डॉ. वैशाली बिनीवाले
मासिक पाळी सुरू होणं हे जननसंस्थेच्या वाढीचं लक्षण. बालपणातून स्त्रीत्वाच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गातील पुढचं पाऊल. मात्र अकाली पौगंडावस्था सुरू झाल्यास, तसंच मासिक पाळी उशिरा सुरू झाल्यास मुलींवर अनेक शारीरिक व भावनिक परिणाम तर होतातच, परंतु पाळी अनियमित असेल तरीही मुलींच्या आजाराचे कारण बनते. काय आहेत, मासिक पाळी अनियमित, लवकर वा उशिरा सुरू होण्यामागची कारणे? काय करता येईल त्यासाठी?

‘२२ जून १८९७’ चापेकर बंधूंच्या स्वातंत्र्य लढ्याविषयीचा हा एक अतिशय सुंदर मराठी चित्रपट. या चित्रपटात एक गाणं आहे,

‘‘वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं? सीताबाईला चाफेकळीला न्हाणं आलं…। पहिल्यांदा न्हाणं आलं, सासू करते सोहळा।।’’

पडद्यावर आपल्याला जुना वाडा दिसतो. वाड्यात छोटासा समारंभ चालू आहे. नवीन लुगडं नेसलेल्या बायकांची लगबग सुरू आहे. मध्येच फुलांनी सजवलेला एक छानसा झोपाळा आहे आणि त्या झोपाळ्यावर नुकतेच ऋतुचक्र सुरू झालेली (बोली भाषेत, न्हाणं आलेली) सीताबाई आपल्याला दिसते. तिला नवीन लुगडं नेसवलंय, तिचं कोडकौतुक सुरू आहे. ‘ऋतुप्राप्ती’चा सोहळा इथं सुरू आहे.

‘ऋतुप्राप्ती’ म्हणजे मासिक पाळी सुरू होणं. बालपणातून स्त्रीत्वाच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गातील पुढचं पाऊल. देशोदेशींच्या संस्कृतीमध्ये या घटनेचा सोहळा साजरा केला जातो. दक्षिण भारतात ‘ऋतुशुद्धी’ किंवा ‘ऋतुकला’ संस्कार साजरा करतात. ‘ऋतुप्राप्ती’ झालेल्या मुलीला साडी, दागिने, भेटवस्तू, मिठाई दिली जाते. पूजा केली जाते. आसाममध्ये ‘तुलोनी बिया’, ओडिसामध्ये ‘रजा’ यासारखे समारंभ साजरे केले जातात. जपानमध्ये लाल तांदळापासून खास पदार्थ करून हा सोहळा साजरा करतात, तर उत्तर अमेरिकेतील ‘अपाची’ या जमातीत ‘सूर्यनृत्य’ केलं जातं. मासिक पाळी सुरू होणं हे जननसंस्थेच्या वाढीचं लक्षण. मुलीचं प्रजननक्षम होण्याकडे पडलेलं एक पाऊल. बहुतांश संस्कृतींमध्ये वंशवृद्धीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऋतुप्राप्ती किंवा मासिक पाळी सुरू होणं हा मातृत्वासाठी स्त्री सक्षम होत आहे हे दर्शवणारा एक टप्पा. आणि म्हणूनच अनेक ठिकाणी ‘ऋतुचक्र’ सुरू होण्याचा एक सोहळाच साजरा केला जातो. पौगंडावस्था हा मुलीच्या आयुष्यातील एक आनंदाचा, परिपक्वतेचा काळ असला, तरी कधी कधी तो चिंतेचाही विषय होऊ शकतो.

नववीमध्ये शिकणारी नेहा ही एक हुशार, चुणचुणीत मुलगी. अभ्यासात चांगले गुण मिळवणारी, खेळातही पारंगत असणारी. स्वभावाने मूलत: थोडीशी शांत आणि अबोल. आज-काल मात्र नेहाच्या स्वभावात खूप बदल जाणवत होता. स्वभाव चिडचिडा झाला होता. सतत रागवायची, आदळआपट करायची. या वर्षी परीक्षेतही कमी गुण पडले होते. त्यावेळी तिचे बाबा तिला खूप ओरडले होते. आता अभ्यासाविषयी काही बोलायला गेलं तर रडायची, दार बंद करून एकटीच खोलीत बसून राहायची. मैत्रिणींच्यात पण फारशी रमत नव्हती. आईला तिची काळजी वाटायला लागली होती.

पौगंडावस्थेच्या काळात नेहाप्रमाणेच काही मुलींना मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. नैराश्य येतं. चिडचिडेपणा वाढतो, मानसिक असंतुलन व वर्तणुकीच्या समस्या निर्माण होतात. मन एकाग्र होत नाही. संप्रेरकांमधलं असंतुलन, आनुवंशिकता याबरोबरच घरातले ताणतणाव, आई-वडिलांबरोबर संवाद नसणं या गोष्टीही मानसिक समस्यांसाठी जबाबदार असतात. अभ्यासात, खेळात उत्तम कामगिरी करण्याचा दबावही या मुला-मुलींवर असतो. पालक, मित्र-मैत्रिणींबरोबर भावनिक जवळीक नसल्यास या मुलींना कुठे व्यक्तच होता येत नाही. यामुळे त्यांचा एकाकीपणा वाढतो. अशा वेळेस व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढू शकतं. मुली लैंगिक प्रलोभनांना बळी पडू शकतात. नैराश्यामुळे आत्महत्येचे विचारही त्यांच्या मनात डोकावू शकतात.

मानसिक समस्या टाळण्यासाठी या वयातील मुला-मुलींना समजून घ्यायला हवं. त्यांच्यावर दबाव न टाकता, सक्ती न करता त्यांच्याशी संवाद साधायला हवा. अशा वेळी पाल्य व पालक दोघांचंही समुपदेशन महत्त्वाचं आहे. मानसिक समस्यांसाठी व्यायाम, ध्यानधारणेचाही चांगला फायदा होतो. मुलींनी त्यांच्या भावना व्यक्त होण्यासाठी लिखाण करणं, छंद जोपासणं उपयोगी पडतं. आपल्या मुलीला मानसिक त्रास होत असल्याचे लक्षात आल्यास पालकांनी मानसोपचारतज्ज्ञांचा त्वरित सल्ला घ्यायला हवा.

वयात येणाऱ्या मुलींमध्ये हल्ली लठ्ठपणाचं प्रमाण वाढू लागलं आहे. १५ वर्षांच्या मीताचं वजन ८० किलो आहे. गेल्या २ वर्षांत २०-२५ किलो वजन वाढलंय. दहावीत असल्यामुळे तिला व्यायामाला वेळच मिळत नाही. शाळा आणि क्लास यातच सगळा दिवस संपून जातो. चांगला अभ्यास करावा म्हणून आई छान-छान पदार्थ करून खायला घालते. आणि आता वाढलेल्या वजनामुळे मासिक पाळी मात्र खूप अनियमित झाली आहे. व्यायामाचा अभाव व चुकीचा आहार हे लठ्ठपणाचं प्रमुख कारण असलं, तरी कधी कधी आनुवंशिकता आणि संप्रेरकांमधलं असंतुलनसुद्धा वजन वाढण्यासाठी कारणीभूत असतं. अति उष्मांकाचा आहार, बाहेरील खाद्यापदार्थ, जंक फूड यामुळे वजन वाढतं. या वयातील लठ्ठपणा पुढील आयुष्यातील अनेक आजारांसाठी कारणीभूत असतो. म्हणूनच नियमित व्यायाम व योग्य आहार घेऊन वजनवाढीवर नियंत्रण ठेवावं. शरीरयष्टी खूप बारीक राहावी यासाठी कधी कधी चुकीचा आहार घेतला जातो. तर काही वेळा जेवणच टाळलं जातं त्याला ‘अग्निमांद्या’ (अॅनोरेक्सीया) म्हटलं जातं. हा एक गंभीर मानसिक आजार असून यात कुपोषण व अनेक आरोग्य समस्यांची शक्यता असल्याने वैद्याकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

सात वर्षांच्या सनाला घेऊन तिची आई आणि आजी दवाखान्यात आल्या. सनाला अचानक मासिक पाळी सुरू झाल्याने त्या बिचाऱ्या गांगरल्या होत्या. सना लहानपणापासूनच गुटगुटीत असल्यामुळे तिच्या स्तनांची होणारी वाढ, शरीरात होणारे बदल त्यांच्या लक्षातच आले नव्हते. इयत्ता दुसरीत शिकणारी सना मासिक पाळी, पौगंडावस्था याविषयीची माहिती समजण्याइतकी काही मोठी झाली नव्हती. अकाली येणारी पौगंडावस्था म्हणजे नक्की काय? पौगंडावस्थेचं सर्वसाधारण वय आहे आठ ते १६ वर्षं, तर मासिक पाळी सुरू होण्याचं वय आहे १० ते १६ वर्षं. पौगंडावस्थेची चिन्हे वयाच्या सातव्या वर्षांआधीच दिसू लागल्यास किंवा मासिक पाळी दहा वर्षांच्या आत आल्यास त्याला ‘अकाली पौगंडावस्था’ म्हटलं जातं. खूप लहान वयात पौगंडावस्था सुरू होण्याचे अनेक तोटे आहेत. यातील सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे उंची न वाढणं. मुलींमध्ये हाडांची वाढ कमी होते व उंची वाढण्यावर बंधन येतं. मुली बुटक्या राहतात.

लहान वयातील या मुली बौद्धिकदृष्ट्याही अपरिपक्व असतात. पौगंडावस्थेत घडणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांविषयी त्यांना फारशी माहिती नसते. स्वत:च्या शरीरात घडणाऱ्या बदलांची त्यांना अनेकदा लाज वाटते. मित्र-मैत्रिणींबरोबर जायला त्या घाबरतात. मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता ठेवणं, काळजी घेणं त्यांना जमत नाही. त्यासाठी त्यांना मदत घ्यावी लागते. या लहान मुली लैंगिक शोषणालाही बळी पडू शकतात. पौगंडावस्था लवकर सुरू होण्याची अनेक कारणं आहेत. बदलती जीवनशैली, स्थूलपणा ही त्याची सर्वसाधारण कारणं. मेंदूचे विकार, अपघातात मेंदूला झालेली इजा, ट्युमर यासारख्या गंभीर कारणांमुळेही अकाली पौगंडावस्था येऊ शकते.

अकाली पौगंडावस्था टाळण्यासाठी रोजच्या आयुष्यात आपल्याला काही उपाययोजना करता येऊ शकतात. अन्नपदार्थांच्या भेसळीमुळे शरीरात जाणारी रसायनं, अतिमांसाहार व दुग्धजन्य पदार्थांतून मिळणारी संप्रेरकं यावर नीट लक्ष द्यायला हवं. असे पदार्थ खाणं टाळायला हवेत. संतुलित आहार व नियमित व्यायाम करून लठ्ठपणा कमी करावा. अकाली पौगंडावस्था आल्याची लक्षणं दिसल्यास मुलींच्या रक्तातील संप्रेरकांची पातळी तपासली जाते. हाडांची क्ष-किरण तपासणी करून हाडांचं वय बघितलं जातं. यासाठी उपलब्ध असलेले उपचार, त्यांचे फायदे व तोटे याविषयी मार्गदर्शन करून अकाली सुरू झालेली पौगंडावस्था पुढे ढकलता येते.

आता सनाच्या बरोबर विरुद्ध असं सुमनचं उदाहरण बघूया. पुण्याजवळील एका खेड्यातून २१ वर्षांच्या सुमनला तिचे आई-वडील घेऊन आले. सुमनचं ते लग्न ठरवत होते. काय कारणाने आला आहात, असं विचारल्यावर तिची आई दबक्या आवाजात बोलू लागली. सुमनचं लग्न ठरत होतं, पण तिची मासिक पाळी अजूनपर्यंत आलेलीच नाही. समाजाच्या भीतीने त्यांनी आजपर्यंत हे कुणाला सांगितलं नव्हतं किंवा वैद्याकीय तज्ज्ञांकडे ते तिला घेऊन गेले नव्हते. पौगंडावस्थेची लक्षणे १३व्या वर्षापर्यंत न दिसल्यास आणि मासिक पाळी वयाच्या १६व्या वर्षापर्यंत सुरू न झाल्यास किंवा स्तनांची वाढ झाल्यानंतर चार वर्षांत मासिक पाळी न आल्यास वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा.

पौगंडावस्था उशिरा का येते? किंवा ही लक्षणे का दिसत नाहीत याला अनेक कारणे आहेत. कुपोषण, आनुवंशिकता, गुणसूत्र दोष, जननसंस्थेचे आजार, रेडिएशन ही त्याची काही कारणे आहेत. पौगंडावस्थेची लक्षणं वेळेवर न दिसल्यास वैद्याकीय सल्ला घेणं का महत्त्वाचं आहे हे आपण मीराच्या उदाहरणावरून बघू या. १३ वर्षांच्या मीराला तिची आई दवाखान्यात घेऊन आली. मीरा छान उंच होती. वयानुरूप शारीरिक बदलही तिच्यात दिसत होते. मासिक पाळी मात्र अजून सुरू झाली नव्हती. गेले सहा महिने मीरा महिन्यातील पाच-सहा दिवस पोटात दुखण्याची तक्रार करत होती. पोटदुखीची तीव्रता हळूहळू वाढत होती. कालच तिला पोटात गाठ जाणवली. तपासणीदरम्यान व सोनोग्राफी करताना असं लक्षात आलं की, योनीमार्गावर असलेल्या पडद्याला (हायमेन) नेहमी असते तसे छिद्र नव्हते. यामुळे मासिक पाळीचा रक्तस्राव योनीमार्गात साठून गाठ निर्माण झाली होती. एका छोट्याशा शस्त्रक्रियेने हायमेनला छेद देऊन अडथळा दूर करण्यात आला व मीराची मासिक पाळी नियमित झाली.

पौगंडावस्था वेळेत सुरू न झाल्याने त्याचे अनेक शारीरिक व भावनिक परिणाम होतात. मुलींच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते. समाजात हिणवले जाण्याची भीती वाटते. एकाकीपणा व नैराश्य येऊ शक तं. पौगंडावस्थेची लक्षणं वेळेत सुरू न झाल्यास कारण शोधणं महत्त्वाचं आहे. यासाठी गुणसूत्र तपासणी, रक्तातील संप्रेरकांची पातळी, सोनोग्राफी, स्कॅन केले जातात व कारण शोधून उपाययोजना करण्यात येते. वयात येतानाचा हा काळ म्हणजे मुलीच्या आयुष्यातील एक अतिशय नाजूक काळ. या नाजूक काळातल्या शारीरिक व मानसिक बदलांना तिनं सहजपणे, विनासायास स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी तिला मदत करूया. एका अवखळ, अल्लड बालिकेचं एका निरोगी, प्रसन्न तरुणीत होणाऱ्या रूपांतराचे साक्षीदार होऊ या.