डॉ. वृषाली किन्हाळकर
प्रत्येकाला वाटणाऱ्या भीतीचा प्रकार वेगळा असला, तरी जिथे मोह आहे, तिथे अनेकदा भय असतंच हे एक सूत्र. या मोहाला आपल्यापासून वेगळं केलं आणि सामोरं येईल त्याचा स्वीकार करायची सवय लावून घेतली, तर भयही संपेल का? संतकवींना ही किमया लीलया साधली होती. सामान्यांना मात्र अनुभवांची किंमत देऊन शिकावं लागतं.

महिन्यावर श्रावणीची परीक्षा होती. अभ्यास झालाय असं वाटत होतं, तरीही मनाची चलबिचल होतीच. जसजशी परीक्षा जवळ येत होती, श्रावणीच्या मनातील आंदोलनांनी भीतीचं स्वरूप धारण केलं. निकाल मनाप्रमाणे लागायला हवा. ‘आई-बाबांनी तालुक्याहून माझ्यासाठी संपूर्ण घरच इथे- जिल्ह्याच्या ठिकाणी हलवलंय. बाबा नोकरीच्या गावी रोज जाणं-येणं करतात. हे सगळं माझ्यासाठी! मला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालाच पाहिजे. विचारांच्या आवर्तात ती गुरफटत गेली. परीक्षा चारच दिवसांवर आलीय आणि तिची धडधड वाढतेय, झोप येतच नाही. अभ्यासात मन एकाग्र होत नाही. कारण- भीती. कशाची आहे ही भीती?..

ओंकारच्या आईच्या छातीत एक गाठ झाली. मी बायोप्सी आणि मॅमोग्राफीचा सल्ला दिला. दोन्ही तपासण्यांचे रिपोर्ट्स घेऊन माझ्याकडे आलेला ओंकार अक्षरश: लटपटत आलाय. कपाळा- वरचा घाम पुसत, आवंढा गिळत मला विचारतोय, ‘‘काय झालंय आईला?’’  घाम आणणारं हे भय कशाचं आहे?..

 डॉ. अंजलीनं कालच ‘सिझेरियन’ केलेल्या एका स्त्रीचा रक्तदाब सातत्यानं कमी होतोय. बहुधा तिला अतिदक्षता विभागात हलवावं लागेल. हे सगळं नातेवाईकांना सांगताना अंजली पूर्णपणे भयभीत झालीय. वरकरणी शांत असली, तरी तिला एका अनामिक भीतीनं ग्रासलं आहे. ही भीती कशाची?

 उपरोक्त सगळे प्रसंग आपल्या सर्वाच्या परिचयाचे आहेत. तिन्ही प्रसंगांतलं भय सारखंच आहे, मात्र प्रत्येकाचं मूळ वेगळं आहे.

    बारावीचा अभ्यास करणाऱ्या श्रावणीला भीती आहे, ती आई-वडिलांच्या अपेक्षाभंगाची. तिनं डॉक्टर व्हावं ही त्यांची इच्छा. ती अजून अबोध आहे. आयुष्य, ध्येय या गोष्टी व्यवस्थित समजण्याचं तिचं वय नाही. मात्र, तिच्यासाठीच केवळ घर शहरात हलवलं आहे, याचं दडपण तिच्या मनावर आहे. दडपण, अपेक्षा आणि  निकालाची अनिश्चितता, यांमुळे हे भय उत्पन्न झालं आहे आणि दिवसागणिक ते वाढतंच आहे.

 ओंकारला भीती आहे ती आईच्या आजाराची. कर्करोग असेल का? असेल तर आईचं आयुष्य आता किती असेल? आईच्या मृत्यूच्या भीतीनं ओंकारला थरथर सुटली आहे.

  डॉ. अंजलीनं सिझेरियन व्यवस्थित केलं आहे. रुग्ण स्त्रीची काळजीदेखील ती घेतेय. तरीही तिला अतिदक्षता विभागात ठेवावं लागेल, हे नातेवाईकांना सांगताना अंजली प्रचंड घाबरलेली आहे. नातेवाईक ही अनपेक्षित गुंतागुंत समजून घेतील का? समजा, सगळे प्रयत्न करूनही ती स्त्री दगावली तर? नातेवाईक आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतील का? या विचारानं ती हादरली आहे. आपली प्रतिष्ठा धोक्यात येईल का? व्यवसायावर होणारा अनिष्ट परिणाम,  कर्जाचे हप्ते, या विचारचक्रात गुरफटून तिचं भय वाढतं आहे.

 भय अशा अनेक प्रकारांचं असतं. भीती हा काही आजार नव्हे, मात्र मर्यादेपलीकडची भीती ही एक विकार असते. अनेक प्रकारचे ‘फोबिया’ माणसांना होतात. मात्र लहानपणी अंधाराची भीती वाटणं, आई दूर गेली की भीती वाटणं, शाळेत जाताना भीती वाटणं, एकटीनं प्रवास करताना भीती वाटणं, हे घडतंच. (कोणत्याही वयाच्या स्त्रीला दिवसा/रात्री कधीच, कुठेच भय वाटणार नाही, असा सुदृढ, निरोगी समाज हे सध्या तरी स्वप्नच आहे.) काही मुलींना तर लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचीदेखील भीती वाटते. तिथे लैंगिक अज्ञान कारणीभूत असतं आणि अशा गोष्टी सांगण्याचं मोकळं, निरोगी वातावरण घरात नसतं.

 अनेक स्त्रियांना संसार मोडण्याचं भय असतं. ‘टीचभर रूढीबाज आभाळ’ या राजन खान यांच्या कादंबरीतली नायिका संसारात रमलेली असताना एका दुपारी तिचा लग्नापूर्वीचा प्रियकर दारात उभा ठाकतो अन् तिला भेटायला येण्याची सक्तीच करतो. उद्या नाही आलीस, तर ‘तुझ्या सासरच्या लोकांना आपल्या प्रेमाची कहाणी सांगेन,’ अशी धमकी देतो. घाबरलेली नायिका संध्याकाळ आणि संबंध रात्र तळमळत राहते. नवरा, सासू यांना मनाची घालमेल कळू न देण्याची काळजी घेत विचार करत राहते. आपण उद्या नाही गेलो तर काय होईल आणि समजा गेलो आणि घरी कळलं तर काय होईल, या विचारांनी तिचं भय चक्रवाढ व्याजासारखं वाढत जातं. रात्र मुंगीच्या गतीनं सरकत जाते, मात्र तिची भीती  शेकडो पटीनं चढत जाते. या भीतीचा कडेलोट होऊन सकाळी ती भेदरलेली पोर पंख्याला लटकलेली आढळते! भीती ही अशी जीवघेणीही असते!

मोठमोठय़ा मंदिरांत जमा होणारी प्रचंड देणगीची रक्कम काय सूचित करते?.. बदनामीचं, अप्रतिष्ठा होण्याचं भय असतंच त्याच्या तळाशी. अवैध मार्गानं संपत्ती जमा केली की मनात साचणारं भय, मंदिरात देणग्या देऊन संपवण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात. माणसांना पराजयाचीदेखील भीती असते. प्रसिद्धी धोक्यात येण्याची भीती असते. व्यवहारात तोटा, नुकसान होण्याची, आर्थिक संकटांची भीती असते. नातं तुटण्याची भीती असते. जिवलगांच्या चिरविरहाची भीती असते. आणि सर्वात मोठी भीती मृत्यूची असते! मृत्यूला तर घाबरतातच लोक; परंतु मृत माणसांनादेखील घाबरतात. मृतांच्या अस्थी, त्यांचे कपडे, वस्तू, यांबद्दल अनेक गैरसमज असतात. माणूस जिवंत असताना त्याच्यासाठी जेवढं काटेकोर नियमपालन केलं जातं, त्याहून किती तरी अधिक काळजीपूर्वक लोक अंत्यसंस्कारावेळी नियम पाळतात. माणसांपेक्षा लोक मृतात्म्याला अधिक घाबरतात असं जाणवतं. या भयाचं मूळ कारण या जीवनाची अनिश्चितता! आज आहे, आता आहे; मात्र पुढच्या क्षणाचं काय? हे भय!

भयापोटीच अनेक माणसं देवपूजा करतात. काही तरी हवं, हा मोह म्हणून  किंवा अमुक एका गोष्टीचं भय; तर ते होऊ नये, म्हणून देवाला पुजायचं. खरा ईश्वर कुठे कळतो माणसांना? अशुभाचं भय मनात ठाण मांडून बसलेलं असतं आणि उद्याचा भरवसा तर या जगाच्या पाठीवर कुणीच देऊ शकत नाही, म्हणून कोणतं ना कोणतं भय माणसाच्या मनात असतंच असतं. 

मला माझ्या अनुभवांनी शिकवलं आहे, की भीतीला संपवायचं असेल, तर अपेक्षाविरहित जगायला आणि आलेल्या दिवसाचा सहज स्वीकार करायला शिकलं पाहिजे. अर्थात हे सोपं मुळीच नाही. पण प्रयत्नांती शक्य आहे. हळूहळू स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करत जावं. विपश्यना करताना गोयंका गुरुजी शिकवायचे – ‘अनित्यबोध’.  Everything is impermanent हे मनावर ठसवण्यासाठी दहा दिवस विपश्यना शिबिरात मन:पूर्वक प्रयत्न करावा लागतो. पुढे मग आजन्म साधना करत राहावी, तर सहज स्वीकार करत ‘अनित्यबोध’ समजू लागतो. घडणारं, अनुभवाला येणारं, सोसावं लागणारं, भलंबुरं, सारंच जर क्षणभंगुर आहे, टिकणारं नाहीच आहे, तर मग भय कुठलं असणार?

  ईश्वराचं नामस्मरण हादेखील उपाय अनेकांना निर्भय करतो, मात्र हे नामस्मरण कोणत्या तरी मोहापोटी नसावं. संसारसुखांच्या पलीकडे मनाला न्यावं लागतं. आपल्याला संतचरित्रांमधून नामस्मरणाचं अनन्यसाधारण महत्त्व कळलेलं आहे,

मात्र ते निर्हेतुक, निरपेक्ष नामस्मरण माणसाला जमत नाही.

  कबीरपंथी लोक कबीराचं एक भजन गातात- ‘साहिब हमको डर लागे एक दिन रो’ हे त्याचं ध्रुवपद आहे. भजनाचा अर्थ असा आहे, की हे शरीर एक मातीचं भांडं आहे आणि एके दिवशी ते फुटून जाईल याची सतत भीती वाटते. किंवा हे आयुष्य म्हणजे एक मोत्यांची माळ आहे, पण एक दिवस धागा तुटला की मोती इतस्तत: विखरून जातील, याची भीती वाटतेय देवा! पापणी लवते न लवते, तोवरच क्षणार्धात अचानक हे जीवन संपून जाईल. क्षणाचाही भरोसा देता येत नाही. हे जीवन म्हणजे सुंदर फुलांची बाग आहे, पण एक दिवस या बागेत हरणं शिरून सगळी नासधूस करतील याची भीती वाटतेय देवा.

 अशा वेगवेगळय़ा उपमा वापरत कबीर आयुष्यातल्या सौंदर्याचं वर्णन करतानाच त्यातली क्षणभंगुरतादेखील सांगत जातात. तरीही माणसाचं जीवनविषयक आकर्षण संपत नाही, म्हणूनच मग भय वाटतच राहतं. अत्यंत व्याकुळ शब्दात कबीर म्हणत जातात, ‘डर लागे एक दिन रो’ आणि माणसाची जीवनाबद्दलची आसक्ती, मोह आणि बेभरवशाचं क्षणजीवी आयुष्य अधोरेखित करतात. मोहामुळेच तर भय निर्माण होतं. मात्र शेवटच्या कडव्यात कबीर भयमुक्तीचा उपायदेखील सांगतात- ‘पहला हैं नाम अलख रो’. त्या न पाहिलेल्या, न दिसणाऱ्या ईश्वराचं नामस्मरण हाच सगळय़ा भयाला संपवणारा, माणसाला निर्भय करणारा इलाज आहे, असं कबीर सांगतात.

  मलाही आजवरच्या आयुष्यानं हेच सांगितलं आहे. मी असाच प्रयत्न करते आणि बऱ्याच अवघड प्रसंगांत निर्भय राहण्यात यशस्वी होते. कोणत्याही गोष्टीसाठी मनातून जेवढा तीव्र नकार येतो, तेवढा ताण वाढतो. ताणतणाव तुमच्या सबंध आरोग्याला घातक आहेत. एकदा मानसिक काय किंवा शारीरिक काय, आरोग्य बिघडलं, की भीतीची मालिका सुरूच होते.  

   मोह आणि भय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मोह आहे तर भय असणारच. लौकिकाचा मोहाचा धागा तोडायचा प्रयत्न करा, भय उरणारच नाही!

  निर्मोही होणं हे निर्भय होण्या- आधीचं महत्त्वाचं आणि तितकंच अवघड पाऊल आहे.

sahajrang@gmail.com