‘क्रशेस, करिअर्स अ‍ॅण्ड सेलफोन्स’ हे इंग्रजी पुस्तक ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’कडून माझ्याकडे अनुवादासाठी आलं.  उमलत्या वयातल्या मुलांसाठी आईनं लिहिलेल्या ‘ए टू झेड नोट्स’ असं या पुस्तकाचं स्वरूप होतं. त्याचबरोबर या वयाच्या मुलांची अनेक विषयांवर काय मतं आहेत, तेही प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्याच शब्दांत वाचायला मिळालं. पुस्तक सलग वाचताना लक्षात आलं की, आपण हा संवाद आई व मुलगी या दोन्ही भूमिकांतून अनुभवला आहे आणि असाच अनुभव सगळ्यांनाच आला असेल, येत असेल असं वाटतं.
एका पिसासारख्या, इवलुशा मुटकुळ्याला पहिल्यांदा कुशीत घेतलं तेव्हापासूनचा एकेक क्षण मनात जागा झाला. तेव्हापासून आयुष्याला कलाटणीच मिळाली. एका क्षणात प्राधान्याचे विषय बदलून गेले. आपल्यावर निर्धास्तपणे विसंबणाऱ्या एका अस्तित्वाचा विचार प्रत्येक श्वासात मिसळून गेला.. अगदी नकळत आणि आपोआप.
तेव्हापासून ते आत्ता ‘टीन’चा टप्पा पार करणाऱ्या लाघवी व उत्साही तरुणीची आई म्हणून हे पुस्तक मला अधिक आपलंसं वाटत गेलं. या पुस्तकातल्या प्रत्येक ‘नोट’बरोबर माझ्या मनात आठवणीत जपलेले एकेक मोती पुन:प्रत्ययाचा आनंद देत गेले आणि अनुवाद सहज उतरत गेला.. आणि ‘एक सांगू – आई आणि मुलं यांच्यामधील मनमोकळा संवाद’ अशा मुखपृष्ठासह नुकताच प्रसिद्ध झाला.
‘आमच्या वेळी’नं सुरू होणारं वाक्य ऐकलं नसेल असा माणूस नसेल, असं विधान करायला हरकत नाही. आता या ‘आमच्या वेळी’चा काळ कमी कमी होत चाललाय इतकंच (म्हणजे आता मुलंसुद्धा ‘आमच्या वेळी’ म्हणू शकतात इतकं सगळं वेगानं बदलत आहे.) आपण अशा उमलत्या वयात होतो तेव्हा आणि आताच्या टप्प्यावर, यामध्ये फक्त भूमिकाच बदलल्या नाहीयेत तर काळानुसार अनेक संदर्भही बदलले आहेत, बदलत आहेत.
आजच्या मुलांची भाषा, त्यांचं विश्व, त्यांच्यासमोरचे प्रश्न, प्रलोभनं, मर्यादा, स्पर्धा, हे सगळं खूप वेगळं आहे, तीव्र आहे. जगभरात कुठंही असलात तरी आव्हानं तीच आहेत आणि ‘पालक’ म्हणून भावनाही त्याच आहेत. या साऱ्यांमध्ये ‘माणूस’ म्हणून मुलांची जडणघडण होताना, त्यांचा तोल राखला जाईल ना, या काळजीनं आईवडिलांचा जीव टांगणीला लागणं स्वाभाविक आहे आणि मुलांनी परीकथेतील विश्वातून बाहेर येऊन, वास्तव जगात पंख पसरून आभाळ कवेत घेताना, पाय जमिनीवर घट्ट रोवायला शिकणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रवाहात दोन्ही बाजूंनी नात्याची स्निग्धता टिकणं आणि हा काळ आनंददायी बनणं खूप महत्त्वाचं असतं.
एके काळी ‘छान छान फ्रॉक’चं आमिष दाखवून ज्या चिमणीचं ‘आवरून’ द्यावं लागत होतं, तीच आता (चेहऱ्यावर जगातली सगळ्यात तुच्छ, भिकार गोष्ट पाहिल्याच्या आविर्भावाला भयचकित आश्चर्याची झालर लावून) ‘‘तू ही अशी ररररर बाहेर जाणारेस’’ असं विचारू लागते.. आपण ज्याला पेन्सिल हातात धरायला (आणि शक्यतो तिनंच कागदावरच लिहावं असं) शिकवलं, तोच आता आपल्याला (अडाणी, मागास पामरांना) मोबाइलचे जादुई चमत्कार फटाफट दाखवू लागतो आणि ते आपल्याला डोक्यात शिरले नाहीत तरी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करतो!.. या दरम्यानचा काळ किती भुर्रकन उडून गेला आहे ना.. आता आपण त्यांच्या विश्वातून ‘आऊट’ (आणि आऊटडेटेडसुद्धा) होत असलो तरी ‘आम्ही सदैव तुम्हाला सावरायला, तुम्हाला आधार द्यायला, तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या एवढय़ाशा त्रासानंसुद्धा आमच्या डोळ्यांत पाणी येतं आणि तुमच्या चिमूटभर यशानंसुद्धा.. हेच सांगायचं आहे  ‘एक सांगू’मधून..
या सगळ्या संवादात आत्ताच्या पिढीची भाषा, त्यांच्या विश्वातल्या अनेक गोष्टी बोली भाषेत सहजपणे सहजपणे उलगडत जाणं अतिशय आवश्यक होतं. त्या त्या ठिकाणी नेमका भाव टिपला जाणं गरजेचं होतं. या पुस्तकाच्या अनुवादात मूळ पुस्तकातली खुसखुशीत शैली, मिस्कील भाष्य जपलं जाणंही आवश्यक होतं. पण या साऱ्यासाठी वेगळे प्रयास घ्यावे लागले नाहीत. आस्थेचा विषय असल्यामुळं असेल कदाचित, पण शब्द कागदावर आपसूक उतरत गेले.
हा संवाद आईवडील आणि मुलांनीच नव्हे, तर याचे साक्षीदार असणाऱ्यांनीही वाचावा असा आहे आणि दुरून पण कौतुकानं आणि रस घेऊन पाहाणाऱ्यांनीही.
supriyawakil@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सदरासाठी मजकूर पाठवताना –
लेखाची शब्दमर्यादा ५०० असून जानेवारी २०१२ ते सप्टेंबर २०१३ दरम्यान प्रसिद्ध झालेलीच पुस्तकेच पाठवायची आहेत. पुस्तक का लिहावेसे वाटले हे सांगण्याबरोबरच पुस्तकापलीकडचे मनोगत या मजकुरात अपेक्षित आहे. या विषयी कोणताही संवाद साधला जाणार नसून अंतिम निर्णय संपादकांचा असेल. मजकूर पाठवा. -चतुरंग, ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई- ४००७१०. वा  chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व असे शब्द... असे अर्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crushes careers and cellphones book translated by supriya wakil
First published on: 21-09-2013 at 01:03 IST