संध्याकाळचे आठ वाजायला आले होते तरी सुबोध घरी आला नव्हता. रोज तो साडेसहा-सातपर्यंत घरी परतत असे. बढे काका अस्वस्थ झाले. तसं पाहायला गेलं तर फार काही उशीर झाला नव्हता. मुंबईसारख्या शहरात अर्ध्या-एक तासाचा उशीर तसा फार नव्हे, पण बाहेरून घरी येणाऱ्या माणसांची वाट पाहत बसणाऱ्या वयस्कर माणसांना मात्र तो तितकासा उशीरसुद्धा कासावीस करून टाकू लागतो. त्या तितक्याशा वेळेतसुद्धा ना ना तऱ्हेचे आणि नको ते विचार डोक्यात येऊन जातात.
आजी-आजोबा दोघंच घरात असतील, तर ती दोघं, त्या उशीर होण्यानं अस्वस्थ असतात, तरीही एकमेकांना ‘‘लगेच इतकं चिंता करायला नको काही. येईल इतक्यात, कोणी तरी भेटलं असेल, गाड्या लेट असतील,’’ अशी मनाशी चिंता करतच एकमेकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात. बढे काका आणि काकू तशीच एकमेकांची समजूत काढत होते आणि तेवढ्यात बेल वाजली. पण ही बेल सुबोध वाजवतो तशी नाही हे दोघांनीही ओळखलं. बढे काकूंनी चटकन पुढे होत दरवाजा उघडला. दार उघडताच त्यांची सून नेहा आत आली. तिच्या दोन्ही कानांतून नेहमीसारख्या ‘इयर फोन’च्या दोऱ्या आज लोंबकळत नव्हत्या.
ती आली तशीच आपल्या खोलीत गेली. हातपाय धुऊन बाहेर सोफ्यावर येऊन बसली आणि मराठी साप्ताहिक उघडून वाचू लागली. ‘‘सुबोध अजून आला नाही?’’ तिनं विचारलं. काका-काकूंचे चेहरे पाहून तिच्या ते लगेचच लक्षात आलं. तिने बाजूचा लॅण्डलाइन फोन जवळ ओढला आणि सुबोधचा मोबाइल नंबर फिरवू लागली. एकदा, दोनदा, तीनदा नंबर फिरवूनही लागत नाही म्हटल्यावर तिने तो ठेवून दिला. भिंतीवरच्या घड्याळ्यावर एक नजर टाकली. काका-काकूंच्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे पाहत म्हणाली, ‘‘नका काळजी करू. येईल इतक्यात तो.’’ तिनं पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं.
इतक्यात बेल वाजली. या बेलचा आवाज मात्र सुबोध वाजवायचा तसाच होता. काका-काकूंना एकदम हायसं वाटलं. सुबोध आत आला. त्याच्याही हातात, कानात काहीच नव्हतं, अगदी ओकाबोका वाटत होता. तोही आपल्या खोलीमध्ये जाऊन हातपाय धुऊन बाहेर आला आणि सोफ्यावर येऊन बसला. नेहाला म्हणाला, ‘‘तुझ्या फोनला काय झालं? किती वेळ मी प्रयत्न करतोय?’’ ती म्हणाली, ‘‘दुपारपासून माझा फोन ‘कम्प्लीट हँग’ झालाय. काही केल्या चालतंच नव्हता. येताना दुरुस्तीला टाकून आले. उद्या मिळेल.’’
नेहा म्हणाली, ‘‘अरे, तुझा फोनही का लागत नाहीये? आई-बाबा वाट पाहत होते, मी लॅण्डलाइनवरून तुझ्या मोबाइल फोनवर किती वेळा प्रयत्न केला. लागतच नाही.’’
सुबोध म्हणाला, ‘‘अगं काय सांगू तुला! आत्ता स्टेशनवर उतरता उतरता कोणी तरी माझा मोबाइल फोन मारला. मला कळलंच नाही. खिशातून फोन काढायला गेलो तेव्हा लक्षात आलं. मग काय पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार वगैरे सगळे सोपस्कार पूर्ण करून आलो. म्हणून तर आज जरा उशीर झाला.’’
नेहा म्हणाली, ‘‘अरे! सांगायला विसरले, सकाळी मी काम करायला लॅपटॉप काढला. त्याचा चार्जर बिघडलाय बहुतेक. लॅपटॉप चार्जच होत नाहीये, ‘कंप्लीट डेड’. तो आता नवीनच आणायला लागणार आहे.’’
सुबोध, चहा घेऊन सोफ्यावर बसला. बाबांना म्हणाला, ‘‘बाबा, या ‘आयपीएल’ फायनलचे ‘हायलाइट्स’ बघू या. आज अनायसे कधी नव्हे तो वेळ मिळालाय, मॅच बघू या!’’ त्याने रिमोट हातात घेतला आणि उलटसुलट करून, तळव्यावर थापटून, परत परत टीव्हीसमोर ओवाळू लागला. पडदा काळा कुळकळीत, प्रकाशाचं नाव नाही. ‘‘बाबा, टीव्ही का चालत नाहीये?’’
‘‘अरे, काय झालं कोणास ठाऊक? दुपारी आम्ही कार्यक्रम पाहत होतो आणि अचानक टीव्ही बंद पडला. आपल्या रिमोटला काही झालं नाहीये, टीव्हीच बिघडलाय. उद्या त्याच्याकडे पाहतो. आपल्या नेहमीच्या टीव्हीवाल्याला बोलावतो, त्याला मगाशी फोन केला होता. त्याला वेळ नाही. उद्या येतो म्हणालाय, येईल तेव्हा खरा!’’
सुबोध म्हणाला, ‘‘अगं बंटी पुण्याहून कधी येणार आहे? आपण या रविवारी त्याला आणायला जाऊ या. पुढच्या आठवड्यात त्याची शाळा सुरू होईल ना! आजीकडे या वेळी जरा जास्तच रमलाय तो.’’
काकू म्हणाल्या, ‘‘जेवण तयार आहे, कधी नव्हे ते आज सगळे निवांत आहोत. चला या टेबलवर, जेवून घेऊ या.’’ सर्व जण जेवायला बसले. सगळ्यांनाच अगदी चुकल्या-चुकल्यासारखं तरीही मुक्त वाटत होतं. मुलाच्या आणि सुनेच्या ताटाच्या बाजूला नेहमी असतो तसा लखलखणारा उताणा मोबाइल नव्हता. मुलाला किती तरी पदार्थ आईने बऱ्याच दिवसांत केलेले नाहीत, ते आज आठवलं. नेहाची एक मावशी बरीच आजारी होती. तिला तिची चौकशी करावीशी वाटली. बढे काकांना पुढल्या आठवड्यात नेहमीप्रमाणे वैद्याकीय तपासणी करायला जायचं असल्याची आठवण सुनेला करून द्यावीशी वाटली.
बंटीला नवीन कपडे घ्यायचे होते, त्यासंबंधी मुलाला आणि सुनेला, दोघांनाही बोलावंसं वाटलं. जेवण झाल्यावर सुबोधने स्वयंपाकघरामध्ये जाऊन कपाटातील बडीशेप शोधून छोट्या चमच्याने सर्वांच्या हातावर दिली. आज सर्वांना, सर्वांकडे, आपल्या घरातील प्रत्येक वस्तूकडे अगदी मनमुराद बघता येत होतं, बोलता येत होतं. कैक दिवसांत असा मनमोकळा संवाद या घरासाठी जणू काही पारखा झाला होता. तो आज नव्याने होत होता. प्रत्येकालाच एकमेकांशी काही तरी आठवून आठवून बोलायचं होतं, विचारायचं होतं.सुबोध म्हणाला, ‘‘आई, माझा ‘म्युझिक की-बोर्ड’ कुठे ठेवलायस गं?’’
काकू म्हणाल्या, ‘‘तो काय तिथे, कपाटावर. लाल रंगाच्या पिशवीत ठेवलाय बघ. अरे, गेल्या गणपती उत्सवात काढला होतास. आता त्याला सहा महिने झाले.’’ सुबोध, नेहाला म्हणाला, ‘‘आपण कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तेव्हा गाणी म्हणत बसायचो बघ! तशी आज धमाल करू या, काय!’’
कपाटावरील पिशवीवरची धूळ झटकून की-बोर्ड बाहेर आला. प्रथम थोडी चाचपडणारी सुबोधची बोटे सराईतपणे त्यावरून फिरू लागली. नवीन चित्रपटातली गाणी, मराठी मालिकांची शीर्षक गीतं, उमटू लागली आणि आसमंत आनंदाने भरून टाकू लागली. नेहा त्याला गाणी सुचवू लागली. चाल आठवली नाही, तर म्हणून दाखवू लागली.
त्या गाण्यांचे स्वर, नकळत शेजारच्या करंदीकर काकांकडे तरंगत कधी जाऊन पोचले कळलं नाही. करंदीकर काका-काकू त्यांचा ‘कराओके’चा स्पीकर घेऊन आले. त्याच्या साथीने करंदीकर काका-काकू, जुन्या चित्रपटातली अजरामर गाणी म्हणू लागले. अगदी हलक्या आवाजातलं ज्योत्स्ना भोळेंचं नाट्यगीत, काकूंनी कधी सुरू केलं ते त्यांच्याही लक्षात आलं नाही. बढे काकांचा खार्ज्यात लागलेला आवाज, तलत महमूद आठवू लागला.
‘‘इतना ना मुझसे तू प्यार बढा,
के मैं एक बादल आवारा,
कैसे किसी का सहारा बनूँ,
के मै खुद बेघर बेचारा…।’’
त्या श्रवणीय माहोलात मध्ये मध्ये पाच-सहा का होईना टाळ्या वाजत राहिल्या. रात्री बारावरचा तास काटा स्थिर होऊन, मिनिट काटा पुढे सरकू लागला होता. सुबोधने नेहाकडे पाहिलं. तिने ‘वर्क फ्रॉम होम’ची खूण केली. सुबोधने तिला टाळी देत त्यालाही उद्या घरीच थांबायचंय, म्हणून खूण केली.
काकू उठून स्वयंपाकघरात गेल्या. वेलची घातलेल्या कॉफीचा दरवळ हॉलमध्ये पंख्याच्या वाऱ्याबरोबर गिरक्या घेत फिरू लागला होता. कॉफीत साखर घालू की नको, हे विचारण्याचं भानदेखील कॉफी करणाऱ्या काकूंना राहिलं नव्हतं. आणि पिणाऱ्यांना त्याची फिकीरही नव्हती. कारण ही रात्रच वेगळी आणि मंतरलेली होती. केवळ हजारो दिवसांत एखाद दिवशी अशी अचानक उगवणारी. हल्ली केवळ अद्भुत आणि असंभव वाटावी अशी!
gadrekaka@gmail. com