नीलिमा किराणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या-जुन्या पिढय़ांतलं अंतर खूप कमी झालंय असं मानलं जात असलं, तरी एकूण जगण्यातली गतिमानता, स्पर्धा, अस्थिरता यांमुळे या दोन पिढय़ांतलं मानसिक अंतर मात्र वाढत चालल्याचं दिसतंय. जुनी पिढी आपले पारंपरिक विचार, मतं यांना कवटाळून नव्या पिढीला समजून घेण्यात कमी पडताना आजही दिसत आहे. आम्ही पुढारलेले आहोत, सुधारलेले आहोत, हे दाखवताना त्यांची ‘लिमिटेड समजूत’ नव्या पिढीला न्यूनगंडात ढकलताना दिसते. मोठय़ांनी नेमकं  कु ठे थांबायचं आणि लहानांनी त्याचं नेमकं  काय स्वीकारायचं यातली सीमारेषा आखता आली तर ते दोन्ही पिढय़ांमधलं नातं एकसूर, एकतान होऊन जाईल. नवीन वर्षांत प्रत्येकानं आपल्या आत डोकावून पाहिलं तर मन:शांतीचा दरवाजा आपल्या आतच उघडलेला पाहायला मिळेल..  

‘आज मला खूप मोकळं वाटतंय. अनेक वर्षांचं मनावरचं ओझं उतरलंय. उद्या तपशिलात सांगतो.’  परदेशातून अभिषेकचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला.. खरं तर गेले काही महिने मी आणि तो त्याच्या आयुष्यात आलेला ‘थांबा’    याविषयी बोलतो आहोत. माझ्या परिचयातला हा मुलगा आता परदेशात छान करिअर करतो आहे; पण भौतिक यश आणि मानसिक समाधान यांची सांगड नेहमीच घालता येते असं नाही, अभिषेक त्याचं उत्तम उदाहरण.

आपले अनुभव त्यानं मला सांगितले, ‘‘दहाएक वर्षांपूर्वी पदव्युत्तर शिक्षणासाठी मी जर्मनीला आलो. जॉब मिळत गेले, इथेच स्थायिक झालो. सगळं उत्तम चाललंय, तरी मन अशांत असतं. आपल्यात काही तरी कमी आहे असं सतत वाटत राहतं. परक्या देशातला एकटेपणा, नोकरीची असुरक्षितता ही कारणं नाहीत. आधीपेक्षा चांगल्या पगाराची ऑफर घेऊनच दर वेळी मी नोकरी बदललीय. स्वत:चं घरही घेतलंय. तरीही काही तरी चुकतंय, माझ्यात कमी आहे, ही भावना लहानपणापासून छळतेच आहे. आता जर्मन गर्लफ्रें डशी लग्न करण्यापूर्वी मनातली अशांती संपवायला हवी.’’ हे लक्षात आल्यानंच त्यानं माझ्याशी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर मनातल्या अनेक अदृश्य गाठी सापडल्या, सुटल्याही, तरी कुठे तरी ठसठस शिल्लक होतीच. अभिषेक सांगत होता, ‘‘आयुष्यात इतकं  यश मिळूनसुद्धा ‘मी चांगला नाही, माझ्यात काहीतरी कमी आहे –

‘I am not good enough’ हे मनाच्या तळाशी खोल रुतलंय. ते बीज कधी रुजलं, कु णाच्या बोलण्यामुळे रुजलं हे शोधण्यासाठी तुम्ही म्हणालात म्हणून लहानपणीच्या अनेक घटना पुन्हा आठवून पाहिल्या. दर मे महिन्याच्या सुट्टीत आई-वडील मला महिनाभर गावी सोडायचे. तिथे अनेकदा संध्याकाळी गावातले काका-काकू, नातलगांची गप्पांची ‘बैठक’ बसायची. मुलांना कुणाला काय काय येतं? वगैरेची चौकशी व्हायची. सर्वात महत्त्वाचा अभ्यास, त्यानंतर खेळ, भाषण आणि गाणी येणं. बाकीचं सगळं फालतू. चांगलं करणाऱ्यांना शाबासकी, न करणाऱ्यांची हजेरी असायची. मी कशातच ‘खास’ नव्हतो. शिवाय अबोल आणि तब्येतीनं अतिशय किरकोळ. तिथे माझी बऱ्याचदा टिंगलच व्हायची. सुकडय़ा, काटकुळ्या, घुम्या असंच बोलवायचे मला. एखादा नातलग कधी  तरी माझ्या बाजूनं बोलला, तरी त्या गर्दीत ते विरून जायचं. तसा मी शाळेत नकला छान करायचो, पण गावी त्याला किं मत नव्हती. टिंगलीच्या भीतीमुळे ते ‘हुनर’ मी तिथे कधीही दाखवलं नाही. झोपून गेल्याचं नाटक करून

कु टुंबीयांची ही बैठक कधी टाळली, तरी कान उघडे असायचे.  खूपदा एकटं, निराधार वाटायचं. अर्थात आईवडील तिथे असते तरी त्यांनी माझी बाजू घेतली असतीच असंही नाही. एकदा असंच मी डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपलो असताना माझ्याबद्दल माझ्याच नातेवाईंकाचे उद्गार ऐकले आणि खूप अस्वस्थ झालो. आत्ता जेव्हा मनानं मी त्या ‘बैठकी’त पोहोचलो तेव्हा खात्री झाली, की ‘माझ्यात कसली तरी कमतरता आहे,’ हे मनात रुजवणारी हीच ती जागा. त्या आठवणींचा खूप त्रास झाला, मानसिक थकवाही आला. असं का? कदाचित माझ्या यशस्वी वडिलांबद्दलची छुपी असूया माझ्यावर निघत असेल किंवा ती त्या घराची वागण्याची पद्धतही असेल किंवा मीच भावनाशील, भाबडा असेन. काहीही असो, आज गावातलं ते घर नाही, त्यातली बरीच माणसं या जगात नाहीत, दहा वर्षांत फारशा कुणाच्या भेटी नाहीत, तरीही ती ‘बैठक’ मला अजून का छळते? आज याचा सोक्षमोक्ष लावायचाच, म्हणून मी एक वेगळा प्रयोग केला. जर्मनीतल्या या माझ्या टुमदार, कौलारू घरात ती ‘बैठक’ बसल्याची मी कल्पना केली. घर पाहूनच सगळ्यांचे आवाज बंद, डोळे विस्फारलेले. मोठे काका माझ्या पाठीवरून कौतुकानं हात फिरवत म्हणाले, ‘लहानपणी घुम्या होतास, त्यामुळे हुशार होतास हे कळलंच नाही आम्हाला. शाब्बास. परदेशात नाव काढलंस घराण्याचं.’ कल्पनेतल्या बैठकीतलं कौतुक खरोखर घडल्याचा अनुभव मी मनापासून उपभोगला. मला आनंद झाला. आयुष्यात पहिल्यांदा स्वत:बद्दल ‘भारी’ वाटलं. स्वत:ची कुवत स्वत:ला पहिल्यांदा मान्य झाली आणि इतकी वर्ष वागवलेल्या भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त झालो. आता नव्या वर्षांला समाधानानं सामोरा जाईन. पुढचं माझं आयुष्य खूपच वेगळं असेल. मी मुक्त असेन.’’

लहानपणीचं ‘बॅगेज’!

लहानपणीच्या अशा प्रसंगांमध्ये वर्षांनुवर्ष अडकून स्वत:ला कमी मानत, कुढत जगणारे खूप जण असतात. बाहेरून यशस्वी आणि आनंदी दिसले, तरी आत न्यूनगंड पोखरत असतो. अभिषेक त्यांचा प्रतिनिधी. एकदाचा तो त्या ओझ्यातून सुटला खरा,पण तोपर्यंत त्याची पस्तिशी आली होती. त्याआधी कित्येक वर्ष स्वत:ला निष्कारण कमी समजत स्वत:शीच लढत होता. लहानपणी जेव्हा घर हेच जग असतं, कुटुंबांकडून मिळणारं कौतुक, आपलेपणाच सर्वस्व असतो, तेव्हा घरातून दुर्लक्ष, टिंगलटवाळी, अपमान झाला, तर ते सल खोलवर रुजतात. नंतर भरपूर काही मिळवलं तरी स्वत:च्याच मनातल्या तेव्हाच्या ‘इमेज’मधून सुटता येत नाही. अभिषेकसारखी मुलं जास्त भावनाशील असतीलही, पण त्यावर ‘सोड रे, काय मनाला लावून घेतोस? फारच भावनाशील आहेस!’ हेदेखील लेबलच असतं. सोडायचं कसं, ते लहानपणी कुठे कळतं? त्यामुळे मुलांना समजून घेण्याची आणि त्यांचं मन ओळखून आधार देण्याची जबाबदारी मोठय़ांची, त्यातही आईवडिलांची असतेच.

आजच्या पिढीच्या मन:स्वास्थ्यावर परिणाम करणारे काही जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यांच्याशी बोलताना लक्षात येतं की कुटुंबीय आणि नातलगांचे शेरे (कॉमेंट्स), त्यातही जाड/ बारीक/ काळं/ गोरं इत्यादींवरची टीकाटिपण्णी (बॉडी शेमिंग), घरच्यांनी त्यांची ‘री’ ओढून किंवा काहीच न बोलून मुलांना एकटं पाडणं, मुलगा-मुलींत होणारा भेदभाव यांचा तरुणांना खूप त्रास होतो. तसंच नाती, करिअर, अनिश्चितता यातून येणारे ताण, चिंता, निराशा आणि घुसमटीशी सामना करताना आत्मविश्वास, मन:स्वास्थ्य हरवतं याचादेखील. पालकांना हे विषय तेवढे महत्त्वाचे वाटत नाहीत. क्षुल्लक किंवा ‘भावनांचं फालतू कौतुक’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, हेटाळलं जातं. आपल्याला असं काही तरी होतंय हे घरच्यांनी मान्यच केलं नाही तर मुलांना असहाय वाटतं. ती खोलवर दुखावतात. खरं तर या सगळ्या गोष्टी जुन्याच आहेत. मग आजच त्यावर नव्यानं विचार कशासाठी? कारण ‘अभिषेक’सारख्या भावनिक बॅगेज वागवत जगणाऱ्यांची संख्या वाढते आहे.  पूर्वीच्या एकत्र वा कुटुंबप्रधान समाजात मुलांच्या मनाचा विचार ही मानसिकताच नव्हती. मोठय़ांपुढे बोलायचं नाही, हा संस्कार, परंपरा. स्वत:चं वेगळं काही म्हणणं मांडणंसुद्धा उलटून बोलणंच वाटायचं. आता शिक्षणामुळे, वाढत्या व्यक्तिप्रधानतेमुळे मुलं प्रश्न विचारतात, विरोध करतात, वाद घालतात. जुन्या संस्कारांच्या सवयीमुळे मोठय़ांची आज्ञाधारकपणाची अपेक्षा असते, प्रश्न विचारणं हाच अपमान वाटतो. अनेकदा तर्कशुद्ध उत्तरंही देता येत नाहीत. मग ‘तुमच्या पिढीला मोठय़ांबद्दल आदर नाही, कुटुंबाचे फायदे हवेत, शिस्त नको, तडजोड नको, तुमच्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे, आमच्या वेळी..’ यावर गाडी घसरते. त्याच त्या वर्तुळात संवाद फिरत राहिला की काही मुलं आक्रमक होतात, तर काही कोषात जातात, एकटी पडतात. 

करिअर, विश्वास आणि आधार

सहजसंवाद, विश्वास, आधार आणि हातात असलेला वेळ यासंदर्भात म्हणून नव्यानं विचार व्हायला हवा. पूर्वी ‘संवाद’ म्हणजे मोठय़ांनी सांगायचं आणि मुलांनी ऐकायचं अशीच एकतर्फी पद्धत होती. तरीही, दोन पिढय़ांची जीवनशैली, करिअरचे पर्याय साधारण सारखे असल्यामुळे आपल्या भविष्याबद्दल पालकांना कळतं आणि त्यांचा सल्ला योग्यच असेल, हा विश्वास मुलांना होता. १९८४ मध्ये शिकलेलं एखादं नवीन कौशल्य पुढे तीस वर्ष उपयोगी पडू शकत होतं. आज एखादं कौशल्य कालबाह्य़ होण्याचा काळ साधारण साडेचार वर्षांचा आहे असं तज्ज्ञ म्हणतात. बदलांचा हा वेग पाहता, दहा वर्षांनंतरची  जीवनशैली, व्यवसाय कसे असतील त्याचा अंदाजही बांधणं अवघड आहे. या अनिश्चिततेमुळे नवीन पिढी करिअर निवडीबाबत गोंधळलेली आहे आणि पालकांच्या मार्गदर्शनाचाही आधार नाही, अशी असते.

मुलांचे प्रश्न पालकांच्या तरुणपणीच्या प्रश्नांपेक्षा वेगळे आहेत हे पालकांनी वस्तुनिष्ठ जाणिवेनं, टीका किंवा कौतुकाच्या पलीकडे जाऊन समजून घ्यायला हवंय. जागतिकीकरणामुळे पाश्चात्त्य संस्कृतीशी मुलांचा जास्त संबंध येतोय. तिथलं स्वातंत्र्य, व्यक्तिवाद जवळचे वाटताहेत. इंटरनेटमुळे दिवस-रात्रीच्या सीमा पुसट झाल्यात. जोडीदाराशी ‘बाँडिंग’साठी वेळ नाही, मुलं वाढवण्यासाठी पुरेसा वेळ देता येण्याची खात्री नाही, नोकरी किती टिकेल याची शाश्वती नाही आणि वेगाचा प्रचंड रेटा. त्यामुळे अनेकांना लग्नाचीही भीती. अशा परिस्थितीशी मुलं लढत असताना त्याबद्दल काहीच न विचारता घरचे अजून आपल्या काळाच्या बुडबुडय़ातच रमलेले असतात. मुलांना लहानच समजून नाती, शिस्त, मुलांच्या उठण्या-झोपण्याच्या अवेळा, मित्रमंडळ, सोशल लाइफ, लग्नाची टाळाटाळ, प्रत्येक गोष्टीवर येताजाता कॉमेंट्स, सल्ले, लेक्चर देत असतात. त्यांचे मुद्दे चुकीचे नसतात; पण आता मुलांसाठी त्याहून महत्त्वाचं काही असतं. पालक आपल्याला समजून घेऊ शकतील, हा मुलांचा विश्वास तिथे संपतो आणि मानसिक आधाराची अपेक्षाही संपते.

मोठय़ांनी नेमकं कुठे थांबायचं?

एक उदाहरण आठवतं. एका संगणक अभियंत्यानं ऑफिसमधल्याच पंजाबी मुलीशी लग्न जुळवलं. बऱ्याच विरोधानंतर घरचे तयार झाले. नव्या जोडप्याचं घर ऑफिसजवळ असणं सोयीचं होतं. मात्र त्यांचे रोजचे तीन तास गर्दी-प्रवासात वाया गेले तरी चालतील, पण आपल्या गावातल्या घराजवळच त्यांनी घर घेण्याचा मुलाच्या आईचा हट्ट. कारण, ‘कधी कधी यांच्या पाटर्य़ा असतात. घर जवळ असल्यावर मी तेव्हा तिकडे चक्कर मारीन म्हणजे कंट्रोल राहील.’ आधी मुलगा पस्तिशीपर्यंत लग्न करत नाही म्हणून वाद, मग निवडलेली मुलगी परभाषिक म्हणून वाद, म्हणजे मुलाच्या मताचा आणि इच्छेचा आदर नाहीच आणि आता पाटर्य़ावर नजर. पस्तिशीच्या मुलांवर जर लहान मुलासारखा ‘कंट्रोल’ ठेवण्याची अपेक्षा असेल, ते जबाबदारीनं राहतील हा विश्वास नसेल, तर तुम्ही आजवर केलेल्या संस्कारांचं काय? मुलाला आणि नव्या सुनेला नेमका काय संदेश जातो? सज्ञान झालेल्या मुलांच्या आयुष्यात आपण किती हस्तक्षेप करावा याची लक्ष्मणरेषा आखणं जमत नाही, हीच एक खरी मोठी समस्या आहे. ‘काहीही कारणामुळे आई-वडिलांच्या घरातच राहावं लागत असेल तर त्यांच्या अति-हस्तक्षेपाची मर्यादा कशी ठरवायची?’ हा आजच्या तरुणांचा मुख्य प्रश्न आहे. मुलींसाठी महत्त्वाचा विषय म्हणजे मुलगा आणि मुलीला दिली जाणारी विषम वागणूक. सानियाचा अनुभव त्यातलाच. म्हणाली, ‘‘आमच्या घरातले पुरुष स्वत:ला पुढारलेले समजतात; पण बाबांनी माझ्या भावाच्या परदेश शिक्षणासाठी पैसे ठेवलेत आणि माझ्या लग्नासाठी! ‘मला एवढय़ात लग्न करायचं नाही, मी आणखी शिकून, कमवून नंतर लग्नाचं पाहीन’ यावर, ‘असं नसतं, तुला काही समजत नाही’ हेच त्यांचं उत्तर. माझे काका तर ‘स्वयंपाक शीक’ म्हणाले. मी म्हटलं, ‘मला गरजेपुरता स्वयंपाक येतो, माझ्या भावाला सांगा स्वयंपाक शिकायला.’ तर म्हणे, ‘तू शिकून आगाऊ झालीयस. जगरहाटी कळेना तुला.’ याचा अर्थ, मुलींनी कमावण्यापुरतं शिकायला पाहिजे; पण त्याच शिक्षणातून आलेली शहाणीव नको. माझे निर्णय घ्यायची अक्कल आणि स्वातंत्र्य मला नाही, मी स्वयंपाकच शिकायचा. हे ‘लिमिटेड पुढारलेपण’ समजण्याच्या पलीकडचं आहे.’’ 

ताण आणि मन:स्वास्थ्य दोन्ही समजून घेणं घरातला अस्वीकार, अविश्वास, लहानपणी आलेले न्यूनगंड, आत्मसन्मान कमी असणं, भविष्याची असुरक्षितता, करिअरसाठी आशा लावून बसलेलं असताना महासाथ किंवा भरती परीक्षेतल्या महाघोटाळ्यांमुळे वेळ वाया जाणं, कौटुंबिक आणि व्यावसायिक अपेक्षांचा ताण, अशा अनेक गोष्टींमुळे मन अस्थिर होतंय, आत्महत्येच्या विचाराला खूप मुलं आणि तरुण शिवून आलेले असतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ‘हे ताण खरे आहेत’ हे घरातल्यांनी समजून घेण्याची गरज वाटते. 

कसा जुळवायचा दोन पिढय़ांचा सांधा?

दर वेळी पालकांनीच समजून घ्यायचं आणि स्वत:ला बदलायचं असं सांगण्याचा उद्देश यामागे अजिबात नाही. मुद्दे दोघांकडेही आहेत आणि त्यात तथ्यांशही आहे; पण बदल घडवण्याची अंतिम जबाबदारी नेहमी प्रमुखाचीच असते. स्वत:ला जबाबदार समजणाऱ्यांनीच सुरुवात करणं योग्य. चूक-बरोबरच्या पलीकडे जाऊन सांधा जुळवायचा असेल, तर दोन पिढय़ांची जगण्याची आणि विचारांची प्रतलंच वेगळी आहेत हे सहृदयतेनं आणि तुलना व टीकेत वेळ न घालवता मान्य करायला हवं, कारण ती वेगळी आहेतच. त्यात चूक, बरोबर असं काहीच नाही. मुलांचा वेग जास्त, वेळ कमी आहे. त्यामुळे, अनुभवांच्या लांबलचक ‘कहाण्यां’ऐवजी, त्यातून मिळवलेलं ‘ज्ञान’ सांगितलं तर मुलांना उपयोगी पडेल. मुलांचा आक्रमकपणा, जुन्याला विरोध, हा वयाचाच भाग वा परिणाम म्हणून त्याकडे थोडं दुर्लक्ष करायला हवं. कारण पालकांनी एके काळी या तरुणांची मानसिकताही अनुभवलीय. अविश्वास दिसल्यामुळे मुलं आक्रमक होतात आणि निराशेमुळे तुटून जाणं घडतं. ‘पालक आपलं ऐकून घेतात’ हा विश्वास वाटल्यावर आक्रमकताही कमी होते. ‘तुम्हाला तुमच्याच मनासारखं घडायला हवं असतं,’ असा आरोप दोन्ही बाजू परस्परांवर करत असतील, तर त्यातून काय अर्थ निघतो?  प्रत्येकाला थोडी तडजोड करावी लागेल. त्यामुळे आपल्या इच्छांमधलं अनिवार्य किती आणि सोडून किती द्यायचं याच्या लक्ष्मणरेषा संवाद-चर्चेतून ठरवल्या, तरच घर सर्वाना आपलं वाटू शकतं.

बाहेरच्या जगातली परिस्थिती बदलवणं कुणाच्याच हातात नाही; पण तरुणांना लहान समजून सल्ले देणं, ‘कंट्रोल’ करणं, जुन्या बुडबुडय़ात रमणं, हे मागे सोडून देणं मोठय़ांच्या हातात आहे. संस्कारांचं ‘मर्म’ घेऊन, दोन्ही मतांचा आदर ठेवून सोय कुठे, कशी शोधता येईल? त्याची यादी करणं हातात आहे. आपल्या अपेक्षांत वास्तववादी बदल करणं आपल्या हातात आहे. घरातली शांती, आपलेपणा आणि आधाराची भावना आपल्या हातात आहे. बोचऱ्या टीका आणि साशंकतेऐवजी ‘मुलं शोधतील त्यांचे रस्ते’ हा विश्वास देणं/घेणं हातात आहे, परस्पर जिव्हाळा दाखवून देणं आपल्या हातात आहे. पाठीवरून फिरणारा आश्वासक वडीलधारा हात मुलांनाही हवाच आहे. मात्र घाई करायला हवी, कारण मुलांना पुढे जावंच लागणार आहे. लहानपणी मोठय़ांचं बोट धरून चालताना त्यांना जो विश्वास वाटायचा, त्याच विश्वासानं आता त्यांचं बोट मोठय़ांनी धरायचंय. त्यांच्या मार्गावर टीका न करता चार पावलं सोबत चालून पाहायला काय हरकत आहे? अपेक्षा, तक्रारींपेक्षा सोबत महत्त्वाची मानली, तर त्या सोबतीमुळे पुन्हा तरुण झाल्यासारखं मस्त वाटेल.  नवं वर्ष तुमच्या निर्णयाची वाट पाहतंय!

(लेखिका व्यावसायिक समुपदेशक आहेत)

–neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Limited leadership old generation competition ysh
First published on: 25-12-2021 at 00:05 IST