मी आजोबा झालो तेव्हा अतिशय आनंदात होतो. नातवाशी- चिन्मयशी बोलत होतो, जे त्या बाळाला अर्थातच काही कळत नव्हतं, पण तो हसला की माझा आनंद द्विगुणित होत असे. तो हळूहळू मोठा होऊ लागला. आधी त्याला मांडीवर घे, मग खांद्यावर घे, त्याच्यासाठी गाणं म्हण, काऊचिऊ दाखव, असं करीत दिवस छान जात होते. तो बोबडे बोल, कविता म्हणू लागला. माझ्यातल्या आजोबाला आनंद नव्हे, परमानंद झाला! आणखी काही वर्ष गेली.. नातू दहावीत गेला. या सर्व काळात बाहेरच्या जगातसुद्धा खूप बदल होत होते. साधे बटणांचे फोन जाऊन आता स्मार्टफोन प्रत्येकाच्या हाती खेळत होते. २०१४ मध्ये दिवाळीत माझ्या मुलीनं मलाही स्मार्टफोन घेऊन दिला. खरंच सांगतो, पहिले दोन महिने तो फोन तसाच डब्यात पडून होता! माझं आपलं छोटय़ा फोनवर बरं चाललं होतं. एके दिवशी मुलीला आठवण झाली आणि तिनं विचारलं, ‘‘पप्पा, फोन वापरताय ना तुम्ही?..’’ मी काय उत्तर देणार! मुलीनं काय ते ओळखलं आणि नातवाला आमच्याकडे पाठवून दिलं.. आणि आधी जाणवलं नाही, पण जणू त्याच्या रूपानं तिनं एक उत्तम शिक्षकच मला धडे देण्यासाठी पाठवला होता!
नातू मला तडक नेटवर्क सुविधा देणाऱ्या कंपनीच्या दुकानात घेऊन गेला. मोबाइलमध्ये सिमकार्ड घातलं, इंटरनेट सुविधा घेतली. आम्ही घरी आलो आणि व्हॉटस्अॅप, फेसबुक, ई-मेल सर्वकाही त्यानं डाऊनलोड करून दिलं. इंग्रजीबरोबर मराठी टायपिंग कसं करायचं हे तो मला दाखवू लागला. तो हे सर्व ज्या वेगानं करत होता, ते पाहून मी बघतच राहिलो! काही वर्षांपूर्वी ज्याला मी अंगाखांद्यावर खेळवत होतो, तोच का हा? आता शिकवणाऱ्याची भूमिका त्यानं घेतली होती आणि मी झालो होतो जणू चिमुरडा विद्यार्थी!




हेही वाचा >>> मोडला नाही कणा..
अडखळत, चुकत माझं शिक्षण सुरू झालं. नातवानं एक गुरुमंत्र दिला, ‘आजोबा सुरुवातीला तुम्ही चुकाल, तरी वापरत जा. हळूहळू जमेलच तुम्हाला!’ खरोखरच चुकतमाकत जमू लागलं. मग रोजच्या घडामोडींवर वाचक पत्रं लिहून वृत्तपत्रांना पाठवू लागलो. पहिलं पत्र जेव्हा ‘लोकसत्ते’च्या ‘लोकमानस’मध्ये छापून आलं, तेव्हा सकाळीच अभिनंदनाचे फोन खणखणू लागले. मग मला पत्र लिहिण्याचं व्यसन लागलं म्हणा ना! पत्रांबरोबर लेख लिहून पाठवणं सुरू केलं. ‘चतुरंग’ पुरवणीत, ‘लोकप्रभा’मध्येही लिखाण छापून आलं आणि त्याचं मानधनसुद्धा मिळालं! याचं श्रेय माझ्या नातवाला- नव्हे माझ्या गुरूला जातं.
मी शाळेत होतो तेव्हा, म्हणजे साठ-पासष्ट वर्षांपूर्वी आमचे गुरुजी नेहमी म्हणत असत, ‘माणूस शेवटपर्यंत विद्यार्थी असतो.. शेवटपर्यंत तो शिकत असतो’. त्याची प्रचीती मला आता आली! हा लेख मी लिहितोय ‘गुरुदक्षिणा’ म्हणून. आमच्या ‘चिन्मयदादा’साठी! करोनाच्या टाळेबंदीत आणि नंतरही आमचं जीवन असं सुसह्य केल्याबद्दल तुमचे आभार गुरुदेव!