१९७०च्या दशकात समाजात विज्ञानाच्या प्रसारासाठी विज्ञान प्रसारक संस्था स्थापन झाल्या. त्यानंतर अनेक चळवळी उभ्या राहिल्या. महाराष्ट्रात या परिषदांमध्ये महिलांचा भरघोस सहभाग होता. विज्ञानाशिवाय जगणे आता केवळ अशक्य आहे. या विज्ञानाच्या आधारानं आणि विज्ञानदृष्टीनंच आपल्याला पुढे जायचं आहे. लाखो, करोडो माणसांचं जीवन बदलायचं आहे. अधिकाधिक मानवी करायचं आहे, हाच संदेश या सर्व चळवळीतल्या स्त्रिया देत आहेत.
विसाव्या शतकात विज्ञानाने मोठी भरारी मारली. भारतानेही अणू आणि अवकाशशास्त्रात झेप घेतली. एकविसाव्या शतकात नेट आणि मोबाइल क्रांतीमुळे तंत्रज्ञान घराघरांत पोहोचले. आज आयटी क्षेत्रात देश-परदेशात बहुसंख्य भारतीय तरुण कार्यरत आहेत. परंतु, अनेक अवैज्ञानिक कल्पनांचा जनमानसावरील पगडा आजही कमी झालेला नाही. त्या पाठीमागील अनेक कारणांपैकी एक कारण, विज्ञानाच्या क्षेत्रातील आणि सरकारी पातळीवरील उदासीनता हे आहे. १९६० पूर्वी तर रोजच्या व्यवहाराशी विज्ञानाचा काय संबंध आहे हे कुणी सांगतही नव्हते. डॉ. श्री. व्यं. केतकर यांनी ज्ञानकोशात वैज्ञानिक विषयांची मांडणी केली, पण ते ज्ञान मर्यादितांपर्यंत पोहोचले.
१९५६ मध्ये पं. नेहरूंनी देशासाठी विज्ञान धोरण तयार केलं. त्यांनी पोलाद, वीज, मोटारींचे कारखाने, धरणे, भाभा अणू संशोधन संस्था, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, आयआयटी, नॅशनल केमिकल लॅब अशा मोठय़ा संस्था काढल्या. परंतु विज्ञान प्रसारक संस्था अस्तित्वात नव्हत्या. १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्रीजींनी आणलेली हरितक्रान्ती, रशियाचा स्पुटनिक उपग्रह, भारत-चीन, भारत-पाक युद्धे यांतील वैज्ञानिक माहिती लोकांना नव्हती. वैज्ञानिक दृष्टिकोन ही तर लांबची गोष्ट होती. या पाश्र्वभूमीवर, भारतात विविध विज्ञान प्रसारक संस्था स्थापन झाल्या. केरळ शास्त्र साहित्य परिषद ही त्यातली पहिली संस्था. केरळमधील साक्षरता आणि जनारोग्याचे प्रमाण वाढणे हा या परिषदेच्या कार्याचा परिपाक होता. नंतर मराठी विज्ञान परिषद, लोकविज्ञान संघटना, कर्नाटक राज्य विज्ञान परिषद, तामिळनाडू सायन्स फोरम, पश्चिम बंगाल विज्ञान परिषद, आसाम सायन्स सोसायटी, दिल्ली सायन्स फोरम अशा संस्था देशभरात विज्ञान साक्षरतेचं काम करू लागल्या.
महाराष्ट्रात, १९६६ मध्ये मराठी विज्ञान परिषदची स्थापना मुंबईत डॉ. म. ना. गोगटे यांच्या पुढाकाराने झाली; नंतर पुणे, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद अशा जवळजवळ १०० शाखा उघडल्या गेल्या. विशेष म्हणजे विश्वस्तपदापासून विज्ञानकथा सांगणाऱ्या शिक्षकांपर्यंत सर्व पातळ्यांवर पुरुषांसह स्त्रियांचा भरघोस सहभाग होता आणि आहे. या संदर्भात डॉ. अ. पां. देशपांडे यांनी स्त्रियांच्या सहभागाचा एक पटच उलगडून दाखविला. ते म्हणाले, ‘‘परिषदेच्या विश्वस्तपदी डॉ. स्नेहलता देशमुख (आता निवृत्त), अचला जोशी, डॉ. विजया वाड आहेत. गेली ५० वर्षे नेमाने होणाऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद आतापर्यंत कर्करोगतज्ज्ञ डॉ. कमल रणदिवे, अंटाक्र्टिका मोहिमेतील संशोधक डॉ. आदिती पंत या दोघींनी भूषविलं आहे. या वर्षी नगररचनातज्ज्ञ डॉ. सुलक्षणा महाजन या नियोजित अध्यक्ष आहेत. मुंबईच्या अधिवेशनाचे पूर्ण नियोजन डॉ. सिंधू जोशी यांनी केलं होतं.’’
मराठी विज्ञान परिषदने अनेक विज्ञानविषयक कार्यक्रम राबविले, त्यातही स्त्रिया आघाडीवर होत्या. उदाहरणार्थ डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी मुलांना विज्ञानातील संकल्पना नीट समजावण्यासाठी दृक्श्राव्य कार्यक्रम, फिल्म्स तयार केल्या. मुलांकडून वैज्ञानिक प्रयोग करून घेणे, सौरऊर्जेच्या कार्यशाळा, सौरदिवे, वीज, जलबचत, स्वच्छता, लैंगिक शिक्षण असे समाजहिताचे उपक्रम राबविण्यात स्त्रिया अग्रेसर होत्या. महिला उद्योजक शिबिरांत वैज्ञानिक खेळणी, कागदी पिशव्या बनविण्याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या शैलजा जोशी, विज्ञान कसे शिकवावे हे सांगणाऱ्या मृणालिनी साठे, सुचेता भेडसगावकर, मीना पेठे, शुभांगी पारकर, दिव्यांग विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रयोग करून घेणाऱ्या साधना वझे, मनीषा लोटलीकर, अरुणा मुणगेकर आदी, तर व्याख्यानमालेचं आयोजन करणाऱ्या नीला डोंगरे, तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या मनातली भीती प्रशिक्षणाद्वारे दूर करणाऱ्या माणिक टेंबे, अश्विनी रानडे, संगीता जोशी, राधा सावंत, विज्ञानकथा लिहिणाऱ्या सरोज जोशी, मेघश्री, मिथिला दळवी, स्मिता पोतनीस तसेच मंगला अभ्यंकर, ललिता पटवर्धन, चित्रलेखा सोमण यांसारख्या पाठीराख्या, अशा एक ना दोन, असंख्य स्त्रिया विज्ञानाच्या उपभोगापलीकडचे रचना आणि तत्त्व, भोवतीच्या सृष्टीविषयीचे कुतूहल जागृत करण्याचे काम करीत आहेत.
या संदर्भात डॉ. राजश्री कशाळकर म्हणाल्या, ‘‘विज्ञानाची प्राध्यापिका या नात्याने चिकित्सक दृष्टिकोन स्वत:त आणि विद्यार्थ्यांत रुजविण्याचा प्रयत्न केला. हरबऱ्याचे, तुरीचे धांडे वापरून कार्बन तयार करू शकतो, ज्याचा टूथपेस्ट, क्रीममध्ये, जलशुद्धीकरणामध्ये उपयोग करता येतो यावर
संशोधन केलं.’’
१९८०च्या सुमारास महाराष्ट्रात डॉ. सुलभा ब्रrो, डॉ. अनंत फडके, इत्यादींच्या पुढाकाराने ‘लोकविज्ञान संघटने’ची स्थापना झाली. ‘पुस्तकांत साठवलेल्या निर्जीव ज्ञानापेक्षा लोकांच्या जाणिवांमध्ये रुजलेले जिवंत ज्ञान महत्त्वाचे असते’ या आइन्स्टाइनच्या विचारांनुसार लोकांशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न ‘लोकविज्ञान संघटना’ करत आहे. माणूस, निसर्ग, विज्ञान आणि समाज हे घटक एकमेकांशी जोडलेले आहेत; लोकांच्या प्रश्नांचे स्वरूप निसर्ग-वैज्ञानिक आहे, परंतु त्याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पैलूही आहेत, ते समजून घेऊन लोकांना ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रवृत्त करणे हे लोकविज्ञान संघटनेचं उद्दिष्ट आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी संघटना काम करीत आहे. उदाहरणार्थ १६ फेब्रुवारी १९८० या ग्रहणाच्या दिवशी लोकविज्ञानने मुंबईत ‘सूर्यजत्रा’ आयोजित केल्या होत्या. सौर चष्मे, सौर कुकर, ग्रहतारे, सूर्यमाला यांची माहिती देणारे तक्ते, चित्रे, फोटो, प्रतिकृती त्यात होते. तिथे ग्रहणासंबंधीचे गैरसमज लोकांनी स्वत:च तपासून दूर केले. त्याचप्रमाणे, मासिकपाळी, गर्भारपण, वंध्यत्व, मुलगा मुलगी अशा स्त्रियांच्या समस्यांवरील चित्रप्रदर्शन, स्लाइड शो इत्यादींमधून आरोग्य शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा यासाठी आरोग्य समितीनं मोलाचं काम केलं.
तसेच, विज्ञानाच्या गैरवापराला विरोध करताना, अण्वस्त्र स्पर्धेतील धोके, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, गर्भलिंग तपासणी, भोपाळ गॅस दुर्घटना यांबाबत लोकाभिमुख भूमिका घेतली. निसर्गसंपत्तीचा योग्य वापर, विकासाचे पर्यायी धोरण, विज्ञान जागरणाचे विविध मार्ग अशा बहुविध अंगांनी ही चळवळ कार्यरत आहे. यात लोकविज्ञान दिनदर्शिका हा उपक्रम लोकप्रिय ठरला. तसेच विज्ञान शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन पेरण्याच्या हेतूने घेतलेल्या ‘युरेका’ ही अभिनव विज्ञान चाचणी, धुळे इथे भरवलेली ‘विज्ञान-जत्रा’ तसेच, विज्ञान-गान, पोस्टर प्रदर्शने, गप्पा, पथनाटय़े, पुस्तके अशा अनोख्या सांस्कृतिक पद्धतींनी विज्ञान जागरण केलं. १९८२ मध्ये बी. प्रेमानंद यांचे आगीवरून चालत जाण्याचे प्रयोग गाजले.
या सर्व टप्प्यावर स्त्रियांचा जागरूक सहभाग विशेषत्वानं होता. त्यात डॉ. सुलभा ब्रrो, मुक्ता मनोहर, प्रेरणा राणे, सुजाता भार्गव, डॉ. कल्पना जोशी, गीता महाशब्दे, गौरी हावळ, शांती वैद्य, नीलिमा मुरुगकर, नीला मुळे, सुकन्या आगाशे, सुमंगल देशपांडे, निशा साळगावकर, विपुल अभ्यंकर, अमिता देशमुख, सुहास कोल्हेकर, मीना गोळे, डॉ. सुलभा काशीकर, डॉ. सीमा केतकर, संजीवनी कुलकर्णी, संगीता सावंत, मीना शिरगुप्पे, मृणाल मुजुमदार, लक्ष्मीसुंदरम, शैला माने आदी महाराष्ट्राच्या सर्व भागातील स्त्रिया होत्या.
त्याचप्रमाणे, ‘भारत जन-विज्ञान समूह’ ही राष्ट्रीय पातळीवरची महत्त्वाची संघटना १९८७ पासून कार्यरत आहे. या संदर्भात विनया मालती हरी यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘भोपाळला वायुदुर्घटनेनंतर भारतातील ३५-४० संघटनांनी १९८७ मध्ये एकत्र येऊन ‘अ.भा. जनविज्ञान आंदोलन’ नावाचे एक नेटवर्क तयार केलं. त्या माध्यमातून भारत जन-विज्ञान कला जत्था काढला गेला. याच दरम्यान, निरक्षरांपर्यंत विज्ञान घेऊन जाण्यासाठी साक्षरता आवश्यक म्हणून सरकारशी बोलणी केली आणि केंद्र सरकारच्या पातळीवर मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रीय साक्षरता अभियानाचा निर्णय घेतला गेला. साक्षरतेच्या सर्व शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद याला लाभला. देशभरातल्या शिक्षिका, प्राध्यापिका, कार्यकर्त्यां, लेखन करणाऱ्या, अभिनय करणाऱ्या स्त्रिया सामील झाल्या.
भारतभर ३५० जिल्ह्य़ांत, तर महाराष्ट्रात २५ जिल्ह्य़ांत असे जत्थे काढले गेले. त्यात वध्र्याच्या सुषमा शर्मा, परभणीच्या माधुरी क्षीरसागर, चंद्रपूरच्या एदलाबादकर, नाशिकच्या सुशीला म्हात्रे, इंदिरा आठवले अशा असंख्य जणी होत्या. या जथ्याने संपूर्ण देश ढवळून निघाला. त्यानंतर डॉ. एम.के. परमेश्वरन (सचिव), डॉ. माल्कम आदिशेषय्या (अध्यक्ष), यांच्या पुढाकारानं भारत जन-विज्ञान समितीची स्थापना १९९० मध्ये झाली.
मुख्य म्हणजे, केवळ निसर्गविज्ञान नव्हे तर, समाजविज्ञानाच्या आधारे जीवनाला भिडणारे प्रश्न हाताळले. उदाहरणार्थ, चाकाच्या शोधाने कष्ट कसे कमी झाले हे सांगून महिलांना प्रत्यक्ष सायकल चालवायला प्रवृत्त केलं गेलं. या वेळी वेगळ्या पद्धतीच्या साक्षरतेच्या हस्तपुस्तकांपाठोपाठ वाचनाची गोडी टिकावी म्हणून ‘जन-वाचन उत्सव’च्या माध्यमातून विविध विषयांवर पुस्तके काढली. लोकांकडे असलेला प्रचंड जीवनानुभवाच्या आधारे त्यांना लिहिते केले. तसेच विज्ञान, पर्यावरण, समता यावर सोप्या, गोष्टी रूपातील स्वस्त पुस्तके छापली व गावागावात वाचनाचे उत्सव भरवले.
तसेच विज्ञान प्रसारासाठी ‘आकाशोत्सव’, ‘आनंददायी शिक्षण आणि बाल विज्ञान उत्सव’, आरोग्य हक्कासाठी ‘जनस्वास्थ्य अभियान’, संसाधन साक्षरतेसाठी ‘गांव को जाने-गांव को बदले’ इत्यादी उपक्रम राबविले गेले. या दरम्यान १९९३-९४ च्या सुमारास समता विज्ञान आंदोलनाचा जन्म झाला. स्थानिक स्वराज संस्था ते राज्य पातळीवरील निर्णयप्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग वाढावा यासाठी देशभरात समता विज्ञान जथ्यांमधून हजारो स्त्रिया ३०-४० दिवस सामील झाल्या. विशेष म्हणजे बिहार, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब हरियाणा, येथून प्रथमच विज्ञान चळवळीत स्त्रिया आल्या. आजही देश पातळीवर विजयालक्ष्मी (आंध्र प्रदेश), कोमल श्रीवास्तव (राजस्थान), आशा मिश्रा (म. प्र.), उषा व पुष्पा (बिहार), उषा बेहरा (ओरिसा) अशा अनेक जणी कार्यरत आहेत.’’
याशिवाय महाराष्ट्र अंधश्रद्धानिर्मूलन समिती, सौरऊर्जेचा प्रसार करणाऱ्या डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, वनस्पतिशास्त्रात संशोधन करणाऱ्या डॉ. कल्पना जोशी, बीज संरक्षणासाठी मदत करणारे वसंत आणि करुणा फुटाणे, कविथा कुरंपट्टी, शेतीत शेतकरी आणि ग्राहक दोघांचेही हित बघून सेतू सांधणाऱ्या वसुधा सरदार, निर्णयप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या दिलनवाज यांचाही उल्लेख करायला हवा.
‘तुम हो रक्षक, तुम विस्फोटक! तुमपर निर्भर अंधे शतजुग! बदलकी तुम ऐलान! बदले वक्तकी तुम पहचान! रे विग्यान!’ अशा विज्ञानाशिवाय जगणे आता केवळ अशक्य आहे. या विज्ञानाच्या आधारानं आणि विज्ञानदृष्टीनंच आपल्याला पुढे जायचं आहे. लाखो, करोडो माणसांचं जीवन बदलायचं आहे. अधिकाधिक मानवी करायचं आहे हाच संदेश या सर्व चळवळीतल्या स्त्रिया देत आहेत.
anjalikulkarni1810@gmail.com