‘पिंक’,‘पार्च्ड’ सारखे सिनेमे हे आपल्या पितृसत्ताक संस्कृतीतली गुंतागुंतच दर्शवतात. या दोन्ही चित्रपटातून दिसतं ते रूढी परंपरांच्या चौकटी मानणाऱ्या समाजात राहून स्रीचे सक्षमीकरण शक्य नाही. परिस्थिती बदलण्यासाठी पळून जाणं हा सक्षमीकरणाचा मार्ग असू शकतो का? आणि पळणं तरी कुठवर आणि कोणापासून?
मी देहानं एकच असले तरी माझ्यात दोन स्त्रिया वस्तीला असतात. जीवनात वाटय़ाला येणारे सर्व थरार, उत्कटता, धाडस हे सगळं काही माझ्यातल्या एकीला हवंय, एन्जॉय करायचंय. आणि दुसरीला? परंपरांच्या बेडय़ांना संस्कार मानत, नियोजनबद्ध, कौटुंबिक चौकटीत राहात गुलामीचं आयुष्य जगायचंय कारण ते अधिक सुरक्षित आहे. मी एक भटकंतीप्रेमी आहे त्याच वेळी एक गृहिणीदेखील आहे. आम्ही दोघी एकाच देहात वसतो.
– पाओलो कोएलो
आपल्यापैकी बहुतेकांनी ‘पार्च्ड’, ‘पिंक’ आणि अगदी ‘सैराट’देखील बघितला आहे. राकट, दणकट थोडक्यात अगदी माचो व्यक्तिमत्त्वाचा पोलीस वर्दीतला अधिकारी किंवा फॉन्सी कार्स दिमाखात पळवणारा चकचकीत जगातला स्टायलिश ‘कॉर्पोरेट हाँचो’ किंवा एका फायटीत दहा-वीस जणांना लोळवणारा व सुंदर तरुणीची सुटका करणारा अशा पठडीतल्या नायकांना मागे टाकत बॉलीवूड किंवा मराठी सिनेमातली स्रीची प्रतिमा आता बरीच पुढे निघून आली आहे. स्वयंपाकपाणी ऊर्फ (एकमेव) गाजरका हलवा बनवणारी, ‘करवा चौथ’ला निर्जला उपवास धरणारी किंवा व्हायोलिनच्या करुण पार्श्वसंगीतासोबत अनादिकाळापासून अश्रू ढाळणारी पारंपरिक बॉलीवूड पटातली स्रीची प्रतिमा आता मागे पडत जाऊन त्याव्यतिरिक्त अनेक ‘इंटरेस्टिंग’ गोष्टी हल्लीच्या स्त्रीकेंद्री सिनेमांतून नायिका करताना दिसते आहे. पण खरोखरच यातील नायिकांना जसे दर्शवले जाते आहे त्यावरून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश जातो आहे का, हा उद्देश सफल होतो आहे असे मानता येईल का?
थोडसा आढावा घेऊ! ‘पिंक’ हा सिनेमा मोठय़ा शहरात नोकरी करणाऱ्या आणि एकाच घरात भाडय़ाने राहणाऱ्या तीन तरुणींविषयी आहे. या तरुणी रात्री उशिरापर्यंत (कामानिमित्त) बाहेर असतात आणि त्यांच्या राहणीमानावरून त्या जीवनात खूप मज्जा करत असाव्यात असा शेजाऱ्यांचा कयास असतो. त्यामुळे त्यांच्या चारित्र्याविषयी शेजारपाजारी शंका घेत असतात. त्यांच्याकडे टक लावून बघतात. एक घटना अशी घडते की सगळे त्यांना ‘तसल्या मुली’ हा किताब देऊन मोकळे होतात. एका रॉक कॉन्सर्टला गेलेल्या असताना एकीला तिचा शाळेतील मित्र तिथे भेटतो आणि तो त्या तरुणींची ओळख आपल्या इतर दोन मित्रांशी करून देतो. या तरुणी नंतर त्या मुलांसोबत ‘डिनर’ला जातात आणि तिथे त्यांच्यासोबत मद्यपान करतात. तिथे एका तरुणीचा विनयभंग यांच्यापैकीच एका मुलाकडून होतो. दारूच्या बाटलीने त्या मुलाच्या डोक्यावर प्रहार करून ती तरुणी आपली सुटका करून घेते. या घटनेची माहिती देण्यासाठी जेव्हा या तिघी तरुणी पोलीस ठाण्यात जातात तेव्हा त्यांची तक्रार नोंदवून घेणे तर दूरच, पण तुम्ही असे केले तर तुमच्यावरच डाव उलटेल, कारण तुम्ही कोणावर हल्ला केलेला आहे हे माहीत आहे का, असं सांगत पोलीस अधीक्षक त्यांची बोळवण करतो. अपमानाने संतप्त अशा त्या तरुणींच्या वेदनांमध्ये अजूनच भर पडते जेव्हा ‘तो’ मुलगा एका राजकीय पुढाऱ्याचा नातेवाईक असल्याचे त्यांना समजते. पुढे तो मुलगाच या तरुणीच्या विरोधात तक्रार दाखल करतो आणि या तरुणीला अटक केली जाते.
अमिताभ बच्चन यांच्या सशक्त अभिव्यक्तीतून साकारलेली वकिलाची व्यक्तिरेखा… हा वकील या तरुणीची केस लढवतो आणि जिंकतो. तरुणी निर्दोष सुटते. आपल्या धीरगंभीर आवाजात प्रेक्षकांमधल्या पुरुषांना हा वकील एक संदेश देतो की स्रीने जर ‘नाही’ म्हटले असेल तर त्याचा अर्थ केवळ ‘नाही’ असाच असतो. ती लज्जेने नाही म्हणते आहे असे नव्हे. तू माझ्या मागे यावंस, मला मनवावंस, मग मी हो म्हणेन असा याचा अर्थ तर अजिबातच नाही… चित्रपट संपतो.
मल्टिप्लेक्समध्ये बसलेल्या ठरावीक स्तरातल्या प्रेक्षकांचे मतपरिवर्तन वगैरे करण्याच्या उद्देशाने हा सिनेमा बनवला गेला आहे का? सुशिक्षित माणसे विनयभंग किंवा बलात्कार करतच नाहीत असे मला अजिबात म्हणायचे नाही. परंतु निर्भयावर किंवा कोपर्डीतील मुलीवर बलात्कार केलेल्या मुलांना, गावातल्या अशिक्षित प्रेक्षकांना इंग्रजी संवादांची रेलचेल असलेला हा चित्रपट आणि अर्थातच ‘नो मीन्स नो’ हे कळेल का? किंवा त्यातला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का?
या सिनेमातून घेण्याजोगे काहीही नाही असेही मी म्हणणार नाही. आधी पित्याच्या, नंतर पतीच्या आणि पुढे पुत्राच्या आज्ञेत राहणारी, तथाकथित सभ्य कपडे घालणारी, ‘सातच्या आत घरात’ टाइप अशी ही पारंपरिक स्री नसून सर्व मान्यताप्राप्त चौकटी मोडून आता ती बाहेर पडते आहे. तिला या गुंडांकडून धोका आहेच, मात्र आणि खरा प्रश्न हा आहे की ‘सातच्या आत’ तरी स्री सुरक्षित आहे का? आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या मुली किंवा स्त्रिया सुरक्षित म्हणाव्यात का?
‘पिंक’सारखे सिनेमे हे आपल्या पितृसत्ताक संस्कृतीतली गुंतागुंतच दर्शवतात. ज्या स्त्रिया स्वत:च्या मर्जीनुसार जगू इच्छितात त्यांच्यासाठी यातून स्पष्ट संदेश जातो- ‘समाज तुम्हाला ‘सभ्य’ समजत नाही. अशा तऱहेचे स्वतंत्र आयुष्य निवडण्याची मोठी किंमत मोजावी लागेल. तुम्हाला ‘आगाऊ ’ मानलं जाईल’… वगैरे! तुम्हाला ‘उंबरठा’ आठवतो? उंबरठा ओलांडलेल्या स्रीची जी वाताहत होते तेच ‘पिंक’मध्येही दिसते. ‘रूढींच्या विरोधात जाताय ना तर त्याचे दुष्परिणाम भोगायला तयार राहा’ हेच तुम्हाला सदैव सांगितले जाईल आणि तुमचा आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची ऊर्मी यांना असेच सतत खच्ची केलं जाईल. या प्रकारच्या कथा आपल्याला सांगण्याची गरज अजूनही आहेच का?
मीनाक्षी शेषाद्री अभिनित ‘दामिनी’ (१९९३) मधला कोर्टरूम भावनाक्षोभ, ‘तारीख पे तारीख’ म्हणत वकिलाचं मुठी आदळणं हे काय दाखवतात? न्यायालयाच्या कटघऱ्यात हुंदके देत रडणाऱ्या स्रीला शेवटी पुरुषाचा (मानसिक प्रश्न असणारा असला तरीही) आधार लागतोच मग तो वकील म्हणून का असे ना? अगदी ‘पिंक’मध्येही तेच. खलनायकाच्या तावडीतून सोडवणाऱ्या नायकाचीच गरज अजूनही स्त्री आहे हेच शेवटी यातून प्रतीत होते आहे ना? आणि आता ‘पार्च्ड’विषयी!
तीन स्त्रियांमधला एक अत्यंत तरल भावबंध यात दाखवला आहे. पाओलो कोएलो यांच्या म्हणण्याप्रमाणे स्त्रीत्वाचे तीन विभिन्न पैलू या तिघींच्या माध्यमातून आपल्यापुढे येतात. आपल्या गावात दूरचित्रवाणी संच आले तर गावातील स्त्रिया, मुली बिघडतील म्हणून पुरुष सरपंच जिथे टीव्ही राहू देत नाही, अशा पुरुषी वर्चस्वाखाली युगानुयुगे पिचलेल्या राजस्थानातील एका खेडय़ामध्ये राहणाऱ्या तीन स्त्रियांची ही कहाणी!
यातली एक विधवा परंतु पुत्रवती असल्याने समाजात थोडेसे बरे स्थान असणारी स्त्री, दुसरी विवाहित परंतु अपत्य नसल्याने ‘वांझोटी’(?) मानली गेलेली आणि म्हणून पतीकडून सतत मार खाणारी तर तिसरी ‘नौटंकी’ (तमाशाचाच एक प्रकार)त नाचणारी वेश्या अशा या तीन स्त्रिया जिवाभावाच्या मैत्रिणी! यांच्या शारीरिक आणि मानसिक वेदनांशी प्रेक्षक म्हणून आपण एकरूप
होत जातो. दिग्दर्शिकेने या तिघींना ‘थेल्मा अँड लुईस’ टाइप स्री सक्षमीकरणाचा साज चढवला आहे. आपल्या नित्याच्या आयुष्यातील वेदनांना कंटाळून या तिघी गावातून पळून जातात. कापलेले केस मिरवत शहराकडे धाव घेणाऱ्या या तिघी
शहरात रोजगाराच्या संधी शोधायला निघतात.या तिघी शहरातील सुशिक्षित स्त्रियांप्रमाणेच खुलेपणाने ‘सेक्स’विषयी बोलतात. सदैव अतृप्त व स्री म्हणून वाटयाला येणाऱ्या दु:खाचे नशिबाने विणलेले टाके यांच्या नात्यातली वीण घट्ट करत जाते, ती वाचकांना विचारप्रवृत्त करू शकेल. पण आपल्या गावातून पळून गेल्या म्हणजे त्यांचं सक्षमीकरण झालं असं मानायचं तरी कसं? पळून जाणं हा एकमेव उपाय यांच्यासाठी शिल्लक का असावा? आपल्या गुलामीचे प्रतीक असणारा दुपट्टा फेकून देणं आणि एकमेकींच्या मदतीनं गावातून पळ काढणं हे प्रतीकात्मकदृष्टय़ा तरी स्त्री सक्षमीकरण दर्शवते का? पळून जाऊन त्या अधिक असुरक्षित वातावरणात जात आहेत हे सत्य नाही का? आणि आपली सुरक्षा करू शकतील इतक्या लढवय्या त्या आहेत का? ‘पिंक’ आणि ‘पार्च्ड’ हे दोन्ही सिनेमे हेच दर्शवतात की रूढी परंपरांच्या चौकटी मानणाऱ्या समाजात राहून स्रीचे सक्षमीकरण शक्य नाही, त्यासाठी त्यांना बाहेर पडावे लागेल… का?
कौटुंबिक, सामाजिक चौकटीत राहाणाऱ्या स्त्रियांसाठी जेव्हा ही चौकट पायातल्या बेडय़ा न ठरता तिच्या सुरक्षिततेची हमी घेत तिचे अवकाश शोधण्यासाठी प्रवृत्त करतील तेव्हा ते सक्षमीकरण समाजाचे असेल. त्यासाठी केवळ स्रीचे सक्षमीकरण होऊन चालणार नाही पुरुषांचेही विचाराने सक्षमीकरण व्हायला हवे. सक्षमीकरणाच्या व्याख्या जेव्हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवू तेव्हा कुठे ‘पिंक’ आणि ‘पार्च्ड’ मधले स्त्रीसक्षमीकरण प्रतीकात्मक रहाणार नाही.
या पार्श्वभूमीवर ‘क्वीन’ मात्र या पठडीपेक्षा वेगळा आहे. ऐन विवाहाच्या आदल्या दिवशी अपमानित केली गेलेली, नाकारली गेलेली, बुजरी वधू नियोजित मधुचंद्राला एकटीच जाते.
एकटय़ाने परदेशात सहज प्रवास करू शकणारी ही कुणी जीगरबाज भारतीय तरुणी नाही; तरीही! या परदेशप्रवासादरम्यान तिच्यातील क्षमतांचा तिला होत जाणारा साक्षात्कार, तिचा वर्धिष्णू आत्मविश्वास बघून प्रेक्षक म्हणून आपणही नक्कीच सुखावतो. एकटे राहणे हे जसे वाटत होते तितके काही वाईट नाही आणि दुनिया हे केवळ दुष्टांनी भरलेली खुंखार स्थान नाही हे आपल्या समोर येत जाते. आपल्या उद्धारासाठी पुरुषाचे सोबत असणे आवश्यक असतेच असे नाही हे पटवून देत पटकथा पुढे सरकते. तिचे आसू आणि हसू दोन्ही आपल्याला आपले वाटू लागतात. शेवटी तिच्या प्राप्तीच्या आशेने परत आलेल्या तिच्या वाग्दत्त पतीला तिने ठामपणे दिलेला नकार प्रेक्षकांच्या हुर्योमध्ये सामावून जातो.
‘पिंक’मध्ये अमिताभच्या दमदार आवाजात स्त्रियांचे फसवे सक्षमीकरण कण्हत राहते. तर ‘पार्च्ड’मध्ये अवॉर्ड विनिंग सिनेमॉटोग्राफरच्या कमालीच्या देखण्या, दिलखेचक फ्रेम्समध्येही हे सक्षमीकरण हरवून जातं. या सर्व स्त्रीकेंद्री व्यक्तिरेखांच्या कोलाहलात ‘क्वीन’ मात्र हलकेच सक्षमीकरणाचा मार्ग प्रशस्त करताना दिसतो.
खरं म्हणजे स्त्रियांना आपले अधिकार काय आहेत हे माहिती असायला पाहिजे. ‘पिंक’ चित्रपटात जर तिघींपैकी एकीनं जरी ‘गूगल’ केलं असतं तरी त्यांना ‘झीरो एफआयआर’बद्दल कळलं असतं. ‘झिरो एफआयआर’ म्हणजेकुठल्याही गुन्ह्यांची
नोंद तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनवर करू शकता. कायद्याने ‘ये काण्ड तो सूरजकुण्डमें हुआ है’ असं पोलीस इन्स्पेक्टर म्हणू शकत नाही. अशा छोट्या छोट्या
पण महत्त्वाच्या गोष्टी जर चित्रपटातून सांगितल्या असत्या तर त्याचा प्रभाव जास्त लोकांवर झाला असता.
लिंगभेदाचा प्रकार घरा घरातून सुरू असतोच. आपण घरातल्या मुलींना ‘तळहाताच्या फोडासारखं’ जपतो, एखाद्या फुलासारखं वागवतो, आणि त्यातच आपल्याला फार गर्व असतो. आजही अनेक ठिकाणी लग्नासाठी मुलगी बघायला जा. तुम्हाला सांगतील, ‘अहो ती जॉब करते आहे, पण लग्न झाल्यानंतर संसारच करेलच.’ एमबीए जरी केलं असलं तरी ‘पोळ्या छान बनवते’ हे ऐकायला मिळतं. ‘मुलांचं ते करिअर, मुलींचा हा जॉब’ असे समजून आपण चालतो. सून डॉक्टर जरी असली तरी घरी आधी सगळ्यांना वाढते आणि सगळं आवरल्यानंतरच जेवते, असं सासूबाई सगळ्यांना कौतुकानं सांगत असतात. उत्तर भारतात ‘छड़ी पर बढ़ी’ ही काही विचित्र परिकल्पना समजली जात नाही. मारूनच वळण लागते असे किती पालक आजही म्हणतात आणि वळण फक्त मुलींना लावलं जातं. उनाड म्हणून मुलांना आपण मारतो, पण अभ्यासू असेल तर सात खून माफ, असंही वागतो. ‘पिंक’चा खलनायक इंग्लंडच्या किंग्स कॉलेजमधून शिकून आलेला असतो. तरीही मुलगी हातात आली तर ती ‘फेयर गेम’ आहे असं त्याला वाटतं. असलं शिक्षण शाळेत देत नसतात. पण आपण जर घरातच मुलगा आणि मुलीत भेद करणं बंद केलं तर पुढच्या पिढ्यांना ‘पिंक’, ‘पार्च्ड’सारखे चित्रपट बनवावे लागणार नाहीत.
आणि मुख्य म्हणजे जसं ‘पार्च्ड’मध्ये अन्याय सहन करत जगण्यापेक्षा पळून गेलेलं बरं असं दाखवलं आहे, ते पहाता विचार येतो सक्षमीकरणाच्या शोधात स्त्रिया कुठवर पळून जाणार? आणि कुठे? आणि कोणापासून?
ता. क. : मी सुरुवातीला ‘सैराट’चा उल्लेख केला आणि नंतर त्यावर काहीच भाष्य केलं नाही. तुम्ही जर नऊ वारी नेसलेल्या आज्ज्या मोटारसायकल चालवताना बघितल्या असतील तर आर्चीचं बुलेटवरून हिंडणं (म्हणजे स्त्री सक्षमीकरण) असं काही वाटणार नाही. इथेही रूढ चौकटींना कंटाळून पळून जाणं हाच शेवटी मार्ग आहे, असं प्रतीत होतं. मान्य आहे की तरुण माणसं प्रेमात असतात तेव्हा परिणामांची पर्वा करत नाहीत परंतु ज्यांच्याबरोबर पळून यायचा निर्णय आर्ची घेते तो नैराश्याच्या भरात तिच्यावर हात उगारतो आणि आर्ची ते निमूट सहन करते तिथेच चित्रपट सामान्य होऊन जातो.
मनीषा लाखे
(अनुवाद – शर्वरी जोशी)
manishalakhe@gmail.com