अनिकेत साठे

कॅप्टन शिवा चौहान, कर्नल गीता राणा, ग्रुप कॅप्टन शालिझा धामी आणि कॅप्टन सुरभी जाखमोला, भारतीय सैन्यदलांमध्ये आघाडीवरील अतिशय आव्हानात्मक जबाबदारी मिळालेल्या या स्त्रिया. भारतीय सैन्यदलात लिंगभेदविरहित रचनेची रुजवात झाली आहे. त्यामुळे सैन्यदलात आव्हानात्मक जबाबदारी केवळ पुरुषच सांभाळू शकतात, ही मानसिकता दूर होणार आहेच; पण देशसेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या अनेक मुलींसाठीही हे प्रेरणादायक ठरणार आहे.

जगातील सर्वात उंच सियाचीन युद्धभूमीवर तैनात भारतीय लष्करातील कॅप्टन शिवा चौहान, पाकिस्तान- लगतच्या सीमेवर हवाई दलाच्या क्षेपणास्त्र तुकडीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ग्रुप कॅप्टन शालिझा धामी, संवेदनशील पूर्व लडाखमध्ये आघाडीवरील स्वतंत्र युनिटची धुरा खांद्यावर घेणाऱ्या गीता राणा आणि भूतानमध्ये रस्तेबांधणी प्रकल्पावर कार्यरत होणाऱ्या सीमा रस्ता संघटनेतील (बीआरओ) कॅप्टन सुरभी जाखमोला. या सर्वामधील एक समान धागा म्हणजे आघाडीवर आव्हानात्मक जबाबदारी प्रथमच स्त्रियांना मिळाली आहे. बदलत्या भारताचे हे एक महत्त्वाचे उदाहरण ठरावे.

   यात एखादा अपवाद वगळता कुणाचीही कौटुंबिक पार्श्वभूमी लष्करी नाही. सामान्य घरातून त्या खडतर, पण प्रतिष्ठेच्या लष्करी सेवेत पुरुषांइतक्याच जिद्दीने दाखल झाल्या. आता त्यांच्यासारखी जबाबदारी पेलणाऱ्या स्त्री अधिकाऱ्यांची यादी वाढत जाईल यात शंका नाही. पुरुषसत्ताक रचनेत प्रथमच मिळालेली जोखमीची जबाबदारी त्यांचे नेतृत्व कौशल्य, डावपेचात्मक व तांत्रिक क्षमता अधोरेखित करतील. सशस्त्र दलाच्या सेवेची प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या मुलींसाठी हे प्रेरणादायक!

सशस्त्र दलात अधिकारीपदाची कवाडे खुली झाल्यानंतर तीन दशकांनी स्त्रियांना नेतृत्वाची संधी मिळत आहे. आव्हानात्मक जबाबदारी केवळ पुरुषच सांभाळू शकतात, ही खोलवर रुजलेली मानसिकता दूर करण्याचे काम या नियुक्तीमुळे होणार आहे. न्यायालयीन निकालामुळे सशस्त्र दलात मुलींना स्थायी सेवा आणि पदोन्नतीत समानतेचे तत्त्व लागू झाले. सैन्यदलात लिंगभेदविरहित रचनेची ही रुजवात म्हणावी लागेल. त्याच्या या स्त्री अधिकारी शिलेदार ठरतील.

सैन्यात वार्षिक गोपनीय अहवाल आणि अभ्यासक्रमाच्या निकषांवर अधिकाऱ्यांना १६ ते १८ वर्षांच्या सेवेनंतर कर्नल पदावर बढती मिळते. पाच वर्षांपूर्वी लष्कराने मर्यादित काळातील सेवेत असलेल्या स्त्री अधिकाऱ्यांना स्थायी सेवा (कायमस्वरूपी कमिशन) निवडण्यास परवानगी देत नियम बदलले; पण ते नियम २०२० पासून सैन्यदलात कारकीर्द करणाऱ्या स्त्रियांना लागू झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर ते पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होऊन कार्यरत स्त्रियांच्या पदोन्नतीचा मार्ग खुला झाला. उपरोक्त काही नियुक्त्या त्याचाच एक भाग. लष्कराच्या सहाय्यकारी दलात १९९२ ते २००६ या कालावधीत कार्यरत २४४ स्त्री अधिकाऱ्यांचा पदोन्नतीसाठी विचार झाला. निवड मंडळ यातील १०८ जणींना कर्नल (निवड श्रेणी) हुद्दय़ावर बढती देत आहे. त्यामध्ये संपर्क व्यवस्था (सिग्नल), हवाई संरक्षण (एअर डिफेन्स), गुप्तवार्ता (इंटेलिजन्स), शस्त्रास्त्र व दारूगोळा पुरवठा (ऑर्डिनन्स), अभियंता (इंजिनीअर्स), विद्युत व यांत्रिकी (ईएमई), सैन्य सेवा (सव्‍‌र्हिस) या विभागांचा समावेश आहे. हवाईदल व नौदलातदेखील ही प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.

कॅप्टन शिवा चौहान

अतिशय जोखमीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या दोन लष्करी अधिकारी या विद्युत आणि यांत्रिकी विभागातील आहेत. बर्फाच्छादित सियाचीनमध्ये नियुक्त झालेल्या कॅप्टन शिवा चौहान त्यांपैकी एक. जगातील सर्वात उंच सीमेवर तैनात होणारी ही पहिली स्त्री आहे. कॅप्टन शिवा या मूळच्या राजस्थानच्या. उदयपूर येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. लहानपणी पितृछत्र हरपले. आईने मुलीच्या केवळ शिक्षणच नव्हे, तर सैन्यदलातील सेवेच्या इच्छेलाही प्रोत्साहन दिले. त्यामुळे ‘टेक्नो इंडिया एनजेआर’ संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्या सैन्यात दाखल होऊ शकल्या. उत्तम सायकलपटू म्हणून त्या ओळखल्या जातात. १५,६०० फूट उंचीवरील कुमार पोस्टवर तीन महिने त्या कार्यरत असतील. सियाचीन क्षेत्रात शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. उणे तापमान, विरळ प्राणवायू, हिमवादळे आणि हिमकडा कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींशी निकराने झुंजावे लागते. या वातावरणात थकवा आणि हृदयविकाराच्या धक्क्याने आजवर शेकडो अधिकारी-जवानांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे येथे कठोर अग्निपरीक्षेतून जावे लागते. ‘सियाचीन बॅटल स्कूल’मध्ये बर्फवृष्टीत तग धरण्याची क्षमता, बर्फाच्या भिंतीवरील चढाई, हिमवादळे आणि हिमकडा कोसळण्याच्या दुर्घटनेतील बचाव आणि जगण्याची कवायत यासाठी आवश्यक सक्षमता आणण्यासाठीची विविध प्रशिक्षणे पूर्ण करावी लागतात. ती यशस्वी करीत शिवा यांच्या नेतृत्वाखाली ‘सॅपर’(लढाऊ अभियंता)ची तुकडी उत्तुंग क्षेत्रात नियुक्त झाली. हे आव्हान स्वीकारताना त्यांच्या मनात काहीशी धाकधूक होती. मात्र हा त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा ठरला. ‘सियाचीनमधील नियुक्तीसारखा दुसरा अनुभव असूच शकत नाही. वयाच्या २५ व्या वर्षी या संधीने भयावह संकटाला हसतमुखाने तोंड कसे द्यायचे ते शिकवले,’ असे त्या आवर्जून सांगतात. सशस्त्र दलात क्षमतेला जितका वाव मिळतो, तितके कुठलेही करिअर देऊ शकणार नाही. लष्करात स्त्रियांनाही आता पुरुषांप्रमाणे संधी आहेत, त्याचा जास्तीत जास्त तरुणींनी लाभ घ्यायला हवा, याकडेही त्या लक्ष वेधतात.

कर्नल गीता राणा

भारत-चीन सीमेवरील पूर्व लडाखच्या दुर्गम भागात स्वतंत्र तुकडीची जबाबदारी कर्नल गीता राणा यांनी हाती घेतली आहे. चीन सीमेलगत तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या स्त्री अधिकारी आहेत. विद्युत व यांत्रिकी विभागातील कॅप्टन गीता यांच्या गाठीशी २३ वर्षांच्या लष्करी सेवेचा अनुभव आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षांपासून हा सीमावर्ती प्रदेश संवेदनशील बनलेला आहे. या क्षेत्रात त्यांची सेवा पुढील काळात येणाऱ्या स्त्रियांनाही मार्गदर्शक ठरेल. कर्नल गीता यांचे वडील लष्करात अधिकारी होते. लहानपणापासून लष्करी शिस्तीचे बाळकडूू त्यांना मिळाले. चेन्नईस्थित अधिकारी प्रबोधिनीत त्यांनी प्रशिक्षण घेतले. २००० मध्ये त्या सैन्यदलाच्या सेवेत दाखल झाल्या. यापूर्वी त्यांनी सिक्किम व जम्मू-काश्मीरसह अनेक भागांत सेवा बजावली आहे. ‘ईएमई प्रशिक्षण संस्थे’त (इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनीअिरग स्कूल) प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे आणि आता त्या आणखी एका आव्हानात्मक मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत.

ग्रुप कॅप्टन शालिझा धामी

आघाडीवर मोक्याच्या ठिकाणी नेतृत्वाची संधी मिळण्याच्या श्रृंृखलेत भारतीय हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टन शालिझा धामी यांचे नावही समाविष्ट झाले आहे. २८०० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव असणाऱ्या ग्रुप कॅप्टन शालिझा यांची क्षेपणास्त्र तुकडीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. पाकिस्तानलगतच्या सीमावर्ती क्षेत्रात हवाई संरक्षण युनिटची जबाबदारी त्यांच्यावर आहे. घरात असलेल्या निर्णयस्वातंत्र्यामुळे त्यांना ही भरारी घेणे शक्य झाले. पंजाबच्या लुधियानातील सराभा हे त्यांचे गाव. वडील वीज कंपनीत होते. सरकारी शाळेत शालिझा यांचे शिक्षण झाले. घुमर मंडीच्या खालसा (महिला) महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. या काळात राष्ट्रीय छात्रसेना पथक (एनसीसी) हवाईदल शाखेची त्यांनी

केलेली निवड आयुष्याची ध्येयपूर्ती करणारी ठरली. वेगवेगळय़ा भागांत होणाऱ्या एनसीसी शिबिरांत सहभागी होताना कुटुंबीयांकडून त्यांना कधीही आडकाठी झाली नाही. या शिबिरांतून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. २००३ मध्ये हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून त्या लष्करात नियुक्त झाल्या. शालिझा या हॉकीपटू, चित्रकार आणि नृत्यांगनादेखील आहेत. पालकांनी आपल्या मुलीच्या आयुष्यात कधीही ढवळाढवळ केली नाही, की तिच्यावर कुठलेही निर्णय लादले नाहीत. अगदी लग्नासाठीसुद्धा जबरदस्ती केली नाही. त्यांना करिअर निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य होते. विंग कमांडर विनीत जोशी यांच्याशी शालिझा विवाहबद्ध झाल्या असून या जोडप्याला दोन अपत्ये आहेत. संसार आणि करिअर या दोन्ही आघाडय़ांवर त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

कॅप्टन सुरभी जाखमोला

सीमावर्ती भागात सैन्याची दळणवळण व्यवस्था बळकट करणाऱ्या सीमा रस्ता संघटनेतील (बीआरओ) कॅप्टन सुरभी जाखमोला यांच्या रूपात पहिली स्त्री अधिकारी परदेशात तैनात झाली आहे. सीमा रस्ता संघटना देशाच्या सीमेवर आणि शेजारील मित्रदेशांत रस्त्यांचे जाळे विणण्याचे, देखभाल दुरुस्तीचे काम करते. भारताकडून भूतानमध्ये राबविल्या जाणाऱ्या दंतक प्रकल्पातील कामासाठी कॅप्टन सुरभी यांना पाठविण्यात आले. ११७ अभियंता रेजिमेंटमधील त्या अधिकारी आहेत. सशस्त्र दलातील त्यांचा हा सहभाग म्हणजे स्त्री कर्तृत्वासाठीची पहाट म्हणता येईल. कॅप्टन सुरभींच्या तैनातीआधी हवाई दलाच्या महिला वैमानिक अवनी चतुर्वेदी जपानमध्ये वीर गार्डियन २०२३ लढाऊ विमानांच्या सरावात सहभागी झाल्या होत्या. देशाच्या पहिल्या तीन स्त्री लढाऊ वैमानिकांपैकी त्या एक आहेत.

 सशस्त्र दलाने स्त्रियांना स्थायी सेवा (कायमस्वरूपी कमिशन अर्थात पीसी) दिल्यामुळे त्यांना युनिटच्या नेतृत्वाची संधी दृष्टिपथात आली. स्थायी सेवेमुळे त्यांची नैसर्गिक प्रगती होईल. स्त्री अधिकारी ज्या शाखेत कार्यरत आहेत, तिथे त्यांना आता तुकडीचे नेतृत्व, महत्त्वाची जबाबदारी देण्यापासून वंचित ठेवता येणार नसल्याचे निवृत्त अधिकारी सांगतात. खरं तर लष्करी सेवेत तुकडीचे नेतृत्व करणे प्रतिष्ठित नियुक्ती मानली जाते. एकदा कर्नल म्हणून बढती मिळाली की संबंधित अधिकारी नेतृत्व करण्यास पात्र ठरतो. कुठल्याही अधिकाऱ्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा काळ ठरतो. या काळात त्याच्यावर संपूर्ण युनिटची जबाबदारी असते. कमांडिंग अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली २० अधिकारी, ४० जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) आणि ८०० जवान असतात. या अनुभवातून पुढे त्याला ब्रिगेडिअपर्यंतचा हुद्दादेखील गाठता येतो. कर्नल तुकडीचा प्रमुख असतो. त्याच्या आदेशावर तुकडी कार्यरत असते. हवाई दलातील ग्रुप कॅप्टन लष्करातील कॅप्टनशी समकक्ष हुद्दा आहे. सहाय्यकारी विभागात तुकडीच्या संख्यात्मक रचनेत बदल असले तरी नेतृत्वाची संधी मात्र समान असते. आजपर्यंत पुरुषांपर्यंत सीमित राहिलेली ही संधी स्त्रियांचे नेतृत्व कौशल्य खऱ्या अर्थाने अधोरेखित करेल.

जगातील अनेक राष्ट्रे स्त्रियांच्या कर्तृत्वावर विश्वास दाखवून सैन्यदलात त्यांना समान संधी देत असताना भारताने मागे राहण्याचे कुठलेही कारण नव्हते. युक्रेन-रशिया युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी मोठय़ा संख्येने युक्रेनियन मुली सैन्यात दाखल होऊन लढाईत उतरल्या. दुसऱ्या महायुद्धात तब्बल साडेतीन लाख अमेरिकी स्त्रियांनी देशात, परदेशात सेवा बजावली होती. वैद्यकीय परिचारिका विभागातील काही युद्धभूमीवर शत्रूच्या गोळीबारात धारातीर्थीही पडल्या होत्या. आता अमेरिका, ब्रिटन, रशिया, इस्रायलसह अनेक देशांत सशस्त्र दलात स्त्रियांना नेतृत्व करायला मिळते. लढाऊ विमानांचे संचलन, युद्धनौकेची जबाबदारी त्यांना पुरुषांच्या बरोबरीने देण्यात येत आहे.

भारतीय सशस्त्र दलात शत्रूशी प्रत्यक्ष भिडणाऱ्या पायदळ व चिलखती वाहनांच्या दलात स्त्रियांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. मात्र, तोफखाना विभागात स्त्रियांसाठी सहाय्यकारी लढाऊ शाखा उघडली जात आहे. भारतीय नौदल विश्वविद्यालयात मुलींसाठी कार्यकारी (एग्झिक्युटिव्ह), अभियांत्रिकी, विद्युत व शिक्षण या शाखांचे दरवाजे उघडले गेले. यात दाखल होण्यास ५,५०० मुलींनी उत्सुकता दर्शविली आहे. नौदलाने सर्व शाखांमध्ये स्त्री अधिकाऱ्यांना समाविष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात त्या स्थायी सेवेला पात्र ठरतील. हवाई दलानेही तसेच धोरण स्वीकारले आहे. स्त्री अधिकाऱ्यांसाठी सर्व शाखांचे दरवाजे खुले झाले. पात्रता व रिक्त पदांवर आधारित त्यांना स्थायी सेवा दिल्यामुळे त्या तुकडीचे नेतृत्व करण्यास पात्र ठरतील. क्षेपणास्त्र तुकडीच्या प्रमुख बनलेल्या ग्रुप कॅप्टन शालिझा हे त्याचेच उदाहरण.

हवाईदलाने मध्यंतरी आपल्या रचनेत बदल करीत नवीन शस्त्रप्रणाली शाखा कार्यान्वित केली आहे. याआधी दलात उड्डाण, तांत्रिक व जमिनीवरील कर्तव्ये या तीन शाखा होत्या. नव्या शाखेवर जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, दूरस्थपणे चालणारी विमाने (यूएव्ही- अनमॅन्ड एरियल व्हेइकल्स), दोन किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या विमानांतील शस्त्रप्रणालीचे संचलन ही जबाबदारी असेल. या नव्या शाखेत चार उपशाखा आहेत. उड्डाण उपशाखा सुखोईसारख्या लढाऊ विमानातील शस्त्रप्रणाली संचलन, दुसरी- दूरसंवेदक (रिमोट) उपशाखा वैमानिकरहित विमाने अर्थात ड्रोन संचलन, तर तिसऱ्या- गुप्तवार्ता उपशाखेवर सांकेतिक माहिती, प्रतिमा आदींच्या विश्लेषणातून शत्रूच्या हालचालींचा मागोवा काढण्याची जबाबदारी असणार आहे. चौथ्या- जमिनीवरील कार्य उपशाखेत क्षेपणास्त्र कमांडर आणि क्षेपणास्त्र चालकांचा समावेश असेल.

   सशस्त्र दलात स्त्रियांना आघाडीवर काम करता येणार आहे. तिन्ही दलांत आज स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत बरेच कमी आहे, मात्र आता हेही अवकाश व्यापण्यास त्यांनी सुरुवात केली आहे..