वयाप्रमाणे विविध टप्प्यांवर स्त्रीशरीरात बदल घडत जातात. त्या काळात स्त्रियांसाठी धोकादायक ठरू शकतो तो म्हणजे कर्करोग. भारतात गर्भाशयमुखाच्या कर्करोगाने दरवर्षी सुमारे ६७ हजार तर स्तनांच्या कर्करोगामुळे सुमारे ७० हजार स्त्रिया मृत्युमुखी पडतात. मात्र तो वेळीच रोखता येऊ शकतो. त्यासाठी काही चाचण्या नियमितपणे करणे आवश्यक असते. याविषयी…

कर्करोग हा एक जीवघेणा आजार. आपल्या देशाचा विचार करायचा, तर भारतामध्ये दररोज साधारणत: १४ ते १६ हजार व्यक्तींमध्ये कर्करोगाचं निदान होतं. आणि दरवर्षी नऊ लाखांपेक्षा जास्त व्यक्ती कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. भारतातल्या स्त्रियांमध्ये सामान्यत: गर्भाशय आणि स्तनांचा कर्करोग, तर पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग (oral cavity cancer) आणि फुप्फुसांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वाधिक आहे.

आपल्या शरीरात नवीन पेशी निर्माण करण्याचं कार्य अविरतपणे सुरू असतं. नवीन पेशी निर्माण होऊन नंतर त्या कार्यरत होतात. काही काळाने त्या नष्ट होऊन त्यांच्या जागी नवीन पेशी तयार होतात. ही संपूर्ण प्रक्रिया जनुकांच्या नियंत्रणाखाली नियमितपणे चालू असते. कर्करोगामध्ये काही पेशींवरील नियंत्रण सुटतं. या पेशी नियंत्रणाबाहेर वेड्यावाकड्या वाढू लागतात. या पेशींचे गुणधर्म वेगळे असतात. त्या निरोगी पेशींवर आक्रमण करून त्यांना इजा करतात आणि शरीरात कुठेही पसरू लागतात.

कर्करोग हा काही नवीन आजार नाही. इसपूर्व १६००मध्ये इजिप्तमधील वैद्याकीय ग्रंथामध्ये (Edwin Smith Papyrus) स्तनाच्या गाठीचा उल्लेख आढळतो. कर्करोगाची गाठ खेकड्यासारखी पसरत असल्याने इसपूर्व ४०० मध्ये हिप्पोक्रेटसने कर्करोगाला ‘कार्सिनोस’ हे नाव दिलं. ‘कार्सिनोस’ म्हणजे ग्रीक भाषेत खेकडा. ‘कॅन्सर’ हा हल्ली प्रचलित असलेला शब्द लॅटीन भाषेतला आहे. ज्याचा अर्थही खेकडा असाच आहे. १८४०मध्ये रुडॉल्फ वर्चाव्ह या जर्मन डॉक्टरने कर्करोगांच्या पेशींचं वर्णन केलं. तेव्हापासून आजपर्यंत आधुनिक वैद्याक शास्त्रामध्ये कर्करोग व त्याच्या उपचारप्रणाली- विषयी अभ्यासपूर्ण शोध लावले गेले आहेत.

भारतामध्ये दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग (Cervix Cancer) होतो व ६७ हजारांपेक्षा जास्त स्त्रिया त्यामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडतात. म्हणजेच भारतात दररोज साधारणत: १८५ स्त्रियांचा मृत्यू गर्भाशयमुखाच्या कर्करोगाने होतो. पाश्चात्त्य देशांमध्ये नियमित तपासण्यांच्या मदतीने गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचं प्रमाण कमी करण्यात यश आलं आहे. गर्भाशयमुखाचा कर्करोग ‘ह्युमन पॅपिलोमा’ या विषाणुमुळे (HPV) होतो. या विषाणूचा संसर्ग बहुतेकदा शरीरसंबंधातून होतो. ज्या स्त्रियांच्या शरीरात हा विषाणू दीर्घकाळ राहतो, त्यांच्यात कर्करोगाची भीती जास्त असते. गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची लक्षणं दुर्देवानं अनेकदा उशिरा लक्षात येतात. अंगावरून रक्तमिश्रित, दुर्गंधीयुक्त स्राव जाणं, शरीरसंबंधानंतर रक्तस्राव होणं ही त्याची काही लक्षणं, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कर्करोग अनेकदा टाळता येतो.

‘एचपीव्ही’चं लसीकरण गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देतं. ही लस नवव्या वर्षापासून पंचेचाळीस वर्षापर्यंत घेता येते. याचे दोन किंवा तीन डोस दिले जातात. भारतामध्ये दोन प्रकारच्या लस उपलब्ध आहेत. ‘Quadrivalent’ लशीतून ‘एचपीव्ही’च्या चार प्रकारच्या विषाणूंपासून संरक्षण मिळतं. या लशीमुळे कर्करोगाची शक्यता ७० टक्क्यांनी कमी होते. ‘Nanovalent’ लशीमुळे ‘एचपीव्ही’च्या नऊ प्रकारच्या विषाणूंपासून संरक्षण मिळतं व गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून ९० टक्के संरक्षण मिळतं.

स्त्रियांमध्ये काही विशिष्ट चाचण्या करून गर्भाशयाच्या मुखातील कर्करोगपूर्व बदलांचे (Pre- cancer changes) निदान करता येतं. यातील सर्वात जुनी आणि सर्वसामान्यपणे केली जाणारी चाचणी म्हणजे ‘पॅप स्मिअर’ (PAP Smear). १९२०मध्ये डॉ. जॉर्ज पापनीकोलाऊ नावाच्या डॉक्टरने ही चाचणी विकसित केली. गर्भाशयाच्या मुखाजवळील स्रावामधून कर्करोगाचं निदान लवकर करणं शक्य झालं. ही तपासणी वयाच्या २५ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंत दर तीन वर्षांनी केली जाते. गर्भाशयमुखाजवळील स्रावात ‘एचपीव्ही’च्या विषाणूचं अस्तित्व बघण्यासाठी ‘एचपीव्ही चाचणी’ केली जाते. ही चाचणी अत्यंत प्रभावशाली असते. याशिवाय ‘कोल्पोस्कोपी’, ‘व्हीआयए’सारख्या चाचण्या गर्भाशयमुखाचा कर्करोगपूर्व टप्पा बघायला केल्या जातात. पाश्चात्त्य देशात या चाचण्या सक्तीच्या असल्यामुळे गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.

स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग. भारतात दरवर्षी स्तनांच्या कर्करोगाचे साधारणत: दीड लाख नवीन रुग्ण आढळतात. या कर्करोगामुळे भारतात दरवर्षी साधारणत: ७० हजार स्त्रिया मृत्युमुखी पडतात. गेल्या काही दशकांत स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढलंय. बदलती जीवनशैली व वाढलेली आयुर्मर्यादा ही त्याची महत्त्वाची कारणे. स्तनांचा कर्करोग ९९ टक्के स्त्रियांमध्ये आढळतो. पुरुषांमध्ये हे प्रमाण फक्त ०.५ ते १ टक्का आहे.

स्तनांमध्ये आढळलेली प्रत्येक गाठ ही कर्करोगाचीच असते का? तर नाही. स्तनांमध्ये आढळणाऱ्या नवीन गाठींपैकी फक्त दहा टक्के गाठी कर्करोगाच्या असतात. बाकीच्या ९० टक्के गाठींमध्ये कर्करोग आढळत नाही. या प्रामुख्याने स्नायूच्या गाठी (Fibroadenoma), पाण्याच्या गाठी (cyst), दुधाच्या गाठी किंवा गळू असू शकतात. अर्थात स्तनांमध्ये गाठ आढळल्यास प्रत्येक वेळी तिची तपासणी करून घ्यायला हवी हे नक्की.

काही स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका जास्त संभावतो. आनुवंशिकता, जास्त काळ संप्रेरकयुक्त औषधं घेणं, धूम्रपान, स्थूलपणा ही त्याची काही कारणं. स्तनांमध्ये गाठ आढळणं हे कर्करोगाचं एक लक्षण. स्तनाग्रातून स्राव येणं, स्तनाग्र आत ओढलं जाणं, स्तनामध्ये खड्डा पडणं, लालपणा येणं ही त्याची इतर काही लक्षणं. कर्करोगाचं निदान लवकर होणं फार महत्त्वाचं. यासाठी प्रत्येक स्त्रीने दर महिन्याला स्तनांची स्व-तपासणी करणं महत्त्वाचं आहे. चाळिशीनंतर ‘सोनोग्राफी’ व पन्नाशीनंतर ‘मॅमोग्राफी’ नियमितपणे करायला हवी. कर्करोगाचं निदान लवकर झाल्यास वेळेत उपचार देऊन पुढील गुंतागुंत टाळता येते.

६०वर्षांच्या प्रतिभाची मासिक पाळी बंद होऊन दहा वर्षं झाली. गेले काही दिवस मात्र योनीमार्गातून अधूनमधून थोडा रक्तस्राव होत असल्याचं तिला जाणवलं. खरं तर पाच-सहा महिन्यांपूर्वीदेखील असाच रक्तस्राव झाला होता, पण तो आपोआपच थांबला. आता मात्र रक्तस्राव थांबत नसल्याने ती डॉक्टरांकडे गेली. सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाच्या आतील स्तर खूप जाड झाल्याचं लक्षात आल्यामुळे डॉक्टरांनी ‘बायोप्सी’ केली. तपासणीमध्ये कर्करोगपूर्व पेशी (Precancerous cells)आढळल्यामुळे वेळेतच उपचार केले गेले व कर्करोग टाळता आला.

गर्भाशयाचा कर्करोग साधारणत: साठीनंतर होतो. यामध्ये गर्भाशयाच्या आतील आवरणाचा कर्करोग (Endometrial Cancer) कॉमन असतो. आनुवंशिकता, लठ्ठपणा व पीसीओडीचा पूर्वी त्रास असणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. ज्या स्त्रियांनी ‘इस्ट्रोजन’ संप्रेरक किंवा ‘टॅमॉक्सीफेन’सारखी स्तनाच्या कर्करोगासाठी औषधं घेतली आहेत, त्यांच्यात गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता थोडी जास्त असते. रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होणं, पाळीच्या वेळी जास्त किंवा अनियमित रक्तस्राव होणं ही त्याची लक्षणं असू शकतात. गर्भाशयाच्या आतील आवरणाची बायोप्सी करून गर्भाशयाच्या कर्करोगाचं निदान केलं जातं.

बीजांड कोशात अनेक प्रकारच्या गाठी निर्माण होतात. पाण्याच्या गाठी संप्रेरकांमधील असंतुलनामुळे होतात, तर ‘एन्डोमेट्रीओसिस’ सारख्या आजारात रक्ताच्या गाठी निर्माण होतात. साधारणत: १५ ते २० टक्के गाठी कर्करोगाच्या असू शकतात. आनुवंशिकता, वंध्यत्वासाठी घेतलेले उपचार, स्तन किंवा मोठ्या आतड्यांचा कर्करोग झालेल्या स्त्रियांमध्ये बीजांडकोशाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. दुर्दैवानं अनेकदा बीजांडकोशाच्या कर्करोगाची लक्षणं लवकर जाणवत नाहीत. कर्करोगाच्या पुढच्या टप्प्यात वजन कमी होणं, नीट भूक न लागणं, पोटात दुखणं, पोट फुगणं यांसारखे त्रास जाणवायला लागतात. बीजांडकोशाच्या कर्करोगाचं निदान सोनोग्राफी, एमआरआय व रक्तचाचण्यांनी केलं जातं.

कर्करोगावर उपचार करताना गाठीचा प्रकार, कर्करोगाचा प्रसार, त्यातील हार्मोन रिसेप्टर्स यांसारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो व उपचारपद्धती ठरवण्यात येते. शस्त्रक्रिये- बरोबरच किमोथेरपी, रेडिएशन व संप्रेरकयुक्त औषधं देता येतात. हल्ली जैविक उपचार व इम्युनोथेरपीसारखे आधुनिक उपचारदेखील कर्करोगातून बरं होण्यासाठी केले जातात.

अँजेलीना जोली ही हॉलीवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री २०१३मध्ये वेगळ्याच कारणाने प्रकाशझोतात आली. अँजेलीनाच्या आईचा स्तनांच्या कर्करोगाने मृत्यू झाला. तिच्या आजी व मावशीलादेखील स्तनांचा कर्करोग झाला होता. त्यामुळे अँजेलीनाने स्वत:चं आनुवंशिक मूल्यमापन करून घेतलं. त्यामध्ये ‘BRCA-1’ या जनुकातील ‘म्युटेशन’ची (उत्परिवर्तन) चाचणी सकारात्मक आली. तिला भविष्यात स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता ८७ टक्के, तर बीजांडकोशाचा कर्करोग होण्याची शक्यता ५० टक्के होती. यामुळे अँजेलीनाने स्तन, बीजांडकोश व गर्भाशयनलिका काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय खूप गाजला.

आनुवंशिकतेचा कर्करोगाशी असलेला संबंध चाचणीद्वारे आपल्याला आधीच समजू शकतो, हे लक्षात आल्याने कर्करोगासाठी आनुवंशिक चाचण्या करून घेण्याचं प्रमाण वाढलं.

आधुनिक वैद्याकशास्त्रात जनुकीय विज्ञानाला (Genetics) अनन्यसाधारण महत्त्व आहे. जनुकांच्या अभ्यासामुळे आपल्याला कोणते आनुवंशिक आजार होण्याची शक्यता आहे हे कळतं. यामुळे रोग टाळायला किंवा रोगाचं निदान लवकर व्हायला मदत होते. जनुकीय शास्त्राचा उपयोग उपचारपद्धतीमध्येही होतो. आनुवंशिक कर्करोगासाठी जनुकांमधील ‘म्युटेशन’ कारणीभूत असतं. असं ‘म्युटेशन’ असलेल्या व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. स्तन, बीजांडकोश, गर्भाशय व मोठया आतड्याचे कर्करोग जनुकीय ‘म्युटेशन’मुळे होतात. हे कर्करोग झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांमध्ये जनुकीय ‘म्युटेशन’ असण्याचा धोका अधिक असतो. हा धोका जनुकीय चाचण्यांमुळे आधीच कळला, तर त्यावर वेळीच उपाययोजना करता येते.

कर्करोगाचे प्रमाण आजकाल वाढलंय हे खरंय. बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, मधुमेह, फॅटी लिव्हर यांसारखे आजार वाढत आहेत. या आजारांमध्ये कर्करोग होण्याची जास्त भीती असते. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, वाढलेलं मांसाहाराचं प्रमाण, मांसाहारातून मिळणारी संप्रेरकं, तंबाखू व मद्यापानासारखी व्यसनं यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. आपल्या देशातील वायुप्रदूषण, अस्वच्छता, अन्नातील भेसळ हीदेखील कर्करोगाची महत्त्वाची कारणं आहेत. वाढलेल्या आयुर्मानामुळे उतारवयात होणाऱ्या कर्करोगाचं प्रमाणही अधिक आहे.

कर्करोग म्हटलं की, प्रचंड भीती आणि असाहायता वाटते. कर्करोग होऊ नये यासाठी काही करता येईल का? कर्करोगातून आपण पूर्ण बरे होऊ का? असे अनेक प्रश्न रुग्णांना पडतात. बरे झालो तरी आयुष्यभर कायम परत कर्करोग होण्याची भीती. यामुळे रुग्ण आजारापेक्षा मानसिकदृष्ट्याच जास्त खचून जातो. अशा वेळी रुग्णाच्या जवळच्या लोकांना खंबीर राहण्याची, त्यांना कायमस्वरूपी आधार देण्याची गरज आहे. आजकाल प्रमाणित केलेल्या कर्करोगाच्या चाचण्या (Standerdised Cancer Screening tests) नियमितपणे केल्यानं आपण कर्करोगाचा धोका नक्कीच कमी करू शकतो.