डॉ भूषण शुक्ल
शाळेतल्या मुलांनी अभ्यास करावा ही जबाबदारी घरातल्या कुणी घ्यावी? कुणी त्यांना सारखं दामटून, सुट्टीच्या, सणाच्याही दिवशी अभ्यासाला बसवावं?… अनेक घरांत आईबाबांपैकी कुणी तरी हा वाईटपणा घेत असतं. पण समजा त्यांनी तो नाहीच घेतला तर? मुलांना सक्तीनं अभ्यासाला ‘बसवण्यापेक्षा’ आईबाबा त्यांच्या नुसते आजूबाजूला राहिले तर?… याचा उपयोग होईल?…

धुळवडीच्या दिवशी सकाळी ११ वाजता सुमेधाच्या घरात शांतता होती. बाहेरून मुलांचा भरपूर आवाज येत होता. संगीताचा आवाज, मुलांचा आरडाओरडा, आनंदाच्या किंचाळ्या व्यवस्थित ऐकू येत होत्या. सुमेधा मात्र तिच्या खोलीत अभ्यास करत होती. तिच्या शेजारी तिचा बाबा, सुधीर बसला होता. सुमेधाच्या हातात बाबानं दिलेला पांढरा स्वच्छ रुमाल होता. ती त्याला नाक आणि डोळे आळीपाळीनं पुसत होती. नजर मात्र समोरच्या पुस्तकावर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. दुसऱ्या खोलीत तिची आई स्वत:चं काम करत होती आणि बैठकीच्या खोलीत आजी-आजोबा एकमेकांशी न बोलता बंद टीव्हीकडे बघत बसले होते.

a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
decision to create an independent family is right or wrong
स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
summer
सुसह्य उन्हाळा!

शेवटी आजोबा उठून उभे राहिले. आजीनं क्षीण आवाजात ‘‘अहो, राहू द्या ना…’’ असे म्हणायला तोंड उघडलं, पण काहीच बाहेर आलं नाही. आजोबांनी घसा खाकरला. सुमेधाच्या खोलीच्या दारात येऊन त्यांनी दोघांकडे बघितलं. सुमेधाचं नाक, गाल, डोळे लालीलाल झाले होते. आजोबांना बघताच तिला परत हुंदका फुटला, पण बाबानं तिच्याकडे बघताच तिनं तो दाबला आणि परत नजर पुस्तकात घातली. ‘‘सुधीर, चहा घेणार का? मी करतोय माझ्यासाठी.’’ आजोबांच्या प्रश्नाला बाबानं फक्त ‘हो’ म्हणून मान डोलावली. ‘‘चल जरा मग तिकडे,’’ असं म्हणून आजोबा स्वयंपाकघराकडे रवाना झाले. पाठोपाठ बाबासुद्धा गेला.

‘‘आप्पा, तुम्ही तिला नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पाठीशी घालताय.’’ असं म्हणत बाबानं डायनिंग टेबलजवळची खुर्ची ओढली. इकडे गॅसवर आधण ठेवत आजोबा बोलते झाले, ‘‘होय, मी तिला पाठीशी घालतोय. तिचा आजोबा आहे मी. हेच माझं काम आहे! तुझ्या रागाची काही सीमा राहिली नाहीये. हे काही ठीक नाही चाललेलं.’’ सुधीरनं रागानं बोलायला तोंड उघडलं, पण फक्त मोठा सुस्कारा टाकला आणि हळू आवाजात म्हणाला, ‘‘माझा आवाज जरा मोठा आहेच. पण मी तिच्या अंगाला कधी बोटसुद्धा लावलेलं नाही. या घरात माझ्याशिवाय कोणाला तिच्या भवितव्याची काळजी आहे का? तिची वार्षिक परीक्षा आठवड्याभरात सुरू होतेय. नववीची परीक्षा आहे. दहावीपेक्षा जास्त अवघड असते. तुम्हाला हे माहीत नाहीये का?’’

हेही वाचा : स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?

‘‘माहिती आहे ना. मीसुद्धा दिली होती. माझ्या दोन्ही मुलांनी सुद्धा दिली होती. तुला आठवताहेत का किती मार्क मिळाले होते तुला ते?…’’ आता मात्र सुधीरच्या आवाजाला धार आली. ‘‘आठवतायत की! मी पहिल्या दहामध्ये नव्हतो. दहावीलाही तेच झालं आणि पुन्हा बारावीलासुद्धा.’’

आजोबांना त्याचं हे दु:ख माहीत होतं. ‘‘हो ना. आम्ही दोघं कधी तुझ्या मागे लागलो नाही. तुझे मार्क चांगले असायचे, पण मेरिटमध्ये आला नाहीस. तुझ्याकडून अभ्यास करून घेतला तर तू पहिलासुद्धा येऊ शकतोस, असं सगळे म्हणायचे. पण मी तुझ्याकडून अभ्यास करून घेतला नाही. आणि तू कधी पहिला आला नाहीस! हे तू अनेकदा बोलला आहेस. अगदी चारचौघांतसुद्धा बोलला आहेस.’’

पण आजोबांच्या आवाजातली शांत स्थिरता सुधीरपर्यंत पोहोचली नाही. ‘‘हो, सांगणारच ना… चांगलं कॉलेज मिळालं नाही. चांगल्या कंपन्या आमच्या दळभद्री कॉलेजकडे यायच्यासुद्धा नाहीत. चार फालतू जॉब केले तेव्हा कुठे जरा बरा ब्रेक मिळाला. तोसुद्धा मित्रानं शब्द टाकला म्हणून. पण तोवर सात-आठ वर्षं वाया गेली ना माझी… त्याचं काय?’’

आता सुधीरचा आवाज चढला होता. ‘‘मी हे सुमेधाच्या वाट्याला मुळीच येऊ देणार नाही. तिला सुरुवातीपासून यशाची चव मिळाली पाहिजे. चॉइस मिळाला पाहिजे. मी कुठच्या कुठे पोहोचलो असतो इतकी वर्षं वाया गेली नसती तर…’’

हेही वाचा : ‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

आता सुधीरचा आवाज इतका वाढला की त्याची आई, सुमेधा, सुमेधाची आई, असे सगळेच जण येऊन काय झालंय बघायला लागले. ‘‘अरे सुधीर, काय हे सणासुदीचं भांडण…’’ आई जरा त्याला शांत करायला गेली, तर तो अधिकच उसळला. ‘‘आई, तू तर बोलूच नको. तुम्ही दोघं अगदी सारखे आहात. अल्पसंतुष्ट! मला हे सहन होत नाही. नशिबानं मिळेल ते घ्यायचं. शी! माझी सुमेधा अशी नशिबानं फेकलेल्या तुकड्यांवर जगणार नाही. मी आहे तिला योग्य दिशा द्यायला. ती विजेती होणारच. अशी मिळमिळीत आयुष्य नाही जगणार ती.’’
पुढचे काही क्षण अशाच अवघड शांततेत गेले. आजोबांनी सगळ्यांपुढे चहाचे कप ठेवले. स्वत:सुद्धा बसले. तेवढ्यात सुमेधा पुढे येऊन आपल्या भावनिक बुद्धिमत्तेची चमक दाखवत बाबाच्या शेजारी जाऊन बसली. अगदी खुर्ची त्याच्या जवळ घेऊन. सुमेधाला अशी जवळ शेजारी बघून बाबा जरा शांत झाला. ‘‘ही हुशार आहे, पण निश्चयी नाही. तिला नियम नाही लावले तर वाया जाईल.’’

आजोबांनी डोळ्याला डोळा भिडवत विचारलं, ‘‘वाया जाईल? तुझ्यासारखी?’’ आता घाबरण्याची पाळी आजीची होती. पण ती काही म्हणणार तेवढ्यात आजोबा तिला म्हणाले, ‘‘प्लीज थांब जरा. त्याची अनेक वर्षांची मळमळ आहे. आज धुळवडीचा मुहूर्त चांगला आहे सगळं बाहेर काढायला.’’

‘‘आपण दोघांनी दुर्लक्ष केलं म्हणून हा आयुष्यात पुढे गेला नाही. हा स्वत:ला अपयशी समजतो आणि आपल्याला अल्पसंतुष्ट! आपण याला धक्के मारत राहिलो असतो, तर हा खूप पुढे गेला असता असं याला वाटतं. नव्हे सुधीरला याची खात्रीच आहे!’’

एक खोल श्वास घेऊन आजोबा पुन्हा बोलते झाले, ‘‘तुझं आजचं जे काही आहे, ते सर्व तुझ्या स्वकर्तृत्वाचं आहे. तुम्ही दोघं इतका चांगला संसार करता आहात, हे सगळं शंभर टक्के तुमचंच यश आहे. मात्र तुझा संसार, तुझी मुलगी, तुझी व्यावसायिक कमाई, हे सगळं अपयश आहे आणि फक्त एका व्यक्तीचं आहे, असं तुला वाटत असेल, तर तो आई-बाप म्हणून आमचा दोष आहे. आनंद, सुख काय असतं हे आम्ही तुला नाही शिकवलं! असं कोणाला शिकवता येतं का?… मला नाही वाटत की शिकवता येत. याउपर तुझी मर्जी!’’
आतापर्यंत त्याची धरून ठेवलेली नजर आजोबांनी मोकळी केली आणि चहाचा घोट घेतला. आता सगळे बाबाकडे बघत होते. तो कितीही भडकला तरी आजोबा सांभाळून घेतील याची सुमेधालाही खात्री वाटत होती.

‘‘आप्पा, हे नेहमीचं आहे तुमचं. कोणतीही चर्चा कुठेही नेऊन ठेवता तुम्ही. सुख, समाधान वगैरे गोष्टींचा हिच्या उडाणटप्पूपणाशी काय संबंध? अशीच उंडारत राहिली ही, तर तसेच वायफळ मित्र मिळतील. त्याच रस्त्यावर आयुष्य चालू राहील. मग पुढे काय?… चांगला अभ्यास, चांगलं कॉलेज, चांगली संगत आणि सवयी, यात न पटण्यासारखं काय आहे?… ही काय अवास्तव अपेक्षा आहे का? बाप म्हणून माझी काळजी चूक आहे का? फक्त तिच्या ‘हो’ला हो म्हणून काय सत्यानाश करू द्यायचा तिला? चौदाव्या वर्षी तिला इतकी समज तरी आहे का? भवितव्य काय आहे हे तिला समजतं का? तुम्ही मला मोकाट सोडून दिलं माझ्या नशिबावर! माझं सुदैव, की मी वाया गेलो नाही. मला खात्री देता का, की हिचंपण चांगलंच होईल?… मी नाही अशी लॉटरी खेळणार. तिला आता राग आला तरी चालेल पण मी असला स्वच्छंदीपणा चालू देणार नाही. पुढच्या वर्षी दहावी आहे. आता पुढची तीन वर्षं मी सांगेन ते ऐकायचं. धुळवडी आणि शिमगे आहेतच पुढे आयुष्यभर! ते काही पळून जात नाहीयेत.’’

हेही वाचा : माझी मैत्रीण : समंजस मैत्री

अनेक वर्षं खदखदत असलेली जखम सुधीरनं सगळ्यांसमोर उघडली. एकदाचं मन मोकळं झाल्याचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. सुमेधाची नजर खाली झाली. आजीसुद्धा खिन्न दिसत होती. सुमेधाची आईही बावरली. सुधीरकडून हा कडवटपणा तिनं अनेकदा ऐकला होता, पण तो एकांतात. त्याच्या मनात रुतून बसलेला हा काटा असा उघडपणे समोर येईल असं तिला अपेक्षित नव्हतं. पण आता बाण सोडला होता… पुढे काय?

आजोबांनी शांतपणे चहा संपवून कप खाली ठेवला. ‘‘बरं झालं एकदाचा उघड बोललास. तुझं मन मोकळं होणं गरजेचं होतं. निदान आता तरी माझ्यावरचा राग इतरांवर काढणं थांबवशील अशी आशा आहे!’’ आजोबा अजूनही शांतपणे बोलत होते. ‘‘मी तुला कान पकडून अभ्यासाला नाही बसवला. कोणतेही अपशब्द वापरून तुझा स्वाभिमान मोडला नाही. तू खूप अभ्यास करून स्पर्धा आणि परीक्षा जिंकाव्यात असं मनापासून वाटूनसुद्धा ते कधी तुझ्यावर लादलं नाही. तू हुशार आहेस. चारचौघांत व्यवस्थित वागतोस. शिक्षक, मित्रमंडळी, सगळेजण तुला जीव लावतात, हे मला दिसत होतं. तू आनंदी आणि उत्साही होता. कोणतेही वायफळ उद्याोग तू कधी केले नाहीस. पूर्ण स्वातंत्र्य असूनसुद्धा! इतके सगळे चांगले गुण असलेली व्यक्ती चांगलं आयुष्य घडवतेच. ते आयुष्य काही पहिल्या नंबरानंच येतं असं नाही. कदाचित थोडं उशिरा मिळेल, पण निश्चित मिळेल, हा आईबाप म्हणून आमचा दोघांचाही विश्वास होता आणि तो तू सार्थ केलास. याबद्दल मला तुझा खूप अभिमान वाटतो.’’

हेही वाचा : माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

आजोबा क्षणभर थांबून बोलत राहिले. ‘‘मी जर सतत छडी घेऊन मागे लागलो असतो, प्रत्येक मार्काचा हिशेब ठेवला असता, तुला भविष्याची भीती दाखवत बळजबरी केली असती, तर तुला दोन मार्क जास्त पडले असते का?… मला माहीत नाही! पण तू स्वत:चं आयुष्य ‘स्वत:चं’ म्हणून जगला असता का? माझ्या जाचातून सुटण्यासाठी उद्याोग केले असतेस! कदाचित स्वत:चं नुकसान होईल असं वागून आम्हाला शिक्षा केली असतीस… तुला पहाटे अभ्यास करायचा होता तेव्हा मी तुला गजराचं घड्याळ दिलं. तुझ्याबरोबर उठलो, चहा करून दिला. तुझा उत्साह मावळू नये म्हणून काहीतरी वाचत तुझ्याबरोबर बसूनही राहिलो. पण गजराची वेळ तू ठरवलीस आणि गजर बंद करून उठायचं की परत झोपायचं हे तू ठरवलंस. मी फक्त बाजूला उभा होतो. तुझं यश पूर्णपणे तुझं आहे, हेच मी माझं यश मानतो! मला तेवढं पुरेसं आहे. तुझं आयुष्य हे तुझं स्वत:चं आहे. माझ्या जबरदस्तीनं बनलेलं काहीतरी टरफल नाही, हे महत्त्वाचं आहे!’’

आता मात्र खरी अंतर्मुख शांतता पसरली! सुमेधाची कळी खुलली. ‘‘बाबा, आई, मी जरा वेळ रंग खेळायला जाते ना! मला एक वाजता बोलवायला याल का? मी लगेच एका हाकेनं येईन. प्रॉमिस!’’

आता खरी परीक्षा सुरू झाली होती… सगळ्यांचीच!
chaturang@expressindia.com