काय झाले गं बोटाला बाई बांधलीस चिंधी? – हा प्रश्न विचारून ग्रेस ज्या चवकशा करतात त्या फक्त समोरच्या बाईविषयी कुतूहल नव्हे तर अतीव कणव असलेला माणूसच करू शकतो.

दोरा चिरतो गळ्याला सुई बोचते टोकाला

रक्त तिळाएवढेच मग कसे ग चिंधीला

‘चिंधी’ या कवितेत मग खेडय़ातली बाई आणि कृषीसंस्कृतीतील असे तपशील येतात की वाटते ही कविता (किंवा अशा ग्रेस यांच्या अनेक कविता आहेत) सरोजिनी बाबर संपादित लोकगीतांच्या संग्रहातील एक गाणे आहे की काय? पण नाही! ग्रेस लगेच स्वत:ची मुद्रा या कवितेवर उमटवितात –

मला आठवते बाई, माझ्या बालपणातली

जिच्या अंगावर वाटे होती केशराची जाळी

अशा खूप ‘बाया’ ग्रेस यांच्या खूप कवितांमध्ये आपली ओळख घेऊन येतात. ग्रामसंस्कृतीतील बाई म्हणजे ‘ओऽऽ बाई’ नाही! स्त्री, बहीण, मोठी मुलगी, माहेरवाशीण, अशा आणि अनेक अर्थाने आणि रूपाने ‘बाई’ अवतरते. या संस्कृतीतील अनेक प्रथा, परंपरा, रूढी संकेत, रीतिरिवाज या कवितेत अचूक शब्दांनी साकार होतात – ही नवलाची गोष्ट आणि ग्रेसच्या वाचकांसाठी अभ्यासनीय बाब ठरावी. बाई, नणंद, जाऊबाई, सवत, सोबतिणी, आयाबाया, वेश्या, कुवारिणी, दीर आणि वहिनी, भातुकली, जार असे गणगोत आणि असा गोतावळा आणि अशा ओळी –

अर्धी फोडणी टाकून आता मालन येईल.

लख्ख करपला वास दहा तोंडाने बोलेल.

या स्त्रिया दु:खी आहेत. पण बंडखोर नाहीत. वाटय़ाला जे भोग आले आहेत ते त्या सोसतात. हे भोग जवळच्या, आपल्या माणसांनी लादले आहेत किंवा नियतीने गळी उतरवले आहेत. भरतारानेच घात केला असेल तर तक्रार कोणाकडे करावी –

नथ आडव्या दांडय़ाची ज्याने नाकात घातली

भांग मोडून त्यानेच केली कुंकवाची होळी

ग्रेस यांच्या कवितेत स्खलनशील स्त्रियांचे उदात्तीकरण वा समर्थन नाही, पण त्यांच्याविषयी आस्था आहे; त्यांना जवळच्या वाटतात. त्यांचे मूळ त्यांच्या विलक्षण आईच्या चित्तरकथेत असावे. कुंती आणि कर्ण यांच्या जीवनकथेचे आणि प्रगट अप्रगट नात्याचे संदर्भ त्यांच्या कवितेत अनेकदा येतात. कर्णाची उघडउघड नाही तरी आंतरिक जवळीकही ते अधोरेखित करतात. कधी कधी कर्णाच्या दु:खात कुंतीचे दु:ख ते विसर्जित करतात;  पक्षपात वाटावा इतपत –  ‘कर्णाच्या घनतेत की वितळतो संभोग कुंतीतला’ किंवा सुखाच्या ओढीने प्रमाद घडलेल्या स्त्रीला गर्भावस्था प्राप्त होते तेव्हा ग्रेस लिहितात –

‘नाव ललाटाचे एक, दुजे अंगो अंगी झाले.’

ही ओळ वाचून थोडा वेळ डोळे मिटले तर फिटले दुबरेधतेचे जाळे अशी अनुभूती येऊ शकते.

कधी कर्णामध्ये ग्रेस स्वत:ला पाहतात असे वाटू लागते. याचे मूळ आपल्याला ग्रेस यांच्या जन्मकथेमध्ये सापडू शकते. कवितेचा रूपार्थ लावण्यासाठी कवीचे चरित्र चिवडू नये, असे मला वाटते. पण स्वत: ग्रेस यांनीच पुरेशा स्पष्टपणे – अर्थात त्यांच्या शैलीतील स्पष्टता – ‘चर्चबेल’मधील एका लेखात ही कथा सांगितेली आहे आणि काही कवितांमधूनही सूचक संकेत मिळतात.

ग्रेसची ‘आई’ – कवितेतून प्रकट होणारी ही फक्त ग्रेसचीच आई असू शकते! या कविता लिहिताना, कवीने काळजावर दगड तरी ठेवला असेल नाहीतर हातामध्ये लेखणीच्या ऐवजी निखाऱ्याची फांदी तरी धरली असेल असे वाटते.

देशी कुण्या विदेशी भुलली कळे न सांज

आई निजे दुपारी उलटी करून शेज.

या आईचे मुलांवरील प्रेम अभावानेच दिसते. कष्ट करून वाढविले, शिकून मोठा हो, असे म्हटले असेही नाही. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ – असेही या कवितांना म्हणता येत नाही. उलट ग्रेस आईला काय म्हणतात – आडवाच झोपलो असतो

मीही गर्भाशयात तर

येऊ दिले असते का

तुझ्या वाटय़ाला माऊलीचे भाग्यपण?

अनुभव विलक्षण आणि शैली अवघड; प्रतिमांची उतरंड तर कधी उत्प्रेक्षांचा संकर; पुराणांपासून अर्वाचीन पाश्चात्त्य साहित्यातील पात्रे आणि प्रसंग यांचे संदर्भ; रामायण, महाभारत या काव्यातील सूत्रांपासून, कुराण आणि ख्रिस्ती धर्माच्या पायाभूत तत्त्वज्ञानाची ओढ, ज्या भाषेत मी जन्माला आलो तिथेही अनाथ वाटते मला’ अशी मराठीविषयी गाऱ्हाणेवजा तक्रार – या सगळ्यांचा परिपाक म्हणून ग्रेसच्या कवितेला दुबरेधतेचे कवच मिळावे यात नवल नाही. याशिवायही कारणे आहेत. पण ग्रेस काहीही म्हणोत, अंधारातून खुणेची शीळ यावी तशा या कविता साद घालतात, कुंडले चमकतात.

या कवितेची मुळे इथेच सापडतात. अगदी पूर्वसुरींच्या प्रेमकवितांची आठवण व्हावी अशा रचनाही ग्रेसच्या सुरुवातीच्या काळात सापडतात. प्रियकर-प्रेयसी पाहात असलेले सुखी भविष्याचे स्वप्नही ‘सोन्याच्या मोहरा’ या कवितेत पाहायला मिळते –

आण लिंबोणी सावल्या

नाही आढय़ाला छप्पर

वळचणीच्या धारांना

लावू चंद्राची झाल्लर.

पाय ओढत्या वाळूची

आण तेव्हाची टोपली

कधी खेळेल अंगणी

तुझी – माझीच सावली?

आणि प्रेयसीकडे अपराधी भावनेने केलेले हे आर्जव शैलीच्या दृष्टीनेही ओळखीचे वाटते –

गमतीचा खेळ जरासा चुकलो

तुझा रोष झालो  कुण्याकाळी

म्हणून बांधिले उन्हात का घर?

तडफडे ऊर आठवता

कृष्ण, द्रौपदी, सत्यभामा, रुक्मिणी, सीता, राघव, देवकी, ऊर्मिला, लक्ष्मण – ही पात्रे इतिहासातली, पुराणातली की महाकाव्यातली हा प्रश्न पडला असताना; या व्यक्ती ग्रेसच्या भावविश्वात पुननिर्मित होऊन कवितेत उतरल्या आहेत. इथे त्यांचे देवपण आणि थोरपण गळून पडते आणि हाडामासाच्या, मानवी विकार – विचार – वासना असलेल्या, व्यक्ती म्हणून ग्रेस चितारतात. त्याच पद्धतीने ते त्यांच्याशी संवादही साधतात. या सर्व व्यक्तींच्या परस्पर नात्यांसंबंधी, व्यवहारासंबंधी ग्रेस यांना कुतूहल आहे आणि अतीव आत्मीयताही आहे. आपणास माहीत असलेले या पात्रांचे व्यक्तिमत्त्व आणि ग्रेस यांनी लावलेला अन्वय यांच्यात मेळ बसत नाही. म्हणूनही कविता अगम्य! त्यात ‘वळण’दार शैली!

ग्रेस यांचा संध्याकाळशी असलेला ऋ णानुबंध सगळे जण जाणतात. पुन्हा पुन्हा ग्रेस संध्याकाळला शरण जातात –  ‘तू दूर तरीही घेते

मज कुशीत संध्यामाई.

आईच्या कुशीत शिरण्याचे भाग्य फारसे लाभले नाही. तेव्हा संध्याच आई – नव्हे माई होते. ‘माई’ या शब्दातून कणव, करुणा, दातृत्व, ज्येष्ठत्व, आदर अशा अनेक छटा व्यक्त होतात. (मराठीतील एका थोर समीक्षकाने ‘आता पडा ना त्या संध्याकाळच्या बाहेर’ असा अनाहूत सल्लाही एका लेखातून ग्रेस यांना दिला होता.) एकटेपणा, एकाकीपण, तुटलेपण ज्याच्या वाटय़ाला आले, आणि ज्या अनुभवांनी कवीच्या काळजावर दाट काजळी धरली त्याने उजेडाची वाट धरावी म्हणून सल्ला देणे सोपे असते. पण ‘लागी मोरी जाने वही जिसके लगी होय.’

कुणी आपुले म्हणेना

कुणी बिलगेना गळा

कंठ दाटताना झाला

रंग कावळ्याचा काळा

– असा करुण उदगार जो काढतो आणि आयुष्याच्या वाटचालीचे वर्णन या साध्या सोप्या शब्दात जो (दुबरेध) कवी करतो त्याकडेही लक्ष

द्यावे.. ते वर्णन असे –

दीर्घ आजारासारखे

सारे आयुष्य चालले

कोणी भेटाया न आले

नाही निरोपाची फुले.

सांध्यपर्वातील सोबतिणी, संगिनी यांचे आणि त्यांच्या सोबतचे अनुभव मात्र भर दुपारचे असावेत हेही विलक्षणच!

– ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते

– माझ्या कुळाप्रमाणे मृत्यू मला दुपारी

– दुपारचे सचित्र ऊन मृगजळास लांबवी

अनंत इंद्रियातले स्वतंत्र शोक जागवी.

– सुमित्रा तिचे नाव उच्चारतो मी

पुन्हा भव्य माध्यान्ह कालातले.

मुलींनो, निघा ऊन वेचून आणा

नदीच्या खुल्या वाळवंटातले

ग्रेस यांच्या काही कविता म्हणजे एक किंवा अनेक स्त्री पात्रे असलेल्या कथा आहेत; आणि बहुतेक कथा शोकपर्यवसायी आहेत. ‘स्त्री’ हे त्यांच्या काव्यप्रेरणेचे एक सशक्त केंद्र आहे. या कवितांमधील किंवा एकूणच स्त्री, तिचे विभ्रम, तिची सोशीकता, तिची आवाहनक्षमता, तिचा देह, तिची स्वप्रीती, तिचे स्वयंभूपण, तिच्या देहाने तिला दिलेली सुखे आणि दु:खे, तिचा कसोटीच्या काळातील चिवटपणा, तिच्यातील क्षमाशीलता, तिच्यातील आक्रमकता, अस्तित्व पणाला लावणारी बेफिकिरी, स्त्रीसमूहातील संलग्नता.. अनेकानेक रूपे साकारित ग्रेसची भाषा, शैलीच्या आविर्भावाने दिपवून टाकते. कधी ही शैली, प्रेमाच्या बाईला, जगरहाटीची जाणीव करून देताना धक्कादायकही होते..  कातडीला सोलणारे

आतडीच खाती

अन्नामध्ये विष्ठेलाही

सामावून घेती

हळवी, माहेर, निर्मळा, चुडा, साजण, उर्मिला, मुलगी, राधा पार्थसारथी, माई, नर्तकी, भातुकली, जाऊबाई, आईचे गाणे, उखाणे, नूरजहां, इन्ग्रेड बर्गमन, मरलिन मन्रो, उदासिनी, सखी, द्रौपदी, स्रग्धरेच्या प्रार्थना, कुलस्वामिनीच्या प्रार्थना, देवी, कालिंदी वहिनी, गंगा, पान्हा, लता मंगेशकर, माऊली, ती अशी, सांगातिणी, जिवाची वैष्णवी, बकुळा, सारंगा, बाई – ही आणि अशी अनेक कवितांची शीर्षकेच सांगतात की ग्रेस यांच्या कवितेशी स्त्री ही त्वचेसारखी अभिन्न आहे.

आता दुबरेधता तर आहेच. पण अर्थ कवीला विचारू नये. (नाहीतर दिवंगतांच्या कवितांचे काय?) कवितेतच कुठेतरी कळ असते. गवसावी लागते. नाही गवसली तर पुस्तक मिटून ठेवावे. ग्रेस म्हणतात, ‘कधीतरी या कवितेचा अर्थ स्पष्ट होत जाईल.’ कवीचे ऐकावे. मर्ढेकर स्पष्ट होण्यासाठी पंचवीस वर्षे लागलीच ना?

‘आईचे गाणे’ या कवितेतील दोन ओळी-

ते चंद्रगंध विटले, चोळी दुधात भिजली

पाठीत वाकताना, आई गळ्यात हसली

– ठीक आहे, मागील काळाने सगळे सुख, आनंद ओरबाडले. पण बाळ पदरात आहे आणि स्तन, पाजण्याच्या असोशीने दुधाने ओसंडून आले आहेत. (दुसऱ्या शब्दात – ‘ओठांची मिथिला ल्याया, पदरातून नभ व्याकूळते.) आई पाठीत वाकते – झोळीतून घेताना किंवा टाकताना.. छातीशी घेताना.. बाळाचे मन रमविण्यासाठी किंवा निजविण्यासाठी  गाणे गुणगुणते – आई गळ्यात हसली!

नर्मदेच्या पाण्यात उभे राहून समष्टीच्या हितासाठी आपले अस्तित्व पणाला लावणाऱ्या स्त्रीकडे ग्रेस, ‘भयचकित नमाचे तुज रमणी’ – अशा दृष्टीने पाहतात. द्रौपदी आणि कृष्ण यांच्या नात्याचा आदर राखून त्यांचे नाते सखी आणि सखाया पलीकडचे अधोरेखित करतात.

स्त्री आणि पुरुष यांचे नाते शारीर संबंधांनंतर पूर्णत्वाला पोचते, एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाला एकमेकात विसर्जित केल्यानंतर सार्थक ठरते अशी ग्रेस यांची ठाम धारणा आहे. हा रतिभाव किंवा त्यासंबंधीचा आग्रह यात निर्मळपणा आणि नितळपणा दिसतो. कुठेही ओंगळपणा नाही.

अंग अंग माती अभंग

मग संगाची का चोरी?

– असा त्यांचा सवाल आहे.

‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ या संग्रहातील, ‘दृष्टांतपर्वा’तील एका कवितेत ‘योनी’ असा शब्द न वापरता ‘जननेंद्रिय’ असा शब्द दोन – तीन ठिकाणी उपयोगात आणला आहे. कविता प्रसिद्ध झाली तेव्हा भल्याभल्यांनी अश्लील म्हणून नाके मुरडली. पण हा शब्द मातृत्वाकडे, सृजनशक्तीकडे संकेत करतो हे लक्षात येण्यास ‘जाणकारांना’ जरा वेळच लागला.

‘ग्रेस’च्या कवितेतील स्त्रिया अमुकवादी, तमुकवादी, वादी, प्रतिवादी, प्रतिक्रियावादी अशा कुठल्याच, शीर्षकात बसवता येत नाहीत याचा अनेकांना त्रास होतो. ‘सौंदर्यवादी’ या शब्दाला ऐकून तिडीक उठणारेही अनेक. आणि ग्रेस तर कुठलेही दडपण न जुमानता ‘मी कलेच्या बाबतीत सौंदर्य सत्तेच्या बाजूने उभा आहे’ असे म्हणायचे!

शेवटी एक नवलाई : खुद्द ग्रेसमध्येच एक स्त्री दडलेली, नव्हे सामावलेली होती. तसेही ‘ग्रेस’ हे मुलीचे, स्त्रीचे नाव! ग्रेस यांनी ‘उखाणे’ ही लिहिले आणि वाचकांना उखाणे घातले. (स्तनावर माझ्या। जांभळाची झाक। ओली आणभाक। आठवते ॥ – अशा कविताही लिहिल्या.)

वैधानिक इशारा :  ग्रेसच्या कवितेसाठी, त्यांनी लिहिलेल्या (च) ललित लेखांचा फक्त आधार घ्यावा. भाषणे आणि मुलाखतींचा नव्हे. त्यांच्याविषयीच्या आख्यायिका आणि अफवा यांचा तर नव्हेच. त्यांनी स्वत:च कवितेत सांगून ठेवले आहे – चरित्राचे माझ्या हसुनि मिटवा ग्रंथ सगळे.

विश्व गळता या तिराला वृक्ष झाल्या बाभळी

श्रावणातील वासनांची गर्द प्रतिमा जांभळी

 चंदनाचा धूप जळतो देह झाली मंदिरे

अर्थ प्राशुन शब्द माझा आज तुजला आवळी

 पाय सोडून तू मिटावी या जळाची कंपना

 दूर क्षितिजाला जडावी ही तुझी काया गव्हाळी

 श्वास शिंपुन उत्सवाला चालली ही लोचने

मी पुढे अन् त्या पुढे तू अमृताच्या राऊळी

 

– नारायण कुळकर्णी कवठेकर

narayankulkarnik@gmail.com