डॉ. वैशाली बिनीवाले
वंध्यत्वाचे स्त्रीवर भावनिकच नाही, तर कौटुंबिक आणि सामाजिक परिणामही होतात. यावर जीवनशैलीत बदल करणे यासह डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले आधुनिक उपचार जोडप्यांसाठी वरदान ठरत आहेत. खरे तर या समस्येमुळे जोडप्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी त्यांना कुटुंब आणि समाजाच्या भावनिक आधाराची जास्त गरज असते.
मध्यंतरी पुण्याजवळील एका खेड्यातून एक पुरुष आपल्या दुसऱ्या बायकोला वंध्यत्वाच्या उपचारांसाठी घेऊन आला होता. पहिल्या बायकोला बरीच वर्षं झाली, तरी मूल-बाळ होत नसल्याने त्याच्या घरच्यांनी त्याचं दुसरं लग्न लावून दिलं होतं. आता दुसऱ्या बायकोलाही गर्भ राहात नसल्याने तिला तपासणीसाठी घेऊन आला होता. डॉक्टरांनी दोघांच्याही तपासण्या कराव्या लागतील असं सांगितलं. त्याची तपासणी करताना लक्षात आलं की, त्याच्या शुक्राणूनलिकेत अडथळा असल्याने वीर्यामध्ये शुक्राणूच नव्हते. त्याने यापूर्वी तपासणी करून न घेतल्यामुळे हा दोष कधी लक्षातच आला नव्हता. हे निदान आधीच झालं असतं तर? हा दोष पुरुषात आहे हे कळलं असतं तर?
आपल्या समाजात वंध्यत्वासाठी अनेकदा फक्त स्त्रीलाच जबाबदार धरलं जातं. त्यामुळे तपासण्यांचा सगळा रोख स्त्रियांकडेच असतो. अनेकदा असंही निदर्शनास येतं की, वंध्यत्वाची समस्या घेऊन आलेल्या जोडप्यांतील स्त्री सर्व तपासण्या करून घ्यायला, उपचार करून घ्यायला लगेच तयार होते, मात्र पुरुष तपासणीसाठी फारसे राजी नसतात. प्रत्यक्षात आकडेवारी पाहिली, तर वंध्यत्व असलेल्या जोडप्यांपैकी पुरुषांमध्ये दोष आढळण्याचं प्रमाण साधारणत: ३० टक्के असतं. वंध्यत्व ही खरं तर जोडप्याची एकत्रित समस्या असते, म्हणूनच स्त्री आणि पुरुष दोघांनीही आपापल्या तपासण्या करून घेणं, औषधोपचार घेणं संयुक्तिक ठरतं.
पुरुषांमध्ये वंध्यत्वाची अनेक कारणं असतात. वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या व गतिशीलता कमी असल्यास किंवा शुक्राणूंमध्ये दोष असल्यास गर्भधारणेची शक्यता कमी होते. कमी गती असलेले अथवा दोष असलेले शुक्राणू गर्भाशयनलिकेतील स्त्रीबीजापर्यंत पोचून त्याचं फलन करू शकत नाहीत. त्यामुळे गर्भधारणा होत नाही. शुक्राणूंमध्ये दोष का निर्माण होतात? धूम्रपान, तंबाखूचं सेवन व मद्यापानासारख्या व्यसनांमुळे शुक्राणूंमध्ये दोष निर्माण होतात. अनियंत्रित मधुमेह, यकृत व मूत्रपिंडाचे आजार, स्थूलपणा यामुळे शुक्राणूंच्या निर्मितीत समस्या येतात. त्यांची गुणवत्ता खराब होते. शुक्राणूनलिकेतील अडथळे, गालगुंड इतर जंतुसंसर्ग, पुरुषांच्या जननसंस्थेला झालेली इजा, गुणसूत्रांमधील दोष ही पुरुषांमधील वंध्यत्वाची आणखी काही कारणं आहेत.
रक्त तपासणी, वीर्याची तपासणी आणि सोनोग्राफीच्या साहाय्याने दोषांचं निदान करता येतं. शुक्राणूंमध्ये दोष आढळल्यास सर्वप्रथम संतुलित आहार व नियमित व्यायामाच्या मदतीने शारीरिक तंदुरुस्ती मिळवायला हवी. आजारांवर नियंत्रण मिळवायला हवं. धूम्रपान, अति मद्यापानासारखी व्यसनं ताबडतोब बंद करायला हवी. वीर्यामधील शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी औषधोपचार केले जातात. काही वेळेस ‘आययूआय’ (इंट्रा-युटेराइन इन्सेमिनेशन) किंवा ‘आयव्हीएफ’ (इन विट्रो फर्टिलायझेशन) यासारख्या आधुनिक उपचार पद्धतीने गर्भधारणा होण्यास मदत करता येते.
गर्भधारणेस विलंब होण्यात कधी कधी स्त्री-पुरुष लैंगिक संबंधातील समस्याही कारणीभूत असतात. जोडप्याला लैंगिक संबंध ठेवायला नीट न जमण्यामागे अनेक कारणं आहेत. कधी स्त्रियांमध्ये योनीमार्गावरील पडदा खूप जाड असतो, तर काही वेळेस योनीमार्गाचे स्नायू अती घट्ट असतात. अर्थात अनेकदा दुखण्याच्या भीतीने हे स्नायू आवळले जातात व त्यामुळे पुरुषाचं शिश्न योनीमार्गात प्रवेश करू शकत नाही. दुखण्याच्या भीतीमुळे अनेकदा लैंगिक संबंध टाळले जातात. तर कधी कधी प्रयत्न करूनही जमत नाही. पुरुषामध्ये लैंगिक क्षमता कमी असणं, अकाली वीर्यपतन किंवा शीघ्रपतन ही पुरुषांमधील लैंगिक संबंध न जमण्याची कारणं आहेत.
लैंगिक संबंधांमध्ये अडथळा किंवा समस्या येत असल्यास वैद्याकीय सल्ला घ्या. अनेकदा जोडपी भीतीपोटी किंवा लाजेखातर याविषयी कुणाशी बोलत नाहीत, सल्ला घेत नाहीत. मनातल्या मनात झुरत राहतात. लैंगिक संबंध न जमणं हे त्यांना कमीपणाचं वाटतं. यातून कधी कधी एकमेकांत विसंवाद होऊ शकतात. ही खरं तर एक साधी वैद्याकीय समस्या आहे. तुमचे डॉक्टर यासाठी तुम्हाला उपाय सुचवू शकतात.
नीरजा व सुयश अनेक वर्षं वंध्यत्वावर उपचार घेत आहेत. त्यांच्या अनेक तपासण्या केल्या आहेत. नीरजाला दर महिन्याला नियमितपणे ‘ओव्ह्युलेशन’ होते. तिचं गर्भाशय, बीजांड कोष निरोगी आहे. गर्भाशयनलिकेत अडथळा नाही. सुयशच्याही सर्व तपासण्या नॉर्मल आल्या आहेत. औषधं चालू आहेत, तरीही गर्भधारणा मात्र होत नाही. कधी कधी वंध्यत्वाचं कोणतंच कारण स्पष्टपणे समजत नाही. स्त्री व पुरुषामध्ये वंध्यत्वासाठी केलेल्या सर्व तपासण्या नॉर्मल असतात. परंतु वर्षभर प्रयत्न करूनही जोडप्याला गर्भधारणा होण्यात अडचणी येतात. अशा प्रकारच्या वंध्यत्वाला ‘अस्पष्ट वंध्यत्व’ (unexplained Infertility) म्हणतात. वंध्यत्वाचा त्रास असणाऱ्या १५ ते ३० टक्के जोडप्यांमध्ये अस्पष्ट वंध्यत्वाची समस्या असते. निकृष्ट दर्जाचं स्त्रीबीज अथवा शुक्राणू, गर्भाशयाच्या आतल्या अस्तरातील दोष, मानसिक ताणतणाव, संप्रेरकांमधील असंतुलन ही त्याची काही संभाव्य कारणं असू शकतात. अस्पष्ट वंध्यत्वाची उपाययोजना करताना जोडप्याने जीवनशैलीत सकारात्मक बदल करायला हवेत. धूम्रपान, अती मद्यापान टाळायला हवं. बीजनिर्मिती व ओव्ह्युलेशन नीट होण्याची औषधं व गरज भासल्यास ‘आययूआय’ व ‘आयव्हीएफ’सारख्या आधुनिक उपचार प्रणालीने अस्पष्ट वंध्यत्वाची समस्या दूर करता येते.
‘आययूआय’ने नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता वाढते. यामध्ये ‘ओव्ह्युलेशन’च्या सुमारास पुरुषाचे शुक्राणू प्रयोगशाळेमध्ये विशेष प्रक्रियेने शुद्ध केले जातात व एका बारीक नळीच्या साहाय्याने स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात. जेव्हा जोडप्यात लैंगिक संबंधात समस्या येतात, वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या व गतिशीलता कमी असते किंवा अस्पष्ट वंध्यत्वाचा त्रास असतो तेव्हा ‘आययूआय’चा उपयोग होतो.
प्राचीला ‘आयव्हीएफ’च्या साहाय्याने गर्भधारणा झाली. प्राची व तिचा नवरा जेव्हा तपासणीसाठी दवाखान्यात आले तेव्हा त्यांनी विनंती केली की, ‘‘ही गर्भधारणा ‘आयव्हीएफ’च्या साहाय्याने झाली आहे ही माहिती कुणालाही देऊ नका. आम्हाला त्यात कमीपणा वाटतो.’’ गर्भधारणा ही प्रत्येक जोडप्याची खासगी बाब असल्याने त्याविषयीची माहिती डॉक्टर उघड करीत नाहीत परंतु यात कमीपणा का वाटावा? नैसर्गिकरित्या मूल न होण्याचा संबंध अनेक जण स्वत:च्या पुरुषत्वाशी किंवा स्त्रीपणाशी जोडतात. त्यामुळे कृत्रिम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गर्भधारणा झाल्यास त्यांना न्यूनगंड वाटतो.
‘आयव्हीएफ’बद्दल अनेक गैरसमजुती समाजात आहेत. याचे उपचार फार त्रासदायक असतात, त्याने जीवाला धोका होतो. या उपचार पद्धतीच्या साहाय्याने होणाऱ्या बाळात दोष निर्माण होतात. यासारख्या गैरसमजुतींमुळे अनेकदा गरज असूनही जोडपी ‘आयव्हीएफ’ उपचार करून घ्यायला तयार होत नाहीत. याशिवाय ही उपचार पद्धती खर्चीक असल्याने आर्थिक मुद्द्याचा विचारही अनेकांना करायला लागतो. खरं तर ‘आयव्हीएफ’ ही आधुनिक उपचार प्रणाली वंध्यत्व असलेल्या अनेक जोडप्यांसाठी वरदान ठरली आहे. गेल्या ४० वर्षांत यात खूप प्रगती झाली आहे. प्रशिक्षित तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केल्यास यात धोका कमी असतो. ज्या जोडप्यांना नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होत नाही किंवा गर्भधारणेस विलंब होतो, अशा जोडप्यांना ‘आयव्हीएफ’चा उपाय सुचवला जातो. गर्भनलिकेत अडथळा, शुक्राणूंची संख्या व गतिशीलता कमी असणं, अस्पष्ट वंध्यत्वात ही उपचार पद्धती वापरली जाते.
‘आयव्हीएफ’मध्ये स्त्रीला बीजनिर्मितीसाठी संप्रेरकयुक्त औषधं दिली जातात. ओव्ह्युलेशनच्या सुमारास परिपक्व झालेली स्त्रीबीजे बिजांडकोशातून काढून प्रयोगशाळेत संकलित केली जातात. यानंतर शुक्राणूंद्वारे स्त्रीबीजांचं फलन केलं जातं. फलित झालेली स्त्रीबीजं काही काळ प्रयोगशाळेत वाढवली जातात व तयार झालेले गर्भ निवड करून गर्भाशयात प्रत्यारोपित केले जातात. ‘आयव्हीएफ’चे यश वाढवण्यासाठी अनेकदा ‘आयसीएसआय’ (Intracytoplasmic Sperm Injection)चे तंत्रज्ञान वापरलं जातं. यात प्रयोगशाळेत संकलित केलेल्या स्त्रीबीजांमध्ये शुक्राणू टोचले जातात. यात फलनाची शक्यता वाढते.
काही वेळेस जोडप्यांमध्ये चांगल्या प्रतीची स्त्रीबीजे व शुक्राणू औषधोपचारानंतरही मिळत नाहीत. अशा वेळी कायदेशीर बाबींची पूर्तता करून व जोडप्याच्या संमतीने स्त्रीबीज दान (Donor Egg) व शुक्राणू दानाच्या (Donor Sperm) मदतीने गर्भधारणा करता येऊ शकते. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय नसल्याने गर्भधारणा होऊ शकत नाही. काही जणींच्या गर्भाशयात मोठा दोष असल्याने त्यांची गर्भावस्था सुखरूप पार पडू शकत नाही. काही स्त्रियांना गंभीर आजार असल्याने गर्भावस्थेत जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा स्त्रियांना ‘सरोगसी’च्या साहाय्याने बाळ होऊ शकतं. या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज व शुक्राणूंपासून गर्भ निर्माण करून तो ‘सरोगेट माते’च्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो. सरोगेट माता नऊ महिने हे बाळ स्वत:च्या गर्भाशयात वाढवते, यासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करूनच ‘सरोगसी’ करता येते.
सुप्रिया व उमेश बाळाचा विचार करत असतानाच सुप्रियाला स्तनामध्ये गाठ जाणवली. तपासणी केल्यावर ती गाठ कर्करोगाची असल्याचं निदान झालं. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ‘किमोथेरपी’ व ‘रेडीएशन’ देण्याआधी डॉक्टरांनी तिला स्त्रीबीजे गोठवण्याविषयी ( Egg freezing) माहिती दिली. सुप्रियाने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वत:ची चांगली स्त्रीबीजे गोठवली. औषधोपचारांनी सुप्रिया पूर्णपणे कर्करोगमुक्त झाल्यानंतर ही स्त्री बीजे वापरून ‘आयव्हीएफ’च्या साहाय्याने गर्भधारणा करण्यात आली. आज सुप्रिया व उमेश दोन वर्षाच्या बाळाचे पालक आहेत. वयामुळे व आजारांमुळे स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीजांची संख्या व गुणवत्ता कमी होऊ लागते. ज्या स्त्रियांना आता गर्भधारणा शक्य नाही, पण भविष्यात बाळ हवं आहे अशांसाठी स्त्रीबीजे गोठवणं हा एक उत्तम पर्याय आहे.
वंध्यत्व ही एक शारीरिक समस्या न राहता त्याचे अनेक भावनिक, कौटुंबिक व सामाजिक परिणाम होताना दिसतात. वंध्यत्वाचा सामना करताना अनेकदा या स्त्रिया नैराश्यात जातात. स्वत:बद्दल नकारात्मक विचार करतात. मूल कधी होणार, या प्रश्नाचं उत्तर देताना कुटुंब व समाजाच्या अपेक्षांचं ओझं त्यांना सहन होत नाही. या जोडप्यांच्या वैवाहिक जीवनामध्येही तणाव निर्माण होऊ शकतो. मानसिक ताणतणावांचा, वंध्यत्वाच्या उपचारांवरसुद्धा विपरीत परिणाम होतो. वंध्यत्वाची समस्या असणाऱ्या जोडप्यांना टोमणे न मारता खरं तर कुटुंबाने व समाजाने भावनिक आधार द्यायला हवा. समजून घ्यायला हवं.
vaishalibiniwale@yahoo.com
