डॉ ज्ञानेश पाटील : साधारण २० वर्षं झाली या गोष्टीला, म्हणजे आमच्या मैत्रीला. काळ अगदीच जुना नसला, तरी डिजिटल युग तेव्हा अद्याप शैशवात होतं. एक काहीसा ऐसपैस निवांतपणा किंवा अॅनालॉग (Analog) घड्याळाला किंवा वस्तूंना असतो तसा साधेपणा त्या दिवसांना होता. त्यादरम्यान आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो.
खरं सांगायचं तर आम्ही समानधर्मी नव्हतो. ना आमचं गाव एक, ना आम्ही एका शाळेत शिकलो, ना कॉलेज एकत्र केलं, ना कोणी कॉमन नातेवाईक किंवा मित्र, ना आमचं शिक्षण एकसारखं! मी आयुर्वेदाचा पदवीधर, तर ती एमबीबीएस डॉक्टर. मी मूळ खान्देशातला आणि पुण्यात शिकत असलेला, तर ती मूळ पुण्याची आणि खान्देशात पदवी घेतलेली. वैद्याकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर एक वर्ष इंटर्नशिप करायला लागते. ज्यात सहा महिने ग्रामीण काम करणं अपेक्षित असतं. त्यासाठी मी आणि माझा मित्र सतीश ‘इंटर्न’ म्हणून पुणे जिल्ह्यात अगदी दुर्गम भागातल्या एका खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालो.
हेही वाचा…आहे जगायचं तरीही…
वैद्याकीय परिभाषेत ज्याला non working Primary Health Care – ‘पीएचसी’ म्हणतात, तसं ते केंद्र होतं. रुग्ण औषधालाही नव्हते, त्यामुळे कर्मचारी वर्गही नव्हता. सामान्यत: अशा ठिकाणी असलेल्या संबंधित अधिकाऱ्याला पैसे देऊन ‘इंटर्नशिप’ पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र घ्यायचं आणि शहरात खासगी दवाखान्यात काम करून अनुभव घ्यायचा किंवा ‘पीजी’ची (पोस्ट ग्रॅज्युएशन) तयारी करायची अशी पद्धत असते. पण मी आणि सतीशने तिथंच राहून काम करायचं ठरवलं.
यथावकाश तिथले क्वार्टर्स वगैरे साफ करून घेतले आणि आम्ही तिथं राहू लागलो. सुरुवातीला तिथं कुणीच मुख्य वैद्याकीय अधिकारी नव्हता, पण लवकरच दोन अगदी नवे, तरुण वैद्याकीय अधिकारी रुजू झाले, डॉ. शेखर आणि डॉ. पल्लवी. हे दोघेही नुकतेच एम.बी.बी.एस. पास झाले होते. दोघांचीही ही पहिलीच नोकरी होती. आणि परंपरेप्रमाणे त्यांना ‘पीजी एंट्रन्स’च्या तयारीसाठी वेळ हवा असल्यानं त्यांनी या केंद्राची निवड केली होती.
पुढील तीन महिने आम्ही चौघे तरुण डॉक्टर्स त्या लहानशा खेड्यात राहिलो, आणि हळूहळू त्या ‘नॉन वर्किंग पीएचसी’ला ‘वर्किंग पीएचसी’ बनवलं. आम्ही त्या काळात तिथं बऱ्याच सुधारणा केल्या. अन्य कर्मचारीही कामावर नियमित यायला लागले. परिणामी, रुग्ण वाढले आणि गावात आमचा मानही वाढला. याच काळात आम्हा चौघांची मैत्री झाली. सर, मॅडम ही औपचारिकता गेली आणि आम्ही एकेरीत बोलू लागलो.
पल्लवीची आणि माझी मैत्रीही यादरम्यान फुलली, टिकली आणि पुढेही वाढतच राहिली. आमचे स्वभाव तसे भिन्न होते. मी काहीसा अबोल, बुजरा, कविता वगैरे करणारा आणि अल्पसंतुष्ट म्हणता येईल असा गावाकडचा मुलगा होतो, तर ती महत्त्वाकांक्षी, बिनधास्त आणि आत्मविश्वासानं भरलेली पुणेकर मुलगी होती. असं असलं तरी आमचे स्वभाव एकमेकांना पूरक ठरले. आमच्या मैत्रीनं परस्परांच्या व्यक्तिमत्त्वातल्या काही अपूर्ण जागा भरून काढल्या असाव्यात, असं मला आता वाटतं.
हेही वाचा…आला हिवाळा…
‘पीएचसी’चं काम संपल्यावर आम्ही संध्याकाळी शेकोटी लावून तासन् तास गप्पा मारत बसायचो. आपली भविष्याची स्वप्नं, सुख-दु:खं एकमेकांना सांगायचो. त्या उण्यापुऱ्या अडीच ते तीन महिन्यांच्या सहवासानंतर आमच्या वाटा वेगळ्या होणार होत्या आणि त्यानंतर आम्ही परस्परांच्या संपर्कात राहण्याचं कुठलंही लॉजिकल कारण नव्हतं. पण मैत्री काही लॉजिक वगैरे गोष्टी पाहून होत नसते. जणू एखादं झाड कुणी लक्ष दिलं नाही, कधीही पाणी घातलं नाही तरी आपल्या अंगभूत जीवनेच्छेनेच वाढत जावं, तशी आमची मैत्री वाढत गेली.
यथावकाश ‘इंटर्नशिप’ संपली. मी पुण्यात आलो आणि काही दिवस अनुभव घेण्यासाठी नोकरी केली. नंतर गावी परतलो आणि दवाखाना सुरू केला. पल्लवीने ‘पीजी’ची प्रवेश परीक्षा दिली, अपेक्षेप्रमाणे त्यात यशस्वी झाली आणि तिने ‘छत्रपती संभाजीनगर’ला ‘एमडी’साठी प्रवेश घेतला. या काळात पुण्यात झालेल्या एक-दोन धावत्या भेटी वगळल्या तर आम्ही केवळ फोनवरून संपर्कात होतो. आपापल्या आयुष्यातील घडामोडी, नवी आव्हानं, ताणतणाव, आनंद आणि नैराश्य, प्रेम आणि प्रेमभंग असं बरंच काही एकमेकांना सांगत राहिलो.
औरंगाबाद येथे शिकत असताना पल्लवीची तिच्या आयुष्यभराच्या जोडीदाराशी भेट झाली. योगायोगानं तो माझ्याच जिल्ह्यातला आहे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह असल्यामुळे दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांना संघर्ष करावा लागला. लग्नाआधी पल्लवी पहिल्यांदा सासरी आली ती थेट तिच्या साखरपुड्यासाठी. त्या वेळी तिच्यासोबत माहेरचं कुणी नव्हतं. त्या काळात ती मुंबईला नोकरी करत होती.
ती मुंबईहून परस्पर माझ्या घरी आली आणि माझ्याकडूनच तयार होऊन माझ्यासोबत पहिल्यांदा सासरी गेली. त्या वेळी तिच्या ‘माहेरचा माणूस’ मीच होतो. पारंपरिक ख्रिाश्चन लग्नात एक परंपरा असते, ज्यात ‘प्रोसेशन’च्या वेळी शेवटी वधूचे वडील किंवा अन्य जवळची व्यक्ती तिला मंचापर्यंत सोबत करतात. मी पल्लवीला तेव्हा गमतीत म्हणालो होतो, ‘‘ I am here to give away the bride today.’’ आम्हा दोघांसाठीही हा क्षण खूप खास होता, आणि आहे.
हेही वाचा…सांधा बदलताना : जगण्याचं तत्त्वज्ञान
आमच्या मैत्रीत काही मजेशीर योगायोग आहेत. आम्हा दोघांची जन्मतारीख एकच आहे. ती माझ्यापेक्षा बरोबर एका वर्षानं मोठी आहे. आम्ही दोघांनीही आंतरजातीय प्रेमविवाह केले आहेत आणि आम्हा दोघांप्रमाणेच आमचे जोडीदारही एका जातीतले आहेत. अर्थात जातपात आम्ही दोघेही मानत नाही, पण एक गमतीशीर योगायोग म्हणून याचा उल्लेख केला.
खरं सांगायचं, तर मैत्रीचं किंवा कुठल्याही नात्याचं विश्लेषण करायला जाऊ नये. पण या लेखाच्या निमित्तानं मी विचार केला. आमची मुळात मैत्री का झाली असावी? आणि जेमतेम दोन-तीन महिन्यांचा प्रत्यक्ष सहवास असताना गेली दोन दशकं आम्ही इतके घनिष्ठ मित्र का राहिलो?
तर मला एक कारण असं दिसतं की, आम्ही ठरवून काहीही केलं नाही. ज्या काही भावना होत्या त्या सच्च्या आणि सेंद्रिय होत्या. आम्हाला दोघांनाही कोणाला काही सिद्ध करून दाखवायचं नव्हतं. आमच्या परस्परांकडूनदेखील काहीच अपेक्षा नव्हत्या. आमच्या वाटा वेगळ्या आहेत हे आम्हाला आधीच ठाऊक होतं. त्यामुळे सोबत चालण्याचा अट्टहास नव्हता. तिच्यात असलेली सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षी स्वभाव मला प्रेरणा देऊन गेला. मोठी स्वप्नं पाहणं आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी झटत राहणं, प्रतिकूल स्थितीतही स्वत:ला आनंदी ठेवणं आणि आनंद वाटत राहणं हे मी तिच्याकडे पाहून शिकलो. तिला माझ्या मैत्रीतून काय मिळालं हे तीच सांगू शकेल, पण मला वाटतं तिच्या व्यावहारिक आणि गद्या जगण्याला माझ्यातल्या कविमनानं एक विरंगुळा, एक उसंत, ‘ठेहराव’ दिला आणि माझ्या काहीशा स्वप्नाळू, भावुक आणि भूतकाळात घुटमळत बसणाऱ्या मनाला तिनं भविष्याकडे पाहण्याची चालना दिली.
आजकालच्या परिभाषेत ज्याला ‘मिलेनिअल्स’ म्हणतात त्या पिढीचे आम्ही प्रतिनिधी. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष बोलतो. फोनवरून मेसेजेस किंवा चॅट जास्त करत नाही. सोशल मीडियावर परस्परांना टॅग किंवा लाइक, फॉलो करणंही आम्हाला जमत नाही. एवढंच काय, इतक्या वेळा भेटूनही आमचा एकही एकत्र फोटोही नाही. मात्र २० वर्षांपूर्वी जेव्हा माझी इंटर्नशिप संपत आली, तेव्हा शेवटच्या दिवशी पल्लवीने माझ्याकडून त्या काळाच्या परंपरेनुसार ‘स्लॅम बुक’ भरून घेतलं जे अद्याप तिनं जपून ठेवलं आहे, आणि त्यात तिच्यासाठी लिहिलेली कविता अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्या कवितेतील काही ओळी अशा होत्या –
जिथे कुणी कुणासाठी नसते थांबत
तुझी माझी भेट झाली अशा प्रवासात
चार दिवसांत पुन्हा बदलेल दिशा
राहतील तुझ्यासवे माझ्या या सदिच्छा
चालताना तुझा कधी जाऊ नये तोल
पापणीला तुझ्या कधी येऊ नये ओल
पावलांना तुझ्या लाभो यशाचे शिखर
प्रकाशाने उजळून जावो तुझे घर!
मला ठावे झेप तुझी आभाळाशी जाते
तरी पावलांचे राहो जमिनीशी नाते
क्षितिजाशी धावताना सुटू नये भान…
विसाव्याचे असू द्यावे एखादे ठिकाण!
आज पल्लवी एक यशस्वी डॉक्टर आहे. ती आता मुंबईत आपल्या पती आणि दोन गोड मुलांसह आनंदात राहते. आमची मैत्री आता आम्हाला ओलांडून आमच्या परिवारापर्यंत गेली आहे. माझी अर्धांगिनी तिची चांगली मैत्रीण आहे आणि तिचा नवराही माझा मित्र आहे. गेल्या वर्षी एका लग्नाच्या निमित्तानं ती आपल्या सासरी आली, तेव्हा सहकुटुंब माझ्या घरी आली. आम्ही खूप गप्पा मारल्या, हास्यविनोद केले. नंतर ती गेल्यावर आम्हाला दोघांनाही एकदम लक्षात आलं, ‘‘अरेच्या, आपण आजही एकत्र फोटो घेतलाच नाहीये!’’ ‘अॅनालॉग’ काळातल्या या मैत्रीला अद्यापही आपल्या डिजिटल पाऊलखुणा तयार करायला जमत नाही, हेच खरं! mednyan@gmail.com