कुत्र्याची छत्री म्हणून ओळखले जाणारे मशरूम्स म्हणजे वनस्पतीवर वाढणारी नैसर्गिक खाण्यायोग्य बुरशीच असते. वनस्पती आणि प्राणी या दोन्हींचे काही गुणधर्म मशरूम्समध्ये असतात. वनस्पतीत न आढळणारं ‘ड’ जीवनसत्त्व त्यात असतं. मशरूम्स लो कॅलरी, लो सोडियम आणि फॅट फ्री असल्यामुळे त्यांच्या सेवनामुळे वजन आटोक्यात राहू शकतं, फळांप्रमाणे मशरूम्स ग्लुटेन फ्री असतात. त्यात अ‍ॅन्टीऑक्सिडन्टस तर आहेतच याशिवाय सेलेनियम, कॉपर यासारखी खनिजं आणि पोटॅशियमही आहे. मशरूम्स हा ‘बी’ जीवनसत्त्वाचा एक चांगला स्रोत आहे. मशरूम्स पटकन शिजतात, सूप, पुलाव, भाज्या यात त्यांचा उपयोग केला जातो. फक्त मशरूम्स खाण्यायोग्य आहेत की नाही हे बघून घ्यावं लागतं. कारण काही मशरूम्स विषारी असतात.
भरले मशरूम्स
साहित्य: १०/१२ मध्यम आकाराचे मशरूम्स, प्रत्येकी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, तयार पुदिना चटणी, तयार खजूर चटणी, बारीक शेव, पनीर ( किंवा उकडलेला बटाटा), दोन मोठे चमचे किसलेलं चीज, १ मोठा चमचा टोमॅटो सॉस, तेल.
कृती : मशरूम्स धुऊन-पुसून घ्यावे. मशरूम्सचे मधले दांडे काढावे आणि बारीक चिरावे. १ चमचा तेल, मीठ आणि १/२ चमचा लिंबाचा रस एकत्र करून हे मिश्रण मशरूम्सच्या आतून बाहेरून लावावं. कांदा, पनीर, खजूर-पुदिना चटणी, शेव, मशरूम्सचे दांडे हे मिश्रण मशरूम्समध्ये भरून त्यावर किसलेलं चीज घालून वर टोमॅटो सॉसचा ठिपका द्यावा. बेकिंग ट्रेला तेल लावून त्यावर मशरूम्स ठेवावे आणि १८० सें. वर तापलेल्या ओव्हनमध्ये १५ ते १८ मिनिटं भाजावे  
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्नसंकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mushrooms
First published on: 04-04-2015 at 01:01 IST