वयाच्या एका प्रगल्भ वळणावर आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन काय, हा प्रश्न पडतोच. अर्थात वयाचं हे प्रगल्भ वळण येण्याचं वय प्रौढच असलं पाहिजे असं नाही. ज्ञानेश्वर माऊलींना अगदी किशोरावस्थेतच हा प्रश्न पडला होताच.

‘जीवन की आपाधापी में कब वक्त मिला

कुछ देर कहीं पर बैठ कभी यह सोच सकूँ

जो किया, कहा, माना उसमें क्या बुरा भला’ असा विचार हरिवंशराय बच्चन यांच्यासारख्या द्रष्टय़ा कवीनंही बोलून दाखवला होता.

‘का?’ असा प्रश्न विचारला की मग आयुष्याची उत्तरं मिळतात. ‘का?’ असा प्रश्न पडल्याशिवाय तुम्हाला आयुष्याच्या सत्याच्या दर्शनाचा मार्ग खुला होत नाही. त्यामुळे आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर, निर्णयांपाशी ‘का?’ असा प्रश्न विचारलाच पाहिजे, असं मी किमान माझ्यापुरतं तरी ठरवलं आहे. माझ्या अस्तित्वाचं प्रयोजन काय? हा प्रश्न मला पडला तिथून ही उत्तरे शोधण्याचा हा प्रवास सुरू झालेला आहे. मी कविता लिहिते.. का लिहावी मी कविता? कवितासंग्रह प्रकाशित केला, तेव्हा का करायचाय मला कवितासंग्रह प्रकाशित? या प्रश्नाशी मी थांबले. त्याचं उत्तर सापडल्यावरच मी तो प्रकाशित केला. काहीही करताना, वागताना ‘का?’ असा प्रश्न विचारून मी माझीच उत्तरं शोधल्यानं पुढचं आयुष्य सुकर झालं. माझ्या कृतींचे, निर्णयांचे परिणाम मला हवे तसे झाले नाहीत तरीही मी इतरांना दोष देऊच शकत नाही आता.

आयुष्याची इयत्ता जसजशी वाढत जाते तसतशी अशा प्रकारच्या अनुभवांच्या गाठोडय़ांच्या ढिगांची उंची वाढत जाते. कालानुरूप माणसं बदलतात, माझ्या आयुष्यात वीस वर्षांपूर्वी आलेली एखादी व्यक्ती आजही तीच आणि तशीच राहील याची शाश्वती मी नाही देऊ शकत. (माझ्यातदेखील बदल झालेले नसतील का?) उलट ती व्यक्ती तेव्हा जशी होती तशीच आजही असायला हवी, असं म्हणणं बालिशपणाचं ठरेल. (हे स्वत:लाही लागू आहे) त्या एखाद्या व्यक्तीच्या गरजा बदलतात, तिचे प्राधान्यक्रम बदलतात, तिच्या मेंदूतली संप्रेरकं बदलतात. अशा वेळी ती व्यक्ती आज जर बदलली असेल तर माझं माझ्यापुरतं एक तत्त्वज्ञान मी आत्मसात करून ठेवलेलं आहे, ज्या तत्त्वज्ञानानं मला कायम मन:शांती दिलेली आहे. पूर्वी खूप चांगलं वागलेली, भरभरून प्रेम करणारी व्यक्ती आज कालानुरूप बदलली असेल, तर त्याचं दु:ख करत बसायचं आणि अशा किती दु:खाच्या निरगाठींचा काच आयुष्यभर सोसायचा, यापेक्षा तेव्हा तेव्हा, त्या त्या वळणांवर त्या व्यक्तीनं मला किती आनंदाचे क्षण ओंजळीत भरून दिले, तिनं माझ्यासाठी काय काय चांगलं केलं आहे, हे आठवलं तर त्या व्यक्तीचा आलेला राग कुठच्या कुठे मावळून जातो, मनात त्या व्यक्तीप्रति कृतज्ञतेचे भाव जागे होतात. त्या व्यक्तीला न्याय दिला जातो. राग-क्रोध यांसारख्या विकारांपासून आपण मोकळं राहू शकतो.

याही पलीकडे जाऊन बुद्धाच्या ‘सम्यक’तेच्या तत्त्वज्ञानाशी आयुष्याच्या पूर्वार्धातच ओळख झाली तर ते उजळून टाकण्याची प्रचंड मोठी ताकद त्या तत्त्वज्ञानात आहे. जपानी लघुकथेचा पितामह अकुटाग्वाच्या तत्त्वानुसार या जगात पाप- पुण्य, चूक- बरोबर, चांगलं- वाईट असं काहीच नसतं. ती निव्वळ घटना असते. त्याची आपल्या सोयीनं आपण वर्गवारी करतो ती केवळ साक्षेपी/ सम्यक नसल्यानंच. त्यामुळे माझ्या भोवतालाबद्दल मी न्यायाधीश होण्यात अर्थ नाही.

एक सर्जनशील व्यक्ती म्हणून मी माझा भवताल व्यापक करायला हवा. अगदी ज्ञानेश्वर, तुकारामांइतका नाहीच होणार माझ्याकडून तो; पण तो मी जितका व्यापक करेन तितकी माझ्या निर्मिती मोठी, अक्षय होईल.. मी गेल्यावर मी माझ्या जगासाठी काय ठेवून जाणार किंवा काय ठेवून जायचं आहे, याचा विचार मला माझ्या आयुष्याचं प्रयोजन शोधून देण्यात सहाय्यीभूत ठरला.

अगदी अखेरीस सांगायचं झालं तर माझी आजी म्हणायची, ‘आपलं राखावं आणि इतरांना यश द्यावं..’ सामान्य व्यवहारी जगात या तत्त्वानं माझ्या अंतर्मनातली शांतता कधी ढवळू दिलेली नाही!

pethkar.bhagyashree3@gmail.com