१९ जुलैच्या पुरवणीतील अनुपमा गोखले यांचा लेख वाचला. क्रीडा क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी केलेल्या स्त्रियांच्या मातृत्वाच्या वेळी होणारी शारीरिक व मानसिक कसरत त्यांनी उत्तम मांडली आहे. भारतीय समाजात लग्न झाल्यावर मातृत्वावर विशेष जोर दिला जातो. कुटुंबातूनही आणि समाजातूनही. तरी या दबावातून खेळासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्त्रियांचा या लेखात प्रेरणादायी आढावा घेतला गेला आहे. लेखिका स्वत:ही बुद्धिबळपटू असल्याने या क्षेत्रातील आव्हाने त्यांना चांगलीच माहिती असणार यात शंका नाही. लेख छान जमलाय.– अजिंक्य कुलकर्णी, अस्तगाव, अहिल्यानगर
अंधश्रद्धेपायी नुकसान
१९ जुलैच्या अंकातील ‘नको नको ज्योतिषा माझ्या दारी येऊ…’ या शीर्षकाचा अॅड. रंजना पगार गवांदे यांचा लेख वाचला. आजही समाजव्यवस्थेमध्ये सामान्य माणसे अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, भविष्य याच्या नादी लागून स्वत:चं आयुष्य, सुखी संसार उद्ध्वस्त करून घेताना दिसत आहेत. अनेक बाबा, बुवा, भोंदू अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून विविध प्रकारची आमिषे दाखवून त्यांना नवस फेडण्यासाठी म्हणा किंवा इतर काही गोष्टी करण्यासाठी खूप खर्च करायला लावतात. म्हणजेच त्यांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण करतात. त्यामुळे त्यामध्ये अडकलेला माणूस दिशाहीन होताना दिसत आहे. अशा अंधश्रद्धेपायी अॅड. पगार गवांदे यांनी एक कुटुंब कसे कसे उद्ध्वस्त होत गेले, आपल्याच माणसांना एकमेकांपासून कसे तोडले गेले हे अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे.– प्रा. डॉ. सतीश मस्के, धुळे
समाजप्रबोधन हाच मार्ग योग्य
१९ जुलैच्या अंकातील ‘स्त्री चळवळीची पन्नाशी!’ या सदरातील अॅड. निशा शिवूरकर यांचा ‘बालविवाह चळवळ चालूच राहील…’ हा लेख वाचला, माझ्या मते, बालविवाह थांबवण्यासाठी फक्त सरकारी कायदे किंवा योजना पुरेशा नाहीत. अनेक वेळा हे कायदे कागदावरच राहतात. खऱ्या अर्थाने बदल घडवायचा असेल तर समाजातील जुन्या चुकीच्या समजुती बदलायला हव्यात. सामाजिक दबावामुळेही बालविवाह होतात. म्हणजे मुलीचं लग्न लावणं हा अनेकांना ‘सन्मान’ वाटतो. पण खरं म्हणजे, सन्मान म्हणजे तिचं शिक्षण, आत्मनिर्भरता आणि स्वप्नं पूर्ण करणं. त्यामुळे समाजप्रबोधन हाच मुख्य मार्ग आहे. प्रत्येक गावात, शाळांमध्ये, मंदिरांमध्ये, मेळ्यांमध्ये लोकांशी थेट संवाद साधून त्यांना समजावलं पाहिजे की बालविवाह म्हणजे गुन्हा आहे आणि तो आयुष्यभराचं दु:ख देऊ शकतो. मुलगी किंवा मुलगा, दोघांनाही त्यांच्या बालपणी खेळायला, शिकायला, वाढायला मिळायला हवं. बालविवाह म्हणजे त्यांच्या स्वप्नांचा गळा घोटणं. त्यामुळे फक्त कायदे नकोत, समाजात बदल हवा. आणि तो बदल आपल्यापासून सुरू होतो. आपल्या घरातून, शेजाऱ्यांपासून आणि आपल्या रोजच्या बोलण्यातून.– सतीश घुले, पाथर्डी (अहिल्यानगर)
सगळेच अवयव थोर!
५ जुलैच्या अंकातील ‘मंत्र धन्यवादाचा’ लेख वाचला. अगदी खरं आहे. वयोमानामुळे माझे गुडघे आता दुखू लागले आहेत. औषधपाणी केल्यावर थोडाफार फरक पडतो. पण मी विचार केला, आईने ‘चाल चाल माते, पायी भरले काटे’ असे म्हणत मला बालपणी चालायला शिकवल्यापासून माझी वाटचाल सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत हे माझे दोन्ही पाय मला आपल्यावर पडणारा माझा भार सोसत कुठे कुठे घेऊन गेले, याचा नुसता विचार केला तरी त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने आपले शिर त्यांच्या पुढे रोज झुकवावे असे वाटू लागते, पण त्याच वेळी शरीरातील विविध अवयवांची महती लक्षात येऊ लागते. हातापायाचे एखादे बोट जरी काही कारणाने जायबंदी झाले तरी पूर्ण हाताच्या पंज्याचे अपूर्णत्व ध्यानात येते. ज्या शरीरसंपदेच्या जोरावर माणूस अविश्वसनीय आणि अविस्मरणीय कर्तृत्व दाखवू शकतो त्या अगदी निसर्गदत्त, अगदी मोफत मिळालेल्या, शरीराच्या प्रत्येक स्नायूची किंमत करायला गेले तर ती अशक्यप्राय गोष्ट ठरेल. काही वर्षांपूर्वी मी माझा दुखरा दात काढायला डेंटिस्टकडे गेलो होतो. त्यांनी माझा तो दात काढून एका ट्रे मध्ये ठेवून माझ्यापुढे धरला. हल्ली तशी पद्धत आहे. सर्जरी केल्यावर, तो काढून टाकलेला शरीराचा भाग त्या रुग्णाला दाखवतात. मी त्या दाताला अगदी मनोभावे हात जोडून नमस्कार केला. डॉक्टर म्हणाल्या, ‘‘काय हो काका?’’ मी म्हटलं, ‘‘इतकी वर्षं मला अन्न पचवायला ज्यांनी इमानेइतबारे साथ दिली, माझ्या खाण्याच्या हावेपुढे तोही बिचारा थकून धारातीर्थी पडला, म्हणून त्याला माझा मन:पूर्वक नमस्कार. या जन्मी तरी मला त्याचे उतराई होणे शक्य नाही. म्हणून त्याला भक्तिभावाने नमस्कार.’’ लेख वाचला आणि हे सगळं आठवलं.– मोहन गद्रे, मुंबई