विशाल देशमुख

मी ‘एमपीएससी’चा अभ्यास करणारा विद्यार्थी. मला नि:स्वार्थ जीव लावणारी मैत्रीण- प्रिया. बारावी उत्तीर्ण होऊन जेव्हा प्रथम कॉलेजात आलो, तेव्हा असं वाटलंही नव्हतं, की प्रियाची आणि माझी ओळख होईल आणि त्यातही एवढी घट्ट मैत्री होईल! माझी बारावी झाली, तेव्हा करोनाची साथ सुरू झाली होती. मग आमचं कॉलेजचं प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षातली पहिली सहामाही सत्रं ऑनलाइन झाली. तिसऱ्या सेमिस्टरपासून मी नियमित कॉलेजला जाऊ लागलो. हळूहळू ओळखी वाढल्या आणि खूप मित्र मिळाले. लातूरचं ‘दयानंद विज्ञान महाविद्यालय’ हे आमचं कॉलेज. दरवर्षी आमच्या विद्यापीठाचं ‘यूथ फेस्टिव्हल’ असतं. त्या निमित्तानं माझी आणि प्रियाची ओळख झाली. शिवाय आम्ही एकाच- ‘बीएस्सी’च्या वर्गातले. यूथ फेस्टिव्हलच्या सरावासाठी आम्ही एकत्र जमायचो. यातून पुढे आमची मैत्री खूप घट्ट झाली.

सुरुवातीच्या काळात मी मुलींशी जास्त बोलायचोच नाही. कारण मुलींशी बोलताना संकोचायचो. नंतर सवय झाली आणि एकदम मोकळा होऊन बोलू लागलो. प्रिया तिच्या समस्या माझ्याशी ‘शेअर’ करू लागली, मीही माझ्या काही समस्या असतील तर त्या सांगू लागलो. कॉलेजमधल्या मित्रांबरोबर ‘एन्जॉय’ करताना माझ्या हातून काही चुकाही होत असत. प्रिया मला त्याची जाणीव करून देत असे. त्या काळात मी केलेल्या चुकांमळे अनेकांनी मला दूर केलं. प्रियाची मात्र साथ राहिली. तेव्हा मला कळलं, की मैत्री म्हणजे काय असतं!

हेही वाचा :इतिश्री: चुकलं तर चुकलं!

कॉलेजला येताच लेक्चरला अनेकदा दांडी मारून आम्ही बाहेर हुंदडायचो. अर्थात, प्रिया सोबत असायचीच. असं अडीच वर्षं गेलं… आता कॉलेज संपल्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी मी लातूर सोडलंय. तिच्यापासून आता मी लांब आलोय. पण तरी नेहमी बोलणं होत असतं. सुखदु:ख बोलून दाखवतो. मैत्री आधीसारखीच घट्ट आहे. प्रियाबरोबर घालवलेले ते दिवस आठवले की मनाला खूप समाधान वाटतं. त्या आठवणी इतक्या गोड आहेत, की मी त्या कधीच विसरू शकणार नाही!

हेही वाचा :लैंगिकता वाढतं आकर्षण आणि गुन्हेगारीही!

vd41560@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरुष वाचकहो, तुम्ही मांडायचे आहेत तुमचे अनुभव! आहे का तुमची एखादी अशी निखळ मैत्रीण, जिच्याबरोबरचं नातं ना तुम्हाला कधी लपवावंसं वाटलं, ना तुम्हा दरम्यानचं अंतर तोडावंसं वाटलंय? अर्थात भिन्नलिंगी मैत्रीण म्हणून वाटलंच असेल ‘वेगळं’ आकर्षण, तर त्या भावनेची वासलात कशी लावलीत? काय आहे तुमच्या दोघांच्या घट्ट नात्याचं रहस्य? काय आहे तुमच्या नात्यातलं चुंबकत्व? आणि हो, होऊ शकते का अशी निखळ मैत्री? महत्त्वाचं, या सदरात फक्त पुरुषांनीच आणि तेही आपल्या मैत्रिणीविषयी, त्या नात्याविषयी मनमोकळेपणानं लिहिणं अपेक्षित आहे. आम्हाला पाठवा ते अनुभव तुमच्या प्रत्यक्ष मैत्रीच्या उदाहरणांसह ५०० किंवा १००० शब्दांत. आमच्या ईमेलवर chaturang.loksatta@gmail.com