आठवणींचा शेवट जर ‘अहाहा’ या भावनेनं होत असेल तर त्याला म्हणायचं ‘स्मरणरंजन’ (नॉस्टॅलजिया) अर्थात भूतकाळातील अनुभवांबद्दलची भावनिक ओढ. आठवणी कडू-गोड दोन्ही असतात, पण काय विसरायचं आणि कशाची उजळणी करायची हे त्या त्या माणसाच्या हातात असतं. मात्र त्यासाठी निरोगी, आनंददायी अनुभवांची प्रत्यक्ष निर्मिती करायला हवी, सतत!
माझ्या लहानपणी येणारे सण आणि बदलतं ऋतुमान यांचं नातं आजच्याइतकं विजोड झालं नव्हतं. कोजागिरीच्या रात्री निरभ्र आकाशात चांदवा खुलायचा. होळीच्या सुमारास वसंताची चाहूलच नाही, तर स्वाक्षरी दिसू लागायची. दिवाळीच्या वेळी प्रसन्न गारवा असायचा. धुकं असायचं, दव पडायचं. एखाद्या सकाळी गोठलेल्या दवांचे थेंब पानांना चिटकून असायचे… त्यांना म्हणायचं ‘दहीवर.’ आज हा शब्द लिहितानाच गहिवरून आलं.
दिवाळीच्या उत्सवात बाजार-संस्कृती घुसलेली नव्हती. तोरणं घरीच बनायची. झेंडू अंगणात फुलायचे, आंब्याच्या डहाळ्या डोलत असायच्या. आमच्या घरापाठच्या छोट्या ओहोळाच्या उगमाच्या दिशेनं गेलं की, झाडाझुडपांमध्ये नरकासुर अर्थात कारिटे पोत्याने असायची. कंदिलाचा सांगाडा घरी बनायचा. फक्त रंगीत कागद विकत आणायचे. खळ करायची तांदळाची. त्याने कंदील चिकटवायचा. फराळ घरीच बनायचा, आणि रांगोळी काढायचा ३६ किंवा ७२ ठिपक्यांचा कागदही घरीच तयार व्हायचा. गेरुचं सारवण आणि रांगोळीचं रेखाटन. त्याला सोबत देणाऱ्या पणत्या. आणि रात्री कंदिलाच्या आत लावलेल्या विजेच्या दिव्याचा प्रकाश नैसर्गिक प्रकाशात मिसळून गेलेला…अहाहा!
तुमच्यापैकी काही जण या सुरुवातीनंतर स्वत:चे निबंध लिहितील. काही जण यापेक्षा वेगळ्या, पण आपापल्या दिवाळी अनुभवाच्या प्रतिमा मनाच्या नेत्रांसमोर रेखायला लागतील. त्या आठवणींचा शेवट जर ‘अहाहा’ या भावनेनं होत असेल तर त्याला म्हणायचं ‘स्मरणरंजन’ अर्थात् ‘नॉस्टॅलजिया’. भूतकाळातील अनुभवांबद्दलची भावनिक ओढ अशी याची शास्त्रीय व्याख्या आहे. आपापल्या काळातल्या आठवणींची भलावण करणाऱ्या या प्रक्रियेला मनोव्यापारांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे.
भावनिक दृष्टीने भेडसावणाऱ्या अनुभवांचा आणि आठवणींचा मानसिक आरोग्यावर दूरगामी दुष्परिणाम होतो, हे आता सिद्ध झालं आहे. ‘स्मरणरंजन’ या सुखद विषयावरची वैज्ञानिक माहिती तुलनेने कमी पण जी आहे ती महत्त्वाची आहे. ‘स्मरणरंजना’चा आस्वाद आपण दोन पद्धतीने घेतो. एकटे असताना आणि इतर इष्टमित्रांसोबत. दोन्ही ठिकाणी महत्त्वाचे असते, ‘अहाहा’ या स्थितीला थांबणं. आणि नवी आठवण आळवणं. तसं झालं, तर चित्तवृत्ती उल्हसित होतातच पण स्वयंचलित (Autonomous) मज्जासंस्थासुद्धा मस्त आरामात सुखावते. पण मनाने ‘तेव्हा’ आणि ‘आत्ता’ अशी तुलना केली आणि दोन्ही किंवा एका अवस्थेसाठी तीव्र तक्रार आणि नाराजी असेल तर स्मरणरंजनाची भट्टी बिघडते. भूतकाळाला ‘आदर्श’असं बिरुद बहाल केलं की वर्तमानाचा स्वीकार कमी प्रतीचा होतो. पुन्हा आठवणी कडू-गोड दोन्ही असतात. काय गिरवायचं, कशाची उजळणी करायची हे त्या त्या माणसाच्या हातात. ‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ असं म्हणत हळहळत राहायचं की आजही कृष्णाकाठची भरली वांगी मस्त खायची? वास्तवाचा स्वीकार करण्यासाठी बळ देते ते निरोगी स्मरणरंजन. ‘‘बदल तर होतच राहणार. या आठवणी मला सांगतात की, मी बदलांना सामोरा जाऊ शकतो. चांगला किंवा वाईट असे शिक्के न मारता वर्तमानाला स्वीकारू शकतो,’’ असं भूतकाळाचं मूल्यमापन असेल तर ‘डोपामाइन’ आणि ‘ऑक्सिटोसीन’सारख्या मेंदूरसायनांवरही सुपरिणाम होतो. मात्र भूतकाळात अतिप्रमाणात रमण्याची प्रवृत्ती वास्तवापासून पलायन करायला मदत करते. हा झाला ‘टॉक्सिक नॉस्टॅलजिया.’
आमचा काळ ‘ग्रेट’ आणि आज कशी सगळीकडे वाट लागली आहे असं आख्यान लावणारे, सांप्रत काळातील सर्व सोयी उत्तम पद्धतीनं वापरत असतात. पण स्मृती कधीच कायम निष्ठावान नसते. माणसाचे विचार या स्मृतींमधले काही भाग अधोरेखित करतात, तर काहींना धूसर बनवतात. त्यामुळे विशिष्ट स्मृती आपण ठाशीवपणे लक्षात ठेवतो. एवढंच नाही, तर त्यांच्याबद्दलचं स्वत:चं मत पक्कं करण्यासाठी पुन्हा त्या स्मृतींचाच वापर करतो. ‘‘माझ्या वडिलांमुळे माझं बालपण करपलं.’’ असं म्हणणारे निरोगी ‘नॉस्टॅलजिया’चा वापर करत नसतात. ‘‘माझे वडील इतरांपेक्षा खूप कडक वागायचे, पण आतून प्रेमळ होते,’’ असं जर स्पष्टीकरण असेल तर त्याचा फायदा होतो. वैयक्तिक नातेसंबंधांच्या सर्व आठवणींना हे तत्त्व लागू होतं असं संशोधक सांगतात. माणसं आभासी जगामध्ये म्हणजे ‘स्क्रीन’मध्ये जितकी रमतील तेवढ्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आठवणी मर्यादित आणि फिक्या (Dull) होतात, असा एका पाहणीचा निष्कर्ष आहे. म्हणजे निरोगी आनंददायी अनुभवांची प्रत्यक्ष निर्मिती हे कौटुंबिक मन:स्वास्थ्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन झालं आहे. घरातील लहान मुलांच्या मनावरचे ‘स्मृतीठसे’ ही त्यांच्या उद्याच्या आयुष्याची शिदोरी आहे. ओरखडे काढणाऱ्या आठवणी लक्षात राहतात. समाधानाच्या आठवणींची लेणी कोरावी लागतात.
एका कुटुंबातले सदस्य किंवा एकेकाळी जवळ असणारे मित्रसहकारी एकत्र येतात तेव्हा त्यांची मैफल रमते कारण, स्मरणरंजन इतरांसोबत अनुभवून त्याचा सामूहिक पुन:प्रत्यय नात्यांना नवा रंग देतो. ‘छिछोरे’ या चित्रपटात काहीशा फिल्मी पद्धतीनं हेच दाखवलं आहे की स्मरणरंजनामुळे ते मित्र खडतर वास्तवाला सामोरे जाऊ शकतात. स्मरणरंजनावर अनेक ‘ब्रॅन्ड्स’ बाजारात यशस्वी ठरले आहेत. ‘पार्ले-जी’ बिस्किट हे त्याचं एक ठळक उदाहरण आहे. कारण ‘खाद्यानुभव’ हा स्मरणरंजनाचा दिंडीदरवाजा आहे. वास, चव, दृश्य, स्पर्श, ध्वनी यांनी सालंकृत अशी खवय्येगिरी कायमची लक्षात राहते. मी वैद्याकीय शाखेचं शिक्षण घेत होतो तो मुंबईतल्या ‘पावभाजी’च्या उदयाचा काळ होता. आमच्या ‘केईएम्’ रुग्णालयासमोर त्याचं एक आद्यास्थान होतं. ती दृश्ये कायमची स्मरणात आहेत. ‘खडी भाजी’ नावाचा एक प्रकार होता. ‘मसाला बन मस्का’ नावाची एक साइड डिश होती. अहाहा! परळच्या पावभाजीच्या तुलनेसाठी ताडदेवचा ‘सरदार’, व्हीटीला (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ‘कॅनन’च्या दांडेकरांची पावभाजी. झाली सुरू रंजनसाखळी.
स्मरणरंजनाचं दुसरं महाद्वार आहे,‘कुटुंब.’ ‘माझिया जातीचे मज भेटू कोणी’ असे तुकोबा म्हणतात. ही अट पूर्ण करतं, कुटुंब आणि त्यानंतर शाळा-महाविद्यालयांतील मित्रमैत्रिणी. जगातल्या सर्व ‘रियुनियन्स’ अर्थात् पुनर्भेटीचं इंधन पुरवतं, स्मरणरंजन. अभ्यासकांनी या प्रक्रियेची प्रमुख अंगे कोणती तेही सांगितलं आहे. वैयक्तिक स्मरणसाठा, त्या काळातील सार्वत्रिक अनुभवसाहित्य, यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक तपशील तसंच निसर्गाचं वर्णन प्रामुख्याने होतं. स्मरणरंजनात मित्रमंडळी एकमेकांची ‘शब्दचित्रं’ काढतात. कधी ‘अर्कचित्रं’ रंगवतात. पण हे सारं ‘निर्विष’ असणं महत्त्वाचं. सध्याच्या आयुष्यात आपण समाधानी की असमाधानी यावर या स्मरणप्रक्रियेचा बाज अवलंबून असतो. कारण स्मरणाबरोबर भावना येतातच. त्या भावना सद्याकालीन भावनांबरोबर जर समाधानाने बागडल्या तर गदिमांच्या ‘बामणाचा पत्रा’ सारखं स्मरणचित्रं तयार होतं. तीन-चारशे वर्षांपूर्वी ‘नॉस्टॅलजिया’ हा शब्द तयार झाला ‘Homesickness’या शब्दावरून. घराच्या आर्त आठवणी असा त्याचा अर्थ. काबुलीवाला चित्रपटातील, ‘ए मेरे प्यारे वतन…’ या गाण्यातल्या भावना दाखवणारा शब्द होता तो. कालांतराने जखमा करणाऱ्या, भळभळणाऱ्या आठवणींना (Traumatic) या सुखद व्याख्येतून वगळण्यात आलं. आणि ती संज्ञा सकारात्मक होता होता आनंददायी बनली.
‘स्मरणरंजनाचा मानसोपचारासाठी वापर’ या विषयावर मजेदार प्रयोग करण्यात आले. भावनिक स्थितीला उभारी देण्यासाठी, स्व-प्रतिमा सुदृढ करण्यासाठी तसेच सामाजिक-सांस्कृतिक एकटेपणाची भावना कमी करण्यासाठी खासकरून गटउपचारांमध्ये स्मरणरंजन वापरलं जातं. काळ काही पुन्हा फिरून येत नाही. त्यामुळे ‘आता हे कधीच घडणार नाही’ या सत्याचा स्वीकार करावा लागतो. स्मरणरंजनाला प्राणवायू देणारा एक कौटुंबिक प्रयोग आम्ही रचला होता. शिक्षण, व्यवसाय, लग्न इत्यादी कारणांनी घराबाहेर पडलेला आमचा मुलगा-मुलगी आणि आम्ही पतीपत्नी यांनी, १२ वर्षांपूर्वीचे आमचे दोन दिवस पुन्हा रचले. आम्ही जशी एकत्र धमाल करायचो ते सगळं पुन्हा केलं. आम्ही खेळ खेळलो, खास ठिकाणी जेवलो, मी निगुतीनं बनवलेले दडपे पोहे घरी झाले, गाणी गायली गेली. दोन्ही मुले माझ्या कुशीत घुसून झोपली. प्रचंड लोळलो. डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो. स्मरणरंजनाच्या एका आवर्तनाला आम्ही झळाळी तर दिलीच पण आमचं एकमेकांबरोबरचं नातं त्या दोन दिवसांनी अधिक घट्ट केलं. या ‘समारंभाला’ येताना आमची मुलगी तिच्या छोट्या मुलाला म्हणजे नातवाला घेऊन आली नाही. त्याच्याबरोबरच्या वेगळ्या स्मरणरंजन सहलीची आखणी करून तीही नंतर संपन्न झाली.
आठवणी आळवताना दोन वेगवेगळ्या शैली वापरल्या जातात. एका शैलीमध्ये ‘सांगणारा मी’ नायक असतो. ती आठवण मी-पणाभोवती फिरत राहते. सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्याचं मन:स्वास्थ्य फुलवणाऱ्या शैलीमध्ये ‘आठवण’ केंद्रस्थानी असते. सहभागी व्यक्तींच्या वृत्ती आणि कृतीचा प्रवास उलगडलेला असतो. आठवणी सांगताना त्यातला बोध किंवा शिकवण सांगून त्याची नीतीकथा बनवण्याची जरुरी नसते. अगदी छोटी का असेना प्रत्येक आठवण जोडणारी असावी. निरागस आनंदाच्या भावनेवरच तिने समेवर यावे.
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘लॅण्डलाइन’चे दूरध्वनी होते तेव्हाची. काही कारणाने गायिका आरती अंकलीकरच्या घरी फोन केला. ज्यांनी फोन उचलला त्या गोड आवाजात म्हणाल्या, ‘‘मी तिची सासू बोलते आहे. सुमती…सुमती टिकेकर’’ ‘‘मोठाच लाभ झाला माझा. तुमचा आवाज कानावर पडला.’’ मी म्हणालो. ‘‘माझी आई आणि माझ्या सासूबाई तुमचं एक गीत गातात. त्यामुळे ते माझंही आवडतं झालं.’’
‘‘कोणतं हो?…’’ त्यांनी विचारलं.
‘‘आठवणी दाटतात, धुके जसे वितळावे. जे घडले ते सगळे, सांग कसे विसरावे.’’ मी सांगितलं आणि सुमतीताईंनी फोनवरून अगदी उत्स्फूर्तपणे ते गाणं मला गुणगुणून दाखवलं… अजूनही त्या सुरांची सोबत आहे. अहाहा!