अपर्णा देशपांडे – adaparnadeshpande@gmail.com

सारखी भेट न होतादेखील जिथे या मनातलं त्या मनाला अचूक कळतं असा मैत्रीचा हक्काचा कोपरा हवाच! उद्याच्या जागतिक मैत्री दिवसानिमित्तानं ..

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!

‘‘ हे जरा अतिच नाही का? ’’ माझी ऑफिसमधली मैत्रीण चिडून मला सांगत होती. म्हणाली, ‘‘दोनच दिवसांपूर्वी माझ्या बालमैत्रिणीचे पती गेले. दोन दिवसच झालेत मी तिच्याकडे जातेय, तर आज घरून निघताना सासूबाई म्हणाल्या, ‘आज पुन्हा जाणार तू तिकडे? गेलीस ना दोन दिवस.. बास झालं. आहेत ना तिच्या घरचे! ’ कसं काय बोलू शकतात त्या हे असं?..’’

मी तिला शांत करत पाण्याचा ग्लास पुढे केला. तिच्या रागाचा निचरा होणं आवश्यक होतं. मग म्हणाली, ‘‘माझ्या नणंदेला अपघात झाला होता, तेव्हा मी स्वत:हून चार दिवस सुटी काढून तिच्याजवळ राहून आले होते. ते बरं चालतं? आता माझ्या मैत्रिणीला माझी गरज आहे, तर का बरं कुरकुर? म्हणजे मैत्रीचं नातं रक्ताच्या नात्यापुढे कायम दुय्यमच का? कोण कुठली नवीन माणसं.. पण लग्नानंतर आपण जीव लावून त्यांना आपलंसं करतोच ना? ही मैत्रीण तर लहानपणापासून माझ्या जिवाभावाची! आज तिच्यावर भयंकर वेळ आलीये. मग मी तिच्याजवळ असायला नको?  हे कसं समजत नाही यांना?’’ ती बरंच काही बोलत राहिली.. माझ्याजवळ बोलून दाखवल्यानं तिच्या रागाचा आवेग कमी झाला. तिच्या मनाची घालमेल जरा निवली, पण मी मात्र त्याच विचारात गुंतले. तिनं जशा काही माझ्याच भावना व्यक्त केल्या होत्या. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते..

खरंच.. नात्यांच्या चढत्या, उतरत्या भाजणीत मैत्री नेमकी कुठे असते? नात्यातल्या व्यक्तींना मिळतो तसा मान प्रत्येक वेळी मैत्रीला मिळतोच असं नाही. मैत्रीच्या नात्यातली आपली भावनिक गुंतवणूक तर सच्ची असते ना? नात्यातल्या दुराव्याइतकाच मैत्रीतला दुरावापण त्रासदायकच असतो ना?  नातं हे आपसूक मिळालेलं, कित्येकदा तर लादलेलं असतं. खरी मैत्री अशी लादलेली असते का? मग रक्ताच्या आणि इतर जोडल्या गेलेल्या नात्यांना मिळतो तो सन्मान आणि ती हक्काची जागा मैत्रीला का नाही मिळत? मैत्रीतून मिळणारा आनंद आणि दु:ख हे दुय्यम कसं असू शकतं? काळानुरूप मैत्रीचे निकष, आजची नेमकी गरज आणि आपली नाती, यात बदल घडत आहेत का? नात्यात मैत्री नेमकी कुठे आहे याचा ऊहापोहच सुरू झाला मनात.

रक्ताची नाती हवीतच. त्यावर दुमत नाहीच! पण त्यांच्या तुलनेत मैत्रीचं पारडं हलकं ठरवलं जाऊ नये. अगदी अलीकडचा एक प्रसंग म्हणजे ‘करोना’ झालेल्या एका माणसाचा रुग्णालयात मृत्यू झाल्यावर खुद्द त्याच्या पत्नीनंही अंतिम दर्शनास नकार दिला. मुलगा कॅनडामध्ये अडकलेला. अशा वेळेला संपूर्ण काळजी घेऊन मुलाचा बालमित्र एकटा गेला होता पालिकेच्या लोकांबरोबर अंत्यसंस्कार करायला. तेव्हा कुठे होते रक्ताच्या नात्याचे लोक?  हीच मंडळी जेव्हा घरातल्या शुभकार्याच्या वेळी ‘घरच्या घरी, थोडक्यात’ शुभकार्य करतात, तेव्हा यादीतून आधी मित्रमंडळींची नावं कमी करतात. गंमत म्हणजे मित्रदेखील हसत हेच सुचवतात, ‘‘अरे, थोडक्यात करताय ना कार्य?  मग आम्ही नंतर येतो ना भेटायला. आधी तुमचे जवळचे येऊन जाऊदेत.’’ यात कुठेही डिवचलं गेल्याची भावना नसते, राग नसतो. उलट परिस्थितीचा मोकळा स्वीकार असतो. हेच जर उलट घडलं, आणि चार नातेवाईक बाजूला सारून मित्रांना जागा दिली, तर त्याची चर्चा होते. सगळीकडे सर्रास असंच घडतं असं नाही, पण असं होण्याचं प्रमाण जास्त आहे. अडीअडचणीला, तातडीच्या मदतीला निरपेक्षपणे धावून येणारे जवळचे मित्र आपली उपस्थिती अडचणीची होणार नाही याची बरोबर खबरदारी घेतात. अशा मित्रांच्या बाबतीत आपल्या प्रेमाची मोजदाद करता येत असते का?  नक्कीच नाही. गेल्याच महिन्यातला प्रसंग. आमच्याकडे एकदम शांत उदास वातावरण बघून घरी आलेल्या एका गृहस्थांनी चौकशी केली. ‘‘काय झालं वहिनी? काही वाईट घडलंय का?’’

‘‘होय हो. यांचे अगदी जवळचे मित्र गेले परवा.’’ मी उत्तरले.

‘‘हात्तीच्या! मग कुणी नातेवाईक गेल्यासारखं काय करताय?’’

ही मानसिकता खूप संतापजनक आहे. मैत्रीच्या नात्याला उपेक्षिततेचा शाप नको. मैत्रीबाबतीतला हा एक अनुभव अभ्यासण्यासारखा आहे, नीरजा ही माहिती तंत्रज्ञान कंपनीतली व्यवस्थापन अधिकारी. तिचं जेव्हा लग्न ठरत होतं, तेव्हा ती स्वत:बरोबर आपल्या बालमित्राला, प्रणवला घेऊन गेली. तिला नेमका कसा जोडीदार हवा आहे, याचे बारीक तपशील तिच्या आई-वडिलांपेक्षा प्रणवला जास्त माहीत होते. त्याच्या नजरेतून तिला आपल्या जोडीदाराला पारखायचं होतं. या प्रणवचं तिच्या आयुष्यातलं स्थान तिनं सगळ्यांना नीट सांगितलेलं असल्यानं लग्नानंतरही तिची मैत्री तशीच टिकून राहिली. हा समतोल ती नीट राखतेय. तिच्या मैत्रीचं स्थान काळाच्या ओघात वाहून गेलं नाही, भलेही त्यांच्या भेटी कमी होत असतील. हे ‘राखणं’ जमलं पाहिजे. माझ्या अनेक नात्यांसारखं मैत्रीदेखील एक महत्त्वाचं नातं आहे, आणि त्या नात्याचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. हे पटवून देणं गरजेचं आहे.

बालमैत्रिणीचा नवरा गेल्यावर तिच्यामागे ठामपणे उभी राहणारी मैत्रीण, मित्राच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार स्वत:चा जीव जोखमीत घालून करणारा मित्र, किंवा आपल्या बालमैत्रिणीच्या अडचणीला तिच्या सासरी धावून जाणारा मित्र.. हे कुठल्या नात्यापल्याडचे नाहीत का? कुटुंबाचे घटक याहून वेगळे नसतात हे कधी समजून घेणार आपण?  कधी कधी वाटतं, की आजच्या तुलनेत जुने लोक कदाचित जास्त दिलदार होते. आम्ही लहान असताना आजोळी बघायचो. मामासोबत कायम सावलीसारखे त्याचे दोन मित्र असायचे. घरातल्या प्रत्येकाला त्या मित्रांबद्दल तितकीच आपुलकी असायची. कुठल्याही प्रसंगाच्या वेळी कुटुंबातली व्यक्ती म्हणून ते दोघं असायचेच! आता वयं झाली, पण मैत्री आणि त्यातला जिव्हाळा तसाच कायम आहे. हे असं सगळीकडे नाही घडत. आज तर दुर्मिळच! मग आज काय अपेक्षा आहेत आपल्या मैत्रीकडून?

स्त्री असो वा पुरुष, नोकरी-व्यवसायानिमित्त ते जेव्हा बारा-चौदा तास घराबाहेर असतात, तेव्हा तिथे क्षणाक्षणाला लढाई करताना कुणीतरी सोबतीला असावं लागतं. कँटीनमध्ये बसून कॉफी पिणं, अथवा मिळून सहलीला जाणं यासाठी सहकर्मी असतात ना. मग त्यापलीकडे काय हवं? तर.. आपलं भलं चिंतणारे एक-दोन मित्र हवेत. कधी कोण तुमच्यावर कुरघोडी करून, तुम्हाला तुडवून पुढे जाईल, याची सावध जाणीव देणारे मित्र हवेतच. मनातलं प्रत्येकच वादळ आई-वडील किंवा जोडीदारासोबत वाटून नाही घेता येत. तिथे शांतपणे ऐकून घेणारा मैत्रीचा कान हवा. मुलांना वाढवताना पालक म्हणून अनेक आव्हानं झेलावी लागतात. तिथे त्याच नावेतून प्रवास करणारी मैत्रीची साथ असेल, तर निर्णय घेणं खूप सोपं होतं. स्पर्धेच्या युगात,

‘तू चिंता करू नकोस, तुझ्यात क्षमता आहे,’ असा विश्वास देणारा शब्द हवा. सैरभैर मनाला शांत करणारा श्वास हवा. मैत्रीत नेहमी एक विसावा शोधतो आपण. कोलाहलात असूनही काटेरी एकटेपणा सुसह्य़ करायला, आयुष्यातल्या कठोर वास्तवाशी निडर होऊन भिडायला प्रत्येकाला एक तरी मित्र हवाच! मनाच्या आतमध्ये स्वत:शी युद्ध सुरू असताना आपण करतोय ते चूक की बरोबर याची शहानिशा करण्यासाठी आपल्या आत डोकावणारा मित्र लागतो.

तंत्रज्ञानाच्या वाढत्या विळख्यात आपलं भौतिक जगणं कमालीचं समृद्ध झालं, पण मनाच्या तणावाचं गणित मात्र बिघडत गेलं. ते तणाव अनेकदा जीवघेणे ठरतात याची कितीतरी उदाहरणं आपण रोज बघतोय. असंख्य वेळा आपण भावनिकदृष्टय़ा कमजोर पडतो, किंवा ‘आता सगळं संपलं’ म्हणण्याइतपत नैराश्यानं खचतो. तेव्हा सगळ्यात मोठा आधार वाटतो तो मैत्रीचा. हातचं राखून न ठेवता भडाभडा मनातलं बोलून मोकळं होण्याची हक्काची जागा हवी. आपल्यालादेखील मित्रासाठी हा असा आश्वासक आधार बनावं लागतं. मान्य आहे की आजच्या जगण्याच्या वेगात नात्यांच्या वाटय़ाला वेळेचा तुटवडा आहे.. इथे प्रत्येक नात्याचा एक एक असा राखीव कोपरा आहे.. त्या कोपऱ्याची अलवार जपणूक करताना होणारी कुतरओढ आहे.. आणि घडय़ाळाच्या काटय़ांवर तोलत ते बंध जपण्याची धडपड  ही आजची वस्तुस्थिती आहे. पण यात एक कोपरा मैत्रीचाही आहेच ना. त्या मैत्रीच्या कोपऱ्यात धूळ आणि जळमटं जमून कसं चालेल? तो कोपरा नाही जपला तर आपल्या मनात कचऱ्याचे ढीग साचतील ना! त्यांचा उपसा कसा होईल?..

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांतल्या मैत्रीतले वेगवेगळे आयाम तपासायचे असतील तर आजच्या युवा पिढीचा दृष्टिकोनही बघायला हवा. ही मंडळी मैत्रीच्या बाबतीत बरीच स्वतंत्र विचारांची आहेत. या पिढीपुढे मैत्रीची अनेक दालनं समाजमाध्यमांमुळे खुली आहेत. आभासी जगातल्या आभासी मैत्रीला बळी पडण्याचा धोका सगळ्यांत जास्त असणारी ही युवा पिढी. या वर्गाला मैत्रीच्या बाबतीत जागरूक असणं प्रचंड आवश्यक आहे. अशा वेळी त्यांच्या आयुष्यातला तो मैत्रीचा कोपरा फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. सगळ्या बाजूंनी समाजमाध्यमं नको तितकी माहिती पुरवत असतात. त्यात सगळी लाज सोडलेल्या ‘वेब वाहिन्या’ तर मुलांची झोप उडवून त्यांना विकृतीकडे नेण्याच्या पूर्ण तयारीत बसलेल्या आहेत. अशा वेळेस विवेकी मित्रमंडळी भोवताली असणं फार गरजेचं आहे. मौजमजा, मस्ती आणि धिंगाणा करण्यासाठी भरपूर मित्र-मैत्रिणी असतात, किंवा चालतात. त्या सगळ्यांनाच मनाच्या गाभाऱ्यात जागा असते असं नाही. तो मान निवडक मित्र-मैत्रिणींचाच! व्यसनापासून दूर ठेवणारे, मौज- मस्ती आणि आपलं ध्येय याची गल्लत न करणारे मित्र असणं ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. किंबहुना पालकांसमोरचं ते आव्हान आहे, कारण ही मुलं रक्ताच्या नात्यांपेक्षा मैत्रीतच जास्त रमतात. या टप्प्यावर नात्यापुढे मैत्रीचं पारडं जड ठरतं.

बदलत्या वातावरणाचा परिणाम आजच्या उमलू पाहणाऱ्या कोवळ्या मुलांच्या ‘इमोशनल बॉण्ड’वर झाला नाही तरच नवल. सध्या आपण आजूबाजूला बघतो, की आजची बरीच कुमारवयीन मुलं आठ-दहा वर्षांची घट्ट मैत्री छोटय़ा-मोठय़ा भांडणात झटक्यात तोडून टाकतात, आणि विशेष म्हणजे पुन्हा त्याचा त्रासही करून न घेता नवीन मित्र शोधतात. हा पिढीगणिक संवेदना बोथट करत जाणारा बदल मुलांना एकाकी आणि आत्मकेंद्रित करणारा आहे. यासाठी त्यांना जिव्हाळ्याच्या मैत्रीची जाणीवपूर्वक मशागत करायला शिकवायला हवं. योग्य-अयोग्य मैत्रीमधील पुसट रेषा त्यांना मोठय़ांनी समजावून सांगायला हवी. मैत्रीच्या आधारवडाची सावली त्यांनाही मिळायला हवी. (या बाबतीत जुनी पिढी खरंच नशीबवान होती.)

आता आयुष्यात सगळं  मिळवून झाल्यावर  मिळालेल्या निवांत काळात मित्रांची आठवण आली की जाणवतं, की आपण मैत्रीला फार गृहीत धरतो. मित्रांचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व वेळीच बोलून दाखवत नाही. आपल्या भोवती मैत्रीचा दरवळ असेपर्यंतच त्यांना व्यक्त करून सांगायला हवं, आपल्या मनात त्यांचं स्थान किती उंचावर आहे ते! ते जर अचानक आपल्या आयुष्यातून गेले, आणि मैत्रीचा तो कोपरा रिता झाला, तर  बोलायचं राहून गेल्याची हुरहुर आयुष्यभर जाळत राहील मनाला.

इतरांचं राहू देत आपण आपल्या मैत्रीचा कप्पा स्वच्छ उजळलेलाच ठेवूया. स्वत:ला नेहमी ताजंतवानं ठेवू, कारण आपल्या मित्रांनाही आपली गरज आहेच. कुणाच्या तरी ‘त्या कोपऱ्यात’ आपणही आहोतच ना!