वर्गातला शेवटचा दिवस. सगळेच अतिशय भावुक झालेले. आमिर उभा राहात माझ्याकडे, अतिककडे बघत म्हणाला, ‘‘परस्पर वैमनस्यामुळे मी जिथे कधीही जाऊ शकणार नाही त्या भारतातल्या कुणाशी माझी मैत्री होईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. जन्मजात खुन्नस असलेल्या बांगलादेशमधला कुणी माझा मित्र बनेल हे केवळ अशक्य होतं. माझे भारतीय आणि बांगलादेशी मित्र ही या अभ्यासक्रमातील माझी सगळ्यात मोठी कमाई आहे.’’
वर्गातला पहिला दिवस. चांगलेच उग्र आणि खडूस दिसणारे प्रा. मार्को रीकोल्फी यांचे व्याख्यान चालू आहे. प्राध्यापक सांगतायत की, या एल.एल.एम.चा एक भाग म्हणून आम्हाला एक शोधनिबंध लिहायचा असून शक्यतो आम्ही तो दोघा-दोघांचे गट करून लिहावा. ‘‘कुणाच्या डोक्यात यासाठी काही विषय आहे?’’ प्राध्यापकांची भेदक नजर सर्व वर्गावरून फिरता-फिरता माझ्यावर स्थिरावते आणि मी बोलू की नको या संभ्रमात हळूच पुटपुटते, ‘‘भारताच्या पेटंट कायद्यातला सेक्शन ३ ड जगभर सध्या चांगल्याच वादळात सापडलाय. हा सेक्शन ३ड आणि औषधांवरील पेटंटवर लिहायला आवडेल मला.’’ प्राध्यापक होकारार्थी मान डोलावतात आणि वर्ग संपतो.
तेवढय़ात साधारण तिशीतला, बऱ्यापैकी भारतीय चेहऱ्यामोहऱ्याचा एक तरुण माझ्यासमोर अवतीर्ण होतो आणि चक्क हिंदीमध्ये बोलायला लागतो. ‘‘अस्सलाम आलेकुम मृदुला. मै आमिर लतिफ. पाकिस्तानसे.’’ शेवटचा शब्द ऐकल्या ऐकल्या मी दचकते. आमिर हसत हसत पुढे बोलतो. ‘‘मै इस्लामाबाद में पाकिस्तान के पेटंट ऑफिस मे लीगल डिपार्टमेंट का डेप्युटी डिरेक्टर हूँ. हम लोग भी सेक्शन ३ डी जैसा कुछ हमारे पेटंट अॅक्ट में डालना चाहते हैं. मुझे बडी खुशी होगी अगर मै आप के साथ रिसर्च पेपर लिखने में आप का पार्टनर बन सकू. क्या आपकी इजाजत है?’’
अरे बाप रे! याने तर मला चक्क ‘धर्मसंकटात’ टाकलंय! पाकिस्तानी माणसाबरोबर पार्टनरशिप? कठीण आहे. शिवाय याला पाहताच थेट जावेद मियांदाद आठवतोय आणि त्याने शारजामध्ये आपला उडवलेला धुव्वा आणि या जावेद मियांदादबरोबर पेपर लिहायचा? याच्याशी फक्त दुश्मनी होऊ शकते. मी फक्त त्याच्याकडे पाहून हसते आणि ‘‘हो, मी सांगते तुला विचार करून लवकरच,’’ असं म्हणून चालू लागते; पण मनात निर्णय झालेला होता की, या पाकिस्तान्याबरोबर बोलणे नाही.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, आम्ही तुरीन शहराच्या सहलीला चाललो आहोत. आमिर ऊर्फ जावेद मियांदाद बसमध्ये येतो आणि माझ्याच शेजारी येऊन बसतो. ‘‘दुसरी जागा सापडली नाही का याला! मेला माझ्याच शेजारी येऊन बसलाय.’’ माझी मनातल्या मनात चडफड. मी मुद्दाम त्याच्याकडे न पाहता खिडकीतून बाहेर पाहू लागते, तर ‘‘अस्सलाम आलेकुम मृदुला.’’ परत एकदा माझ्याशी संभाषण सुरू करण्याचा आमिरचा केविलवाणा प्रयत्न आणि माझा परत शिष्टपणा.
आम्ही आइसक्रीम खायला थांबलोय. मी एक इटालियन सिम कार्ड घ्यायला तिथल्या एका दुकानात शिरते तर तिथेही हे महाशय सिम कार्ड विकत घेत उभे. त्याच्या हातातले सिम कार्डचे एक पाकीट माझ्यापुढे धरत म्हणतो, ‘‘मेरे सिम कार्ड पे ये और एक सिम कार्ड फ्री मिला है, आप रख लीजिए. मैं दो दो रखके क्या करूंगा.’’ वास्तविक १० युरोच्या या सिमवर फुकट फोन करण्याची बरीच मिनिटे आहेत, पण तरी तो मला हे सिम कार्ड देऊ करतो. पैसे घ्यायला साफ नकार देतो. मला फुकट मिळालेल्या गोष्टीचे मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही, असं त्याचं म्हणणं. विळ्याभोपळ्याचं सख्य असलेल्या माझ्या शेजारी देशातला हा माणूस चक्क माझ्याशी चांगला वागू पाहतोय याचं मला आश्चर्य वाटतं! मी मुकाटय़ाने ते सिम पर्समध्ये ठेवते.
यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ. मी कँटीनमध्ये गेले, तर एका टेबलवर आमिर आणि अजून एक भारतीय चेहऱ्यामोहऱ्याचा दिसणारा माणूस खात बसलेले. आमिर मला हात करून बोलावतो. हा अतिक. बांगलादेशी. हा ढाका विद्यापीठात ‘इंटरनॅशनल रिलेशन्स’ या विषयाचा प्राध्यापक आहे. थोडय़ा फार गप्पा मारून मी न्याहारी संपवते आणि उठू लागते. हळूच आमिर विचारतो, ‘‘आपने कुछ सोचा पेपर के बारेमें?’’ मी अर्थात नाही म्हणत तिथून चालू लागते.
त्यानंतरचा दिवस. आज आम्ही सगळे तुरीनच्या एका पोलीस स्टेशनमध्ये, इटलीत राहण्याचे परमिट घ्यायला आलोय. आमचा एक वर्गमित्र मला आणि आमिरला काश्मीर या विषयावरून छेडतो आणि आमचा जोरदार वाद चालू होतो. मी सात्त्विक संतापाने बोलू लागलेय पाकच्या घुसखोरीबद्दल, ताजवरच्या हल्ल्याबद्दल आणि आमिर हसत हसत काही तरी मल्लिनाथी करून माझ्या आगीत तेल ओततोय आणि मी अजून अजून भडकतेय. शेवटी तो हळूच हिंदीमध्ये म्हणतो, ‘‘बस करो मृदुला. काम डाऊन. पाकिस्तान का कोई भी आम आदमी नही चाहता के हम आपसे लडते रहे. भला ये काश्मीर आप रख लो. लेकिन ये झगडे बंद होने चाहिये. हमे बहोत प्यार है आपके मुल्कसे. माशाअल्ला हमारे फोरफादर्स कभी वहाँपे बसे थे. खुदा करे और ये झगडे खतम हो जाये. काश हमारे मुल्क साथ होते तो आज हम कहा पहोच चुके होते.’’ त्याच्या या बोलण्याने तो माझ्यातल्या आगीवर एकदम पाणी ओततो. जाताना हसत हसत हळूच विचारतो, ‘‘वो पेपर के बारे में कुछ सोचा?’’ मी म्हणते, ‘‘देखो आमिर. अगर हमे पेपर साथ में करना है तो एक बात तय है. हम पोलिटिकल और रिलिजियस मसलोपें बिलकूल बात नाही करेंगे. अगर ये आपको मंजूर है तो मैं इसके बारेमें सोच सकती हूँ.’’ आमिर म्हणतो, ‘‘हां आपको अगर इससे तकलीफ है तो नही करेंगे. इसमें क्या है?’’ आणि आम्ही दोघे पार्टनर बनतो.
यानंतर काही दिवसांनी सकाळी नाश्त्याच्या वेळेला आमिरबरोबर उपाहारगृहात एक नवीच मुलगी दिसते. ही मेहरीन. इस्लामाबादमध्ये ‘इन्स्टिटय़ूट फॉर रुरल डेव्हलपमेंट’मध्ये काम करते आणि तिथून आमच्या कॅम्पसमध्ये डेप्युटेशनवर आली आहे. मेहरीन साधारण पंचाविशीतली, एकदम हसतमुख. ती नुकतीच इथे आल्याचे व थोडी आजारी असल्याचे आमिरनेच सांगितले. मेहरीन जुजबी बोलून जाते. त्यानंतर एकदा भेटते. मी तिला म्हणते, ‘‘मेहरीन, आज तू एकदम बरी दिसतेयस.’’ तर ही वेडी पोर खूश होऊन चक्क गळ्यात पडून रडायला लागते. म्हणते, ‘‘आज सुबहसे बहोत याद आ रही थी घरवालोंकी. लग रहा था किसीसे गले मिलू. लेकिन मेरे साथ काम करनेवाले सभी बंदे मर्द है. कितना अच्छा लगा आपको गले लगाया तो. मुझे लगा अपने बडे बहन से मिली हूं.’’ आणि त्यानंतर ही लाघवी, बडबडी, बेधडक मेहरीन आमची मैत्रीण होऊन जाते. आमिर, मी, अतिक आणि मेहरीनचं इतकं गूळपीठ जमायला लागतं की, ‘साऊथ इस्ट एशियन कनेक्शन इन इटली’ असं म्हणून आम्हाला लोक चिडवायला लागतात.
या हिंदू नसलेल्या माझ्या मित्रांना हिंदू धर्माबद्दल इतकी माहिती होती की, विचारू नका. गाईच्या पोटात ३३ कोटी देव का? गणपती आणि सरस्वतीपैकी नक्की विद्येची देवता कोण? तुम्हाला इतक्या देवांची गरज काय? असे अनेक प्रश्न विचारून आमिर आणि मेहरीन मला भंडावून सोडायचे. मी कधीही मंदिरात जात नाही आणि माझ्या धर्माला ते चालतं हे ऐकून ते आश्चर्यचकित व्हायचे. देवाला नमस्कार केला नाही किंवा उपवास केला नाही तरी हिंदू धर्मात त्याची काही शिक्षा नसते हे त्यांना झेपायचंच नाही.
आमचे चर्चेचे लाडके विषय म्हणजे अर्थातच राजकारण, बॉलीवूड आणि क्रिकेट! माझ्यापेक्षा किती तरी जास्त हिंदी चित्रपट या माझ्या मित्रांनी पाहिलेले होते. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये दीपिका पदुकोण बोलते ती भाषा तुला बोलता येते का, हे त्यांनी मला अनेकदा विचारलं! बॉलीवूडमधल्या आपल्या हिरो-हिरोइनचे अफेअर्स यांना पाठ. क्रिकेटवरून एकमेकांना चिमटे काढणं नेहमीचंच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मनसे, राज आणि उद्धव ठाकरेंचं भांडण. सगळं सगळं यांना माहीत!
पाकिस्तानातील पडदानशीन बायका आणि त्यांच्या सामाजिक स्थितीबद्दल आपले जे काही समज असतात त्याला जबरदस्त हादरा देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे मेहरीन. अतिशय बेधडक, बिनधास्त, बोलघेवडी. शॉर्ट्स घालून आमच्या वर्गातल्या सगळ्या पुरुषांबरोबर एकटी फुटबॉल खेळायची! मेहरीनचं ऑफिस आमच्या वर्गाच्याच इमारतीत. येता-जाता आमच्या वर्गात आमचं काही इंटरअॅक्टिव्ह सेशन चाललंय असं दिसलं, तर बिनधास्त आमच्या वर्गात येऊन बसणार!
मी आणि आमिर हिंदीत मोठय़ाने बोललो तरी कुणालाही काहीही समजायचं नाही. एकदा कॉपीराइटच्या अतिशय कंटाळवाण्या तासानंतर सगळेच प्राध्यापिकेचे तोंडदेखले कौतुक करत होते, पण मनातून अतिशय वैतागलेले. आमिरही त्यांना म्हणाला, ‘‘प्रो. अॅप्लिन युवर लेक्चर वॉज एक्सलंट.’’ आणि मग माझ्याकडे बघत म्हणाला, ‘‘यार, ये कितना पकाती है.’’ प्रो. अॅप्लिन म्हणाल्या, ‘‘व्हॉट आर यू सेइंग टू हर.’’ तेव्हा आमिर गंभीर चेहरा करून म्हणाला, ‘‘आय अॅम टेलिंग हर इन अवर मदरटंग दॅट युवर लेक्चर वॉज एक्सलंट.’’ मला हसू आवरणे अशक्य झाले.
या माझ्या मित्रांनी काळजाला खरा हात घातला दिवाळीच्या दिवशी. अख्ख्या कोर्समध्ये मी एकटीच हिंदू आणि भारतीय होते. मुसलमान बरेच असल्यामुळे ईद वगैरे जोरदार साजरे झाले होते. मात्र दिवाळी म्हणजे काय हेच जिथे कुणाला माहीत नाही तिथे ती साजरी करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता; पण दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्री मी झोपलेले असताना माझ्या दारावर थाप पडली. डोळे चोळत उठून दार उघडलं तर दारात मेणबत्त्या घेऊन हे तिघं उभे, मला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला.. केक घेऊन आलेले. मला प्रचंड आनंद झाला. मी घरापासून इतक्या दूर असताना आणि दिवाळीच्या दिवशी मी घराची आणि घर माझी इतकी आठवण काढत असताना कुणी तरी माझ्यासाठी हे केलं. त्या आनंदातच मी झोपले, तर सकाळी ९ वाजता रूमवर अतिकचा फोन. ‘‘चल ऊठ, तयार हो. तुझा भारतीय कुर्ता पैजामा घाल, नाही तर साडी नेस. आज आपल्याला बाहेर जेवायला जायचं आहे..’’
आमच्या कॅम्पसमधल्या पो नदीच्या काठाने फेरफटका मारत मारत शहरापर्यंत चालत गेलो. मग नदीच्या घाटावर उन्हं खात बसून चकाटय़ा पिटल्या. तिथून यांनी शोधून ठेवलेल्या ‘रेस्तोरान्ते ताज महल’ या एका पंजाबी हिंदू हॉटेलमध्ये गेलो. तिथे चक्क दिव्यांची आरास दिसली. दिवाळी साजरी होत होती. तिथे भारतीय पक्वान्नं आणि संगीताच्या साथीने पोटभर जेवलो. तुरीनसारख्या शहरात युरोमध्ये खर्च करणं अतिशय जिकिरीचं असायचं आम्हा सगळ्यांनाच. त्यातून भारतीय जेवण तर प्रचंड महाग! पण असं असतानाही त्या दिवशी या तिघांनी मला खिशात हातही घालू दिला नाही. दिवसभर मला घराची आठवण येऊ नये म्हणून चाललेली त्यांची धडपड मला दिसत होती आणि सुखावत होती. त्या तिघांनी मला या दिवशी दिलेले जिव्हाळ्याचे क्षण माझा आयुष्यभरासाठीचा ठेवा बनले आहेत.
त्यांच्या चांगुलपणाचे आणि सहृदयतेचे असे किस्से तरी किती सांगू? माझा जुना सोबती असलेल्या व्हर्टिगो या आजाराने एकदा मी तीन दिवस त्रस्त होते. अवस्था अशी होती की, तीन दिवस एकटीने अंथरुणात उठून बसायचंही धाडस होई ना. उठलं की जबरदस्त चक्कर, पण वर्ग चालू असतानाही अधूनमधून अनेक चकरा मारून यांनी मला माझ्या अंथरुणात नाष्टा आणि जेवण पुरवलं. दिवसभर आलटून पालटून कशी आहेस? बरी आहेस का? काही हवंय का? म्हणून विचारायला फोन करत राहिले.
दिवस भरभर पुढे सरकले आणि आपापल्या मायदेशी परतण्याचे दिवस जवळ येऊ लागले. आल्या आल्या काही दिवस कुठे येऊन पडलोय? कधी परत जाणार? असे विचार करणारे आम्ही सगळेच आता मात्र परत जाण्याच्या विचारांनी कातर होऊ लागलो होतो. आमिरला आणि मेहरीनला यानंतर भेटणं विशेषत: मला कठीण आहे हे आम्हाला माहिती होतं, कारण आम्हाला एकमेकांच्या देशांचा व्हिसा मिळणं महा कर्मकठीण. जायचा दिवस जवळ येऊ लागला तसं मेहरीन मला आणि अतिकला पुन:पुन्हा सांगू लागली की, तिच्या लग्नाला आम्ही इस्लामाबादला यायचंच आहे. आमिर पुन:पुन्हा मला सांगू लागला की, त्याला त्याच्या बेगमला घेऊन अजमेर शरीफला यायचं आहे. तिथून मी ताजमहाल बघणार आणि मग सरळ नाशिकला येणार तुझ्या घरी. अतिकच्या ढाका विद्यापीठातल्या फार्मसी विभागात व्याख्यान द्यायला त्याने मला बोलवायचं असंही आमचं ठरलं.
वर्गातला शेवटचा दिवस. अभ्यासक्रमाबद्दल अभिप्राय व्यक्त करण्याचं शेवटचं सत्र चालू आहे. सगळेच अतिशय भावुक झालेले. एखाद्या दीर्घ स्वप्नासारखे साडेतीन महिने भुर्रकन उडून गेलेले. अभिप्राय द्यायला आमिर उभा राहतो. अभ्यासक्रमाबद्दल बोलून झाल्यावर माझ्याकडे आणि अतिककडे बघत म्हणतो, ‘‘ज्या माझ्या शेजारी देशाबद्दल मला प्रचंड आकर्षण वाटतं, पण परस्पर वैमनस्यामुळे मी जिथे कधीही जाऊ शकणार नाही त्या भारतातल्या कुणाशी माझी मैत्री होईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. जन्मजात खुन्नस असलेल्या बांगलादेशमधला कुणी माझा मित्र बनेल हे केवळ अशक्य होतं. ते माझे भारतीय आणि बांगलादेशी मित्र ही या अभ्यासक्रमातील माझी सगळ्यात मोठी कमाई आहे. मृदुला आणि अतिक, तुम्हाला मी कधीही विसरू शकणार नाही.’’ तो हे बोलून खाली बसला तेव्हा तिघांनाही वर्ग धूसर दिसू लागलेला..
आम्ही सगळे आपापल्या घरी परत आलो आणि दिनक्रमात अडकलो; पण मी अजूनही वाट पाहते आहे.. अतिकच्या विद्यापीठात भाषण द्यायला जाण्याची.. आमिर आणि त्याच्या बेगमची मेहमान नवाझी माझ्या घरात करण्याची आणि मेहरीनच्या शादीमध्ये इस्लामाबादला जाऊन शरिक होण्याची..
(क्रमश:)
प्रा. डॉ. मृदुला बेळे -mrudulabele@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Overseas education experience
First published on: 25-07-2015 at 01:03 IST