scorecardresearch

Premium

नवे वर्ष, नवे वेध, नवे संकल्प!

दिवाळी संपली की वेध लागतात ते नवीन वर्षांचे. पुन्हा एक नवं कोरं करकरीत वर्ष हात पसरून कवेत घ्यायला आपल्या समोर उभं असतं. आपण त्याचा स्वीकार कसा करतो यावर आपल्या आयुष्याची गुणवत्ता ठरत असते; पण अर्थात मनात आलं म्हणून संकल्प पूर्ण झाला असं होत नाही, त्यासाठी व्यवस्थित नियोजन करावं लागतं, मनाचंही..

new year 2024 in marathi, how to plan for new year in marathi, new year new goals in marathi,
नवे वर्ष, नवे वेध, नवे संकल्प! (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दिवाळी संपली की वेध लागतात ते नवीन वर्षांचे. पुन्हा एक नवं कोरं करकरीत वर्ष हात पसरून कवेत घ्यायला आपल्या समोर उभं असतं. आपण त्याचा स्वीकार कसा करतो यावर आपल्या आयुष्याची गुणवत्ता ठरत असते; पण अर्थात मनात आलं म्हणून संकल्प पूर्ण झाला असं होत नाही, त्यासाठी व्यवस्थित नियोजन करावं लागतं, मनाचंही..

शर्मिला पुराणिक

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
Loksatta chaturanga Governor Ramesh Bais Consider changing school timings
शाळेची वेळ: सकाळची की दुपारची?
Why do breasts itch?
स्तनांना वारंवार खाज सुटते? काय आहे त्यामागचे कारण? जाणून घ्या कशी मिळवू शकता ‘या’ त्रासातून सुटका

दिवाळी संपली आणि मी पुन्हा नियमितपणे योगासनाच्या क्लासला जायला लागले. तिथे सई भेटली, योगवर्गातली मैत्रीण. म्हणाली, ‘‘अगं, या दिवाळीत गोड म्हणू नको, तिखट म्हणू नको इतकं खाल्लंय ना, की तीन-चार किलो तरी वजन नक्की वाढलंय, आता फटाफट कमी करावं लागेल म्हणजे ख्रिसमस पार्टीला खास आणलेला ड्रेस घालता येईल.’’ सई बोलून गेली आणि मनात विचारांची गर्दी झाली..

हा आता मानवी स्वभावच झालाय, नवीन वर्ष येतंय म्हटलं, की नवनवीन संकल्प केले जातातच. गंमत म्हणजे भारतात असे संकल्प करण्याची संधी वर्षांतून तीन वेळा तरी मिळते. गुढीपाडवा, नवीन इंग्रजी वर्ष वा जानेवारी महिना आणि स्वत:चा वाढदिवस; पण ‘तेरडय़ाचा रंग तीन दिवस’ या म्हणीप्रमाणे केलेले संकल्प तीन-चार दिवस टिकतात आणि मग थेट त्यांची आठवण येते पुढच्या वर्षी. तसे तर इतर कोणी म्हणो किंवा नको, पण आपण आपल्याच मनाला वेगवेगळय़ा सबबी देऊ लागतो. मग साहजिकच संकल्प व त्यासाठीची कृती थंड होते आणि आपण आपल्याच मनाची समजूत घालत बसतो, आत्ता नाही जमलं, पुढच्या वेळी नक्की करेन. काही वेळा स्वत:चंच टुमणं लागतं म्हणा किंवा गरजेचा तगाजा लागतो म्हणा, आपण तो संकल्प पुन्हा एकदा पूर्ण करायला घेतो. काही दिवस करतोही, पण परत ये रे माझ्या मागल्या. पुन्हा कोणती तरी नवी कारणं आणि संकल्पापासून पळ काढणं ही गंमत (?) चालूच राहाते.

हेही वाचा : दिवाळी काल-आज!

माझ्या ओळखीतल्या एक बाई, त्यांच्या मुली जेव्हा लहान होत्या. त्या त्यांना सांगायच्या, ‘‘खर्च जपून करा. वस्तू जपून वापरा. थेंबे थेंबे तळे साचे.’’ मुली म्हणायच्या, ‘‘काहीही हं आई तुझं. असं काही होत नाही, रोज चिमूटभर वाचवून.’’ मग त्या बाईंनी मुलींना प्रात्यक्षिकच करून दाखवायचं ठरवलं. रोज भात करताना त्यांनी एक मूठ तांदूळ एका डब्यात काढून ठेवायला सुरुवात केली. रोजच्या एक मूठ तांदळामुळे काही दिवसांतच एकावेळचं सर्वाचं नीट जेवण होईल एवढे तांदूळ जमा झाले. तेव्हा मुलींनाही पटलं, की मोठी गोष्ट साधायला उडीही मोठीच मारावी लागते असं नाही. म्हणजेच कोणत्याही सबबी देऊन एखादी ठामपणे ठरवलेली गोष्ट, निर्धार केलेली गोष्ट सोडून देण्याची गरज नाही.

आपल्याच मनाला आपणच सबबी देण्यावरून मनात आलं, की बहुतेक वेळा सगळे संकल्प हे वजन कमी करणं किंवा शारीरिक तंदुरुस्ती मिळवणं यासाठी बहुतांशी केले जातात; परंतु मनाला सशक्त करणारे संकल्प केले तर? मन सुदृढ केलं तर? उदाहरणार्थ- पटकन रिअ‍ॅक्ट होणं, चिडणं यावर ताबा मिळवणं, नातेसंबंध सुधारणं, स्वत:चा बडेजाव न करणं, भूतकाळात घडलेली त्रासदायक घटना किंवा मनातला अपराधगंड मागे सारून पुढे जाणं, हे आहेतच; पण आजच्या काळात गरजेचे झालेले आणखी काही महत्त्वाचे संकल्प म्हणजे, गरज नसताना केली जाणारी खरेदी, सतत स्वत:ला सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह ठेवून मी किती मजेत आहे हे दाखवण्याची चढाओढ, तसेच वाढलेला मोबाइलचा वापर कमी करण्याचा संकल्प करणं खूप गरजेचं झालं आहे. आजच्या जगण्यात ताणतणाव वाढत आहेतच, शिवाय नातेसंबंधही खूप बिघडत आहेत. नुकत्याच झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात मुक्ता पुणतांबेकर यांनी एका आईच्या वाढत्या मोबाइल वापरामुळे तिच्याच मुलाचा मृत्यू कसा झाला ही घटना सांगितली, यावरून ही सवय नात्यांवर किती गंभीर परिणाम करत आहे व त्यावर संयम बाळगणं किती गरजेचं आहे, याची जाणीव झाली. खरंच असं होतं ना? की आपण ठरवतो मोबाइल नाही बघायचा, पण सारखं लक्ष जातंच. काही ना काही कारणास्तव आपण तो घेतोच हातात. म्हणजे कळत असूनही आपण ते टाळू शकत नाही. यासाठी आपण व्यक्तिगत काही संकल्प करू शकतो का? आणि ते चिकाटीनं पूर्ण करण्यासाठी काय करता येईल?

हेही वाचा : एक दशकाचा गौरवशाली प्रवास!

एक सोपा आणि सहज करता येण्यासारखा उपाय म्हणजे कागद, पेन हातात घेऊन सरळ लिहायला घेणं. त्यासाठी थोडा स्वत:साठी निवांत वेळ काढणं- मला नक्की कोणकोणते संकल्प करावेसे वाटताहेत, याची यादी बनवणं, त्या यादीतून प्राधान्यक्रम ठरवून एक किंवा दोनच अतिमहत्त्वाचे संकल्प नक्की करणं, संकल्प निश्चित झाल्यावर यात मला कोणत्या गोष्टींचा अडथळा येईल? तिथे मला मनावर कसा ताबा ठेवता येईल? येणारा अडथळा मी कसा टाळू शकेन, यासाठी मी कुणाची मदत घेऊ शकेन. त्याचबरोबर माझ्याकडे उपलब्ध नैसर्गिक गोष्टींचा मी पूर्णपणे स्वीकार करून त्याचा जास्तीत जास्त कसा उपयोग कसा करता येईल याचा आराखडा तयार करणं. तुमच्याकडून कोणत्या चुका व्हायची शक्यता आहे, त्या कशा व किती टाळता येतील याचीही यादी यात असणं गरजेचं. अशी पूर्ण लेखी यादी तयार केली तर तो संकल्प पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील.

माझ्याकडे समुपदेशनाला एक मुलगी आली होती, ती हुशार होती; परंतु ती काय लिहिते हे तिलाही वाचता येत नसे, मग आम्ही तिचं अक्षर सुवाच्य करण्याचं ठरवलं, रोज नियमानं तिला एक सुविचार, अगदी गिरवून गिरवून, जास्तीत जास्त छान लिहिण्यास सांगितलं. सहा महिन्यांत तिचं अक्षर इतकं सुधारलं, की तिचा स्वत:चाही त्यावर विश्वास बसत नव्हता. तसंच ही गोष्ट करून एकाच वेळी दोन गोष्टी साध्य झाल्या. तिचं अक्षरही सुधारलं व अक्षर घोटून लिहिल्यामुळे सुविचारही मनात पक्के झाले आणि सर्वात महत्त्वाचं परीक्षेत तिनं लिहिलेली उत्तरं नीट कळल्याने परीक्षेतही उत्तम गुण मिळायला लागले. असंच छोटं छोटं काम करून आपल्याला काय काय करता येईल, याचा शांतपणे विचार करायला हवा. त्यामुळे खरंच खूप काही करता येईल.

हेही वाचा : शोध आठवणीतल्या चवींचा! घनदाट जंगलातील चविष्ट पदार्थ

अब्राहम लिंकन यांनी म्हटलं आहे, ‘‘तुम्ही केलेला संकल्प इतर कुठल्याही संकल्पापेक्षा मोठा असतो.’’ सशक्त व सकारात्मक संकल्प करणं आणि तो निभावणं सोपं कधीच नसतं. त्यासाठी त्याचा ध्यास व सातत्य लागतं. भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘स्वप्नं ती नसतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती असतात जी झोपूच देत नाहीत.’ याबाबतीत एक महत्त्वाचं उदाहरण द्यायचं झाल्यास डॉ. आनंद नाडकर्णी यांचं नाव घेईन. गेली अनेक वर्ष मानसिक आरोग्य व त्याबाबतची जागृती, यासंदर्भात वेगवेगळे प्रकल्प व कार्य ते सातत्यानं करत आहेत. त्यांच्यासारखीच अनेक माणसं या क्षेत्रात किंवा वेगवेगळय़ा क्षेत्रांत आपापलं काम सातत्यानं करून आपले संकल्प पूर्ण करत आहेत. अशा सर्व लोकांकडे बघून एक महत्त्वाची गोष्ट जाणवते ती म्हणजे हे लोक संकल्प पूर्ण करताना, कुठल्याही अपयशानं निराश तर होत नाहीतच, पण आव्हानांमुळे खचूनही जात नाहीत. यासाठी मन बळकट ठेवण्याचा दृढनिश्चय त्यांनी केलेला असतो व ते तो पाळतही असतात; पण काही वेळा असंही होतं की, एखादी व्यक्ती काही तरी ठरवते. ते मनापासून करतही असते. त्याचे छान परिणामही दिसू लागतात. मग कोणी तरी म्हणतं, ‘‘ए तू छान जमवलंस हं सारं.’’ इथे धोका असू शकतो नाही का? कारण अशा एखाद्या प्रतिसादानंतर संकल्प सुटण्याची शक्यता असते. तेव्हा मात्र सावध राहायला हवं. तिथे ‘आधी केले मग सांगितले’ हे मनात पक्कं करावं लागेल.

हेही वाचा : पाहायलाच हवेत : कहाणी जीवनव्यापी मनोभंगाची

तर, आता नवीन वर्ष सुरू व्हायला थोडेच दिवस राहिले आहेत. त्यासाठी आपलं मन बळकट करणारा संकल्प करू या का? व तो पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी याच महिन्यात सुरू करू या का? म्हणजे आयत्या वेळी गडबड न होता संकल्प पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. जमेल असं वाटतंय ना? चला, येणाऱ्या वर्षांत स्वत:च्या मानसिक आरोग्यासाठी काही तरी संकल्प करू या. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे प्रत्येकानं स्वत:चा एक संकल्प पूर्ण केला तरी सुदृढ मनाची किती तरी माणसं तयार होऊन, त्यांचा एक सशक्त समाज घडू शकेल.आपण सर्वच अशा संकल्पासाठी व तो पूर्णत्वाला नेण्यासाठीच्या तयारीला लागू या.
शुभस्य शीघ्रम!
(लेखिका वकील आणि समुपदेशक आहेत.)
25.sharmila@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New year 2024 new vision how to make goals for upcoming new year 2024 css

First published on: 18-11-2023 at 00:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×