श्रीपाद आगाशे
काही वर्षांपूर्वी ठाण्यातील एका प्रदर्शनात मी नेत्रदान करण्याचे आवाहन करणारा स्टॉल लावला होता. नेत्रदानासाठीच्या स्टॉलवर साधारणत: गर्दी नसतेच. आवाहनाची भित्तिचित्रं लावत असताना समोरून एक दृष्टिहीन व्यक्ती जाताना दिसली. त्यांच्यासोबत त्यांची डोळस पत्नी होती. तिने त्यांना सांगितलं, ‘‘इथं नेत्रदानाचा स्टॉल आहे.’’ त्या व्यक्तीने लगेच आनंदित होऊन म्हटलं की, ‘‘अरे वा वा. मला घेऊन चल, मला नेत्रदानाचा फॉर्म भरायचा आहे.’’ नेत्रदानाच्या स्टॉलकडे डोळस माणसांचं लक्ष जात नसताना किंवा स्टॉल पाहूनही दुर्लक्ष करत असताना चक्क एक दृष्टिहीन व्यक्ती येऊन म्हणते की, ‘मला नेत्रदानाचा फॉर्म भरायचा आहे.’ हा माझ्यासाठी सुखद धक्काच होता. काही दृष्टिहीन व्यक्तीही नेत्रदान करू शकतात हे त्यांना ज्ञात होतं हे आणखी एक आश्चर्य!

मी त्यांना विचारलं, ‘‘आपण नेत्रदानाचा फॉर्म भरण्यासाठी कसे काय प्रवृत्त झालात?’’ त्यांनी सांगितलं, ‘‘वयाच्या ३०-३२ वर्षापर्यंत त्यांना चांगलं दिसत होतं. परदेशात चांगली नोकरी होती, पण हळूहळू दृष्टी गेली आणि याचं कारण ‘रेटीनल डिटॅचमेंट’! सर्व उपचार निरुपयोगी ठरले. परंतु त्यांना हे माहीत होतं की, आपण नेत्रदान करू शकतो कारण त्यांचं पारपटल (कॉर्निया) चांगलं आहे. आणि ते दान करता येऊ शकतं. असाच एक अनुभव मला काही वर्षांपूर्वी डोंबिवलीतल्या एका आरोग्य शिबिरातही आला. तिथे मी नेत्रदानावर आधारित भित्तिचित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं आणि प्रचार- प्रसारासाठी पत्नी पुष्पासह दोन दिवस या शिबिरात जात होतो. तेथे एक दृष्टिहीन व्यक्ती आली. ती म्हणाली, ‘‘माझा कॉर्निया चांगला आहे त्यामुळे मी नेत्रदान करू शकेन, असं मला वाटतं.’’ आम्ही लगेचच तिथल्याच आरोग्य शिबिरात तिच्या डोळ्यांची तपासणी केली असता तिला सांगण्यात आलं, ‘‘आपला विचार बरोबर आहे, आपण जरूर नेत्रदान करू शकता.’’ त्या व्यक्तीने लगेच नेत्रदानाचा अर्ज भरला. त्या आरोग्य शिबिरात नेत्रदानाच्या स्टॉलकडे नेहमीप्रमाणे जवळजवळ कोणीच वळत नव्हतं, परंतु जेव्हा मी असं आवाहन केलं की, ‘‘पाहा एक दृष्टिहीन व्यक्तीसुद्धा आवर्जून नेत्रदानाचा संकल्प करीत आहे तर आपणही का मागं राहावं?’’ माझ्या या आवाहनानंतर बऱ्याच जणांनी तेथे नेत्रदानाची इच्छापत्रं भरून संकल्प केला.

भारतात सुमारे सव्वा कोटी दृष्टिहीन आहेत. त्यातल्या ३० लाख लोकांना दृष्टी मिळू शकते, मात्र आपल्याकडे फक्त ४० हजार लोकांचे दरवर्षी नेत्रदान होत असते. ती संख्या मोठ्या संख्येने वाढायला हवी, परंतु अनास्था, अज्ञान, मला काय त्याचे? ही आपल्याकडची प्रवृत्ती. समजत असतं, उमजत असतं परंतु वळत मात्र नाही. तर हे वळणं आणि समस्त जनतेनं नेत्रदान करणं थोडंसं मनावर घेणं आवश्यक आहे.

एकूण अनास्था फारच असली तरी आवर्जून सामाजिक जाणिवेतून तसेच अडीअडचणींवर मात करूनही नेत्रदान करणाऱ्यांची अपवादात्मक उदाहरणंही आहेत. आमच्या संकुलातील एका व्यक्तीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्या व्यक्तीला दोन मुलगे. त्यांची नेत्रदान करण्याची इच्छा आणि तयारी होती, परंतु निधन झालेल्या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलीचा याला विरोध होता. त्यांच्या विरोधाचं एक कारण गावातल्या, जवळच्या नातलगांना काय वाटेल? असं होतं. मी मुलांना सांगितलं, ‘‘गावच्या नातलगांना फोनवरून त्यांच्या नेत्रदान करण्याच्या इच्छेबाबत सांगा.’’ नातलगांनी सांगितलं, ‘‘नेत्रदानच काय देहदान केलं तरी चालेल.’’ पण तोपर्यंत या बऱ्याच वेळच्या एकमेकांशी संपर्क साधण्यामध्ये मृत व्यक्तीचं स्थलांतर शवागृहात झालेलं होतं. गावकऱ्यांची संमती मिळाल्यावर रात्री १०नंतर त्यांचा मृतदेह शवागृहातून बाहेर काढून नेत्रदान घेतलं गेलं. एका नेत्रपेढीत काही कारणानं नेत्रदान शक्य झालं नाही, तर दुसऱ्या नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान झाल्याची उदाहरणंही आहेत. नव्या मुंबईतल्या एका पोलीस शिपायांच्या १८ वर्षांच्या मुलाचं अपघाती निधन झाल्यावर त्या अत्यंत दु:खद प्रसंगातही त्याच्या आई-वडिलांनी त्याचं नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.

माझ्याबरोबर गेली ४४ वर्षं नेत्रदान प्रचार-प्रसारात हिरिरीने सहभागी असलेल्या माझ्या पत्नीचं, पुष्पाचं गेल्या २३ जानेवारीला ठाण्यात अपघाती निधन झालं. त्या स्थितीतही आम्ही नेत्रदानाचा आग्रह धरला. नेत्रदान झालं आणि तिचे नेत्र नेत्ररोपणासाठी उपयुक्तही ठरले. यात मुलांचाही सहभाग होताच. माझा मोठा मुलगा अनिल अलिबागला असतो आणि तो नेत्रदानाचं कार्य तिकडे करत असतो. रात्री-बेरात्रीही आवश्यकतेप्रमाणे नेत्रदानासाठी डॉक्टरला घेऊन येणं, पोहोचवणं, मरणोत्तर देहदानासाठी एखादा मृतदेह अलिबागहून कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना वाटेत पनवेलमध्ये नेत्रपेढीत जाऊन नेत्रदान करणं अशा प्रकारे त्याचा क्रियाशील सहभाग असतो. ठाण्यातील माझा मुलगा आशीष त्याच्या परीनं सहभाग देत असतोच. आमच्या नातलगांतही नेत्रदानाचा परिपाठ निर्माण झाला असून माझ्या बहिणीचे पती, पत्नीची आई आणि दोन मामी, माझ्या आत्याचे यजमान, पत्नीच्या मामे बहिणीचे सासरे, माझी आई अशा अनेक नातेवाईकांचं नेत्रदान आणि काही जणांचं त्वचादानही झालं आहे.

वैद्याकीय क्षेत्राशी माझा काही संबंध नव्हता आणि नाही. मी ‘अणुशक्ती खात्या’त नोकरीला होतो आणि तमिळनाडूमध्ये कल्पाक्कम येथे २० वर्षं होतो. त्यावेळी १९८०च्या अखेरीस एका ‘रिडर डायजेस्ट’मध्ये एक लेख माझ्या वाचनात आला आणि त्यातून मला असं कळलं की, श्रीलंका हा देश आपल्यालाच नाही तर जगातल्या ३६ देशांना नियमितपणे डोळे पुरवतो. तिथले नागरिक नेत्रदानात अग्रेसर आहेत. हे मला फारच अजब वाटलं आणि तेवढंच लाजिरवाणंसुद्धा! मी स्वत: नंतर काही वर्षानंतर त्यासाठी श्रीलंकेला जाऊन आलो. एका लेखामुळे मी जानेवारी १९८१मध्ये नेत्रदान प्रचार-प्रसाराचं थोडं-फार कार्य कल्पाक्कम येथे सुरू केलं. अनेक नेत्रतज्ञांना भेटलो, नेत्रदानाची संपूर्ण माहिती घेतली. १९९१मध्ये मुंबईत बदली घेऊन आलो. त्यामुळे नेत्रदानाचं कार्य बऱ्याच प्रमाणात मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात विस्तारलं. हजारो जणांनी नेत्रदानाची संकल्प पत्रे भरली. या विषयावरील सुमारे ४५० व्याख्यानं मी आतापर्यंत दिली असून करोना काळात दहा ऑनलाइन व्याख्यानंही दिली. सुमारे १२५ स्टॉल्स विविध ठिकाणी लावले. या प्रचार-प्रसारामुळे आतापर्यंत जवळपास ४०० नेत्रदाने, काही त्वचादाने, अवयवदाने आणि देहदाने झाली आहेत.

विशेष बाब म्हणजे, या कार्यात ६० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद स्त्रियांचा मिळाला, अजूनही मिळतो आहे. नेत्रदानावर मी एक एकांकिका आणि १८ कविता लिहिल्या असून त्यांचं एकत्रित एक पुस्तकही प्रसिद्ध केलं आहे. ‘नेत्रदान’ हे सगळ्यात सोपं असून या साध्या क्षेत्रातही आपण परावलंबी का असावं? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यायला काहीच हरकत नसावी.

खरं तर नेत्रदान हे फारच साधं सरळ सोपं असून त्याला लिंग, वय, धर्म याचं काहीच बंधन नाही. कोणीही, कधीही, कुठेही नेत्रदान करू शकतो. नेत्रदान करण्यासाठी आधी नोंदणी केलेली असणं हेसुद्धा मुळीच आवश्यक नाही. याबाबतीत बऱ्याच जणांचे, काही डॉक्टर मंडळींचेसुद्धा गैरसमज आहेत.

नुसता एक दूरध्वनी केला, तरी नेत्रपेढीचे डॉक्टर, तंत्रज्ञ घरी येऊन किंवा मृत व्यक्ती जर का रुग्णालयात असेल तर तिथे जाऊन नेत्र घेतात. यासाठी फक्त सुमारे अर्धा तास पुरतो. वेळेला उपयोगी पडण्याच्या दृष्टीने जवळच्या नेत्रपेढ्यांचे संपर्क क्रमांक टिपून ठेवावेत किंवा इंटरनेटवरून शोधून ठेवावेत. नेत्र नेत्रपेढीत नेल्यानंतर त्यांची पूर्ण तपासणी होते, ते नेत्ररोपणासाठी उपयुक्त आहेत की नाही याचाही पूर्ण विचार केला जातो आणि नंतरच ते रोपणासाठी पाठवले जातात.

नेत्रदानासाठी फॅमिली डॉक्टरचे मृत्यू प्रमाणपत्र तयार असणं आवश्यक असून ते लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा. एका व्यक्तीचं नेत्रदान हे दोन दृष्टिहीन व्यक्तींच्या जीवनात अमूल्य दृष्टीचे रंग भरू शकतं, नवजीवनच देऊ शकतं. सध्याचा काळ हा पुनर्वापर कुठल्या बाबींचा कधी, कसा, कुठे होईल याचा विचार करण्याचा आहे. मृत्यूनंतर देहाबरोबर दहन वा दफन केल्या जाणाऱ्या नेत्रांचं दान करून असा पुनर्वापर करता येणं सहज शक्य आहे. मृताच्या अंगावरचे दागदागिने आवर्जून काढून घेतले जातात परंतु नेत्र, त्वचा यासारखे बहुमोल दागिने मातीमोल का करावेत? त्यांचाही वापर करण्याचा विचार केला गेला पाहिजे, आपण तसा विचार जरूर कराल आणि वेळेला कृती कराल याचा विश्वास वाटतो.

जाता जाता डॉक्टर मंडळींना कळकळीचे आवाहन करावेसे वाटते की, जेव्हा आपण मृत्यू प्रमाणपत्र देता तेव्हा मृताच्या नातलगांना नेत्रदान, त्वचादान करण्याविषयी जरूर सुचवावं. आपण दहा जणांना सुचवलं तर निदान दोन-तीन जण तरी होकार देतील, असा सार्थ विश्वास वाटतो. हे डोळस दान अनेकांच्या आयुष्यात प्रकाशाचं वरदान ठरेल.

shreepad.agashe@gmail.com