कालच आपण भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या स्वतंत्र देशातल्या कंजारभाट समाजातल्या ‘तिची’ मात्र आजही लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेतली जाते. ती खरी की खोटी ठरवली जाते, या कुप्रथेविरुद्ध या समाजातल्याच काही तरुणांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी समाजातल्याच लोकांच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस त्यांना करावं लागत आहे, त्यासाठी त्यांना मारहाणही झाली आहे. या देशातल्या लोकांनी आपल्यापाठी उभं राहावं, असं आवाहन हे तरुण करत आहेत. आपल्या समाजातलं हे जळजळीत सत्य कंजारभाट समाजातल्याच तरुणीच्या शब्दांत..
मी प्रियंका (२६) राहणार पिंपरी पुणे. स्वतंत्र भारत देशाची नागरिक. लहानपणापासून आमच्या कंजारभाट समाजातील अनेक प्रथा बघत मोठी झाले. तेव्हा अर्थ कळायचे नाहीत, पण जसजशी मोठी होत गेले तसतशा कुठल्या प्रथा कशासाठी हे लक्षात येऊ लागलं. त्यापकी एक कुप्रथा म्हणजे कौमार्य चाचणी! जी मी फक्त आमच्या समाजात पाहिली. वय लहान असल्याने ही परीक्षा नेमकी काय, कशासाठी हे कळत नसायचं. लग्न तर होतच होती, पण कधी त्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बिर्याणी खायला घातली जायची तर कधी मुलीला मारहाण केली जायची. नंतर कळलं की बिर्याणी खायला घालणं हे कौमार्य परीक्षा पास झाल्याचं लक्षण तर मारहाण म्हणजे कौमार्य परीक्षेत नापास होणं.
लग्नाच्या पहिल्या रात्री केली जाणारी ही योनिशुचिता वा कौमार्य चाचणी! लग्न झालं की त्या रात्री नवा नवरा पांढरीशुभ्र चादर घेऊन नवी नवरी असलेल्या खोलीत जातो. बिछान्यावर ही चादर पसरली जाते. शरीरसंबंध झाला की त्या चादरीवर रक्ताचा डाग पडणं सक्तीचं. (ते झालं नाही की ती नवी नवरी ‘खोटी’.) जे काही असेल ते घेऊन तो नवरा मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीच्या बाहेर येतो. पंच मंडळी निवाडय़ाला बसलेलीच असतात. ते विचारतात, ‘रात्री जो माल तुला दिला होता, तो कसा? खरा की खोटा?’ इतक्या गलिच्छ भाषेत त्या नव्या नवरीचा अपमान आमच्या समाजात केला जातोय, आजही एकविसाव्या शतकात!
ज्या क्षणी मला या चाचणीविषयी कळले तेव्हा मला धक्काच बसला. शाळेत शिकलेल्या १० मूल्यांपकी स्त्री-पुरुष समानतेचं एक मूल्य आठवलं आणि प्रश्न निर्माण झाला की इथे समानता कुठे आहे? अक्षरश: किळस वाटली या गोष्टीची आणि तेव्हाच ठरवलं की एके दिवशी मी या घाणेरडय़ा प्रथेचा विरोधात पाऊल उचलणार. आज मी या प्रथेविरोधात आवाज उठवला आहे आणि सुदैवाने माझ्यासारखा विचार करणारे अनेक तरुण-तरुणी या समाजात आहेत आणि माझ्या साथीला उभे आहेत. खरे तर अनेकांना आमच्या बरोबर यायचं आहे परंतु कुटुंबाच्या दबावामुळे आणि समाजातील लोकांच्या भीतीमुळे ते समोर येऊ शकत नाहीयेत, पण मला खात्री आहे हळूहळू सगळ्यांनाच आमच्यावरच्या या अन्यायाचं सत्य कळेल आणि तेही आमच्याबरोबर उभे राहतील.
अर्थात आज मी आणि माझ्या बरोबरच्या काही जणांनी पुढाकार घेतला आहे त्यासाठी समाजातल्या लोकांचा आणि काही नातेवाईकांचा प्रचंड विरोध आहे. माझ्या वस्तीमध्ये राहणारे लोक सध्या अशा पद्धतीने बघतात किंवा वागतात की मी एखादा गुन्हाच केला आहे. आणि याची शिक्षा माझ्या भावालाही झालीय. वस्तीत होणाऱ्या क्रीडास्पर्धामध्ये त्याला भाग घेऊ दिला जात नाहीए. थोडक्यात, आमच्या जातपंचायतीने बहिष्कृत करण्याआधी समाजातले लोकच मला आणि माझ्या कुटुंबाला बहिष्कृत केल्यासारखे वागवत आहेत. या गोष्टीचं फार वाईट वाटतं की ज्या समाजातल्या मुलींच्या स्वाभिमानासाठी मी झगडतीये त्याच समाजाचे लोक मला आणि माझ्या ‘स्टॉप द वि रिच्युअल’ ग्रुपमधल्या प्रत्येकाला ‘समाजद्रोही’, ‘समाजकंटक’ म्हणत आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या समाजातील उच्चशिक्षित आणि अशिक्षित दोघांनाही ही कौमार्य चाचणी बंद व्हायला नको आहे. कारण त्यांच्या मते ही चाचणी महत्त्वाची आहे. ती जर नाहीशी झाली तर समाजातील मुली बिघडतील आणि मर्यादेत राहणार नाहीत. अशा विचारसरणीच्या लोकांना मला काही प्रश्न विचारावेसे वाटतात कीकौमार्य चाचणी ही फक्त भाट समाजात आहे म्हणून काय फक्त भाट समाजाच्या मुलींचेच चारित्र्य स्वच्छ आहे आणि देशभरात ही प्रथा कुठल्याच समाजात नसल्यामुळे देशातल्या मुली चारित्र्यहीन आहेत का? सगळ्याच मर्यादेच्या बाहेर आहेत का? आणि या प्रथेमुळे भाट समाजात असणाऱ्या सगळ्याच मुलींचे कौमार्य सुरक्षित राहील का? विज्ञान हा विषय किंवा वैज्ञानिक कारणे भाट समाजातल्या मुलींना लागू होत नाहीत का? मुळात ही जी पद्धत आहे ती विज्ञानाच्या निकषावर रास्त आहे का कारण यौनपडदा फाटण्यासाठी मुलीचं खेळणं, अपघातही कारणीभूत असू शकतात, हे या लोकांना कधी कळेल? का मुलींच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा बाजार या समाजात मांडला जातो? शिवाय मुलांच्या कौमार्य परीक्षेसाठी निकष काय? मुलाचं कौमार्य टिकलेलं आहे का, हा प्रश्न त्यांना कोण विचारणार? म्हणजे अगदी सती प्रथेपासून ते २०१८ मध्ये चालू असलेल्या कौमार्य चाचणीपर्यंत फक्त मुलींवरच अन्याय का? तुम्ही नक्की या स्वतंत्र भारताचे नागरिक आहात का? याची मला शंकाच वाटते.
स्त्रीत्वाचा अपमान करणारी ही प्रथा आहे ती बंद व्हायलाच हवी. आज आमच्या समाजातील मुलंही शिकत आहेत. सुशिक्षित होत आहेत. चांगल्या नोकऱ्या मिळवत आहेत तरीही अनेक दारूभट्टीमार्फत काळा पसा कमवत आहेत. अशा लोकांची किंमत इतर समाजात किती असणार, हे लक्षात येत नाही का? देश, जग कुठून कुठे चाललं आहे आणि आम्ही मात्र मुलीच्या कौमार्याची परीक्षा घेत आहोत, हे कधी थांबणार?
कौमार्य चाचणीबरोबरच बालविवाह, शुद्धीकरण आणि इतरही अन्याय्य प्रथा भाट समाजात आहेत आणि त्याचा न्यायनिवाडा केला जातो जातपंचायतीमार्फत. कुणी अधिकार दिले त्यांना? भाट समाजातली ही कुठल्याही प्रकारचा आधार नसलेली न्याय्य व्यवस्था बंद होणे फार गरजेचे आहे. उदाहरणच द्यायचं तर एका स्त्रीच्या शुद्धीकरणाचे देता येईल. आमच्या समाजात कोणत्या अन्याय पद्धती आहेत त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण. नाशिक जिल्ह्य़ातील संगमनेर गावातल्या एका स्त्रीवरच्या गलिच्छ अन्यायाचं नाव होतं, शुद्धीकरण! तिच्यावर अनतिक संबंधाचे आरोप लावून तिचं शुद्धीकरण करावं लागेल, असं फर्मान या बुद्धीला गंज चढलेल्या लोकांनी काढले. जंगलात जाऊन धीज गोळा करणे म्हणजेच रात्रभर तापवलेला लोखंडी गोळा तिच्या ११ वर्षीय मुलाच्या हातात ते देणार आणि ती स्त्री पूर्णत: वस्त्रहीन होऊन तिथे उपस्थित पुरुषांसमोर अर्थात पंचांसमोर १०७ पाऊले चालणार. ती चालत असताना तिच्यावर गव्हाच्या कणकेचे गरम गोळे फेकून मारले जाणार. ती चालत असताना तिच्या त्या ११ वर्षीय निरागस मुलाचे हात भाजून निघाले तर ती स्त्री पापी आणि दोषी हे सिद्ध होणार आणि जर मुलाचे हात भाजले नाहीत तर ती ‘शुद्ध’ असा निकाल जात पंचायत देणार. वा काय न्याय! पण सुदैवाने तिनेच जातपंचायतीचा हा निर्णय फेटाळून लावला आणि पोलिसांकडे धाव घेतली.
दुसरी घटना नाशिक जिल्ह्य़ातील संगमनेरमधल्याच पोलीस भरतीसाठी तयारी करीत असलेल्या मुलीची. गेली कित्येक वर्षे तिच्यावर अन्याय होत आहे. तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री ती कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकली नाही म्हणून तिला मारहाण करण्यात आली. तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्यात आला. तिचा नवरा किंवा कुटुंबीय कुणीही हे लक्षात घेतलं नाही की तिचे कौमार्य पटल लग्नापूर्वी फाटण्यामागचं कारण तिची पोलीस भरतीची तयारी होती. आजही तिला प्रचंड मानसिक त्रास दिला जातोय, तिचा साथीदार तिला, ‘‘तू काय मला लाल रंग दाखवला नाहीस.’’ असं उठता बसता बोलून मारहाण करतो, छळ करतो. आजही ती मोकळा श्वास घेऊ शकत नाही. कारण तिचा न्यायनिवाडा करणारं कोणी नाही. जे आहेत त्यांचे हेच विचार आहेत. कुठपर्यंत चालू राहणार हे?
मुळात ही कौमार्याची परीक्षा कशासाठी? मुलींनी व्यभिचार करू नये म्हणून. का? प्रत्येक मुलगी वयात आली म्हणजे व्यभिचार करणार असेच यांना वाटते का? व्यभिचार म्हणजे काय याचा नेमका अर्थ तरी या लोकांना माहीत आहे का? मला संत कबीरांचा एक दोहा आठवतो, ‘नहाये धोये क्या हुआ, जो मन मल न जाए, मीन सदा जल में रहे, धोये बास न जाए’ ज्यांच्या मनातच घाण आहे त्यांनी किती जरी जल स्नान केलं तरी मनाची शुद्धी होणार नाही, जसा मासा पाण्यातच राहतो पण बाहेर काढला तरी त्याचा वास जाता जात नाही. म्हणूनच या घाणेरडय़ा प्रथा बंद होणं जरुरी आहे, अशा प्रथा ज्या कोणाचंही भलं करत नाही. याचमुळे कंजारभाट समाज आज मागे पडला आहे. याचं आम्हाला दु:ख होतंय. त्याच्या विरोधातच आम्हाला हा लढा लढायचा आहे.
आज अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या (अंनिस) पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या प्रथेचा विरोध करत आमच्या साथीला उभ्या आहेत. भाट समाजातील काही युवा ‘स्टॉप द वि रिच्युअल’च्या चळवळीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत तेव्हा त्याही या चळवळीत सहभागी झाल्या.
आज त्यांचेही हेच प्रयत्न चालू आहेत की या चळवळीला यश यावं. या कौमार्य चाचणीच्या विरोधातलं एक पाऊल म्हणून ‘स्टॉप द वि रिच्युअल’ ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक चळवळ आमच्याच समाजातल्या विवेक तमाईचेकरने सुरू केली आहे. नवतंत्रज्ञानाच्या युगात आपल्याच तरुणांनी या गोष्टीला वाचा फोडावी, असं त्याला वाटलं आणि त्याने स्वत:पासून सुरुवात केली. त्याने ‘स्टॉप द वि रिच्युअल’ या ग्रुपद्वारे भाट समाजाच्या तरुणांना जोडून त्यांच्यामध्ये या कुप्रथेविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी, त्यांची मतं मांडण्यासाठी, चर्चा करण्यासाठी हे एक माध्यम निर्माण केलं आहे. या माध्यमाच्या पलीकडे जाऊन जातपंचायत आणि सामाजिक बहिष्कार याविरोधी कायद्यातील तरतुदींबद्दल प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याने काही तरुणांना सोबत घेतले आहे. कौमार्य परीक्षण आणि यांसारख्या तत्सम चालीरीतींना मूठमाती देण्यासाठी कंजारभाट समाजातील नवतरुण आणि तरुणींनी जास्तीतजास्त संख्येने जोडलं जावं यासाठी ही चळवळ असून समाजातलेच नव्हे तर इतरही सुजाण नागरिक या चळवळीशी जोडले गेले आहेत. समाजातील शोषक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समाजातील युवांनी उचललेलं हे एक संघटित पाऊल आहे. हे पाऊल आता यशाच्या दिशेने, मुक्तीच्याच दिशेने पडायला हवे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय राज्यघटनेने दिलेला स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल २१, भाग ३ अन्वये खासगी अधिकार (राइट टू प्रायव्हसी) हा प्रत्येकासाठी आहे. जो अधिकार या समाजात सर्रास पायदळी तुडविला जात आहे. त्यावर आता गंभीरपणे निर्णय व्हावा.
या चळवळीमध्ये सक्रिय असणारा अक्षय तमाईचेकर म्हणतो की, आज २१व्या शतकातसुद्धा अशा प्रकारच्या कुप्रथांना आपला समाज खोटय़ा प्रतिष्ठेसाठी कवटाळून बसतो याहून लांच्छनास्पद दुसरी कोणती बाब नाही. पुरोगामी म्हणविणाऱ्या व शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार असलेल्या आपल्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या गोष्टी या सर्रास घडत आहेत आणि त्याकडे आपला सुशिक्षित, पुढारलेला समाज व शासकीय यंत्रणा कानाडोळा करताना दिसत आहे. हे थांबायला हवे. नवउदारमतवाद्याच्या या प्रवाहात आणि महिला सक्षमीकरणाच्या युगात आजही हा समाज स्त्रियांच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष देण्याऐवजी तिच्या कौमार्य परीक्षणात, जातपंचायतीत अडकून पडलाय. खरी चीड तर तेव्हा येते जेव्हा ही जातपंचायत स्वत:चं असं संविधान बनवते ज्याला समाजात ‘काळी किताब’ असं म्हटलं जातं आणि त्यात लिहिल्या गेलेल्या अनिष्ट प्रथांना आजही थारा देते. म्हणूनच ‘स्टॉप द वि रिच्युअल’ या चळवळीच्या माध्यमातून हे जातपंचायतीद्वारे चालवल्या जाणाऱ्या या प्रशासनाला मूठमाती देण्याचा आणि जातीनिर्मूलनाचा आम्ही ठाम निश्चय करत आहोत.’’
आम्हाला या कुप्रथेतून बाहेर पडण्यासाठी समाजाची साथ हवी आहे, कारण आमच्याच समाजातली आमची म्हणवणारी माणसं आमच्या विरोधात गेली आहेत. आम्हाला बहिष्कृत करू पाहात आहेत. खाली दिलेल्या फेसबुक पेज लिंकवर क्लिक करून आमच्या चळवळीला तुमचा पाठिंबा जाहीर करा, आम्हाला बळ मिळेल या स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या कुप्रथेच्या विरोधात लढण्याचं!
आम्हाला या कुप्रथेतून बाहेर पडण्यासाठी समाजाची साथ हवी आहे, कारण आमच्याच समाजातली आमची म्हणवणारी माणसं आमच्या विरोधात गेली आहेत. आम्हाला बहिष्कृत करू पाहात आहेत. खाली दिलेल्या फेसबुक पेज लिंकवर क्लिक करून आमच्या चळवळीला तुमचा पाठिंबा जाहीर करा, आम्हाला बळ मिळेल या स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या कुप्रथेच्या विरोधात लढण्याचं!
– प्रियंका तमाईचेकर
https://www.facebook.com/stoptheVritual/
victoryinjesus918@gmail.com
chaturang@expressindia.com