महाराष्ट्रात बालहत्याकांडाच्या घटना आजही विविध जिल्ह्यांमध्ये घडताना दिसतात. यवतमाळमधल्या सपनाचा गावचा दुष्काळ हटवण्यासाठी बळी दिला गेला, तर धन लालसेपोटी अघोरी पूजा करून विनोदचा बळी देण्याचं ठरलं होतं, मात्र त्यापूर्वीच त्याचं बिंग फुटल्यामुळे त्याचा जीव वाचला. २०१३ मध्ये ‘जादूटोणाविरोधी कायदा’ झाला मात्र आजही नरबळी जातच आहेत.

सजग नागरिक म्हणून आपण यामागची कारणे कधी शोधणार? स वर्षांपूर्वीचा कोल्हापूरमधला अंजना गावीत खून खटला अनेकांना आठवत असेल. तिच्या दोन मुली, जावई यांनी एक ते पाच वर्षं वयाच्या सुमारे तेरा मुलांचं अपहरण केलं. आणि त्या मुलांना चोरी, पाकीटमारी यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये ढकललं. ज्या मुलांनी चोरीला नकार दिला त्यांची हत्या करण्यात आली. यातल्या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा झाली. त्यावर त्यांनी दयेचा अर्ज केला. त्या अर्जावर विचार करण्यास उशीर झाल्यामुळे मृत्युदंडाच्या शिक्षेत बदल होऊन शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत झालं.

दुसरं गंभीर प्रकरण अहिल्यानगर जिल्ह्यातील चांदा या गावचं. चांद्यामधे गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाच्या मदतीने एक शिक्षक दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला एका बालकाचा बळी देत होता. सलग तीन वर्षं मुलं गायब होत होती. तपास लागत नव्हता. चौथ्या वर्षी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बुधवंत यांनी खोल तपास केल्यामुळे आरोपींना शिक्षेप्रत पोहोचण्यात यश आलं.

पुरोगामी महाराष्ट्रात घडणारे बालहत्याकांड हीच खरं तर खेदाची बाब आहे. महाराष्ट्रात ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ’ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करण्याचं काम करत आहे. २०१३ मध्ये ‘जादूटोणाविरोधी कायदा’ झाला. या कायद्याअंतर्गत नरबळी, बालहत्या गुन्हा आहे. तरीही आपल्या अवतीभोवती अंधश्रद्धामूलक कृती व त्यातून बालहत्या घडताना दिसतात.

मी चळवळीच्या कामानिमित्ताने बाहेरगावी असताना मला एका पत्रकार मित्राचा फोन आला. ‘‘ताई, नरबळीचं प्रकरण आहे. ताबडतोब जाणं गरजेचं आहे.’’ मी तातडीने टेंभी गावाला जायला निघाले. जिल्ह्याच्या ठिकाणापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेलं हे एक-दीड हजार लोकवस्तीचं गाव. मुख्य रस्त्यापासून गाव पाच-सहा किलोमीटर आत असल्यामुळे पत्रकार मित्राने नियोजन केलं. त्याप्रमाणे मी बसमधून फाट्यावर उतरताच गावातील एक तरुण, संजू मला घेण्यासाठी मोटरसायकलवर आला होता.

गावात पोहोचेपर्यंत मी संजूकडून गाव, गावातलं राजकारण, समाजकारण, भोवताल व प्रत्यक्ष घटना याबाबत जाणून घेतलं. दशरथ व तुकाराम यांच्या शेताच्या बांधावर पिंपळाचं झाड आहे. दशरथची वस्ती त्याच शेतात आहे. दशरथच्या घरातल्या बैठकीच्या खिडकीतून पिंपळाचं झाड, बांध व शेत पूर्णपणे दिसतं. मे महिन्यातली अमावास्येची ती रात्र.

घरापासून जवळच असलेल्या मारुतीच्या मंदिरात दशरथ भजनासाठी गेला होता. रात्री अकराच्या सुमारास तो घरी परतला. तो झोपण्याच्या तयारीत असतानाच बैठकीच्या खिडकीतून त्याला बांधावर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली अनेक दिवे पेटलेले दिसले. त्या दिव्यांच्या उजेडात काही हालचालीही जाणवल्या. त्याने ताबडतोब जाऊन मंदिरातील ग्रामस्थांना ही बाब सांगितली. काही लोकांसह तो शेताकडे आला.

ग्रामस्थांची चाहूल लागताच झाडाखालचे काही लोक पळाले. ग्रामस्थांनी तिथल्या दहा लोकांना पकडलं. त्यात शेजारच्या गावातील एक स्त्री आणि व्यापारी होता. गावातला एक मांत्रिक आणि संपत हा एक व्यावसायिक होता. झाडाखाली पोतंभर मानवी हाडं, कवट्या, गुंगीचं औषध, शंख, शिंपले, कवड्या, खारीक, खोबरं, लिंब, टाचण्या, जिलेबी, तुपाचा डबा, मोहरी, लोखंडी त्रिशूळ, खंजीर, मोठा सुरा असं सर्व साहित्य होतं. दिवे, समया लावलेल्या होत्या.

तिथे उपस्थित असलेल्या व्यापार्‍याने अंगातला शर्ट काढून बाजूला ठेवलेला होता. स्त्री अर्धनग्न अवस्थेत पूजेला बसलेली होती. पुजेचं साहित्य असलेल्या थाळ्यांमध्ये गावातल्या सात बालकांच्या नावाची यादी होती. त्यापैकी पहिल्या क्रमांकाचं नाव गावात राहणार्‍या विनोद या गरीब कुटुंबातील मुलाचं होतं. त्या मुलाचं नाव थाळ्यात एका कागदावर लाल रंगाने लिहिलेलं होतं. एव्हाना गावात बातमी पोहोचली होती. सुमारे ५०० ग्रामस्थ तिथे जमा झाले. त्यांनी सर्व साहित्य ताब्यात घेतलं.

अघोरी पूजा करत असलेल्या या लोकांनी पूजेबाबत विचारलं असता, ‘‘आम्ही झाडाची पूजा करतो.’’ असं त्यांनी सांगितलं. ग्रामस्थांनी त्यांना मानवी हाडं, कवट्या, खंजीर, त्रिशूळ याबाबत विचारलं असता ते काहीही सांगण्यास तयार नव्हते. परंतु ग्रामस्थांनी हिसका दाखवताच त्यातील एकाने ही नरबळीसाठी अघोरी पूजा आहे असं कबूल केलं.

ग्रामस्थांनी सर्व पूजा साहित्यासह त्या लोकांना ग्रामपंचायत कार्यालयात आणलं. तिथं त्यांना बोलतं केलं. त्या दिवशी गावातील विनोदचा बळी देण्याचं ठरलं होतं. दुपारी संपतने विनोदला त्याच्या घरी जाऊन लाडू व आंबे दिले. घरची गरिबी, खाण्याची आबाळ यामुळे विनोद खूप खूश झाला. त्याच रात्री विनोदला घेऊन संपत भजनासाठी मंदिरात गेला. त्याला मंदिरातच बसवून ठेवलं होतं. निरोप येताच विनोदला बळी देण्यासाठी शेतात न्यायचं नियोजन होतं. परंतु बिंग फुटलं आणि विनोद वाचला.

या घटनेची माहिती गावपुढाऱ्याला समजली. तो ग्रामपंचायतीत आला. त्याने संबंधित पोलीस ठाण्याला फोन केला. पोलीस आले. त्यांनी आरोपींना गाडीत बसवलं. गावपुढारीही त्यांच्यासोबत गेला. गाडी पोलीस ठाण्याच्या दिशेनं निघाली. पिंपळाच्या झाडाखाली जमा केलेल्या हाडं, कवट्या, त्रिशूळ, खंजीर हे महत्त्वाचं सामान पोलिसांनी सोबत घेतलं व अन्य सामान तिथंच ठेवलं. गावकऱ्यांनी तत्पूर्वी वस्तूंचे फोटो काढले. शिल्लक वस्तू थाळीसह गावकऱ्यांनी दशरथच्या घराच्या पडवीत आणून ठेवल्या. त्यानंतर पोलीस, पुढारी व आरोपी गावाबाहेरील मुख्य रस्त्यावरच्या एका ढाब्यावर थांबले. पुढाऱ्याने देवाणघेवाण करून प्रकरण मिटवलं. सर्व आरोपींना सोडून दिलं.

दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पुढाऱ्याकडे विचारणा केली असता तो म्हणाला, ‘‘या प्रकरणामुळे अख्ख्या गावाची अब्रू जाईल. तुमची मुलं तर वाचली ना? आता कुठंही, काहीही बोलू नका.’’ ग्रामस्थ संभ्रमित झाले. ते ओळखीतल्या एका पत्रकाराशी बोलले. पत्रकार मित्रामार्फत मला संपर्क केला.

मी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दशरथच्या घरी असलेला पूजेचा थाळा पाहिला. गावकऱ्यांनी पूजा साहित्य व मुलांचं नाव लिहिलेल्या चिठ्ठीचे फोटो दाखवले. विनोद भेटला. त्याचे आई-वडील खूप घाबरलेले होते. ते गाव सोडून जाण्याबाबत बोलत होते. त्यांना धीर दिला. गावकऱ्यांना लेखी निवेदन तयार करून दिलं. ते विभागीय पोलीस अधिकार्‍यांना द्यायला सांगीतलं. मी तातडीने पोलीस ठाणं गाठलं. पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली. संघटनेच्या वतीनं लेखी अर्ज दिला. पाठपुरावा सुरू झाला. गावकरी, पोलीस ठाण्याला फोन सुरू होते. दररोज वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या. आम्ही धीर दिल्यामुळे दशरथनेही पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार अर्ज दिला.

दशरथ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यास गेला असता पोलीस अधिकार्‍याने त्यांचाच उलट तपास घेतला. ‘‘तुमचं झाड जागेवरच आहे ना? कोणाचा बळी गेला का? ’’ असे प्रश्न विचारून फिर्यादीचंच मानसिक खच्चीकरण केलं. अर्जाची पोहोच द्यायला नकार दिला. अचानक नरबळीसाठी निवडलेल्या मुलांच्या नावाची यादी, पूजेसाठी बसलेली स्त्री, विनोदला खाऊ देणारा संपत गायब झाले होते. पूजेत सहभागी असलेला व्यापारी मात्र ताठ मानेने गावात फिरत होता.

आजूबाजूच्या परिसरात या प्रकरणाची चर्चा होऊ नये म्हणून या बातम्या प्रसिद्ध झालेली वर्तमानपत्रे मोठ्या संख्येने विकत घेऊन ते नष्ट करत होता. दरम्यान, आमचा पाठपुरावा व गावकऱ्यांचा रेटा यांच्यामुळे पोलीस उपनिरीक्षक गावात तपासासाठी आले. गाव पुढारीही त्या वेळी हजर होता. पोलीसांनी गावात बसून घटनेची माहिती घेतली. दशरथवर गावपुढाऱ्याने आणलेल्या दबावामुळे तो गावातून निघून गेला होता. पूजेचा थाळाही गायब झाला होता. पोलीसांनी तपास केल्याचं दाखवलं पण पुढे काहीच केलं नाही.

मी, नागेश कुसाळे, अशोक गवांदे आणि इतर सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलं. त्यानंतरही काहीही हालचाल होत नव्हती. मी पुन्हा पोलीस निरीक्षकांना फोन केला. ते म्हणाले, ‘‘मॅडम, त्यांचा गावातला वाद आहे. तुम्ही कशाला लक्ष घालता?’’ मी पुन्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘‘मी पोलीस भरतीत व्यग्र आहे. विभागीय पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क करा. त्यांना लेखी द्या.’’

विभागीय पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘‘मी बाहेर आहे. आल्यावर तुम्हाला फोन करतो.’’ असं वारंवार घडत गेलं. गावातील लोक अतिशय भयग्रस्त होते. ते मुलांना खेळायलाही बाहेर पाठवत नव्हते. गावातली अंगणवाडी ओस पडली होती. प्रकरण थंड करण्यासाठी, त्यावरील लक्ष हटवण्यासाठी गाव पुढाऱ्याने गावातल्या काही लोकांना पदरमोड करून तीर्थयात्रेला नेलं.

काळ पुढे सरकत होता. पोलीसांनी पुन्हा गावात येऊन चौकशी केली (?). दशरथ किंवा विनोदच्या आई-वडिलांचे मात्र साधे जबाबही नोंदवले गेले नाहीत. अख्खं प्रकरण दडपलं गेलं. गावकऱ्यांनी व आम्ही मंत्रालयापर्यंत अर्ज, निवेदन दिलं. कालांतराने प्रकरणात काहीच होत नाही म्हणून गावकरी निराश झाले, थंडावले. आमच्या पाठपुराव्यालाही ते प्रतिसाद देईनासे झाले. गावकऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष भेटून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. गावपातळीवर संरक्षक फळी निर्माण करण्यासाठी चर्चा केली. परंतु मुलांच्या मनावर झालेल्या आघाताचं काय?

यवतमाळमधल्या सपनाचा, गावचा दुष्काळ हटवण्यासाठी दिलेला बळी किंवा धनलालसेपोटी बळी देण्याचा झालेला प्रयत्न हे अघोरी अमानुष कृत्य. अशा कृत्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडतं. लहान मुलांवरही दूरगामी दुष्परिणाम होतात. महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील, तर आपण सजग, सतर्क राहून या घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेतच.

परंतु अशा गंभीर प्रकरणातही हलगर्जीपणा दाखवणाऱ्या शासकीय यंत्रणेलाही जाब विचारण्यासाठी जागरूक असायला पाहिजे. शासकीय यंत्रणेतही आपल्यातलीच माणसं आहेत. त्यांची संवेदनशीलताही जागवायला हवी. ती कशी करायची हा वर्षोनुवर्ष पडलेला प्रश्न.

(लेखातील व्यक्ती व स्थळांची नावं बदललेली आहेत.)