डॉ. अंजली जोशी

लग्न ठरवताना किंवा सासू- सासऱ्यांशी जुळवून घेताना मुलींना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं; पण एका बाजूस आई-वडील आणि दुसरीकडे प्रेयसी, अशा कात्रीत सापडलेल्या पुरुषांचीही कुचंबणा मोठी असते. आपल्याला ज्यांनी कष्टानं वाढवलंय, त्या आई-वडिलांचं अनेक बाबतींत पटत नसूनही त्यांना थेट दुखावता येत नाही आणि त्यांच्या कलानं घेताना प्रेयसीवर अन्याय होतोय, याची बोच मनाला लागते. स्वप्निलसुद्धा अशाच दोलायमान अवस्थेत गेलं वर्षभर हेलकावे खातोय. त्याची ही गोष्ट..

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

‘‘स्वप्निल, तुला निर्णयच घेता येत नाही. किती दिवस तू आईवडिलांच्या ओंजळीनं पाणी पिणार? ते तुझं इतकं ब्रेनवॉशिंग करतात, की तू स्वतंत्र विचार करूच शकत नाहीस. उद्या जर काही अवघड प्रसंग उभा ठाकला, तर तू मला पाठिंबा देण्याऐवजी आईबाबांच्या मागे लपशील. खरं तर तुझ्यासारख्या माणसानं प्रेमाच्या फंदात पडूच नये, कारण प्रेम केलं तर आईबाबांची संमती असो वा नसो; पण लग्न करण्याची हिंमत बाळगायला हवी. लग्नाचा निर्णय फक्त आपल्या दोघांचा आहे; आईबाबांचा नव्हे.’’ बोलताना रियाचा चेहरा लाल झाला होता.

मला बोलणं सुचेना. ‘‘रिया, अजून थोडे दिवस थांब. मी नक्की आईबाबांचं मन वळवेन.’’ मी कसंबसं म्हणालो. ‘तुझं हेच बोलणं ऐकून आतापर्यंत थांबले, त्याला वर्ष उलटलं. आता मी जास्त थांबू शकत नाही. माझ्या आईबाबांना मी आजपर्यंत कसंबसं थोपवून धरलं आहे. साक्षात ब्रह्मदेव अवतरला तरी तुझे आईबाबा संमती देणार नाहीत! त्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला लग्न करावं लागेल. हे तुला मान्य नसेल तर आपलं नातं संपलं. पुढच्या आठवडय़ापर्यंत मला तुझा निर्णय सांग. मी फोन करेन.’’ रिया रेस्टॉरंटच्या टेबलवरून उठत म्हणाली. गेल्या वर्षभरातले सर्व प्रसंग फेर धरून माझ्या डोळय़ांसमोर नाचू लागले. माझ्या आईबाबांची संमती मिळाली की मगच लग्न करायचं, असं मी रियाला सांगितलं होतं. रियाच्या कुटुंबात सगळे बिझनेस करणारे आहेत. नोकरी करणारा माझ्यासारखा मध्यमवर्गीय जावई त्यांना पसंत पडणं अवघड होतं; पण माझे आईबाबा मात्र लग्नाला अनुकूलता दर्शवतील, असा विश्वास मला होता. त्यांचा होकार आला की आम्ही रियाच्या आईवडिलांच्या कानावर घालणार होतो. त्या रात्री जेवण झाल्यावर मी विषय काढला. रियाचा फोटोही दाखवला. थोडा वेळ दोघंही बोलले नाहीत.

‘‘काय झालं?’’ मी न राहवून विचारलं.
‘‘स्वप्निल, इतकी महत्त्वाची गोष्ट, पण पत्तासुद्धा लागू दिला नाहीस. आम्ही मारे छोटय़ा-मोठय़ा गोष्टी तुझ्याशी शेअर करत असतो.’’ आई दुखावल्या स्वरात म्हणाली.
‘‘अगं, नक्की ठरत नव्हतं; पण ते ठरल्यावर तुम्हालाच पहिल्यांदा सांगितलं ना?’’
‘‘काय रे, ही तुमची सोशल मीडियावरची ओळख ना?’’ बाबांनी कपाळाला आठय़ा घालत विचारलं.
‘‘हो. सुरुवात तर तिथून झाली; पण नंतर प्रत्यक्ष भेटलो आहोत अनेकदा.’’ मी म्हटलं.
‘‘अरे, सोशल मीडियाचं काही खरं नसतं. फेसबुकवर टाइमपास करताना, पबजी खेळताना प्रेम जडतं. काही अर्थ आहे का त्याला?’’ बाबा म्हणाले.
मनात आलं, की उलट कुठल्याही बंधनाशिवाय एकमेकांची पुरेशी ओळख करून घ्यायला सोशल मीडिया वाव देतो! पण मी गप्प बसलो.
‘‘सोशल मीडियावर दाखवलं जातं वेगळंच आणि खरं असतं वेगळंच! किती बातम्या येत असतात, की सोशल मीडियावरून ओळख करून घेतली आणि मग फसवलं म्हणून!’’ बाबा आता सोशल मीडियावर तुटून पडले होते.

‘‘बाबा, काही प्रसंग घडले म्हणून सगळेच फसवणारे असतील का? हल्ली तर बहुतेक लग्नं सोशल मीडियावरच जुळतात.’’ मी बाबांना शांत करत म्हटलं. ‘‘आम्ही सांगण्याचं काम केलं. निभवायचं तुला आहे.’’ बाबांनी संभाषणाचा समारोप केला. मी आईबाबांना आनंदाची बातमी सांगायला गेलो होतो. त्याला भलतंच वळण लागलेलं पाहून मी खट्टू झालो; पण काही बोललो नाही. बाबांची नुकतीच अँजिओप्लास्टी झाली होती. त्यांना जास्त ताण द्यायचा नाही, धीरानं घ्यायचं, असं मी ठरवलं. जसजशी रियाशी त्या दोघांची ओळख होईल, तसतशी त्यांची नाराजी दूर होईल, असं मला वाटत होतं. त्यासाठी मुद्दाम मी रियाची आणि त्यांची अनेकदा भेट घडवून आणली. माझी अपेक्षा होती, की आई-बाबा रियाची माहिती करून घेतील किंवा आमच्या दोघांचे पुढचे बेत काय आहेत याची चौकशी करतील; पण झालं उलटंच!

एकदा जेवताना आई म्हणाली, ‘‘रियाची लाइफस्टाइल बघ. ब्रॅन्डेड कपडे, उंची रेस्टॉरन्ट्स! तिचा ब्यूटीपार्लरचा खर्चच मुळी कित्येक हजारांत असेल. तू कष्ट करून वर आला आहेस. उत्तम शिक्षण घेतलं आहेस, मोठय़ा पगाराची नोकरी आहे. रियानं तुला कसं अगदी अचूक जाळय़ात ओढलंय!’’

मग बाबांचंही चालू झालं, ‘‘अरे, आम्हाला जगाचा अनुभव आहे म्हणून सांगतोय. प्रेमात व्यवहार नसतो. व्यवहार सुरू झाला, की कळेल की ते निभावणं इतकं सोपं नसतं. वीकएंड आले की सारखे ट्रिप नाही तर ट्रेकला जाता. रियाचं ध्येय फक्त मौज-मजा दिसतंय! आयुष्य मौजमजेवर चालत नाही. आताच सगळे पैसे उधळून टाकले तर नंतरच्या आयुष्यात काय शिल्लक राहणार? आम्ही बघ कसा काटकसरीनं संसार केला. असे पैसे उधळले असते तर प्रत्येक गोष्टीसाठी हात पसरायला लागले असते.’’

‘‘बाबा, सगळी मौजमजा आयुष्याच्या शेवटी ठेवायची का? तुम्ही आयुष्यभर काटकसर करून पैसा जमवलात. आता म्हणताय तसा तुमच्या गाठीला पैसा आहे, पण त्याचा उपयोग काय? आईचे गुडघे दुखत असतात, तुम्हाला शुगर आहे, मनाप्रमाणे खाता येत नाही किंवा ट्रिपला गेलं की कुठे चढता येत नाही. म्हणून आताच तंदुरुस्त असताना आम्ही करून घेतोय.’’ ‘जीवन आनंदानं जगायला पाहिजे,’ हे रियाचं तत्त्वज्ञान माझ्या डोक्यात घोळत होतं.

‘‘व्वा! इतकी वर्ष आमच्या तालमीत वाढलास आणि काटकसरीनं राहणं कसं चूक आहे, याचे धडे आम्हालाच देतोस? अरे, अजून अक्षता पडल्या नाहीत डोक्यावर आणि आधीच रियासारखं बोलायला लागलास! नंतर काय होईल कोण जाणे!’’ आई म्हणाली. ‘‘तुम्हाला रिया पसंत नाही का?’’ मी विचारलं.

‘‘अरे, जे डोळय़ांना दिसतंय तेच सांगतोय. आम्ही तुझ्यासारखा तात्पुरता विचार करत नाही. पुढचा विचार करतो. आम्हाला तुझ्या भविष्याची काळजी वाटते. तुला तो सुमित माहीत आहे ना? बायको उधळी! त्याची बरीचशी मिळकत तिच्या मौजमजेवर खर्च झाली आणि लग्नानंतर १२ वर्षांनी पटेनासं झालं म्हणून वेगळे झाले. तिनं मेन्टेनन्सचा एवढा अवाढव्य खर्च मागितला की सुमितची उरलेली सर्व पुंजी क्षणात रिकामी झाली. म्हणजे वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी परत शून्यापासून सुरुवात! तसं तुझ्या बाबतीत होऊ नये म्हणून आधीच सावध करतोय.’’ बाबा म्हणाले. ‘‘आयुष्याची सुरुवात करतानाच आम्ही काही वर्षांनंतर वेगळे झालो तर काय, अशा विचारानं का करायची? पुढे काय होईल ते कुणाला माहीत? जेव्हा ते होईल तेव्हा बघून घेऊ.. आणि तसंच होईल असं कशावरून?’’ मी हे म्हणालो खरं; पण मनाच्या एका कोपऱ्यात सुमितऐवजी मी स्वत:च दिसायला लागलो. आई-बाबा म्हणतात ते खरंच असेल का? पण रिया अशी नाहीये. मी सुमितचा विचार मनातून झटकून टाकला.

‘‘स्वप्निल, अरे आपल्या घरातले संस्कार वेगळे आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं मूल्य मानतो आपण! रियाच्या घरचे बिझनेसमन आहेत. म्हणजे काळा पैसा भरपूर असणार. म्हणूनच देखावा जास्त! एवढा चकचकाट करण्याची आपली पद्धत नाही. आपला पैसा घाम गाळून मिळवलेला आहे. आपल्या संस्कारांत ती बसणारी नाहीये.’’ आईनं पुस्ती जोडली.

रिया भेटली तेव्हा तिनं विचारलंच, ‘‘इतका का विरोध आहे त्यांचा?’’
‘‘ते म्हणताहेत की तुझ्या घरचं वातावरण बिझनेसचं! आमची राहणी अगदी साधी आहे. तिच्याशी जुळवून घेणं तुला जड जाईल, असं वाटतंय त्यांना!’’
रिया उसळून म्हणाली, ‘‘अरे, मी ते बघून घेईन की! आणि बिझनेस करणारे असलो तरी घाम गाळून मिळवलेलेच पैसे आहेत ना! कुणाला लुटून तर पैसा मिळवत नाही ना? साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं म्हणतात खरं; पण उच्च राहणी आणि उच्च विचारसरणीही असू शकते की!’’

आई-बाबा हे पटवून घेणार नाहीत, हे मला माहीत होतं. तरीही प्रयत्न करण्याचं आश्वासन मी दिलं. मी लग्नाचा विषय ताणून धरला, तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘हे बघ, आमच्या जर मनात नाही, तर आम्ही लग्नाला खोटी संमती कशी देऊ? पण आपण एक करू शकतो.. पत्रिका बघू या. ती जुळली तर पुढे जाऊ. म्हणजे आमची मतं आड येण्याचाही प्रश्न नाही. तू रियाला सांग तिची पत्रिका घेऊन यायला!’’

हे रियाला नुसतं सांगण्याचा अवकाश, ती चवताळून उठली, ‘‘अरे, तू कशी मान्यता दिलीस या प्रस्तावाला? ही तर उघडउघड तुझ्या आईवडिलांची स्ट्रॅटेजी आहे. पत्रिका न जुळण्याचं कारण देऊन ते लग्नाला विरोध करणार. आपण प्रेम केलं ते पत्रिका बघून केलं का? मग आता कुठे पत्रिकेचा संबंध येतो? मी अजिबात देणार नाही माझी पत्रिका.’’

हे घरी सांगितल्यानंतर तर स्फोटच झाला. ‘‘मला वाटलंच होतं, की हिच्या पत्रिकेत काही तरी गडबड आहे. नाही तर तिनं आढेवेढे घेतले नसते आणि काय रे स्वप्निल, तुमचं प्रेम आहे ना? मग प्रेमासाठी हिला साधी पत्रिकाही देता येत नाही? नुसतं तकलादू प्रेम दिसतंय हे!’’ आई म्हणाली. अर्थात हे रियाला सांगणं अशक्यच होतं. रियाला भेटलं की आईबाबांचा विषय हमखास निघतो. घरी असलं की आईबाबा रियाचा विषय चालू करतात. निष्पन्न काहीच होत नाही. माझ्यासारखे अनेक तरुण, जे आईवडील आणि प्रेयसी यांच्या कात्रीत सापडतात, ते काय करतात? त्यांच्या आईवडिलांना त्यांची घालमेल समजते का?..

मला मात्र माझी होणारी ओढाताण आईबाबांना सांगता येत नाही. आईबाबांना माझं सुख हवंय आणि मला त्यांचं! पण आमच्या सुखाच्या कल्पना भिन्न आहेत. रियाशिवाय दुसऱ्या मुलीचा विचार मी लग्नासाठी करू शकत नाही. प्रेम केल्यावर ते निभावून न नेता मला तिला वाऱ्यावर सोडायचं नाहीये.. पण आई-बाबा डोळय़ांसमोर येत राहतात. रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी मला मोठं केलंय. त्यांना दुखवणं मला जिवावर येतं. रियाशी लग्न करण्याचा निर्णय मी घेतला तर त्यांना किती वाईट वाटेल, बाबांना हा ताण झेपेल का, त्यांची प्रकृती अजून ढासळली तर मी स्वत:ला माफ करू शकणार नाही. निर्णय घेता येत नाही, म्हणून स्वत:ची घृणा वाटते. प्रचंड अस्वस्थता येते. कशात लक्ष लागत नाही. डोकं भणभणत राहतं. रियाच्या फोनची घंटी कधीही वाजेल, या विचारानं छातीत धडधड होतेय.. मी काय उत्तर देऊ?

anjaleejoshi@gmail.com