एका बाजूला धर्ममान्य, पण अन्याय्य आणि शोषण अशा परंपरेतल्या अनेक गोष्टींना नकार देत बसवेश्वरांनी नऊशे वर्षांपूर्वी वीरशैव तत्त्वज्ञानातून क्रांतिकारक परिवर्तनाचा आग्रह धरला, परंतु त्यांची वाट रक्तरंजितच राहिली आणि आजही ते परिवर्तन खऱ्या अर्थानं झालेलं नाहीच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या भूमीवर शिवोपासना फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. पाशुपत, कापालिक, काश्मिरी शैव, कालामुख, नाथ, वीरशैव असे अनेक शिवोपासक संप्रदाय साऱ्या भारतभर उदयाला आलेले दिसतात. मुख्यत: दक्षिण भारतात अधिक प्रभावी असलेला वीरशैव संप्रदाय शिवगणांनी पाच आचार्याच्या रूपाने प्रत्येक युगात प्रतिष्ठित केला, अशी वीरशैव सांप्रदायिकांची श्रद्धा आहे.
बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात बसवेश्वरांच्या रूपाने या संप्रदायात एक थोर महात्मा निर्माण झाला. कर्नाटकातल्या बागेवाडी नावाच्या अग्रहारात बसवेश्वरांचा जन्म झाला. घरात पिढय़ान् पिढय़ांची शिवभक्तीची परंपरा होती. वडील अग्रहार सभेचे प्रमुख होते. बागेवाडीला असतानाच जातवेद मुनी यांनी बसवेश्वरांना वीरशैव संप्रदायाची दीक्षा दिली, असं मानलं जातं. पुढे कूडलसंगम या प्रसिद्ध शिवक्षेत्रात बसवेश्वरांनी कूडलसंगम अग्रहाराचे प्रमुख ईशान गुरू यांच्या मार्गदर्शनाने संस्कृत आणि तमिळ ग्रंथांचा अभ्यास केला. आगम ग्रंथ आणि न्यायशास्त्र त्यांनी अभ्यासलं. वेद आणि इतिहास-पुराणांबरोबरच दर्शनशास्त्रांनाही त्यांनी जाणून घेतलं.
एकीकडे अध्ययनानं दृष्टी विशाल करीत असतानाच कलचुरी राजा बिज्जलाच्या आधिपत्याखाली प्रथम सामान्य लेखापाल आणि पुढे राजाचे कोषाध्यक्ष आणि मुख्य प्रधान अशा पदांवर ते आरूढ झाले.
बसवेश्वरांच्या लौकिक आयुष्यातल्या या राजकीय सामर्थ्यांपेक्षा किती तरी मोठं असं त्यांचं आंतरिक भक्तिसामथ्र्य होतं आणि त्यांचं चरित्र या दोन्ही सामर्थ्यांच्या संवाद-संघर्षांतूनच पुढे गेलेलं दिसतं. समकालीन धर्मजीवनाचा विचार त्यांनी व्यक्तिगत ईश्वर चिंतनाच्या जोडीनेच सातत्याने केला. अंधविश्वास, कर्मकांड, जाती-वर्णभेद, उच्चवर्णीयांकडून धर्माच्या नावाने होणारं बहुजनांचं शोषण, अनेक देवदेवता आणि त्यांच्या नावाने रुजलेल्या अनेक अनिष्ट प्रथा-परंपरा या सर्वाच्या मुळाशी जात ते समाजव्यवस्थेपर्यंत पोचले. धर्मविचाराच्या आधारे व्यवस्थेतलं परिवर्तन करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न म्हणजे अंतर्दृष्टी असलेल्या विद्रोहाच्या भारतीय परंपरेचाच एक अभिनव आविष्कार होता.
कर्नाटकात कल्याणीनगरीत बसवांनी ‘अनुभव मंडप’ या नावाने एका भक्तिकेंद्राची स्थापना केली. सारे ‘शिवशरण’ या अनुभव मंडपाशी जोडले गेले. श्रेष्ठ आध्यात्मिक गुरू अल्लमप्रभू हे त्या मंडपातल्या शून्य सिंहासनाचे स्वामी होते. त्या केंद्राशी जोडल्या गेलेल्या शिवशरणांच्या चिंतनातून कन्नड साहित्यात मौलिक ठरलेल्या वचन साहित्याची निर्मिती झाली.
बसवांनी अनुभव मंडपाच्या रूपानं एका जातीमुक्त समाजाचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. त्यांच्याभोवती हडपद अप्पण्णासारखा न्हावी होता. मेडर केंतय्यासारखा बुरुड होता. मादर चन्नय्यासारखा चांभार होता. मडिवाळ वाचय्यासारखा परीट होता. मोलिगे मारय्यासारखा मोळीविक्या होता. किन्नरी बोमय्यासारखा सोनार होता आणि डस्क्क्या बोमय्यासारखा डोंब होता. कुणी आरसे विकणारे, कुणी दोर बनवणारे, कुणी शेतात राबणारे- नाना व्यवसाय करणारे नाना जातींचे लोक बसवांच्या अनुभव मंडपातले शिवशरण होते. शिवाय अक्कमहादेवी, रायम्मा, आयदक्की लक्कम्मा, मुक्तायक्का, रेमव्वे, हिंगम्मा, सोमम्मा अशा अनेक शिवशरणीही होत्या. महाराष्ट्रात नामदेव-ज्ञानदेवांच्या वारकरी संप्रदायाची सर्वसमावेशक अशी विठ्ठल भक्तीची परंपरा तेराव्या शतकातली. बसवेश्वरांचा हा जातिनिरपेक्ष शिवभक्तांचा मेळा कर्नाटक भूमीवर त्याआधीच्या शतकातच जमला होता.
बसवेश्वरांच्या कार्याची महत्ता अशी, की समाजव्यवस्थेतली विषमता दूर करण्याचा मूलभूत प्रयत्न त्यांनी अध्यात्म मार्गाने केला.
वधस्तंभ सांभाळणारा मांग
आणि अभक्ष्य ते भक्षण करणारा महार,
यांचे कूळ कशाला विचारता बरे?
सर्व जीवात्म्यांचे कल्याण चिंतणारे
कूडलसंगम देवाचे शरण
हेच कुलवंत खरे!
असं बसवांचं एक वचन आहे. त्यांच्यासाठी ईश्वराचे भक्त ते सारे सारखेच आहेत.
हरिजनवस्ती आणि शिवालय-भूमी एकच एक
शौचाचे अन् आचमनाचे पाणी एकच एक
सहा दर्शनांपासून मिळते मुक्तीचे फळ एक
कूडलसंगमदेव जाणती ते तर सारे एक
बसवेश्वरांच्या या धारणेला प्रत्यक्ष कृतीची जोड होती. अनुभव मंडपाच्या आधारे जातीमुक्त समाजनिर्मितीची एक चळवळच त्यांनी उभारली. त्यांचे शिवशरण हे या चळवळीचे आधार होते. चारित्र्यशुद्धता आणि श्रमप्रतिष्ठा ही त्यांच्या कृतिशीलतेची दोन मुख्य परिमाणं होती. ‘कायकने कैलास’ म्हणजे कायक अर्थात कष्ट करून स्वत:चा उदरनिर्वाह करणं आणि त्यातून मुक्तीकडे जाणं, आपल्या श्रमातून मिळालेलं उत्पन्न गरजेपुरतं वापरून उरलेलं समाजाच्या कल्याणासाठी वेचावं अशी कायकत्वाची कल्पना आहे.
बसवेश्वरांनी याद्वारे श्रमांना प्रतिष्ठा दिली. भिक्षा मागणं गैर मानलं. व्यवसाय कोणीही कोणताही करावा, पण तो सचोटीनं करावा असा त्यांचा आग्रह होता. चारित्र्य हे ईश्वराजवळ जाण्याचं एक साधन आहे असं त्यांनी मानलं.
देवलोक, मृत्युलोक अन्य नसे साच।।
सत्यवचन देवलोक
असत्य तो मृत्युलोक
सदाचार हाच स्वर्ग,
अनाचार-नरक
कूडलसंगमदेव यास साक्ष बा तुम्हीच।
बसवांची अशी किती तरी वचनं आहेत! मार्मिक आहेत. अचूक दृष्टान्त देणारी आहेत. संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून विशाल मानवी करुणेनं परिपूर्ण आहेत. भक्तीच्या माधुर्यानं ती भरलेली आहेतच, पण देहालाच देवालय मानून ऐहिक जीवन शुद्ध करीत राहण्याच्या ऊर्मीनंही ती भारलेली आहेत. एका बाजूला धर्ममान्य, पण अन्याय्य आणि शोषण अशा परंपरेतल्या अनेक गोष्टींना नकार देत बसवेश्वरांनी नऊशे वर्षांपूर्वी वीरशैव तत्त्वज्ञानातून ज्या क्रांतिकारक परिवर्तनाचा आग्रह धरला, ते परिवर्तन त्यांच्या काळात सर्वमान्य होणं अवघड होतं. त्यामुळे त्यांची वाट रक्तरंजितच राहिली आणि आजही ते परिवर्तन खऱ्या अर्थानं झालेलं नाहीच. त्यामुळे त्यांची वाट वहिवाटीची न राहता उपेक्षित राहिली. द्रष्टय़ा पुरुषांचं भागधेय कधी कधी असंही असतं!

More Stories onधर्मReligion
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religious reform
First published on: 14-03-2015 at 01:01 IST