवऱ्याशी बोलू का, असं विचारल्यावर तिनं नकार दिला. ‘‘आईचा फोन आला होता म्हटलं तरी मला मारतो,’’ मीनाचं उत्तर.

एके दिवशी तब्येत थोडी बिघडली म्हणून शंकर तिला दवाखान्यात घेऊन गेला. करोनाला घाबरलेल्या डॉक्टरांनी दारातूनच, काय झालंय ते विचारलं. तपासायचं तर दूरच, पण औषध लिहून द्यायची जोखीमही घेतली नाही. पाचवा महिना सुरू झालेल्या मीनाला त्यामुळे तब्येतीची काळजी आणि सुटकेचा तणाव यानं घेरलं. एके दिवशी ‘‘मीनानं बाबूला घेऊन घर सोडलंय आणि ती माझं अजिबात ऐकत नाहीये,’’असा लक्ष्मीचा फोन आला. ‘‘पोटातलं मूल पाड, म्हणून सासू भांडतेय. त्यामुळे मी चालतच मुंबई गाठणार आहे. रस्त्यात भीक मागीन. कुणीतरी आसरा देईलच. खायला देईलच,’’ मीना मला फोनवर सांगत होती. ‘‘करोनाच्या पाश्र्वभूमीवर तुला कुणी दारातही उभं करून घेणार नाही. तू घरी परत जा. मी लवकरात लवकर मार्ग काढते,’’ असं सांगत मी तिची समजूत काढत होते. ती नाही-नाही म्हणत होती. मी रागावत होते. ती रडत होती. मग तिनं फोनच बंद केला. पण त्याच दुपारी लक्ष्मीचा ती घरी परतल्याचा फोन आला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मीनानं फोन केला. रेशन दुकानात सामान आणायला गेलेल्या सासूला मदत करावी म्हणून ती गेली आणि रस्ता चुकली, असं तिनं घरच्यांना सांगितलं. पण तरीही रात्रभर नवरा तिला मारतच होता. तिचा फोनही काढून घेतला होता. शेवटी मी आणि आमची दुसरी कार्यकर्ती, समुपदेशक रश्मी हिनं चर्चा करून मीना आणि बाबूला नवी मुंबईत परत आणायचं ठरवलं. रश्मीनं आमच्या संघटनेच्या ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वर मीनाला मदत हवीय, असं लिहिलं. तिनं ‘रत्नागिरी फॅमिली कौन्सिलिंग सेंटर’, स्पेशल सेलला फोन केला. पण टाळेबंदीमुळे सारंच बंद होतं. थोडे दिवस थांब, असाच संदेश रश्मीला येत होता. नुसती चर्चा चालली होती. पर्यायही काढत होतो. सुटकेसाठी मीनाची कशालाही तयारी होती. ‘चाइल्ड लाइन’शी पत्रव्यवहार केला. पण हे कौटुंबिक हिंसाचाराचं प्रकरण असल्यानं ते काही करू शकत नव्हते. बाबूसाठी प्रयत्न करता येतील, असं त्यांचं म्हणणं पडलं.  पण त्या दोघांना वेगळं करण्याची आमची तयारी नव्हती.

एकानं  रश्मीला ग्रुपवर चिपळूणच्या संरक्षण अधिकाऱ्यांचा, माधवी जाधव यांचा नंबर पाठवला आणि त्या मदत करतील, असं सांगितलं. पोलीस ठाण्यातून सकाळी फोन आल्याचं मीनानं मला सांगितलं. टाळेबंदीमुळे आम्ही तुम्हाला सोडवू शकत नाही. पण घरी येऊन नवऱ्याला धमकावू शकतो, असं ते म्हणाले. पण ‘‘तुम्ही गेल्यानंतर तो माझा जीवच घेईल,’’ असं सांगून मीनानं त्यांना न येण्याची विनंती केली.  पण अखेर माधवी जाधव यांनी मीना आणि बाबूला ताब्यात घेतलं आणि चिपळूणला आणलं तोपर्यंत संध्याकाळचे सात वाजले होते. रात्री या दोघांना कुठे ठेवायचं, हा प्रश्न होता. मी आणि रश्मी कोकणातल्या ओळखीच्यांना अथक संपर्क करत होतो. माधवी जाधव यांचा त्या दिवशी वाढदिवस होता. घरी सगळे वाट पहात होते, पण रात्रीचे साडेनऊ वाजले तरी मार्ग निघत नव्हता. शेवटी माधवी दोघांना घरी घेऊन गेल्या. आऊट हाऊसमध्ये त्यांची सोय केली. घरच्यांनी या दोघांना खाऊ घातलं. माधवींनी मीनाला नेसायला साडी दिली. माधवींसाठी ती रात्र झोपेची नव्हती, पण मीना प्रथमच गाढ झोपली.

सकाळी पोलिसांनी बोलावलं म्हणून मीना समोरच असलेल्या पोलीस ठाण्यात गेली. येताना शंकर रस्त्यातच तिला आडवा आला. घरी चल, म्हणू लागला. शंकर, त्याचे आई-वडील पोलीस ठाण्यात येऊन ‘‘मीनाला नेतो,’’ म्हणून विनवण्या करत होते. परत मारझोड करणार नाही, असं लिहून द्यायलाही तयार होते. दुसरीकडे फोनवर-फोन चालू होते.  वरिष्ठांनाही मीनानं परत सासरी जावं आणि तिचा संसार वाचावा, असं वाटणं स्वाभाविक होतं. पण मीना तिथे सुरक्षित नाही, हे फक्त गेले पंधरा दिवस तिच्याशी सतत बोलणाऱ्या मलाच कळत होतं.  मीनाला घरी नेऊन शंकरला त्याची प्रतिष्ठा जपायची होती. मीना परत गेली की परत मारझोड, आणखी जाचक बंधनं हेच होणार होतं.  इतक्या छोटय़ा गावात पोलीस संपर्कही मुश्कील होता. शेवटी मीनाला आधी सुरक्षित ठिकाणी हलवून वैद्यकीय सुविधा मिळवून देऊ आणि नंतर शंकर आणि इतरांशी बोलू, असं ठरलं. या साऱ्या तणावपूर्ण परिस्थितीत माधवी यांनी मला समजून घेऊन खूप पाठिंबा दिला. त्यांनी महिला पोलीस बरोबर देऊन मीना आणि बाबूची रत्नागिरीच्या ‘प्रतिभा महिला आश्रमा’त रवानगी केली. इकडे रश्मी ‘ई पास’ मिळवण्याच्या तयारीला लागली. लक्ष्मीकडे स्मार्टफोन नव्हता. तिनं आमची दुसरी कार्यकर्ती रुक्मिणीचा फोन घेतला. डॉ. लोखंडे यांनी लक्ष्मीला वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं. लक्ष्मीसाठी गाडी ठरवणं आणि त्याच्या खर्चासाठी कुणी दाता शोधणं, हे एकाच वेळी चालू होतं. गाडी मिळणं महामुश्कील होतं. ‘ई पास’मध्येही अडचणी येत होत्या. रुक्मिणीनं बचत गटातल्या स्त्रियांशी बोलून तिथून दहा हजार रुपये काढून लक्ष्मीला दिले. ई पासचा संदेश आला. गाडी मिळाली. तपासणी होत होत लक्ष्मी रत्नागिरीला पोहोचली.  ‘प्रतिभा महिला आश्रमा’नं मीना आणि बाबूचे वैद्यकीय तपासणी अहवाल आणि सर्व कागदपत्रं दिली. लक्ष्मी, मीना आणि बाबू सुखरूप घरी पोहोचले.

माधवी जाधव यांनी मीनाच्या सुटकेसाठी सामाजिक आणि मानवतावादी परिप्रेक्ष्यातून प्रयत्न केले. आम्ही तिघी सतत संपर्कात होतो. रश्मी, लक्ष्मी, मीना, रुक्मिणी, माधवी आणि मी या ‘टीमवर्क’मधला एकही दुवा कच्चा राहिला नाही. या काळात विविध ठिकाणी अडकलेल्यांच्या, हतबल झालेल्यांच्या कहाण्या रोज ऐकत असताना, पाहात असताना मीना आणि बाबूच्या सुटकेची ही कहाणी दिलासा देणारी होती..

(अधिकारी माधवी जाधव आणि  रश्मी तसेच रुक्मिणी या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त इतरांची नावे बदललेली आहेत.)

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus pandemic lockdown story of a village pregnant lady maharashtra dd70
First published on: 23-05-2020 at 01:07 IST