सुजाता खांडेकर

अस्मिता तुपे, बेबी मोहिते, स्वाती दडस, कल्पना सुतार, मनीषा शिंगाडे, सुरेखा काळेल, विजया भोसले, मेघा डोंबे, पद्मा मोहिते आणि नंदा जगदाळे.. या आहेत साताऱ्यातील माण तालुक्यातल्या ‘जलनायिका’! दुष्काळी भागातल्या स्त्रियांची दु:खं अनुभवलेल्या या स्त्रियांनी गावात पाणी आणण्यासाठी, धावणारं पाणी चालवण्यासाठी तांत्रिक, शास्त्रीय संकल्पना शिकून घेतल्या आणि गावाची मोटही बांधली. ‘स्त्रियांना अक्कल नसते’ हे वाक्य सर्रास ऐकायला मिळणाऱ्या आपल्या समाजात या स्त्रियांनी स्वत:मधले नेतृत्वगुण शोधले आणि गावाच्या विकासाबरोबर त्यांनाही आत्मविकासाची वाट सापडली.

Rainy Weather, unseasonal rain, Delights Wildlife, Tadoba Andhari Tiger Project, Bears Spotted Carrying Cubs, Bears Spotted Carrying Cubs on Their Backs, marathi news, tadoba news, andhari news, viral video,
VIDEO: अस्वलाने पिल्लाला बसवले पाठीवर आणि घडवली जंगलाची सैर…हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा बघाच….
sam pitroda controversial statement
सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?
husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
baramati couple found dead marathi news
बारामतीत सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत, दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार

स्त्रियांच्या चळवळीनं कायमच स्त्रियांबद्दल जाणीवपूर्वक बनवल्या गेलेल्या खोटय़ा, चुकीच्या प्रतिमांना आव्हान देत त्या बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बायकांची आकलनशक्ती त्रोटक असते. त्यांना काही कळत नाही. ज्ञानाशी त्यांचा दुरूनही संबंध नाही,’ ही अशीच एक प्रतिमा. ‘शास्त्र, गणित, तंत्रज्ञान निसर्गत:च स्त्रियांपासून दूर असतात’ असाही समज. ‘नसलेली अक्कल पाजळू नको!’ असं चिडून किंवा शांतपणेही सांगितलेलं आपण सर्रास ऐकतो. ‘मी विचार करणारी स्त्री पाहिली!’, किंवा ‘एक बाई बुद्धिबळ खेळत होती’ असे ‘विनोद’ सांगणारे ‘एलिट’ पुरुषही भेटतात. ‘स्त्रीच्या बुद्धीची धाव स्वयंपाकघराच्या उंबऱ्यापर्यंत!’ या मतावर ठाम असणारे लोक आजही आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत.

पुरुषसत्ताक पद्धतीचं एक वैशिष्टय़ आहे- सतत, बिनधास्त आणि आक्रमक पद्धतीनं स्त्रियांबद्दल धादांत खोटे, चुकीचे समज पसरवून त्याला आपसूक समाजमान्यता मिळवायची. स्त्रियांना अक्कल नाही, हे प्रस्थापित केलं की मग स्त्रियांकडून प्रश्न, विरोध किंवा आव्हान येणार नाही. विरोध झालाच, तर तिला ताळय़ावर आणण्याचे मार्गही समाजमान्य असतात. आणि अशा समजांच्या सततच्या माऱ्यामुळे स्त्रियांनाही ते सत्यच आहे असं वाटायला लागतं! या भ्रमाचा भोपळा फोडणाऱ्या ‘जलनायिका’ आहेत- अस्मिता तुपे, बेबी मोहिते, स्वाती दडस, कल्पना सुतार, मनीषा शिंगाडे, सुरेखा काळेल, विजया भोसले, मेघा डोंबे, पद्मा मोहिते आणि नंदा जगदाळे. सातारा जिल्ह्यातला माण तालुका सततचा दुष्काळी. अनेक गावांमध्ये दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच टँकर लागतात, कारण प्यायचं पाणीही नसतं. दीड-दोन किलोमीटरवरून पाणी आणायचं. इथली मुलंमुलीही शाळेत जायचं सोडून पाणी भरतात. बायकांची अक्षरश: कंबरडी मोडतात, गर्भपात होतात. पीकपाणी नाही, रोजगार नाही. वीटभट्टी, ऊसतोडी, रंगारी अशा कामांसाठी पुरुष स्थलांतर करतात. दुष्काळाचा भकासपणा गावभर बोकाळलेला. टँकर आला, की पाण्यासाठी डोकी फुटेपर्यंत मारामारी कशी चालायची ते विजया, अस्मिता सांगत होत्या. गावातल्या स्त्रियांचं र्अध आयुष्य पाणी आणण्यात आणि ते लवकर संपू नये म्हणून धडपड करण्यात जायचं. पद्मा सांगतात, ‘‘जीव कळशीत टाकून खोलवर विहिरीत उतरावं लागतं. दुष्काळ फक्त आमच्या ताटातच दिसत नाही, तर शरीरापासून मेंदूवर पसरला आहे!’’ अशा गावामध्ये गेल्या तीन वर्षांत पाणी आलं. भूगर्भातल्या म्हणजे जमिनीखालच्या पाण्याचा विषय म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असते. स्त्रियांचा पाण्याशी संबंध म्हणजे पाणी भरणं, स्वयंपाक, धुणीभांडी एवढय़ापुरताच, हा समज. स्वाती सांगतात, ‘‘आजूबाजूचे लोक जाणीव करून देत राहतात, की ‘हे काम बाईचं आणि ते पुरुषाचं’. भांडी बायकांनी घासायची, पण घरातला नळ खराब झाला की तो दुरुस्त करणार पुरुष. बायकांना ‘टेक्निकल’ गोष्टी कळत नाहीत, असं म्हणून त्यांना त्यातलं काही शिकायची संधी दिली जात नाही.’’ पण माणमधल्या पाणवन, परतवडी, पांगरी, पाचवड, थदाळे, वळई या ६ दुष्काळी गावांत पाणी आणलं ते जलनायिकांनीच. या सहांपैकी चार गावं आता टँकरमुक्त झाली आहेत. दोन गावांची ८० टक्के पाण्याची गरज भागली असून आता पुढची कामं सुरू आहेत. या पाणी-प्रक्रियेचं नेतृत्व सर्व पातळय़ांवर स्त्रियांनी केलं. त्यांच्या कृतीतून स्त्रियांच्या क्षमतांबद्दलच्या सवंग समजाला आव्हान दिलं गेलं.

सहा वेगवेगळय़ा गावांतून आलेल्या या जलनायिका सामूहिक कामामुळे मैत्रिणी झाल्या. जाती वेगळय़ा, शिक्षण वेगळं, वयं वेगळी, रोजगार वेगळा, जीवनकहाण्या वेगळय़ा. यातल्या काहींना गरिबीमुळे शाळा सोडावी लागली, तर काही पशूवैद्यक, परिचारिका, शेतीचा डिप्लोमा केलेल्या. ओबीसी, दलित, भटके, खुला गट, सर्व श्रेणीतून आलेल्या या मैत्रिणी. अस्मिता, मनीषा, पद्मा यांचं १३-१४ व्या वर्षी लग्न झालेलं. कल्पना यांना लग्नानंतर एक महिन्यात ‘सोडून’ देण्यात आलं होतं. विजया यांनी शाळेपासून दलित असण्याचा कटू अनुभव घेतलेला. एक गोष्ट मात्र यांच्यात समान होती. तीन वर्षांपूर्वी ‘ग्रासरूट्स’ नेतृत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये या सगळय़ाजणी सहभागी झाल्या होत्या. आपापल्या भेदभावाच्या अनुभवांचं गाठोडं एकत्र उकलण्याची संधी त्यांना इथे मिळाली. जुने भ्रम तुटले, नवीन उमेद तयार झाली. पाण्यासाठी करावी लागणारी वणवण हा त्यांना जोडणारा धागा झाला. ‘गावात पाणी आणणं’ या संकल्पनेबद्दल कल्पना हसत हसत सांगत होत्या, ‘‘सुरुवातीला मला हा विनोद वाटला! गावात पाणी आणायचं? वाटलं, या लोकांचं पावसाशी सेटिंग आहे वाटतं!’’. पण नंतर पाण्याच्या प्रश्नाचा अभ्यास यांनी ‘पाणीशाळे’त केला. पाणीशाळा म्हणजे काय? सुरेखा सांगतात, ‘‘पाय मोडला तर आपण हाताला प्लास्टर करतो का? तर, नाही! एक्स-रे काढून मग पायावरच योग्य उपचार करतो. तसंच पाणी व्यवस्थापनासाठी ‘हायड्रोजीओलोजी’ (शिकलेला नवीन शब्द) जाणून घेऊन जलउपचार समजून घेणं महत्त्वाचं.’’ पद्मांच्या मते आता त्यांच्या संपूर्ण गावानं या जलउपचारासाठी डॉक्टर बनायचं ठरवलं आहे! या सगळय़ा मैत्रिणींनी गावाचा तपशिलात सव्र्हे केला. गावातल्या नैसर्गिक, मानवी आणि इतर संसाधनांची नोंद केली. प्रशिक्षण घेऊन गावाचं सूक्ष्म नियोजन केलं. दगडांचा, खडकांचा अभ्यास केला. खडकांची छिद्रं आणि उभ्या-आडव्या चिरांचा अभ्यास केला. पाणी का, कुठे, किती मुरतं ते समजून घेतलं. जमिनीचे चढउतार, ‘रीचार्ज-डिसचार्ज’ क्षेत्र समजून घेतलं. भूगर्भातल्या पाण्याची पातळी मोजण्याचं कसब शिकून घेतलं. गावात असलेल्या बुजलेल्या जलस्रोतांची माहिती गोळा केली. पाण्याचा ताळेबंद केला. बंधाऱ्यांच्या प्रकारांचं, स्थानाचं महत्त्व जाणलं आणि गावाचे नकाशे तयार केले. सुरेखा सांगतात, ‘‘याआधी मी कधी नकाशा केला नव्हता. पण वहीत नोंद केलेली माहिती- म्हणजे दिशा, जमीन, नद्या, ओढे, नाले, रान, झाडं, वस्त्या, रस्ते, लोकसंख्या हे घटक समोर ठेवून अमुक एक विहीर ही रानापासून इतक्या अंतरावर आहे, त्यात अमुक महिने पाणी असतं, वगैरे समजून घेतलं.’’ ही प्रक्रिया सुमारे दोन-अडीच वर्ष सुरू होती. पुण्याच्या ACWADAM (अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर वॉटर रीसोर्सेस, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट) या संस्थेच्या मित्रमैत्रिणींनी सहज, उत्तम पद्धतीनं हे तंत्रज्ञान या स्त्रियांना शिकवलं. गावात पाण्याची साठवण आणि पातळी वाढवण्याची विविध कामं झाली. विविध प्रकारचे बांध, बंधारे बांधले. सलग समतल चर (CCT – Continuous Contour Trench)बांधले. विहिरीतला गाळ काढून शेतीत वापरला. सहा गावांमध्ये मिळून १ कोटी ४४ लाख ८० हजार रुपयांचा निधी शासकीय योजनांमधून मिळवला.

सुरेखा सांगतात, की ‘‘गावाचा नकाशा करताना लोकांच्या जगण्याचा नकाशा कळला!’’ त्यामुळे महत्त्वाची गोष्ट झाली. प्रक्रियेत गावातल्या सगळय़ांचा सहभाग असण्याची अपरिहार्यता जाणवली. गावातल्या प्रत्येक घटकाशी वेगळा संवाद सुरू झाला. स्त्रियांचे जलमेळावे झाले. गावातल्या पाण्याची स्थिती आणि शक्य-उपचार यावर चर्चा होत राहिली. विजयांच्या मते, या मेळाव्याची विशेष बाब म्हणजे स्टेजवर स्त्री पाहुण्या आणि समोर ऐकणाऱ्याही स्त्रिया. पुरुषांना सतत मंचावर बघायची सवय असल्यामुळे हे विशेष वाटलं. पाण्याच्या प्रश्नानं पूर्णपणे गांजलेल्या स्त्रियांना आपल्याच गावातल्या स्त्री-नेत्यांमुळे आशेचा किरण दिसला. सर्व जातीधर्माचे, वयांचे, गरीब-श्रीमंत स्त्री-पुरुष पाणी-प्रक्रियेत सहकारी झाले. रात्री उशिरापर्यंत बैठका चालायच्या. सूर्योदयालाच लोकं कुदळ-फावडं घेऊन श्रमदानाला यायचे. याशिवाय सरकारी योजनेतल्या निधीबरोबरच प्रत्येक घरानं त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार पैसे देऊन ‘ग्रामकोष’ तयार केला. सरकारी अधिकारीही मदतीला आले.

या स्त्रियांच्या बोलण्यात सतत गावातल्या लोकांचे परस्परसंबंध कसे बदलले आहेत याचा उल्लेख येतो. तीस वर्षांत एकमेकांशी न बोललेल्या व्यक्तीही एकत्र काम करायला लागल्या. भांडणतंटे कमी झाले. काही ठिकाणी मंदिरात दलित समाजातले लोक कधीच जाऊ शकले नव्हते, पण पाणी-प्रक्रियेच्या बैठकाच मंदिरात व्हायच्या, त्यामुळे आपोआप मंदिरात त्यांचा निर्वेध वावर सुरू झाला. मनीषा सांगतात, ‘‘कोणत्याही पुरुषाशी बोलणं जिथे पाप मानलं जायचं, तिथे आज मी माझी मतं अख्ख्या ग्रामपंचायतीत मांडते. हे या कामांमुळे आलेल्या आत्मविश्वासातून.’’ दुष्काळी किंवा पाण्यासाठी वणवण करणारी गावं, हे संबोधन संपूर्ण गावानं एकत्र येऊन पुसून टाकलं.

पाण्याची पातळी टिकवणं आणि रोजगार या दृष्टीनं सहाही गावांमध्ये अनेक उपक्रम सुरू झाले. परसबागा केल्या, तुतीची शेती सुरू झाली. ८२,००० झाडांची लागवड झाली. याबरोबर रेशन, शिक्षण, आरोग्य यांकडे लक्ष देणं सुरू झालं. आता पाण्याचा हक्क आणि त्याचं समान वितरण यावर काम सुरू आहे. गावाची कामं व्हायची असतील, तर ग्रामपंचायत महत्त्वाची, हे मेघा यांना समजलं होतं. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी पॅनल उभं करून ९ पैकी ८ जणांना निवडून आणलं. त्या स्वत: निवडणूक लढल्या नाहीत, पण गावाच्या विकासासाठी मेघा यांनी केलेले प्रयत्न प्रभावी ठरले.
एवढं धैर्य आणि एवढी बांधिलकी या जलनायिकांची कशी तयार झाली? पाणी-प्रक्रियेत येण्यापूर्वी त्यांच्यापैकी सर्वजणी आयुष्यात दमलेल्या, हरवलेल्या किंवा घुसमटलेल्या होत्या. स्वत:बद्दल, स्वत:च्या क्षमतेबद्दल विचार करायला मिळालेल्या संधीतून त्यांची बांधिलकी तयार झाल्याचं त्या सांगतात. त्यांना अनेक प्रश्न पडले, त्याची मिळून त्यांनी उत्तरंही शोधली. ‘वेडी’ ठरवून लग्नानंतर एका महिन्यात सोडून दिलेल्या कल्पना विचारतात, ‘‘आपल्याकडे मुलींचं आयुष्य किती स्वस्त आहे ना? कुनीतरी ठरवतं लग्न करायचं, कुनी ठरवतं मुलगी येडी हाय, मुलीला सोडून देऊ.. आणि आमी मात्र बसतो शोधत, की आमच्यात नक्की दोष काय व्हता?’’ अस्मितांना स्त्रीपण आणि जात यांची सांगड कळली. ‘जिथे अगोदर पुरुष का बाई, मग बाई असेल तर तिची जात कोणती, हे बघून तिला बोलायला द्यावं की नाही हे ठरवलं जातं, तिथे ती सर्व क्षेत्रांत कशी पुढे जाणार?’ हा मूलभूत प्रश्न त्यांना पडतो. मनीषा त्यांच्यावरच्या बंधनांना संस्कार समजून घुसमटीत जगत होत्या. कोंडी फोडून मोकळा श्वास घेण्याची वाट बघत होत्या. ‘पाणीशाळा’मध्ये त्या सगळय़ांना मोकळा श्वास घेता आला, एकमेकांची साथ मिळाली. हक्क कळले, ओळख मिळाली, जगण्याला उद्देश मिळाला. एक चौकट मोडली आणि अनेक चौकटी मोडण्याचं बळ मिळालं. सुरुवातीच्या काळात डोंगरउतारावरच्या गावातल्या एका बैठकीमध्ये वयाच्या सत्तरीत असलेल्या एक आजी आल्या होत्या. तिथे पावसाचं येणारं तुटपुंजं पाणी सगळं वाहूनच जायचं. कामाची चर्चा चालू होती, तेव्हा आजी म्हणाल्या, ‘‘इथं पाणी पळतंय. त्याला चालवायचंय!’’. किती सोपं आणि स्पष्ट आकलन! ना ओढून-ताणून काही मांडण्याचा प्रयत्न, ना कसला आविर्भाव. ज्ञान, शहाणपण, समज हे न समजणाऱ्या शब्दांत नव्हे, तर जगलेल्या अनुभवात आणि वास्तवात दडलेलं आहे, याची जाणीव करून देणारा हा अनुभव. स्त्री-चळवळ हेच अधोरेखित करते. या ज्ञानाचा, शहाणपणाचा आपण सन्मान कसा करणार, हा कळीचा प्रश्न आहे. लपलेलं, अव्यक्त आणि अव्हेरलेलं हे ज्ञान, शहाणपण त्याच्या धारकांसहित दृश्यमान व्हायला हवं.

(या लेखासाठी सूर्यकांत कांबळे यांनी सहकार्य केले आहे.)