मध्यंतरी ‘फेक पनीर’चं प्रकरण गाजलं आणि उपाहारगृहात तसेच रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यापदार्थांच्या गुणवत्तेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. अन्नपदार्थातील भेसळ व फसवणूक हा एक अक्षम्य गुन्हा आहे आणि त्यासाठी आपल्या कायद्यामध्ये शिक्षाही आहे, तरीही फसवणूक होतच असते. आणि ती सध्या इतकी वाढली आहे की दूध, भाज्या, फळं, कोणतेही तयार खाद्यापदार्थ विकत घेताना मन साशंक होतं. एका अहवालानुसार भारतातील २५ टक्के अन्नपदार्थ बनावटी आहेत. काय करायला हवं त्यापासून वाचण्यासाठी… ‘जागतिक अन्न सुरक्षा दिना’निमित्त अन्न सुरक्षा ऑडिटर आणि प्रशिक्षक चिन्मयी देऊळगावकर यांचा खास लेख.
वर्ष २००८. चीनमधील एका घटनेने जगात खळबळ उडवली होती. तब्बल तीन लाख शिशूंमध्ये मूत्रपिंडाचे आजार दिसत होते. त्यांच्या मूत्रपिंडात खडे होत होते. ५४ हजार मुले इस्पितळात उपचार घेत होते आणि ६ बाळांचा मृत्यू झाला होता. कारण होते त्यांची दूध पावडर. या दूध पावडरमध्ये मेलामाइन हा रासायनिक पदार्थ टाकला होता. कशासाठी? तर पूर्वी दुधातील प्रोटिनचे प्रमाण नायट्रोजन किती आहे यावरून ठरत असे. मेलामाइन नायट्रोजन वाढवतो. म्हणजे चाचणीमध्ये ही दूध पावडर प्रोटिनयुक्त आहे हे दाखवता येईल, असं ते गणित होतं. पण त्याचा गंभीर परिणाम या तीन लाख बाळांना भोगावा लागला.
वर्ष २०१३. ‘हॉर्स मीट स्कॅन्डल’ हे जगातील सर्वात मोठे प्रकरण. बीफ पॅटिसमध्ये घोडे, डुक्कर, कांगारू आदी प्राण्यांचे मास मिसळून एका ऑस्ट्रेलियाच्या कंपनीने ते युरोप, युकेमध्ये विकले. तिथल्या प्रशासनाने डीएनए चाचणी केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. १२ देशांतून हा अब्जावधी रुपयांचा माल परत मागवून घेतला गेला आणि नष्ट केला गेला.
वर्ष २०२५. कल्पना ही न करता येणारी अन्नभेसळ सिंगापूर प्रशासनाने उघडकीस आणली. चॉकलेट, फळांचे रस, न्यूट्रास्युटिकल्समध्ये प्रतिबंधित औषधी घटक आढळले. हे घटक लैंगिक क्षमता वाढवणारे, वेदनानाशक अथवा पित्तरोधक होते. कल्पना करा, एका १० वर्षाच्या बालकाने हे चॉकलेट खाल्ले तर?
अन्नभेसळ ही जणू काही पूर्वापार चालत आलेली प्रथाच झाली आहे. याची जागतिक वार्षिक उलाढाल अंदाजे ४० बिलियन डॉलर्सची आहे. भारतात आरोग्य आणि बाल कल्याण मंत्रालय यांनी २०२३-२४ मधे १,७०,५१३ चाचण्या केल्या. त्यात ३३,८०८ नमुन्यात भेसळ आढळली होती, व ४,७३७ वर गुन्हेगारीचा आरोप होता. अन्नभेसळ माहितीनुसार (Decernis food fraud database ) भेेसळ आणि फसवणुकीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. यात दुग्धजन्य पदार्थ (जसे तूप, पनीर, चीज, मावा), सागरी अन्न वा सीफूड, मध, मसाले, तेल, चॉकलेट यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पूर्वी भेसळीचे प्रकार म्हणजे दुधात पाणी टाकणे, धान्यात ़खडे टाकणे, केशरमध्ये झेंडूचे परागकण टाकणे, हापूस आंब्याच्या रसात केसर, पायरी आंबा मिसळणे. ‘प्रीमियम ग्रेड’ असूनही त्यात त्याच पदार्थांमध्ये तुकडे टाकणे, ज्यामुळे त्यांचे वजन वाढेल, अशी भेसळअसायची. हे चूक आहे यात शंकाच नाही, पण याचा फक्त आपल्या खिशावर ताण पडत होता, आरोग्यावर नाही. आता त्यात बदल झाला आहे, भेसळीची व्याख्याच बदलली आहे.
अन्नभेसळ म्हणजे अन्न उत्पादनात जाणूनबुजून निकृष्ट, स्वस्त अथवा अप्रमाणित गोष्टी टाकणे किंवा त्यात बदल करणे. अन्न फसवणूक म्हणजे ग्राहकांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणे. या सगळ्यांचा उद्देश एकच – पैसे कमावणे, मग भलेही ते आरोग्याला अपायकारक असो.
भेसळ आणि फसवणुकीचे स्वरूप खालील प्रमाणे – ●अन्नातून त्याचे सत्त्व काढणे, कमी करणे, अथवा कमी दर्जाचे पदार्थ त्यात टाकणे – उदाहरणार्थ, हळदीतून कर्क्यूमिन (हळदीतील सत्त्व) काढणे, वापरलेल्या चहाची पूड विकणे, खाद्यातेलात कमी दर्जाचे तेल मिसळणे, कधी विचार केलाय, रस्त्यावर मसाले विकणारे स्वस्त मसाले कसे काय देतात? त्या मसाल्यात ‘सत्व’च नसतं. मद्यांतील(दारू) भेसळीमुळे अनेक जण मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या नवीन नाहीत. ●कृत्रिमरित्या अन्नपदार्थ आकर्षक बनवणे. लाल तिखटात सुदान डाय (आरोग्याला धोकादायक रसायने), तांदळाला सुगंधित करणे, डाळींना चमक येण्यासाठी टाल्कम पवडर टाकणे, भाज्या हिरव्यागार, टवटवीत दिसण्यासाठी त्या कॉपर सल्फेटमध्ये बुचकळणे, साबुदाणा ब्लिच करणे, शीशे असलेले रंग पेस्टरी, केक या बेकरी पदार्थात टाकणे, कॉफी चिकटू नये म्हणून मॅग्नेशियम ऑक्साइड टाकणे अशी अनेक उदाहरणे देता येतील. ● पदार्थांच्या लेबलवर चुकीची माहिती देणे. जुन्या पदार्थांची तारीख बदलून नवीन टाकणे, आयातीच्या पदार्थांवर त्या देशाचे नाव नसणे, संपूर्ण घटक पदार्थांची यादी न देणे, हाय प्रोटीन, नो शुगर, ऑरगॅनिक असल्याचे दावे, ते पदार्थ तसे नसताना करणे. बघा ना, फ्रुट जूसच्या लेबलवर आंब्याचा ज्यूस असे म्हटलेले असते, पण विचार करा, खरंच १० रुपयाला आंब्याचा रस असलेले पेय मिळेल का? मी एकदा एका कंपनीमध्ये तारीख न टाकता पॅक केलेले पदार्थ बघितले आहे. ऑर्डर आल्यावर तारीख टाकणे हा त्यांचा नियम होता. ●बनावटी पदार्थ. अनेकदा आपण सारखी दिसणारी नावे, नीट न वाचल्यामुळे फसतो. जसे की, BISLERI, AMUL या मूळकंपनीच्या नावात फक्त एखाद्या अक्षराचा फरक केलेला असतो. त्यांच्यावरच्या समान डिझाइनमुळे आपला गोंधळ होतो. आणिआपण बनावट वस्तू विकत घेतो. बनावटी पदार्थांचा बाजार भस्मासुराप्रमाणे फोफावत चालला आहे. ही यादी हनुमानाच्या शेपटासारखी न संपणारी आहे. भेसळ करणारे रोज नवीन क्लृप्त्या शोधून काढतात. माझ्याकडे एकजण तुपाच्या दोन बाटल्या घेऊन आला होता. एक तूप खरे आणि दुसरे खोटे होते. दाणेदार, तुपाचा हलका सुगंध, लॅबोरेटरीमध्ये पाठवल्याशिवाय दोघांचा फरक समजणारच नव्हता, इतकी बेमालूम बनावट होती.
सध्या बाजारात पनीर, चीज आणि त्यांचे analogue मिळतात. दोघांनाही कायद्यात मान्यता आहे. पण अॅनालॉग हे दुग्धजन्य पदार्थ नाहीत. ग्राहकांना यातील फरक स्पष्ट समजावा म्हणून FSSAI अॅनालॉग असलेल्या पदार्थांच्या लेबलवर लावायचे नियम तयार करते आहे
प्रत्येक अन्न व्यावसायिकाची अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (फूड सेफ्टी सिस्टिम) असावी, असे अन्न सुरक्षा कायद्यात नमूद केले आहे. यात पुरवठा साखळीमध्ये कुठे भेसळ होऊ शकते याचे मूल्यांकन करणे अपेक्षित आहे. अन्न फसवणुकीविरुद्ध कच्च्या मालाच्या तपशिलांची पुरेशी माहिती हा एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक पैलू आहे. पुरवठादाराने भेसळयुक्त माल पाठवला तर तो कसा समजतो, क्वालिटी कंट्रोल किती अचूक आहे, ते त्यांचा माल कुठून घेतात इथपासून ते कंपनीचे त्यांच्या पुरवठादारावर किती नियंत्रण आहे, हे बघितले जाते. प्रत्येक देशात अन्न प्रशासक अन्न भेसळ व फसवणूक नियंत्रण कायदा आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा म्हणून कायद्यात भरभक्कम दंड व तुरुंगवास आहे. आपल्या देशात देखील FDA,( Food and Drug Administration) FSSAI ( Food Safety and Standards Authority of India) या सरकारी अन्न प्रशासनाने असे अनेक गुन्हे पकडले आहेत, पकडत असतात.
अन्न प्रशासनाने रोजच्या वापरणाऱ्या अन्नपदार्थात, घरच्या घरी, सोप्या पद्धतीने भेसळ कशी शोधून काढावी हे Detect Adulteration with Rapid Test ( DART) या पुस्तकात दिले आहे. हे पुस्तक ऑनलाइन उपलब्ध असून ते डाऊनलोड करून घेता येते. प्रत्येक घरात हे पुस्तक असायलाच हवे. शिवाय त्यांच्या ‘फूड सेफ्टी कनेक्ट’ या अॅपद्वारे, तक्रार, गुन्हा नोंदवता येतो. ताबडतोब चाचणी करण्यासाठी ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या फिरत्या लॅब्सही आहेत. ७ जूनच्या जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्ताने आपण हे करायलाच हवे.
ग्राहक जागरूकता कशी –
●चटकदार, रंगीबेरंगी गोष्टी पडताळून बघा.
●एखाद्या पदार्थाची किंमत वाजवीपेक्षा कमी-जास्त झाल्यास, वाटल्यास सतर्क व्हा.
●पदार्थावरील लेबल नीट वाचा. केलेल्या दाव्यांना बळी पडू नका. तारीख, घटक, पोषक घटकांचा तक्ता नीट बघा.
●‘डार्ट’ पुस्तकात दिलेल्या कृतीप्रमाणे घरी पदार्थ तपासा.
●समाज माध्यमावरील सगळ्याच बातम्यांवर विश्वास ठेवू नका. मात्र कोणी भेसळ करत असेल आणि त्याची खात्रीपूर्वक माहिती असेल तर तक्रार करा.
ही भेसळ, फसवणूक थांबवायची असेल तर बहिरी ससाण्यासारखी नजर हवी. प्रशासनाची, व्यावसायिकाची, पुरवठादारांची, ग्राहकांची, आपल्या सगळ्यांची. असं म्हणतात, जर तुम्हाला फसवणूक होताना दिसली आणि ती फसवणूक तुम्ही निदर्शनास आणली नाही, तर तुम्हीसुद्धा फसवणूक करणारेच ठरता. तेव्हा भेसळ आणि फसवणूक थांबवण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलू या आणि निरोगी राहू या.
( लेखिका FoodChain ID याअमेरिकी कंपनीच्या भारतीय शाखेच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
cdeulgaonkar@foodchainid.com