‘मराठय़ांच्या लढायांचा इतिहास’ हे शिवराम महादेव परांजपे यांचे पुस्तक ज्याला महाराष्ट्र, भारत, इंग्रज आणि मुघल सत्ता जाणून घ्यायची आहे, त्यांनी वाचलेच पाहिजे असे आहे. एकूण १५ लढाया आणि त्यासाठी ४५६ पृष्ठे यामुळे पुस्तकाला संदर्भग्रंथाचे मोल प्राप्त झाले आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२८ मध्ये आली होती. दुसरी आवृत्ती २०१७ मध्ये आली आहे. या पुस्तकातील सारे लेख १९२५ ते १९२८ या काळात ‘चित्रमयजगत’च्या अंकांतून प्रसिद्ध झालेले होते. ते एकत्र करून पुस्तकाचे रूप त्याला देण्यात आले. १८०२ ते १८१८ या सोळा वर्षांतील लढायांची वर्णने त्यात आहेत. लढायांच्या निमित्ताने परांजपे समाजाचे जे दोषदिग्दर्शन करतात ते खूप महत्त्वाचे आहे. एक संशोधक पत्रकार, एक समाजहितैषी संपादक आणि लढाऊ बाण्याचा कार्यकर्ता इतिहासाकडे कसे बघतो, याचे उत्तम दर्शन या पुस्तकात घडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शि. म. परांजपे हे वक्रोक्तीपूर्ण लेखन करण्यात वाकबगार होते. त्यांची शैली, निरीक्षणे यांची गोळाबेरीज बघायची असल्यास हे पुस्तक त्याचा उत्तम नमुना आहे. प्रस्तावनेमध्ये लेखकाने या पुस्तकाचे जे सार सांगितले आहे ते महत्त्वाचे आहे. ‘मागील इतिहासांची पुस्तके वाचावयाची कशाला? तर त्यांच्यापासून आपल्या देशाच्या भावी इतिहासाच्या बाबतीत आपल्या मनाला काही तरी उत्साह उत्पन्न व्हावा म्हणून.’ खरे म्हणजे हे निरीक्षण सगळ्याच इतिहासाच्या पुस्तकांना लागू होते.

या पुस्तकात जी परांजपेशैली आढळते, त्याची काही उदाहरणे पाहू या- ‘आपले पराभव शत्रूंच्या अंगच्या अधिक शौर्यापेक्षा आपल्या अंगच्या अधिक दुर्गुणांमुळेच झालेले आहेत.’ ‘एखाद्या निर्जीव तोफेचे नाव महाकाळ ठेवण्यात काही मुद्दा नाही. तोफ ही महाकाळ नव्हे, तर मनुष्याची छाती ही महाकाळ आहे!’

इंग्रजांच्या वर्तनाबद्दलची त्यांची एक टिप्पणी अथवा निरीक्षण महत्त्वाचे आहे. ते लिहितात – ‘.. आपल्या शत्रूला प्रत्यक्ष शस्त्रांनी पराजित करण्याच्या आधी त्यांनी (इंग्रजांनी) त्याला लोकमताच्या नैतिक दृष्टीने अगदी अध:पतनाला नेऊन पोचविलेले असते.’ ‘रायगड किल्ल्याची दोन स्थित्यंतरे’ या लेखात ते लिहितात – ‘पण पडत्या काळामध्ये मूळच्या कर्त्यां पुरुषांचे हेतू आणि उद्देश सगळे बाजूला राहतात.’

शेवटचे एक निरीक्षण आजच्या काळालाही लागू आहे. ते देण्याचा मोह टाळता येत नाही म्हणून देतो. ‘जेथे आपल्या देशातील लोक लाच घेऊन आपल्याच देशाच्या विरुद्ध फितुरी करण्याला तयार होतात, तेथे फितूर करविणारापेक्षा स्वदेशाच्या विरुद्ध फितूर होणारेच जास्त गुन्हेगार होत. या गोष्टी हिंदुस्थानातील लोकांना समजतील तो सुदिन!’

अशा निरीक्षणांमधून पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचनीय झालेले आहे. अर्थात, असे असले तरी सच्चा देशभक्तांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे सामथ्र्यही या लढायांमध्ये आहे. भरतपूरच्या किल्ल्याच्या लढाईचा इतिहास वगळता अन्य लढाया म्हणजे पराभवांचा इतिहास आहे. प्रत्यक्ष लढाईचा एक दिवस वगळला, तर त्याच्या अगोदर कित्येक दिवस चाललेली युद्धाची तयारी, फितुरी यांवर या पुस्तकात सखोल प्रकाश टाकण्यात आलेला आहे. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी परांजपे यांनी या विषयावर लिहून उपकारच केले आहेत. विजयापेक्षा पराभवाच्या कहाण्या जास्त काळ लक्षात राहतात, असे जे म्हणतात त्याची सत्यता वरील लढायांचा इतिहास वाचल्यावर पटते.

या पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढण्यास १५ चित्रे आणि २४ नकाशे कारणीभूत आहेत. आपल्याकडे इतिहासाच्या पुस्तकात क्वचितच नकाशे असतात. या पुस्तकात मात्र चित्र आणि नकाशांचा भरपूर वापर केल्यामुळे विषय समजण्यास सोपा झाला आहे. परंतु, नकाशे समजण्यास मात्र दुबरेध झाले आहेत. पुढच्या आवृत्तीत या पुस्तकावर एखादा कुशल संपादकीय हात फिरला, तर ही उणीवसुद्धा दूर होईल. लष्करी डावपेचांची चर्चा सविस्तर केलेली आहे, हे पुस्तकाचे बलस्थान आहे.

लेखकाचे समाजव्यवहाराचे निरीक्षण, अफाट वाचन, तर्कसुसंगतता याची प्रचिती आपणास पुस्तकात ठायी-ठायी येते. सामान्य वाचकांचे समाधान होत असले, तरी अभ्यासकांची मात्र गैरसोय काही ठिकाणी झाली आहे. उदा. पुस्तकात पृ. २७ वर परांजपे यांनी लेफ्टनंट कर्नल ब्लॅकर यांच्या इतिहासलेखनाचा संदर्भ दिला आहे. या संदर्भात त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक दिलेले नाही. पुस्तकाच्या शेवटी संदर्भग्रंथांची यादी दिलेली नाही. त्यामुळे ब्लॅकर यांनी जर ४-५ ग्रंथ रचले असतील, तर नक्की संदर्भ कोणता आहे? येथे कोणत्या ग्रंथातील संदर्भ पृष्ठ क्रमांकानुसार घ्यायचा आहे, हे समजत नाही. मुळात हे पुस्तक जेव्हा १९२८ मध्ये ‘चित्रमयजगत’मध्ये क्रमश: लेख स्वरूपात छापले गेले, तेव्हा वाचकांना ब्लॅकर कदाचित समकालीन असू शकतील असा अंदाज आहे. २०१७ मधील वाचकाचा विचार केल्यास प्रकाशकांनी पुढील आवृत्तीत संदर्भग्रंथांची यादी, स्थल सूची, व्यक्ती सूची यांचा समावेश करण्यास हरकत नाही. याच्याच जोडीला पुणे शहर किंवा महाराष्ट्र आणि भारतातील जी जुनी नावे पुस्तकात आलेली आहेत, त्यांची सध्याची नावे, जवळची खूण दिल्यास वाचकांची आणखी सोय होऊ शकेल. या पुस्तकाची गरज इतिहासाचे अभ्यासक, पत्रकार, देशाचे नेतृत्व करणारे राजकारणी, सहकारी अभ्यासक सगळ्यांसाठी आहे. सध्याच्या युगातील स्पर्धापरीक्षांना बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तर हे पुस्तक निश्चितच उपयोगी आहे.

शेवटचे विजयाचे प्रकरण ‘भरतपूरचा किल्ला आणि इंग्लिशांचे तेथील चार पराभव’ हे मुळापासून वाचण्यासारखे आहे. ‘भारतीय युद्धात जिंकतात, पण तहात हरतात,’ हे सिद्ध करणारेच हे प्रकरण आहे.

‘मराठय़ांच्या लढायांचा इतिहास’- शिवराम महादेव परांजपे,

वरदा प्रकाशन,

पृष्ठे – ४५६, मूल्य – ४५० रुपये. 

प्रा. डॉ. गणेश राऊत

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivram mahadev paranjape marathi book review
First published on: 11-06-2017 at 02:37 IST