– मृण्मयी साटम
डॉ. आनंदीबाई जोशी आणि डॉ. रखमाबाई राऊत यांसारख्या भारतीय स्त्री वैद्यकीय चिकित्सकांच्या योगदानाबरोबरच ते काम अधिक काळ करणाऱ्या अणि वैद्यकीय चिकित्सेतून समाजसुधारणा करणाऱ्या म्हणून डॉक्टर कृष्णाबाई केळवकर यांचे नाव अगत्याने घेतले जाते. २ सप्टेंबरच्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांचे हे स्मरण.
भारतातील प्रारंभीच्या स्त्री डॉक्टरांपैकी एक आणि समाजसुधारणा चळवळीतही महत्त्वाचे योगदान असलेल्या डॉ. कृष्णाबाई केळवकर. १९२३ मध्ये कोल्हापूर येथे त्यांनी स्थापन केलेले ‘केळवकर वैद्यकीय केंद्र’ आज सुमारे एका शतकानंतरही वसाहतकालीन पितृसत्ताक वर्चस्व असलेल्या पाश्चात्त्य वैद्याकशास्त्रातील स्त्रियांच्या योगदानाची आठवण म्हणून उभे आहे. अलीकडच्या काळातील काही ऐतिहासिक संशोधनांमधून डॉ. आनंदीबाई जोशी आणि डॉ. रखमाबाई राऊत यांसारख्या भारतीय स्त्री वैद्यकीय चिकित्सकांच्या योगदानाची दखल घेणे शक्य झाले आहे. या अग्रणींमध्ये कृष्णाबाईंचे नावही अगत्याने घ्यावे लागते.
या स्त्री डॉक्टरांचे योगदान केवळ स्त्रियांच्या आरोग्यविषयक चळवळीपुरतेच मर्यादित राहिले नाही, तर त्यांनी स्वत:च्या शिक्षण आणि कार्यातून प्रस्थापित सामाजिक रूढींविरोधातही आव्हान निर्माण केले.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात विविध धार्मिक-सामाजिक सुधारणा चळवळीस प्रारंभ झाला. त्यातून स्त्रिया आणि त्यावेळच्या तथाकथित अस्पृश्यांसाठी शिक्षणाची केंद्रे खुली झाली. या पार्श्वभूमीवर कृष्णाबाईंचे जीवनचरित्र त्यांच्या काळातील राजकीय-सामाजिक परिस्थितीपासून पूर्णत: वेगळे होऊन पाहता येणे शक्य नसले, तरी त्यांच्या व्यक्तित्वातील काही मुख्य गुणांकडे लक्ष वेधणे महत्त्वाचे आहे.
कृष्णाबाईंमधील जिद्द आणि धैर्यामुळे त्या सामाजिक दबावांपासून स्वतंत्र राहू शकल्या. शाहू महाराजांच्या सुधारणावादी कोल्हापूर संस्थानातील एका क्षत्रिय कुटुंबात कृष्णाबाईंचा जन्म (२६ एप्रिल १८७९) झाला, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. शिवाय, त्यांच्या वडिलांना त्वचेवर परिणाम करणारा ‘पिंटा’ नावाचा एक दुर्मीळ संसर्गजन्य आजार जडल्याचे निदान झाले. कृष्णाबाईंची आई रखमाबाई, यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत साहाय्य करण्यासाठी प्रथम कोल्हापूर दरबारात आणि त्यानंतर ‘स्त्री प्रशिक्षण संस्थे’मध्ये अध्यापनाचे कार्य केले होते.
वसाहतवादी काळात हळूहळू वाढत असलेल्या सामाजिक चळवळींचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या व्यावसायिक पार्श्वभूमीतील समाजसुधारकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून समाजसुधारणा चळवळीला अर्थसहाय्य केले. कृष्णाबाईंनाही शिक्षणासाठी शाहू महाराज आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्याोगपती जमशेदजी टाटा यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली. कृष्णाबाईंची शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन शाहू महाराजांनी त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला. १९०२ मध्ये कृष्णाबाई त्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग म्हणून डब्लिन (आयर्लंड) येथे ‘प्रसूतीशास्त्र आणि स्त्रियांचे आजार’ या विषयातील शल्यचिकित्से-संबंधीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेल्या. त्यावेळी सरकारी निधीव्यतिरिक्त, ‘जे.एन. टाटा एंडॉवमेंट फंड’ने कृष्णाबाई आणि ‘ग्रँट मेडिकल महाविद्यालया’मधील त्यांची सहकारी पदवीधर फ्रीनी कामा यांना आर्थिक सहकार्य केले. १८९२ मध्ये सुरू करण्यात आलेला हा फंड टाटांच्या विधायक लोकोपकाराचा पहिला उपक्रम होता. टाटा यांनी स्वत: कृष्णाबाई आणि कामा यांची निवड केली होती. सातत्याने वाढत असणारा बालमृत्युदर, स्त्री डॉक्टरांची कमतरता आणि पुरुष डॉक्टरांचा सल्ला घेण्यास भारतीय स्त्रियांनी दाखवलेली अनिच्छा यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय स्त्री डॉक्टरांना समर्थन आणि प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी ओळखली होती.
१८९३ मध्ये कृष्णाबाईंनी पुणे येथील ‘फिमेल हायस्कूल’मधून शालेय शिक्षण पूर्ण केले. स्त्रीशिक्षणाला चालना देण्यासाठी ‘आर्य महिला समाजा’ने या शाळेची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यातील ‘फर्ग्युसन महाविद्यालया’त प्रवेश घेतला. जिथे त्यांनी इतर विषयांसह इंग्रजी, संस्कृत आणि गणित या विषयांचे अध्ययन केले. कृष्णाबाईंच्या वडिलांकडूनही (कृष्णाजी केळवकर) त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाला पाठिंबा मिळाला. गोदुबाई देशपांडे यांच्यासह विशेष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासाठी या संस्थेत प्रवेश घेतलेल्या कृष्णाबाई या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. ‘फर्ग्युसन महाविद्यालया’त असताना संस्थेच्या व्यवस्थापनाकडून त्यांना लिंगाधारित भेदभावाचा कसा सामना करावा लागला यासंदर्भात कृष्णाबाई आपल्या आत्मचरित्रात लिहितात.
‘‘… आम्हा मुलींना वर्गाच्या एका कोपऱ्यात शिक्षकांच्या बाजूला बसायला जागा दिली जात असे. आमच्या सभोवताली वेताचे पडदे असत. ‘पर्दा’प्रथेत त्या पडद्याच्या पलीकडे बसणाऱ्या स्त्रियांना काय वाटत असेल याचा तेव्हा मला जवळून अनुभव आला. आमच्यासाठी वेगळा जिना ठेवलेला असे. या सर्व दक्षतेची खरं तर काहीच गरज नव्हती हे ओघाने नंतर लक्षात आलेच. आमच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आमच्या प्रती असलेल्या वागणुकीबद्दल तक्रार करण्याचा प्रसंग कधी आलाच नाही. हेच पडदे पुढच्या सत्रात अदृश्य होण्याचे कदाचित हे एक कारण असू शकेल.’’ लिंगभेदावर आधारित वेगळेपणाच्या या पद्धती अनावश्यक आणि अन्यायकारक आहेत, अशी त्यांची ठाम भूमिका होती. मात्र तरीही त्यामुळे स्वत:च्या सहाध्यायांना (मुख्यत: पुरुष) वाईट वागणूक देण्याची अथवा त्यांच्याबद्दल संशय बाळगण्याची गरज त्यांना कधीही वाटली नाही. त्यांच्या वडिलांनी मात्र या अन्यायी प्रथेविरुद्ध महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती.
‘फर्ग्युसन महाविद्यालया’तील अनुभवांनी कृष्णाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली. १८९५ मध्ये पहिल्या श्रेणीत पदवीधर झाल्यानंतर कृष्णाबाईंमध्ये त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक भूमिकेबद्दलची स्पष्ट जाणीव विकसित झालेली दिसते. त्यांनी मुंबईच्या (तेव्हाच्या बॉम्बे) ‘ग्रँट मेडिकल कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. त्यासोबतच प्रार्थना समाजाचे कायमस्वरूपी सभासदत्व स्वीकारले.
१९०१ मध्ये नव्यानेच वैद्यकीय प्राशिक्षण पूर्ण केल्यानंतर कृष्णाबाई कोल्हापुरात स्थायिक झाल्या. तिथे त्यांनी ‘अल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये स्त्री विभागाच्या प्रमुख म्हणून स्त्रिया आणि मुलांसाठी सहाय्यक शल्यचिकित्सक म्हणून वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. पाश्चिमात्य वैद्याकशास्त्रात एम.डी.पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्री डॉ. आनंदीबाई जोशी यांचा क्षयरोगाने अकाली मृत्यू झाल्यानंतर कृष्णाबाईंची त्यांच्या जागी वर्णी लागली.
कृष्णाबाईंनी कोल्हापुरात प्रसूतिसेवा विकसित करण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली १९०३ ते १९२३ या काळात ‘मातृत्व आणि बालकल्याण प्रणाली’त आमूलाग्र बदल घडून आला. कृष्णाबाईंनी सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रसूतिपद्धती आणि अर्भकांची काळजी घेण्याबद्दल जनजागृती करण्याचे काम केले. त्यांनी ‘निरोगी बाळ जन्माला यावे म्हणून आईवडिलांनी घ्यावयाची काळजी’, ‘निषिद्ध गर्भारपण’, ‘लागोपाठच्या बालकांमध्ये किमान किती वयाचे अंतर असावे’ अशा शीर्षकांसह विविध लेख प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्याची कोल्हापूर संस्थानासोबतच मुंबई परिसरात, इतरत्रही प्रशंसा होऊ लागली. १९०८ मध्ये भारतातील सार्वजनिक सेवेतील योगदानाबद्दल ब्रिटनच्या राजाकडून ‘कैसर-ए-हिंद’ (रौप्य) ही पदवी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या कार्याचे वर्णन करताना ‘हिंदी पंच’ हे तत्कालीन आंग्ल-गुजराती नियतकालिक लिहिते, ‘केवळ कृष्णाबाईंचे औषध आणि त्यांची शस्त्रक्रियेची सुरीच रोगांना बरे करत नाही तर त्यांचे गोड स्मितहास्य आणि त्यांचे मृदू उपचारही रोगांना तितकेच लवकर बरे करतात.’ त्यांच्या कार्याची अशी योग्य दखल घेण्यामधून त्या तत्कालीन मुंबई परिसरातील स्त्री डॉक्टरांच्या तरुण पिढीसाठीही प्रेरणास्थान बनल्या.
१९२२ मध्ये शाहू महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर कृष्णाबाईंना त्यांच्या सार्वजनिक सेवेत प्रबळ राजकीय पाठिंबा देणारा हात उरला नाही. पुरुषी वर्चस्व असलेल्या नोकरशाहीत त्यांना मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला. परिणामत: त्यांनी त्यांच्या वैद्यकीय सार्वजनिक सेवेमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र त्यानंतरही त्यांनी खासगी पातळीवर त्यांची सेवा चालूच ठेवली. त्यानंतरच्या काळात त्यांनी कोल्हापूर येथे ‘केळवकर वैद्यकीय केंद्रा’ची स्थापना केली. या संस्थेशी त्या दीर्घकाळ सलगभन होत्या.
नंतरच्या काळात जरी स्त्रियांसाठी उच्च शिक्षणामधील संधीमध्ये हळूहळू वाढ होत असली, तरी वैद्यकीय क्षेत्रांसहित इतर अनेक क्षेत्रांमध्ये जातिधारित आणि लिंगाधारित भेदभावाचे प्रमाण लक्षात घेता आज एकविसाव्या शतकातही सामाजिक सुधारणेची आवश्यकता टिकून राहिली आहे. मे २०१९ मध्ये पायल तडवी या एका आदिवासी समाजातून आलेल्या महत्त्वाकांक्षी स्त्रीरोगतज्ज्ञ मुलीने आत्महत्या केली. मुंबईतील ‘नायर रुग्णालयामध्ये’ मध्ये वैद्यकीय विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना तिला स्त्री सहकाऱ्यांकडून जातिधारित छळाचा सामना करावा लागल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप होता. तिची व्यावसायिक कामगिरी समाजातील अंगभूत असमानतेला आणि अन्यायाला मागे टाकू शकली नाही. धर्म-जात-लिंग वर्चस्व असलेल्या या समाजात अजूनही स्त्रियांना समानतेने वागवले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.
२ सप्टेंबर १९६१ मध्ये निधन पावलेल्या कृष्णाबाईं- सारख्या प्रारंभीच्या स्त्री डॉक्टरांच्या उल्लेखनीय कार्याचे स्मरण करण्यातून व्यापक पातळीवर आपण आपल्या भारतीय वैद्यकीय व्यवसाय आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सामाजिक सुधारणेच्या अपूर्ण कार्याकडेही लक्ष वेधले जातेच. त्यामधूनच पुन्हा जाति-धर्म-लिंगाधारित विषमतेला आव्हान देण्याचे मार्ग नव्याने निर्माण होतील.
(लेखिका बीआयटीएस लॉ स्कूल, मुंबई येथे इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत.)
अनुवाद अनिकेत लखपती – aniketlakhpati98@gmail.com
मृण्मयी साटम -satam924@gmail.com